Site icon InMarathi

युद्धात धगधगणाऱ्या इंग्लंडमध्ये राहून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी झटणारी महाराष्ट्राची लेक!!

venu chitale feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी.. म्हणजे आपली आई आणि जन्मभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत.

आपली पिढी फार सुदैवी. आपल्यासमोर पारतंत्र्याच्या जोखडाची भीती नाही. परदेशी बंधनांचा काच नाही. काय करु? अवती भवती शत्रू अशी अवस्था नाही.

फार सुधारलेल्या काळात आपण जन्मलो. करिअर म्हणून हवं ते क्षेत्र निवडू शकतो. हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो. देशात, परदेशात कुठेही!! ना महायुद्ध भोगलं ना अणुबाँब पाहीले.

ती पिढी आता नामशेष झाली आहे, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, हसत हसत प्राणांची बाजी लावली. कसलीही अपेक्षा न ठेवता फक्त देशासाठी लढले.

ते देशासाठी लढले,ते अमर हुतात्मे झाले!!!  आपण फक्त त्यांच्या कथा कविता ऐकायच्या. कित्येक अनामिक लोक स्वातंत्र्याच्या पायथ्याशी बळी गेले.

आपल्याला फक्त कळसावरची नावं दिसतात. तंट्या भिल्ल, प्रितीलता वड्डेदार, मन्मथनाथ गुप्त ही नावं तर कित्येक जणांना ऐकायला सुद्धा आलेली नाहीत. अशापैकीच अजून एक नांव आहे वेणू दत्तात्रेय चितळे.

 

bbc.com

 

१९३९ साल.. दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजले. मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्रांनी एकमेकांविरुद्ध कंबर कसली. युद्ध कसंही असो…साधं किंवा मोठं त्याचे परिणाम नेहमीच वाईट असतात.

जिवीतहानी, वित्तहानी तर होतेच, पण त्याशिवाय इतरही अनेक दुष्परिणाम होतात. जपानला विचारा..जे काही लिटल बाॅयन त्यांच्या पदरात टाकलं, ते जपानला पिढ्यानपिढ्या भोगावं लागलं.

तर या महायुध्दाच्या काळात आशियाई लोकांना किती त्रास सोसावा लागला. युध्दजन्य परिस्थिती असताना ब्रिटनमध्ये समुद्रकिनारे धोकादायक ठरले होते. प्रवास करणं जीवघेणं संकट वाटत होतं.

२० वर्षाची वेणू आॅक्सफर्ड विद्यापीठात शिकत होती. तिनं स्वयंस्फूर्तीनं एअर रेड प्रिकाॅशन युनिटमध्ये प्रवेश केला.

 

thebetterindia.com

 

महायुध्दात नागरिकांना शत्रूच्या हवाई हल्ल्याची सूचना देणं, बाँबिंगची सूचना देणं, त्यांना मदत करणं, त्यांची सुटका करणं अशी कामं या युनिट कडू केली जात.

ती या युनिटची स्वयंस्फूर्त स्वयंसेवक होती. एक भारतीय तरुण विद्यार्थिनी हे जीवाच्या जोखमीचं काम करते ही किती कौतुकास्पद बाब होती!!!

नंतर ती बीबीसी म्हणजे ब्रिटीश ब्राॅडकास्टींग कार्पोरेशन च्या भारतीय विभागासाठी काम करु लागली. त्यासाठी ती लंडनला रवाना झाली. बीबीसी हिंदी विभागात तिची मुख्य कामं होती बातमीपत्राचं वाचन करणं, इतर कार्यक्रम सादर करणं.

लेखक आणि सहक्षेपण अधिकारी जाॅर्ज आॅरवेल यांची सहाय्यक म्हणून ती काम करत होती.

 

वेणूची जीवनकहाणी-

 

orwell.ru

 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावात वेणूचा जन्म झाला. ती आपल्या आई वडिलांचे सहावे किंवा सातवे अपत्य. खूप लहानपणी वेणूचे मातृपितृ छत्र हरपले. इतर नातेवाईक आणि भावंडांनी मिळून तिला वाढवलं.

पुण्यातील सर्वात जुनी मुलींची शाळा हुजूरपागा. तिथं तिनं शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतरच्या शिक्षणासाठी तिनं मुंबईत गावदेवी भागातील कोलंबा या मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला.

विल्सन कॉलेजमध्ये शिकत असताना तिला आफ्रीकन वंशाच्या जोहाना अँड्रीयाना या शिक्षिका लाभल्या. त्या केवळ शिक्षिकाच नव्हत्या, तर तिला गुरुस्थानी होत्या.

