Site icon InMarathi

फक्त चवीसाठी नव्हे, तर सध्याची “नाजूक” स्थिती पाहता “हे” मसाले आहारात नियमित असायला हवेत

indian spices inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजचं आपलं जीवन हे धकाधकीचं आणि तणावपूर्ण झालं आहे. कामाचं टेन्शन, मुलाबाळांना सांभाळण्याची जबाबदारी, घराची काळजी असे एक ना अनेक विचार कायम आपल्या मनात घोंघावत असतात.

कितीही प्रयत्न केला तरीही या तणावाला आपल्याला थोड्याफार प्रमाणात सामोरं जावंच लागतं. इतर गोष्टींकडे लक्ष देत असताना आपण आपल्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करतो.

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकालाच “तंदुरुस्त” असण्याचं महत्त्व कळलं आहे. इतरवेळेस शरीराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे आपण सध्या साधी शिंक आली तरीही स्वतःची काळजी घेत आहोत.

 

 

केवळ जिम, महागडी औषधं यांनीच निरोगी राहता येतं असं नाही, तर तुम्ही सकस- चौकस आहार घेत असाल, तर तुमचं शरीर स्वतःहूनच रोगांचा प्रतिकार करण्यास सक्षम होतं. मात्र यासाठी योग्य जीवनशैली असणं गरजेचं आहे.

भारतीय खाद्यसंस्कृतीत आहाराला विशेष महत्त्व आहे. फार पूर्वीपासून आपल्याकडे ऋतुमानानुसार गोष्टी खाल्ल्या जातात. आयुर्वेदात, विशिष्ट ऋतूत विशिष्ट पदार्थ खाण्यास सांगितले आहेत, यामागे विज्ञान आहे.

आपल्या रोजच्या आहारात कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्याला अनावश्यक गोष्टींमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखायला मदत करतात. शरीर शुद्ध करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

या सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये कायम असतात, पण आपण त्यांच्या उपयोगांपासून अनभिज्ञ असतो.

सध्या पावसाळा चालू आहे. इतर ऋतुंपेक्षा पावसाळ्यात सर्दी-खोकला, जुलाब असे साथीचे आजार लवकर पसरतात. यासाठी आपण आपल्या आहारात काही मसाल्याच्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

बघूया, हे मसाले आणि त्यांचे शरीराला होणारे फायदे :

 

१) हिंग :

 

helloswasthya.com

 

घरात कोणाच्याही पोटात दुखत असेल, तर लगेचच हिंग- पाणी पोटावर लावलं जातं. हा सगळीकडे वापरला जाणारा घरगुती उपाय आहे.

आपण वरणात-आमटीत आवर्जून हिंग टाकतो. हिंग तुमची पचनशक्ती वाढवतं.

१९१८ मध्ये आलेल्या “स्पॅनिश फ्लू”च्या साथीमध्ये हिंगाचा वापर लाभदायक असतो हे दिसून आले होते. त्यामुळे साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी हिंगाचे सेवन गरजेचे आहे.

कफ, अपचन- मळमळण, पोटासंबंधीचे विकार यावर हिंग गुणकारी आहे.

 

२) हळद : 

 

beyoungaholic.com

 

आपल्या फोडणीच्या डब्यात असलेली हळद ही शरीर शुद्धीकरण कार्यात मोठा सहभाग घेते.

शरीरात साठलेली विषारी मुलद्रव्ये बाहेर टाकून शरीरशुद्धी व कायाकल्प करण्यासाठी हळद अतिशय उपयुक्त आहे.

हळदीत असलेले घटक हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. जखमा भरुन आणायला मदत करतात. नैसर्गिकरित्या जखमांचं निर्जंतुकीकरण करतात. इतकेच नव्हे, तर त्यांचा फैलाव होणं रोखतात.

हळद दुधाचा उपयोग दुखणारा घसा, फ्ल्यू, सर्दी यांनी होणारी अंगदुखी थांबण्यासाठी होतो.

हळदीच्या वापराने त्वचा तुकतुकीत होतेच शिवाय त्वचेला जर काही जखमा झाल्या, तर त्यावरही हळद गुणकारी आहे.

 

३) जिरं :

 

nari.punjabkesari.in

 

पावसाळ्यात आपली पचनशक्ती थोडी अशक्त झालेली असते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी जिरं गुणकारी आहे.

अपचन, पोटदुखी, जुलाब यावर जिऱ्याचे पाणी हा रामबाण उपाय आहे.

जिऱ्याचा पाण्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी जिरं महत्त्वाचं आहे.

जिऱ्यामुळे तुमचं वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

 

४) बडीशेप :

 

popxo.com

 

जेवणानंतर विरंगुळा म्हणून आपण सगळेच बडीशेप खातो, पण केवळ तोंडाची दुर्गंधी घालवणे इतकाच या पदार्थाचा गुणधर्म नाही. याचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत.

बडीशेप बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटफुगी वर गुणकारी आहे. दररोज मूठभर बडीशेप खाल्याने तुमच्या डोळ्यांचं आरोग्य देखील नक्कीच सुधारेल.

बडीशेप च्या नियमित सेवनाने त्रिदोष म्हणजे कफ, वात, पित्त नियंत्रित राहतात. बडीशेप अर्काच्या सेवनाने ब्रॉंकायटीस, कफ, सर्दीने गच्च झालेले नाक कमी होण्यास मदत होते.

 

५) ओवा :

 

astroworld.co.za

 

आम्लपित्त, पोटदुखी, उलट्या, गॅसेस यासारख्या सर्रास होणाऱ्या त्रासांवर ओवा खूप गुणकारी आहे. म्हणूनच पोट दुखत असेल, तर घरातली मोठी माणसे आपल्याला ओवा चावून खाण्यास सांगतात.

ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडतात, यामुळे आवश्यक ते घटक शरीरात शोषले जातात. शरीरातील कफ बाहेर पडण्यास ओवा खाणे गुणकारी आहे.

ओव्याचे पाणी प्यायल्याने पचन क्षमता वाढते.

 

६) आलं :

 

business.com.gh

 

अंगात कणकण असतांना घोटभर आल्याचा चहा प्यायला तरीही तरतरी येते. पावसाळ्यात घरी शिजवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये आल्याचा समावेश असणे खूप गरजेचे आहे.

पचनक्रिया उत्तम ठेवण्यास आलं मदत करते. कफ, घसा खवखवणं, घश्याला सूज येणं, सर्दी यावर आलं खूप गुणकारी आहे.

हे सगळे पदार्थ आपण कायमचं वापरत असतो, पण वरील फायदे वाचल्यानंतर आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक आणि प्रयोगांती या पदार्थाचा वापर सांगितलं आहे हे लक्षात येते.

कोरोनाचे वाढते आकडे लक्षात घेता, प्रत्येकाने घरी राहून स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य आहार घ्या आणि सकारात्मक विचार करून स्वतःला निरोगी ठेवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version