चार पाय घेऊन जन्माला आलेल्या महिलेची चित्तथरारक कहाणी आणि तिचा संघर्ष!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जन्मतःच काहीतरी व्यंग घेऊन आलेले बालक आपण पाहतो. त्यांना आयुष्यभर ते व्यंग सोबत घेऊन रहावं लागतं. कधी हाता पायाला १२ बोटं असलेली मंडळी आपण पाहतो. कधी दोन डोके जोडलेली लोकही आपल्याला माहिती आहेत.
परंतु एकाच व्यक्तीला चार पाय आहेत आणि त्या व्यक्तीने आपले आयुष्य नॉर्मल लोकांसारखं जगण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा आपल्याला माहीत होईल तेव्हा नक्कीच त्याविषयी कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही.
ही घटना खरी घडलेली आहे, ती अमेरिकेतील टेक्सास मध्ये. ८ मे १८६८ मध्ये जन्माला आलेली मर्टल कॉर्बिन. जन्माला येताना चार पाय आणि दोन जननेंद्रिय घेऊन जन्माला आली.
खरंतर त्या दोघी जुळ्या बहिणी होत्या. परंतु एकीची वाढ आईच्या पोटात झालीच नाही. तिच्या शरीराचा फक्त कमरेखालचा भाग तयार झाला, जो मर्टलच्या शरीराशी जोडला गेला.
याचा अर्थ मर्टलला जे चार पाय होते त्यातले तिचे स्वतःचे फक्त दोनच होते. लाखात एखादी अशी घटना घडत असेल पण त्यामुळे मर्टल ही चार पायांची बाई म्हणूनच ओळखली गेली.
तिच्या बहिणीचे दोन्ही पाय पूर्णतः तयार झाले नव्हते. मर्टलच्या दोन पायांच्या मध्ये दोन छोटे पाय होते. त्या पायांवर मर्टलचा कंट्रोल होता. परंतु त्या दोन पायाने तिला चालता येणे शक्य नव्हते. उलट तिला त्या पायांचा त्रास व्हायचा.
मर्टलच्या प्रत्येक पायाला फक्त तीन बोट होती. तिची दोन्ही जननेंद्रियं ही व्यवस्थित काम करायचे. फक्त तिची मासिक पाळी एकदाच यायची.
तिच्यामध्ये हे व्यंग तिच्या आई-वडिलांमुळेच आले होते. ते दोघेही रक्ताचे नातेवाईक होते, म्हणूनच मर्टल अशी जन्मली असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. परंतु ही विसंगती फक्त मर्टलच्या वाट्याला आली. तिचे इतर भाऊ-बहीण हे नॉर्मल जन्माला आले.
चार पायांची मुलगी म्हटल्यानंतर तीच तिची लहानपणापासूनची ओळख झाली. त्यामुळेच ती प्रसिद्ध झाली. तिच्या या प्रसिद्धीचा वापर तिच्या वडिलांनी करायचा ठरवला.
तिला पाहण्यासाठी वेगवेगळे शोज ते करायला लागले. त्या शोज मध्ये ती आपला झगा वर करून आपले पाय दाखवायची. ती आपले दोन्ही छोटे पाय हलवून दाखवायची.
आपल्या या प्रसिद्धीचा फायदा तिने स्वतःसाठीही करून घेतला. ती राहायची छान. आपल्या चारही पायात कलरफुल सॉक्स घालायची त्याला साजेसे शूज घालायची. केवळ तिला बघायला लोक यायचे.
गावोगावी तिचे शोज आयोजित केले जायचे. तिने एक सर्कस देखील जॉईन केली होती. तिथेही तिचे कार्यक्रम व्हायचे. यातूनच ती त्यावेळेस आठवड्याला ४५० डॉलर्स कमवायची.
त्यावेळी टेक्सास मध्ये ती खूप प्रसिद्ध झाली होती. तिच्यासारखीच प्रसिद्धी मिळवायचा इतर लोकांनीही प्रयत्न केला.
