Site icon InMarathi

लातूर म्हणजे फक्त भूकंप आणि दुष्काळ?! तुम्हाला खरं लातूर माहितीच नाहीये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अनुप कुलकर्णी

===

सोशल मीडियामुळे अनेक गावातल्या अनेकांशी मैत्र जुळलं आहे. त्यातही पुण्यामुंबईतली मंडळी जास्त. संभाषणात “तुझं गाव कोणतं?” हा प्रश्न हमखास विचारला जातो. आणि मी अभिमानाने सांगतो..”लातूर”.

असं आढळून आलंय की लातूर म्हटल्याबरोबर लोकांचा जरा सूर बदलतो. कारण लातूर म्हणजे भूकंप आणि दुष्काळ इतकंच त्यांना ठाऊक असतं. पण त्यापलिकडेही लातूरमध्ये खूप काही आहे हे मला बऱ्याच दिवसांपासून सांगायचं आहे.

१६ ऑगस्ट म्हणजे आमच्या लातूरच्या निर्मितीचा दिवस.

 

thewire.in

 

लातूरचा इतिहास थेट राष्ट्रकूट काळापासूनचा सांगितला जातो. राजा अमोघवर्ष याने ‘लट्टालुर’ शहराची स्थापना केली. त्याचाच पुढे लातूर हा अपभ्रंश झाला. या शहरावर नंतर अनेक सत्तांनी राज्य केले.

राष्ट्रकूट, सातवाहन, शक, चालुक्य, देवगिरीचे यादव, दिल्लीचे सुलतान, बहामनी, आदिलशाही, मुघल आणि नंतर सतराव्या शतकापासून निझामाच्या हैदराबाद संस्थानात हे शहर होते.

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळूनही आमच्या नशिबात मात्र त्याचा आनंद नव्हता. वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली रझाकार सेनेशी लढा देऊन भारतीय सैन्य आणि क्रांतिकारकांनी १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळवले.

लातूर जिल्हा हा कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला आहे. साहजिकच येथे तिन्ही राज्यांचा संस्कृतीमिलाफ झालेला आहे. इथे प्रामुख्याने मराठी, कन्नड, तेलगू आणि उर्दू भाषा बोलल्या जातात.

खाद्यसंस्कृती इतर प्रदेशांपेक्षा निराळी आहे. इथले काही पदार्थ तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाहीत. इथली बोलीभाषा सुद्धा अगदी निराळी आहे. मराठी वाक्य कानडी पद्धतीने हेल काढून बोलल्यामुळे लातुरी माणूस कुठेही गेला तरी ओळखू येतो.

विशेष म्हणजे आम्हाला आमच्या गावाची ओळख लपवणे आवडत नसल्याने आम्ही ‘लातुरी’ हे विशेषण अभिमानाने मिरवतो.

 

youtube.com

 

स्वतंत्र झाल्यापासून लातूर आणि उस्मानाबाद हे एकच जिल्हे होते. पण लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी इथल्या नेत्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद पासून विभक्त होऊन लातूर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.

हा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय किती योग्य होता त्याची प्रचिती आज येत आहे. उस्मानाबादची म्हणावी तशी प्रगती झालेली दिसून येत नाही, मात्र तुलनेने लातूर विकासाचे एक एक टप्पे पार करत आहे.

माझे स्वतःचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यात असले तरी, आणि शेतीवाडी तिथे असली तरी जन्मापासून लातूरमध्ये वाढल्याने माझी ओळख ‘मी लातूरकर’ अशीच करून देतो.

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या मानाने औरंगाबाद नंतर लातूरच झपाट्याने प्रगती करत आहे. इथल्या ९६ टक्के गावांमध्ये एसटी पोचते. रेल्वेमार्गाने हा जिल्हा पूर्ण भारताशी जोडला जातो. इथे सुसज्ज विमानतळ सुद्धा आहे!

