आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
खरं म्हणजे प्रत्येक काम ही एक तपश्चर्या आहे. एका क्षणात कुठलंही काम उत्तम होण्याची सिद्धी कुणालाही प्राप्त झालेली नाही.
खूप वेळा एखादं काम करत गेलं, की मगच त्यातील बारकावे लक्षात येतात. त्याची कळ हातात येते. काय केलं तर हे काम कमी वेळात जास्त चांगलं करता येईल हे समजतं. मग ते केर काढणं असूदे किंवा स्वयंपाक करणं!!!
आपल्याला पण आपल्या आईनं, काकूनं,आत्या, मामी मावशी यांनी उत्तम केलेला स्वयंपाक आठवतो. एका क्षणात त्या तरबेज झाल्या का त्यात? नाही…काही वर्षं त्यांनीही तो शिकण्यात घालवली. आणि मग त्यांची खासियत निर्माण झाली.
एखादा पदार्थ, काही मसाले किंवा सगळा स्वयंपाक!! काही जणींच्या हातालाच चव असते म्हणतात. म्हणजे त्यांनी साधं पाणी जरी फोडणीला घातलं तरी चवदार होईल.
आपल्या आज्या पणज्या अशा होत्या. मोजक्याच साधन सामुग्री उपलब्ध असताना उत्तम पदार्थ करणाऱ्या. त्या खऱ्याखुऱ्या अन्नपूर्णा!!!
आता पूर्वीच्या तुलनेत स्वयंपाक कमी कष्टाचा झाला आहे. पूर्वीचे उखळ मुसळ जाते यांची जागा आता मिक्सरने घेतली आहे. त्यामुळं वाटण घाटण बनवायचं काम कमी कष्टात होऊन जातं.
गोडा मसाला, काळा मसाला, सांबार मसाला, रसम् मसाला आणि इतरही मसाले हे सारं आजकाल दुकानात विकत मिळतं. वेगवेगळ्या ब्रँडनी आपला ग्राहकवर्ग तयार केला आहे.
एमडीएच या मसाल्यांचे आजोबा तर जोकमधून इंटरनेटवर प्रसिद्ध झाले आहेत. जितकी प्रसिद्धी त्यांच्या मसाल्यांना मिळाली नसेल तितकी त्यांच्यावरील जोक्सना मिळाली.
आजकाल अगदी साधं धान्य जरी आपण घ्यायला दुकानात गेलो, तर ते निवडलेलं मिळतं. तांदूळ, गहू निवडत बसलेली गृहिणी हे चित्रही आजकाल कमी दिसतं.
अशावेळी एका तरुण मुलीनं खास मसाले तयार केले आणि त्याचा उद्योगच बनला…हे ऐकायला किती नवलाईचं वाटतं ना? हो.. पण हे सत्य आहे.
आजकाल मसाला बनवणं म्हणजे मसाल्याच्या सामानाची यादी करुन ते आणणं, निवडणं, योग्य प्रमाणात भाजणं, तेलावर परतणं गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून काढणं, हे सारं करायला नोकरीच्या आणि प्रवासाच्या चक्रात अडकलेल्या मुलींना, स्त्रियांना वेळ तरी आहे का?
त्यामुळं लोकांचा जास्तीत जास्त कल हा हे आयते पदार्थ खरेदी करण्याकडंच आहे. ते घरगुती चवीचं दर्जेदार असेल तर मग विचारुच नका. थोडंसं महाग असलं तरीही लोक घेतात पण तो दर्जा सोडत नाहीत.
हीच गोष्ट लक्षात घेऊन एका तरुणीनं या मसाले बनवण्याच्या आपल्या आवडीचा छान उद्योग सुरू केला आणि तो यशस्वी झाला आहे. ही कुणालाही प्रेरणादायी ठरणारी कहाणी आहे स्नेहाची!!!!
स्नेहा सिरीवारा ही दाक्षिणात्य तरुणी!!! तिला खूप लहानपणापासून स्वयंपाकघरात काम करायला आवडायचं. त्याचा फायदा असा झाला तिला आई आजीच्या हातची मसाल्याची चव,आणि ते बनवण्याची पद्धत सहजावारी हातात बसली.
असंही आपल्या भारतीय पारंपरिक पदार्थांना मसाल्याची जोड आहेच आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी, की ते मसाले त्या त्या प्रांतातील हवामानानुसार, पदार्थांनुसारच आपल्या पूर्वजांनी बनवले आहेत. ते सर्व दृष्टींनी अगदी उत्तमच आहेत.
उत्तरेतील मसाले तिकडच्या हवामानानुसार तेथील भाज्यांसाठी योग्य आहेत, तर दक्षिणेकडील सांबार, रसम्, बिशीबेळी अन्ना, हे फार प्रसिद्ध पदार्थ. हे तेथील हवामानाला उपयुक्त आहेत.
या पदार्थांच्या कृतीत त्यासाठी असणारे विशिष्ट चवीचे, प्रमाणाचे मसाले त्यांची लज्जत वाढवतात.
