' ८० रुपयांचे कर्ज ते कोट्यवधीची कमाई; हजारो महिलांच्या “लज्जतदार, लिज्जतदार” व्यवसायाची कहाणी – InMarathi

८० रुपयांचे कर्ज ते कोट्यवधीची कमाई; हजारो महिलांच्या “लज्जतदार, लिज्जतदार” व्यवसायाची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लिज्जत पापड म्हटलं, की ती सशाची ‘कर्रम कुर्रम, कुर्रम कर्र्म’ करणारी जाहिरातही आठवते. तसंच जिभेवर रेंगाळणारी चवही आठवते.

भारतीय जेवणातला तसं म्हटलं तर पापड म्हणजे साइड डिश, पण त्याच्या असण्याने जेवणाची लज्जत वाढते. रोजच्या जेवणात तर कधी मुगाच्या खिचडी बरोबर, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा पापड खाल्ला जातो.

हॉटेलात गेल्यावर जेवण येईपर्यंत “स्टार्टर” म्हणून खाल्ला जाणारा मसाला पापड आता भारतीय जेवणाचा महत्त्वाचा घटक झाला आहे.

 

masala papad inmarathi
merisaheli.com

 

आता भारतात मिळणाऱ्या पापडांमध्ये लिज्जत पापड हाही एक महत्वाचा भाग बनला आहे. लिज्जतने खूप मोठा व्यवसाय उभा केला आहे. लिज्जत नेच पापडाला खरी प्रसिद्धी मिळवून दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

तर अशा या लिज्जत पापड याच्या निर्मितीची कथा तशी रंजकच आहे.

मुंबईमध्ये १९५९ मध्ये सर्वसाधारण गुजराती घरांमधील महिला जेव्हा दुपारचं जेवण झाल्यावर थोडा वेळ मिळतो त्यात गप्पा मारायला एकत्र यायच्या. एकमेकींची सुखदुःख सांगायच्या.

त्यातूनच त्यांना कळलं ,की आपले नवरे जे काही कमवतात त्यामध्ये संसार चालवणे प्रत्येकीलाच अवघड जातं. पण काय करावं, आपलं शिक्षण जास्त नाही आपण आपल्याच संसारासाठी, घरासाठी काय मदत करू शकतो यावर त्या बोलायच्या.

तसं म्हटलं तर शिक्षण नसल्यामुळे बाहेर जाऊन नोकरी करणं त्यांना शक्य नव्हतं. आणि घरी लहान मुलं बाळ असल्यामुळे त्यांना सोडून जाणंही शक्य नव्हतं. घरची जबाबदारी सांभाळून त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं.

त्यांना व्यवस्थित जर काही करता येत असेल तर तो स्वयंपाक. अशाच एकदा घरातल्या वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी त्या गच्चीवर जमल्या.

तिकडे पापड करताना त्यांना ही कल्पना सुचली, की आपण हे असे का पापड विकले तर तो एक व्यवसाय होऊ शकेल.

जसवंतीबेन पोपट, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडाणी, उज्जंबेन कुंडलिया, बानुबेन तन्ना, चुताडबेन गावडे आणि लागूबेन गोकानी या सात महिलांनी मिळून हा व्यवसाय करायचे ठरवले.

त्यांच्या मनात विचार आला खरा, पण त्यांच्याजवळ कोणतही भांडवल नव्हतं. मग त्यांनी चक्क ८० रुपयांचं कर्ज काढलं. यासाठी जसवंतीबेन पोपट यांनी पुढाकार घेतला.

 

lijjat papad inmarathi1
badabusiness.com

 

हे कर्ज त्यांना देऊ केलं ते छगन लाल पारेख या एका सोशल वर्करनी. पुढे तेच त्यांचे मार्गदर्शक बनले. ते त्यांचे पुढे छगन बप्पा झाले.

मिळालेल्या कर्जातून त्या सात जणींनी पापडासाठी लागणारं साहित्य आणलं. त्याचे एकूण पापडांचे चार पुडे तयार झाले. ते त्यांनी विकायला गिरगावातील एका दुकानात नेले.

