Site icon InMarathi

ह्या मराठी योध्दयाने खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचला!

tatya-tope inmarathi

Dimdima.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

तात्या टोपे…नाव तर सर्वांच्याच परिचयाचे, मात्र त्यामागची कहाणी फारच कमी जणांना ठावूक आहे. या व्यक्तीच्या जीवनाबद्दल खूप काही जाणून घेण्यासारखं आहे.

आज याच थोर व्यक्तिमत्वाबद्दल अगदी संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊ, म्हणजे पुढल्या वेळेस कोणी तात्या टोपे याचं नाव घेतलं की त्यांचा संघर्षमयी जीवनप्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलाच पाहिजे.

 नाशिक जिल्ह्यातील येवल्यात १८१४ साली तात्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव होते रामचंद्र पांडुरंग टोपे! पुढे ते तात्या टोपे याच नावाने इतिहासात अजरामर झाले.

तात्या टोपे आपल्याला सर्वप्रथम भेटतात ते पेशवाईमध्ये! त्यांचे वडील ब्रह्मवर्तास नानासाहेब पेशव्यांकडे दानाध्यक्ष म्हणून काम पाहत.

काही काळ नानासाहेबांच्या दरबारात कारकुनी काम केल्यानंतर १८५७ साली त्यांची पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली आणि इथून सुरु झाला तात्यांमधील लढाऊ योद्ध्याचा प्रवास!

 

स्रोत

१८५७ साली नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई यांच्या सोबत इतर सैन्याला सोबती घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उभारली. त्यांची ही आघाडी इंग्रजांवर जबरदस्तीने बरसली की त्यांनी अल्पावधीतच महत्त्वाची ठाणी इंग्रजांकडून काबीज केली.

या कामगिरीमध्ये तात्या टोपेंची लढाऊ वृत्ती निर्णायक ठरली.

१८५७ च्या या उठावाचा इतका जबरदस्त परिणाम शेष भारतावर झाला की अनेक ठिकाणी बंडाचे लोण वाऱ्यासारखे पसरले. १८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते.

परंतु त्यात्या आणि इतर आघाडीचा हा झंझावात फार काळ टिकला नाही आणि १६ जुलै १८५७ जनरल हॅवलॉक विरुद्धच्या कानपूरच्या लढाईत त्यांना पराभव पत्करावा लागला.

निकराने लढून देखील हाती अपयश ल्याने निराश झालेले तात्या आणि इतर योद्धे अयोध्येला आले. पुन्हा कानपूर हस्तगत करायचे या इराद्याने त्यांनी विठूरला मुक्काम हलवला.

पण तत्पूर्वी जनरल हॅवलॉक ह्याने विठुरवर हल्ला केला. हल्ला अनपेक्षित होता आणि आपले योद्धे देखील..! आणि त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा एकदा तात्या आणि मंडळींना पराभवाचा सामना करावा लागला.

 

स्रोत

पण अजूनही तात्यांनी आशा गमावली नव्हती. शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या ग्वाल्हेरला आले आणि कालपी येथे त्यांनी छावणी उभारली. १८५७ च्या नोव्हेंबर महिन्यात कानपूर वर चढाई करून तात्यांनी जनरल विनडॅमला पराभवाचे पाणी चाखायला लावले आणि कानपूर पुन्हा एकदा हस्तगत केले.

परंतु हा विजय देखील फार काळ टिकला नाही आणि काहीच दिवसांत सर कोलिन कँबेलने केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा तात्यांना कानपूर शहर गमवावे लागले.

याच पराभवाच्या काळात सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झाशी जिंकण्यासाठी कूच केली. दिवस होता २२ मार्च १८५८ चा! झाशीच्या राणीच्या मदतीला तात्या टोपे धावून गेले. परंतु इंग्रजांच्या प्रचंड सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही.

पुढे तात्या, लक्ष्मीबाई आणि रावसाहेब यांनी पुन्हा एकत्र येत ग्वाल्हेर ताब्यात घेतले पण ते देखील फार काळ टिकले नाही आणि सर ह्यू रोझ याने केलेल्या हल्ल्यात ग्वाल्हेर पुन्हा इंग्रजांनी हस्तगत केले.

याच युद्धात लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या. या युद्धानंतर तात्यांनी सरळ सरळ इंग्रजांना सामोरे न जाता गनिमी काव्याचे तंत्र अवलंबले.

तात्यांच्या या नव्या खेळीमुळे इंग्रज खूप बेजार झाले. त्यांनी जवळपास वर्षभर तात्यांना पकडण्याचे निष्फळ प्रयत्न केले.

 

स्रोत

या वर्षभरात २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ या काळात तात्यांनी जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी या ठिकाणच्या लढाया जिंकत आपल्या पराभवाच्या पर्वावरच मात केली.

परंतु १० ऑक्टोबर १८५८ च्या लढाईत जणू पुन्हा एकदा त्यांचे भाग्य फिरले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पुन्हा एकदा इंग्रजांनी तात्यांचा पाठलाग सुरु केला. पण तात्या काही हाती लागले नाहीत. १३ जानेवारी १८५९  तात्या फिरोजशाहाला जाऊन भेटले.

तेथून फिरोजशहाच्या मदतीने तात्या शिंद्यांचा सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेले आणि येथेच जनरल मीडने तात्यांना कैद केले. शत्रूच्या हाती असूनही त्यांनी शेवटपर्यंत आपले ध्येय काही ढळू दिले नाही.

मानसिंग यानेच तात्यांचा विश्वासघात केला का आणि तात्यांचा मृत्यू नेमका कसा झाला यावर पराग टोपे यांचे संशोधन (ऑपरेशन रेड लोटस हा ग्रंथ) वाचण्यासारखे आहे.

१८ एप्रिल १८५९ रोजी तात्यांना फाशी देण्यात आली (या घटनेचा देखील पराग टोपे यांनी इन्कार केला आहे.) आणि स्वातंत्र्यसंग्रामातील हा धगधगता निखारा विझला.

तात्यांनी इंग्रजांशी लढताना अनेक पराभव पाहिले, परंतु त्या पराभवातून इतरांप्रमाणे न खचता ते अधिक जोमाने उभे राहिले.

 

स्रोत

अनेक टीकाकार म्हणतात किंवा हा लेख वाचूनही म्हणतील की तात्यांच्या कारकिर्दीत पराभवच जास्त होते, त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेव्हा इंग्रजांची ताकद बक्कळ होती आणि आपले भूमिपुत्र तुटपुंज्या फौजा घेऊन लढत होते.

त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादा सर्वसामान्य माणूस एवढ्या पराभवांनी खचला असता, त्याने शत्रूसमोर हात टेकले असते, पण तात्या टोपेंनी मात्र क्षणभरासाठीही माघार घेतली नाही.

त्यांच्या या लढाऊ वृत्तीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे या थोर व्यक्तिमत्त्वाचा अपमान ठरेल.

म्हणून हे आवर्जून म्हणावे लागते की, “एवढे पराभव पत्करून देखील इंग्रजांना पाणी पाजण्याचे ध्येये ढळू न देणारा एकच वीर होता तो म्हणजे “थोर योद्धा तात्या टोपे”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version