स्नेहानं निरिक्षण केलं तेव्हा तिच्या लक्षात आलं, की हे दाक्षिणात्य मसाले त्यांच्या त्या विशिष्ट चवीच्या स्वादामुळे जास्त चांगले बनतात. ते दगडी खलबत्ते, रगडा यांवर केल्यामुळे जास्त चवदार बनतात.
तिचे बहुतांश नातेवाईक हे नोकरीच्या निमित्ताने प्रदेशात गेलेले, त्यांना ही साऊथ इंडियन मसाल्यांची चव तिकडं मिळत नाही हे तिला माहीत होतंच.
आपण ज्या स्वादाचं जेवण लहानपणापासून करतो तो स्वाद जगातल्या पाठीवर कुठंही जा विसरला जात नाही. म्हणूनच तर आईच्या हातची विशिष्ट भाजी त्या चवीची भाजी करायला कुणालाच जमत नसते.
बरं, परदेशात तसे आपले भारतीय पदार्थ घरी करुया म्हटलं, तर ते ते विशिष्ट मसाल्याचे घटक पदार्थ मिळायला हवेत..ती दक्षिण भारतीय दुर्मिळ चव आहे ती जमणं..जमवणं कठीण.
परदेशातून कितीतरी नातेवाईक येत, तेव्हा ते मसाले घेऊन जात शिवाय प्रवासी म्हणून आलेले लोकही ते घरगुती मसाले खरेदी करत. मग त्या विशिष्ट चवीचे मसाले आपणच तयार करावेत का?
तिनं ते मसाले बनवून एकदा आपल्या नातेवाईकांना दिले. त्यांना ती चव इतकी आवडली. त्यांचं प्रोत्साहन पाहून स्नेहाने मनात विचार केला आपण याचंच उत्पादन करुया का? ही तिच्या व्यवसायाची सुरुवात होती.
तिनं आपल्या आई वडीलांसह घराच्या गॅरेजमध्ये आपल्या मसाल्यांच्या उत्पादनाला सुरुवात केली. त्यातले बारकावे आत्मसात करत हळूहळू तिचं काम सुरू झालं.
यामध्ये तिनं मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची, काॅफी, वेगवेगळ्या तऱ्हेची इन्स्टंट पीठं, स्नॅक्स, बनवायला सुरुवात केली. २०१३ मध्ये आपल्या लघु उद्योगाचा शुभारंभ केला.
यात मसाले भाजणं, कुटणं, मसाले मिसळणं आणि पॅकिंग करणं हे सगळं ती एकटी सांभाळायची. One Woman Army..सगळं काही एकहाती तीच करायची. आणि सात वर्षांत जी भरारी घेतली ती लक्षणीय आहे.
तिनं आपल्या ब्रँडचं नावही फार चटपटीत ठेवलंय. सांबार स्टोरीज!! दोन हजारांहून अधिक उत्पादनं तिनं विकली आहेत. यापैकी ५० उत्पादनं अशी आहेत जी संपूर्णतः नैसर्गिक पद्धतीने बनवली जातात. त्यात कसलाही कृत्रिम रंग मिसळला जात नाही.
बंगळुरू येथे एका छोट्या गॅरेजमध्ये चालू झालेला व्यवसाय आता चांगलाच जोमाने चालू आहे.
स्नेहानं व्यापाराशी संबंधित कसलंही शिक्षण घेतलं नाही, पण तिची इच्छा स्वतःचं असं काही आणि वेगळं काहीतरी करायची होती.
काँप्युटर इंजिनिअर असलेल्या स्नेहानं एक वर्ष विप्रोमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलं, पण तिथं काही ती रमली नाही. तिला तेव्हाच सांबार स्टोरीजचा ध्यास लागला होता. तिनं ती नोकरी सोडून दिली.
आता कोणताही नवा ब्लेंड आधी ती घरी बनवते घरीच त्याची चाचणी घेतली जाते आणि त्याची चव आवडली तरच तो आपलं पुढील प्राॅडक्ट म्हणून बाजारात दाखल केला जातो.
आपल्या तमिळ सासूबाईंकडूनही स्नेहा बरेच पदार्थ शिकली. आणि मुरुक्कू- ही चकलीची तमिळ बहिण बरं का.. मोर कोलंबू हा कढीचा भाऊबंद हे व असे अनेक पदार्थ ती शिकली आणि तिनं तेही बाजारात आणले.
लाॅक डाऊन असतानाही तिची उत्पादनं फार चांगली खपली.
नोकरीचा सरधोपट रस्ता सोडून आपल्या व्यवसायाची नवीन वाट चोखाळणाऱ्या स्मिताने इंटरनेटच्या मदतीने आपला व्यवसाय चांगलाच फैलावला आहे.
असे जगावे आव्हानाचे छाताडावर लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर हे वयाच्या २८व्या वर्षी स्मितानं आपल्या वागण्यातून दाखवलं आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.