तिथल्या दुकानाचे मालक आनंदजी यांनी त्यांचे ते पापड घेतले आणि अवघ्या काही तासांतच त्यांच्या पापडाची विक्री झाली.

हळूहळू त्यांच्या पापडांना मागणी वाढली तशी छगन बाप्पानी त्यांना सांगितलं, की कधीही कोणत्याही बाबतीत कॉलिटीशी तडजोड करायची नाही. नेहमी उत्कृष्ट कच्चामाल वापरूनच पापड बनवायचा.

कुठेही गेले तरी लिज्जत पापड त्या चवीचेच असायला हवेत. कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचं देणगी किंवा डोनेशन स्वीकारू नका. जे काही असेल फायदा-तोटा तो तुमच्यातच वाटून घ्या.

छगन बाप्पांचा हा सल्ला लिज्जत पापड मध्ये अजूनही वापरला जातो. महिलांनी तयार केलेला हा उद्योग असल्यामुळे याला नाव देण्यात आलं “श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड”.

सुरुवातीला पापड बनवताना त्यांना अनेक अडचणीही आल्या. पावसाळ्यामध्ये पापड वाळणे शक्य नसल्याने उद्योग बंद ठेवायला लागायचा. परंतु या महिलांनी त्यावर एक शक्कल लढवली.

पूर्वी जे पलंग मिळायचे त्याच्याखाली एक स्टोव्ह चालू ठेवून पापड वाळवले जाऊ लागले. त्यामुळे बारा महिने लिज्जत पापड मिळणे शक्य झाले.

बघता बघता त्यांच्या पापडाची महती तोंडोतोंडी पसरली. सुरुवातीला केवळ सात महिला यामध्ये काम करायच्या पण मागणी वाढली तशी त्यांनी अनेक गरजू महिलांना काम द्यायला सुरुवात केली.

वर्षभरातच त्यांच्याकडे ३०० महिला कामाला लागल्या. १९६६ मध्ये श्री महिला गृह उद्योग लिमिटेड रजिस्टर करण्यात आला. आता लिज्जत पापड मध्ये ४५ हजार महिला काम करतात.

 

lijjat papad inmarathi
hindi.rapidleaks.com

 

प्रत्येक महिलेला काम करण्यासाठी येणे शक्य नसल्याने मग मळलेल्या पिठाचे एक सारख्या वजनाचे गोळे करून महिलांना घरी पापड लाटण्यासाठी ते देण्यात येऊ लागले.

वर्क फ्रॉम होम ही कल्पना लिज्जत पापड मध्ये सुरुवातीपासूनच आहे.

या महिला किती स्वच्छता बाळगून आणि कशाप्रकारे काम करतात हे पाहण्यासाठी अचानक पणे त्यांच्या घरांना भेटी देण्यात येतात. त्यामुळे स्वच्छता आणि गुणवत्ता याचं भान लिज्जत पापड मध्ये कायमच राखलं गेलं आहे.

महिला गृह उद्योग लिज्जत पापडचा उद्देश हाच आहे, की महिलांनी स्वावलंबी व्हावं आत्मसन्मानाने जगावं. इथे काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला बेन असंच म्हटलं जातं. या महिला बहिणीसारखी एकमेकांना मदत करीत असतात.

सुरुवातीला काम करणाऱ्या महिलांना अशा कामाचं टेन्शन येतं, तर त्यांना आधार देण्याचे काम ही याच महिला करतात. त्यांना कामाचं स्वरूप समजावून सांगतात.

 

lijjat papad inmarathi2
femina.in

 

इथं काम करणाऱ्या महिला या खूप शिकलेल्या किंवा उच्चशिक्षित घरातल्या नसतात. स्वाती पराडकर या त्यापैकीच एक, इथे झालेल्या संचालिका.

त्या दहा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील वारले आणि कमी शिकलेल्या आईने मग पापड लाटायला सुरुवात केली. या त्यांच्या बरोबर आई बरोबर तिकडे जायच्या. हळूहळू मग त्यांनी तिथल्या ऑफिसचं काम शिकून घेतलं.