ती जसजशी मोठी व्हायला लागली तसे लोकांना वाटायचं की हिच्या बरोबर कोण लग्न करेल? कारण चार पायांची मुलगी म्हणून ती प्रसिद्ध होती. अशा विचित्र मुलीचं लग्न होईल का? हा तेव्हा टेक्सास मध्ये चर्चिला गेलेला प्रश्न होता.
वयाच्या १९ व्या वर्षी मर्टलने क्लिंटल ब्लिकनेल या डॉक्टरशी लग्न केले. त्यानंतर थोड्याच दिवसात तिच्या डाव्या भागात दुखणे सुरू झाले. म्हणून ती डॉक्टरांकडे दाखवायला गेली, तेव्हा तिला समजले कि ती डाव्या बाजूच्या गर्भाशयाकडून गरोदर आहे.
याचं तिलाच आश्चर्य वाटलं , ती म्हणाली की,’ उजव्या बाजूच्या गर्भाशया कडून मी गरोदर आहे हे जर मला कळलं असतं तर मला आश्चर्य नसतं वाटलं.’ कारण तिने डाव्या बाजूच्या योनीचा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर केलाच नव्हता.
परंतु तिच्या बाबतीत ही मेडिकल किमया घडली. पण या गरोदरपणामुळे ती खूप अशक्त आणि आजारी झाली. दुर्दैवाने ते मूल जगलं नाही. तिला आठ आठवड्यानंतर गर्भपात करावा लागला.
परंतु त्यानंतर तिने पाच मुलांना जन्म दिला आणि ते अगदी व्यवस्थित नॉर्मल बाळासारखे जन्माला आले. विशेष म्हणजे तिच्या दोन्ही गर्भाशयामधून ही मुले जन्माला आली.
तीन उजव्या बाजूच्या गर्भाशयातून तर दोन डाव्या बाजूच्या गर्भाशयातून जन्माला आले. त्यांचं पालन-पोषणही मर्टलने व्यवस्थित केलं. ती आपल्या आयुष्यात समाधानी होती.
ती आपल्या वयाचा साठावा वाढदिवस दोनच दिवसात साजरा करणार होती. परंतु त्याआधीच तिला १९२८ मध्ये एक त्वचा विकार जडला होता. तिच्या उजव्या पायावरच हा त्वचा विकार झाला.
स्त्रेप्तोकॉक्कल नावाचा एक त्वचाविकार तिला झाला. आता विज्ञानाने त्या आजारावर औषध शोधले आहे. परंतु १९२० – ३० मध्ये या आजारावर कुठलंही औषध उपलब्ध नव्हतं.
आजाराचे निदान झाल्यावर आठवड्याभरातच तिचा अंत झाला. ६ मे १९२८ ला तिचा मृत्यू झाला.
ती गेली, याचीही तेव्हा बातमी झाली. अनेक डॉक्टर्स, संशोधक यांना तिच्या मृत्यूनंतर तिच्या शरीराची तपासणी करायची होती. तिचं मृत शरीर ताब्यात घेण्यासाठी देखील लोकांनी पैसे देऊ केले होते.
परंतु तिच्या नवऱ्याला मात्र हे मान्य नव्हते. म्हणूनच जेव्हा तिला दफन करण्यात आले तेव्हा तिच्या कबरीचे सिमेंट वाळेपर्यंत तिच्या कुटुंबातील कुणीतरी त्या कबरीजवळ पहारा देत असायचं.
जेणेकरून कुणीही येऊन तिची कबर खोदून तिचं शरीर चोरुन घेऊन जाऊ नये. जेंव्हा सिमेंट पूर्ण वाळलं तेंव्हाच तिच्या घरचे लोक तिथून गेले.
तिच्या वडिलांनी तिचं वर्णन करताना म्हटलं होतं की, ‘उन्हाळ्यातील दिवसाप्रमाणे ती सूर्यप्रकाशाइतकी तेजस्वी आणि आनंदी दिवसासारखी आनंदी असते.’
लहान असताना तिच्या वडिलांनी तिची खूप काळजी घेतली होती. अर्थात तिची मदतच त्यांना झाली होती. जन्मल्यापासून मृत्यू येईपर्यंत आणि मृत्यूनंतरही चर्चेत राहिलेली व्यक्ती म्हणून मर्टल सगळ्यांच्या लक्षात राहील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.