नोबेल पासून वंचित ठेवली गेलेली पहिली भारतीय शास्त्रज्ञ आजही मायदेशात दुर्लक्षितच आहे…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात संशोधन क्षेत्रात किती लोकं काम करतात याची माहिती तशीही कमीच असते. मुळातच त्या क्षेत्रात ग्लॅमर नाही, खूप आर्थिक प्रगती होईल याची शाश्वती नाही. तसेच त्या क्षेत्रात सरकारचं नियंत्रण, हस्तक्षेप देखील खूप असल्याने त्याकडे लोकांचा ओढा देखील नाही.
भारतातली बरीच हुशार मुलं एकतर परदेशात जातात किंवा आयटी इंडस्ट्रीज मध्ये काम करतात. सध्या जर ही परिस्थिती असेल तर साधारण पन्नास – साठ वर्षांपूर्वी कशी परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.
त्यातूनही स्त्रीला दुय्यम मानणाऱ्या देशात संशोधन क्षेत्रात एखादी महिला काम करत असेल तर तिला कशा प्रकारची वागणूक मिळाली असेल?
संशोधन क्षेत्रातलं असंच एक दुर्लक्षित नाव म्हणजे विभा चौधरी. अणुभौतिकशास्त्रात महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं. केवळ स्त्री असल्यामुळे आणि सरकार सहीत इतर कोणाचाही पाठिंबा नसल्यामुळे त्यांनी केलेलं महत्त्वाचं संशोधन विस्मृतीत गेलं.
किंवा अगदी चुकीच्या वेळी त्यांचं काम झालं असं आपण म्हणू. त्या आजही लोकांना माहीत नाहीत. अगदी त्यांनी काम केलेल्या संशोधन संस्थांमध्ये देखील त्यांना किती आदराने आठवलं जात असेल याची कल्पना नाही.

अगदी नोबेल प्राईज मिळेल इतक्या तोडीच संशोधन करूनही त्यांना नोबेल तर सोडाच पण भारतातीलही कुठल्याही वैज्ञानिक संस्थेकडूनही संशोधनात्मक कार्यासाठी दिला जाणारा कोणताही पुरस्कार दिला गेला नाही.
भारतातल्या कुठल्याही सरकारने त्यांच्या कामाची दखल घेतली नाही. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी केवळ संशोधनासाठी वाहून घेतलं होतं. १९९१ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या संशोधनात कार्यरत होत्या.
विभा चौधरी यांचा जन्म बंगालमधील कलकत्त्यात १९१३ मध्ये झाला. त्यांना एकूण पाच बहिणी आणि एक भाऊ. त्यांचे वडील डॉक्टर होते तर आई ब्राह्मो समाजाची कार्यकर्ता.
विभाच्या आयुष्यावर ब्राह्मो समाजाच्या विचारांचा पगडा शेवटपर्यंत होता. १९३६ मध्ये त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्रामध्ये पदवी आणि पदविका मिळवली.
त्याकाळात भौतिकशास्त्र घेऊन एमएससी करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.
पोस्ट ग्रज्युएशन नंतर त्याच युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी डी.एम. बोस यांच्याबरोबर संशोधन चालू केले. त्यांच्याबरोबरच त्या बोस इन्स्टिट्युट मध्ये १९३८ मध्ये गेल्या. त्याचं संशोधन मेसोन वर होतं.

