या दिग्गज खेळाडूंचं धोनी बरोबर एक विचित्र साम्य आहे…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताचा माजी कर्णधार आणि जबरदस्त यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याने १५ ऑगस्ट २०२० रोजी निवृत्ती घोषित केली. जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असणाऱ्या धोनीने असं अचानक निवृत्ती जाहीर करणं, अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं.
धोनीसारख्या अफलातून खेळाडूला, अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळावी अशी इच्छा सर्वच क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. धोनीच्या झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सुद्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे तशी मागणी केली आहे.
मात्र, निरोपाचा सामना न खेळणारा धोनी हा एकटाच यशस्वी खेळाडू नाही. इतर काही भारतीय दिग्गजांना सुद्धा असा सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
कोण कोण आहेत, ते दिग्गज, हेच आज जाणून घेऊयात..
१. नजफगढचा नवाब.. धडाकेबाज सेहवाग –
अनेक वर्षं वीरेंद्र सेहवाग म्हणजे आपला लाडका वीरू याने भारतीय संघातील सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली. १९९९ मधील एप्रिल महिन्यात त्याने वनडे संघात पदार्पण केलं. पुढे २००१ साली त्याने कसोटी संघातही स्थान मिळवलं.
मार्च २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला. मात्र त्या मालिकेत त्याला दुसऱ्या सामन्यासाठी संघातून वगळण्यात आलं.
वीरू फॉर्ममध्ये असणं किंवा नसणं याने फार फरक पडत नसे. तो संघात असल्याने भल्याभल्या गोलंदाजांना धडकी भरत असे. कसोटी सामन्यांमध्ये २ त्रिशतकं झळकावणाऱ्या ४ फलंदाजांपैकी एक आहे वीरेंद्र सेहवाग!
मात्र, २०१३ मध्ये गमावलेलं संघातील स्थान त्याला पुन्हा मिळवता आलं नाही. अखेर २०१५ च्या ऑक्टोबर महिन्यात त्याने निवृत्तीची घोषणा केली.
२. भारताच्या विश्वविजयाचा शिल्पकार युवराज –
भारताने २०११ साली तब्बल २८ वर्षानंतर वनडे क्रिकेट विश्वचषक जिंकला. ३६२ धावा आणि १५ विकेट्स अशी अप्रतिम अष्टपैलू कामगिरी युवराज सिंगने या स्पर्धेत केली होती. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली २००० साली भारताने युवा विश्वचषक जिंकला होता.
त्या स्पर्धेतही युवराजने मालिकावीर खिताब मिळवला होता. ऐन तारुण्यातच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून युवराज नावारूपाला आला. त्याने भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत.
मात्र, कर्करोगाच्या दुर्धर आजारामुळे त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागले. मात्र या योध्याने खणखणीत कामगिरी करून संघात पुनरागमन सुद्धा केलं. मात्र जून २०१७ नंतर तो संघात स्थान टिकवू शकला नाही.
अखेर २०१९मध्ये युवराजने निवृत्तीची घोषणा केली.
३. व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण –
व्ही व्ही एस अर्थात, व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण हा अनेक भारतीयांच्या गळ्यातील ताईत होता. वनडे कारकिर्दीत फारसा प्रभावशाली न ठरलेला लक्ष्मण कसोटी संघातील एक महत्त्वाचा खांब होता.
महत्त्वाच्या क्षणी तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन सामने वाचवण्याची करामत लक्ष्मणने अनेकदा केली आहे. १९९६ ते २०१२ याकाळात त्याची उत्तम कारकीर्द रंगली.
जानेवारी २०१२ मधील अखेरच्या मालिकेनंतर मात्र त्याला संघातून वगळण्यात आलं. ऑगस्ट महिन्यापर्यंत त्याला संघात पुन्हा संधी मिळाली नाही. अचानक त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा संधी देण्यात आली.
मात्र त्याने पुनरागमन करण्याची ही संधी नाकारली. ही मालिका न खेळता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय लक्ष्मणने घेतला. त्याच्या चाहत्यांना मात्र त्याच्या या निर्णयाचे दुःख झाले.
४. अंतिम सामन्यातील ‘अनसंग’ हिरो गौतम गंभीर –
कप्तान धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ साली टी-२० विश्वचषक आणि २०११ साली वनडे विश्वचषक भारताने जिंकला.
या दोन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर गौतम गंभीर याने उत्तम कामगिरी केली होती. २००७ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात ५४ चेंडूत ७५ धावांची खेळी त्याने केली. त्याची ही उत्तम कामगिरी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळवून देऊ शकली नाही.
२०११च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात २ बाद ३१ अशा दयनीय स्थितीतून भारतीय फलंदाजी सावरणारी खेळी गंभीरने खेळली. अवघ्या ३ धावांनी त्याचं शतक हुकलं. या सामन्यातही सामनावीर हा पुरस्कार त्याला मिळू शकला नाही.
गौतम गंभीर निवृत्तीच्या वेळी सुद्धा असाच कमनशिबी ठरला. २०१६ सालच्या जानेवारी महिन्यात त्याने भारताकडून अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याला संघातील स्थान गमवावे लागले.
अखेर ३ डिसेंबर २०१८ रोजी त्याने त्याची निवृत्ती घोषित केली.
५. “द वॉल” राहुल द्रविड –
भारताचा एक यशस्वी कर्णधार, उत्तम खेळाडू आणि क्रिकेटमधील खरा जंटलमन म्हणून द्रविड कायम नावाजला गेला. संघातील कुठलीही जबाबदारी स्वीकारणं त्यानं कधीच नाकारलं नाही.
प्रसंगी यष्टिरक्षणाचे ग्लोज चढवून तो यष्ट्यांमागे उभा राहिला. कधी सलामीवीराच्या अनुपस्थितीत त्याने संघासाठी सलामीवीराची भूमिका सुद्धा निभावली. कर्णधार म्हणून अनेक उत्कृष्ट खेळाडू त्याने घडवले.
संघासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या द्रविडला निवृत्तीनंतर योग्यप्रकारे निरोप मात्र मिळाला नाही. जानेवारी २०१२ मध्ये अखेरची कसोटी द्रविडने खेळली.
त्याच वर्षीच्या मार्च महिन्यात, कुणाच्या ध्यानीमनीही नसताना त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आपली संपूर्ण कारकीर्द निस्वार्थीपणे संघासाठी घालवल्यानंतर, एखादा निरोपाचा सामना किंवा फेअरवेलची अपेक्षा सुद्धा या महान खेळाडूने ठेवली नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.