ऑफिसचं काम करता करता त्या तिथल्या स्टोअर कीपर झाल्या. आणि असंच मनापासून काम करत करत त्या तिथे संचालिका झाल्या.

स्वाती पराडकर म्हणतात, की आता नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. तरी आजही लिज्जत पापड मध्ये पापड हे हातानेच लाटले जातात. तिकडे कोणतीही मशिनरी आम्ही वापरत नाही.

याचं कारण हेच, की लिज्जत पापड महिला गृह उद्योगचा उद्देश हाच आहे, की इथं महिलांनी स्वावलंबी व्हावे. त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे. जर मशिनरी आणली तर अनेक महिलांचे रोजगार सुटतील आणि त्या बेरोजगार होतील.

म्हणूनच कोणतीही मशनरी लिज्जत पापड मध्ये आणली जात नाही.

आता महाराष्ट्राबाहेरही लिज्जत पापडच्या अनेक शाखा आहेत. लिज्जत पापड परदेशातही निर्यात केला जातो. लिज्जत पापडाची चव अजूनही तशीच आहे.

आता पापडांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात. उडीद डाळ पापड, मुगडाळ पापड, लसूण मिरची पापड, पंजाबी मसाला पापड, जिरेमीरे पापड इत्यादी.

 

lijjat papad inmarathi3
thebetterindia.com

 

पापडा बरोबरच इतरही उद्योग लिज्जत पापड मध्ये आता सुरू झाले आहेत,जसे की गव्हाचं पीठ, चपाती, मसाले, डिटर्जंट पावडर तयार केले जात आहेत.

कॉलिटी च्या बाबतीत लिज्जत पापड कधीही तडजोड केलेली नाही. तिथे येणारी उडीदडाळ ही म्यानमार वरून येते, हिंग अफगाणिस्तानातून, तर काळी मिरी केरळमधून येते.

त्या महिला सकाळी साडेचार वाजल्यापासून काम करायला चालू करतात. ज्यांच्या घरामध्ये जागा नाही या महिलांना उद्योगाच्या ठिकाणी येऊन काम करण्यास परवानगी आहे. त्यांच्यासाठी मिनीबसची सोय केली आहे.

ज्यांना घरात काम करणे शक्य आहे, त्यांना त्यांच्यासाठी जवळच्या केंद्रातून पीठ नेण्याची मुभा आहे.

ज्या महिला काम करायला चालू करतात त्यांना तिसऱ्या दिवसापासूनच पगार मिळायला सुरुवात होते. आणि हे पैसे रोख दिले जातात. कारण बँकेचे व्यवहार करणे खूप जणींना माहीत नाहीत.

परंतु आता मात्र या महिला सुशिक्षित होत आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे.आपल्या मुलांना त्या शिकवत आहेत.

उत्कृष्ट काम करणार्‍या महिलांना बक्षिसी दिली जाते. कधी पैशाच्या रूपात तर कधी पाच ग्रॅम सोनं वगैरे देऊनही. लिज्जत पापडचा टर्नओव्हर आज काही कोटींच्या घरात आहे.

 

lijjat papad inmarathi4
doerlife.com

 

लिज्जतने आपल्या जाहिरातीतही कधी मोठ्या कलाकारांना आणलेलं नाही. ग्राहक आणि तिथे काम करणाऱ्या महिला यांना मिळणारं समाधान हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे.

अनेकांनी त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. लिज्जत पापडाचे डुप्लिकेटसही काहींनी काढले. अशा लोकांना कायद्याचा बडगा देखील या महिलांनी दाखवला आहे.

महिलांनी महिलांसाठी चालवलेला उद्योग म्हणजे श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड. यामध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन दिलं जातं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ही निर्माण केला जातो. त्यांना त्यांची ओळख निर्माण करता येते.

वर्षानुवर्षांच्या त्यांच्या पापडाच्या चवीत फरक पडलेला नाही. आज हा उद्योग कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. महिलांनी चालवलेली ही स्वदेशी कंपनी खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?