छोटे मोठे नॅशनल/इंटरनॅशनल ब्रँड्स आणि फुडजॉइंट्सनी आपापले आउटलेट इथे उभारले आहेत. मॉल्स, मल्टिप्लेक्स यांची रेलचेल आहे. माहीत नसेल तर सांगतो, लातूर महानगरपालिका आहे.

 

saamana.com

 

लातूरच्या इतिहासाला कधीही जातीय किंवा धार्मिक दंगलीचे गालबोट लागले नाही. सर्व समाज एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने येथे राहतात. याला कारणीभूत आमचे राजकीय नेते आहेत.

काँग्रेस असो वा भाजप, कुठल्याही नेत्यांनी जातीयतेचे राजकारण इथे केले नाही याचा आम्हाला गर्व आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या कुरबुरी सुरूच असतात मात्र कुठली आपत्ती आल्यास पक्षभेद विसरून सर्वजण एकत्र येतात.

आत्ताच सांगली, कोल्हापूर महापुराच्या घटनेवर आम्ही हे अनुभवलं आहे.

लातूर पॅटर्न बाबत काही बोलण्याची गरज आहे काय? महाराष्ट्रात पुण्यानंतर शिक्षणाचा दर्जा कुणी टिकवला असेल तर तो लातूरने. इतर कुठल्याच जिल्ह्यात नसतील तितकी शाळा, महाविद्यालये इथे आहेत.

मेडिकल, इंजिनिअरिंग पासून ते सर्वच क्षेत्रातील दर्जेदार उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था तुम्हाला लातूरमध्ये दिसतील. मागच्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड काढून पहा. दहावी बारावी परीक्षेत मेरिट मध्ये आलेले जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या जिल्ह्याचे आहेत.

आमचे लातूर पूर्वापार काळापासून एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. फक्त लातूरच नव्हे तर इथल्या तालुक्यांनाही मोठी बाजारपेठ लाभली आहे. एखाद्या मेट्रो सिटी एवढा इथला आडत बाजार आहे.

लातूर जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती असून इथल्या डाळी भारतात प्रसिद्ध आहेत. मागच्या काही वर्षांपासून सोयाबिन मुळे लातूर सर्वांच्या नजरेत आले आहे. इथले सोयाबीनपासून बनवलेले तेलाची भारतभर विक्री होत असते.

लातूर जिल्ह्यात दोन भुईकोट किल्ले दिमाखात उभे आहेत. उदगीर आणि औसा हे किल्ले आपल्या स्थापत्यकलेसाठी ओळखले जातात.

 

pinterest.com

 

त्याशिवाय पुरातन खरोसा लेणी, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर, रेणापूरचे रेणुका देवी मंदिर प्रसिद्ध आहेत.

पर्यटन स्थळांमध्ये चाकुरचे साईनंदनवन, औश्याचे बालाजी मंदिर, वडवळ नागनाथ येथील औषधी वनस्पतींचा डोंगर, हत्तीबेट, इत्यादी ठिकाणे आहेतच.

थोडक्यात काय तर आम्ही कुठल्याच क्षेत्रात कमी नाही. किंबहुना इतर जिल्ह्यांपेक्षा काकणभर सरसच आहोत.

मग शिक्षण असो वा क्रीडा, कला असो वा विज्ञान, संगीत असो वा सिनेमा प्रत्येक ठिकाणी लातूरकरांचे नाव तुम्हाला ठळक अक्षरात दिसल्याशिवाय राहणार नाही.

आता राहिला प्रश्न पाण्याचा. लातूरच्या बाहेरील अनेकांनी आम्हाला पाण्यावरून हिणवलं आहे पण आम्ही त्याचे वाईट वाटून घेत नाही. आम्ही १९९३ च्या भूकंपामधून सावरून परत पाय रोवून ठाम उभी राहिलेली माणसं आहोत.

 

newindianexpress.com

 

संकटांशी सामना करणे हे आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे आमच्याकडे पाणी नाही म्हणून कितीही अवहेलना केली तरी आम्ही शांतच असतो. निसर्गाचा असमतोल आम्ही स्वीकारून त्यातून मार्ग शोधत असतो.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर इतकं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version