मेसोन म्हणजे अणु पेक्षाही लहान मूलकण, अणुच्या केंद्रात आढळणारा मूलकण. त्यांच्या या संशोधनासाठी लागायचे फोटोग्राफिक प्लेट्स.
त्याद्वारेच झालेल्या संशोधनावर त्यांनी लिहलेले तीन प्रबंध सायन्स साठी प्रसिद्ध असलेल्या नेचर मासिकात त्यावेळेस प्रसिद्ध झाले होते.
१९४० नंतर पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यामुळेच त्यांना संशोधनासाठी लागणारे फोटोग्राफिक प्लेट्स मिळेनासे झाले. म्हणून मग त्यांना संशोधन थांबवावे लागले आणि त्यांनी मॅंचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये पीएचडी करायचे ठरवले.
विभा चौधरी यांनी जे संशोधन चालू केले होते त्यासाठी त्या ज्या मेथड वापरायच्या त्याच मेथडचा वापर करून ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ सी.एफ. पॉवेल यांनी संशोधन केले.
आणि विशेष म्हणजे त्यांच्या संशोधनाला नोबेल प्राईज मिळाले. विभा चौधरी इथेही दुर्लक्षित राहिल्या.
१९४५ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ ब्लॅकेट यांच्याबरोबर त्या संशोधनात सहभागी होत्या. त्यावेळेस ब्लॅकेट हे ब्रम्हांडातील किरणांचा अभ्यास करत होते. त्यावरती त्यांचं काम चालू होतं.
विभा चौधरी त्यांना मदत करायच्या. कॉस्मिक रेज वर विभा चौधरी संशोधन करत होत्या. ब्लॅकेट यांनीही आपलं संशोधन ब्रह्मांडातील किरणांवरच चालू ठेवलं होतं.
१९४९ मध्ये विभा चौधरी यांनी आपला पीएचडी चा कॉस्मिक रेज वरचा थिसिस सादर केला. त्याच वेळेस ब्लॅकेट यांना त्यांच्या कॉस्मिक रेज वरच्या संशोधनसाठी नोबेल प्राईज मिळालं. परंतु यासाठी विभा यांनी दिलेले योगदान दुर्लक्षित राहिलं.
त्यानंतर त्या १९४९ मध्ये भारतात परत आल्या. इथे आल्यावर त्या “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई” येथे जॉईन झाल्या. डॉक्टर होमी भाभा यांच्या बरोबर अणूसंशोधन आणि कण भौतिकी यावर त्या काम करत होत्या.
भारतातल्या त्या पहिल्याच महिला संशोधक होत्या. १९५५ मध्ये इटली मध्ये पिसा येथे मूलकणांच्या संदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनातही त्या सहभागी होत्या.
१९५७ मध्ये त्या ‘फिजिकल रिसर्च लॅबरोटरी, अहमदाबाद’ येथे रुजू झाल्या. त्यावेळेस त्याचे प्रमुख होते डॉक्टर विक्रम साराभाई. त्यांनी डॉ. साराभाई यांच्याबरोबर ‘कोलार गोल्ड फिल्ड’ या संशोधनात सहभाग घेतला.

ज्यामध्ये भूमिगत असलेल्या उप अणूकणांचा शोध घेतला जात होता. ज्यासाठी एक ” कण डिक्टेटर “देखील तयार करण्यात आला होता. खाणींमध्ये खोल जाऊन अशा उपकणांचा शोध घेतला जायचा.
१९८० पर्यंत या प्रयोगावर काम चालू होते. भारतीय वैज्ञानिक हे करू शकत होते. परंतु पुढे सरकारकडून मिळणारा निधी कमी पडायला लागला. शेवटी निधीअभावी कण डिक्टेटर सोडून द्यावा लागला आणि प्रयोगही थांबवावा लागला.
विभा यांना खरंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी उत्सर्जनाचा अभ्यास करण्यात देखील रस होता. त्यासाठी माउंट अबू येथे एक केंद्र स्थापन करायचा त्यांचा मानस होता.
परंतु विक्रम साराभाई यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांना हे कार्य करता आले नाही. विक्रम साराभाई, विभा चौधरींना प्रयोगांसाठी प्रोत्साहन द्यायचे.
पुढे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये देखील नेतृत्व बदल झाले. भारतातील इतर सरकारी ऑफिसेस मध्ये असणारी नोकरशाही तिथेही सुरू झाली. विभा चौधरी यांना मुक्तपणे संशोधन करण्यास मनाई करण्यात आली.
शेवटी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि त्या परत कलकत्त्याला गेल्या. तिथे त्यांनी ‘साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ मध्ये काम करायला सुरुवात केली.
अगदी त्यांचा मृत्यू येईपर्यंत त्या त्याच इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होत्या. त्यांचा प्रबंध १९९० मध्ये त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स मध्ये छापला गेला.