तिचं रंगभूमीवर असलेलं प्रेम पाहून त्याही थक्क झाल्या होत्या. तिची अभिनयातील उत्स्फूर्तता आणि भावोत्कट शैली त्यांना अतिशय आवडली. अनाथ वेणूला त्यांनी आपल्या पंखाखाली घेतलं.

बालवयात आई वडील गमावलेल्या वेणूला ही अशी अकल्पित माया करणारी गुरुमाता मिळाली होती. त्या वारंवार तिच्याकडं जायच्या. पुढं जोहाना यांनी आॅक्सफर्ड विद्यापीठात पत्रकारिता शिकण्यासाठी प्रवेश घेतला.

वेणूनं बहि:स्थ विद्यार्थिनी म्हणून त्यांच्यासोबत आॅक्सफर्ड गाठलं. वेणू फार उत्तम इंग्रजी लिहायची.

 

scroll.in

 

१९३७ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्यावेळी असं उत्तम लिहीणाऱ्या लोकांची एकदम मागणी वाढली. त्यात लंडनमध्ये राहणारी वेणू चितळे, मुल्कराज आनंद यांचा समावेश होता. ते त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे प्रवक्ते होते.

ब्रिटीश राजवटीविरुद्ध कडाडून विरोध करणारी धार असणारे शब्द त्यांच्याकडं होते. हिच ती योग्य वेळ होती, जेव्हा ब्रिटिश सत्ता उलथवण्यासाठी सर्वांनी सर्व पातळ्यांवरुन एकसाथ प्रयत्न करणं आवश्यक होतं.

ब्रिटिशांना या महायुद्धात शत्रुराष्ट्रांना हरवण्यासाठी लागणारं मनुष्यबळ भारतात मुबलक होतं.

शंभराहून अधिक वर्षं त्यांच्या जुलुमी राजवटीचा वरवंटा भारतीय सहन करत होते. आता हीच वेळ होती स्वातंत्र्य पदरात पाडून घेण्यासाठी इंग्रजांचं नाक दाबायची!!!

१९४० मध्ये वेणूनं बीबीसीच्या भारतीय विभागात प्रवेश केला. त्याचवेळी तिथं मुल्कराज आनंद, बलराज सहानी त्यांची पत्नी दमयंती, कपूरथळाची राजकुमारी इंदिरा देवी, श्रीलंकन कवी जेएम तंबीमुट्टू, आणि अँग्लो इंडियन जीवशास्त्रज्ञ, कवी केड्रीक डोवर हे लोक भेटले.

 

scroll.in

 

ही फळी अतिशय उत्तम लिहीणाऱ्या देशभक्तांची आणि डावी विचारसरणी असलेल्या लोकांची होती. वेणूनं नंतर इंडियन लीगमध्ये प्रवेश केला.

अखिल भारतीय महिला परिषदेत वेणूनं स्वतःची ओळख करून दिली ती अशी-

पाच हजार मैलांवरुन भारतीय महिलांना भेटायला आलेली महिला. तिनं हिंदू -मुस्लिम समस्या खूप व्यासपीठांवरुन मांडली.

वेणूनं खूपदा भारतातील बहुभाषिकत्वाचा मुद्दा मांडून सूचना केली होती की, आपण भारतीयांनी एकमेकांच्या भाषा शिकून घेतल्या, तर एकमेकांना समजून घेत एकोप्याने पुढं जाता येईल.

१९४७ साली वेणू चितळे भारतात परत आल्या. त्यांनी विजयालक्ष्मी पंडित यांच्या सोबत फाळणीच्या वेळी दिल्लीतील कँपमध्ये आलेल्या महिला व मुलांसाठी काम करायला सुरुवात केली.

त्यांनी आपलं पहीलं पुस्तक १९५० साली प्रकाशित केलं. आणि त्याचवर्षी चाटर्ड अकाउंटंट असलेल्या गणेश खरे यांच्याशी लग्न केलं. नंतर त्या पुण्यात रहायला गेल्या. विविध वर्तमानपत्रात त्यांनी बरंच लेखन केलं.

१९९५ साली त्यांचं निधन झालं. पण आजही त्या कितीतरी जणांना माहिती नाहीत. दुसऱ्या महायुद्धाच्या रणधुमाळीत बीबीसी वरुन केलेली त्यांची भाषणं त्यांच्या सहकाऱ्यांना माहीत होती.

भारतातून भाषण करणं थोडंसं अवघड होतं कारण भारत पारतंत्र्यात होता. खुद्द इंग्रजांच्या देशात त्यांच्याच रेडिओवर आपल्या लोकांसाठी भाषण करणं, त्यांच्यासाठी काम करणं हे महाकठीण होतं, पण वेणू चितळे यांनी ते केलं.

विस्मरणात गेलेल्या या शूर स्त्रीला एक मुजरा तर नक्की करु शकतो आपण!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version