विभा चौधरी यांनी आपले संपूर्ण जीवन केवळ संशोधनासाठी वाहून घेतलं होतं. त्यांनी कधीही लग्न केलं नाही आणि संसार मांडला नाही. त्यांचा संसार म्हणजे त्यांचे संशोधनच.
परंतु त्यांच्या संशोधनाला जो सन्मान मिळायला हवा होता तो मात्र त्यांना मिळाला नाही.
फिजिकल रिसर्च लॅबरोटरी मध्ये त्यांच्याबरोबर इतर जे शास्त्रज्ञ काम करत होते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, प्रतिष्ठित पद मिळाले, पण विभा मात्र त्यापासून वंचित राहिल्या.
भारतीय विज्ञान अकादमी कडून दरवर्षी अनेक शास्त्रज्ञांना पुरस्कृत केलं जातं. परंतु कधीही विभा यांना कुठलाही पुरस्कार मिळाला नाही.
अगदी २०१९ मध्ये भारतीय विज्ञान अकादमीने भौतिकशास्त्रात इंग्रजांच्या काळापासून आत्तापर्यंत काम केलेल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांची यादी दिली होती.
त्यामध्ये शंभर एक महिला शास्त्रज्ञांचे नाव आहे, परंतु त्यातही विभा चौधरी यांना स्थान नाही.
अगदी अलीकडे विज्ञान इतिहासकार राजिंदर सिंह आणि सुप्रकाश सी यांनी एक पुस्तक लिहिले आहे ज्याचं नाव आहे बिभा चौधुरी: अ ज्वेल उनाटर्डः द स्टोरी ऑफ अ इंडियन वुमन सायंटिस्ट’.
त्यामध्येच विभा चौधरी यांची माहिती मिळते. त्यामध्येच विभाच्या माहित नसलेल्या गोष्टी कळतात.

मॅंचेस्टर मध्ये असताना ब्लॅकेट यांना त्यांनी केलेल्या मदती बद्दल तिथल्या ‘ मॅंचेस्टर हेरॉल्ड ‘ या वर्तमानपत्राने विभा चौधरी यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना म्हटलं होतं,
“Meet India’s New Woman Scientist — She has an eye for cosmic rays”.
स्वतः विभा चौधरी यांना अनेक महिलांनी, मुलींनी भौतिकशास्त्राच्या संशोधनात सहभागी व्हावं असं वाटायचं. त्या म्हणायच्या –
“आज भौतिकशास्त्रात खूपच कमी महिला काम करत आहेत ही खरंच खेदजनक गोष्ट आहे. आताच्या विज्ञान युगात विशेषतः भौतिकशास्त्राचं महत्व वाढलेलं असताना महिलांना अणुऊर्जेचं महत्व माहित असणे गरजेचे आहे.
जर त्यांना अणु ऊर्जा कशी काम करतेय हे कळणार नाही तर त्याचा वापर कसा करायचा हे कसं कळेल?”
त्या हे म्हणून गेल्यात हे देखील कोणाला माहीत नाही इतक्या त्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. आणि ही फार लांबची ही गोष्ट नाही.
१९९१ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मुलींनी संशोधनात सहभागी व्हावं असं म्हणण्यासाठी देखील आधी त्यांच्या संशोधनाची माहिती सर्वांना व्हावी लागेल.
निदान यापुढे तरी अशी कोणती विभा चौधरी दुर्लक्षित राहू नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
अत्यंत साधी राहणी आणि केवळ संशोधनासाठी आपलं सारं जीवन व्यतीत करणारी विभा चौधरी खरोखरच विस्मृतीत गेलेली एक तारका आहे असंच म्हणावं लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.