Site icon InMarathi

भारताच्या राष्ट्रध्वजात रंग भरणाऱ्या या अनामवीराची पुढे झालेली दुर्दशा मनाला चटका लावून जाते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे देशातले दोन महत्त्वाचे दिवस. आपल्या देशाच्या झेंड्याला वंदन करायचे दिवस.

“झेंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा!!” असं अभिमानानं ज्याबद्दल म्हटलं जातं तो झेंडा.

देशातल्या सैनिकांना, लोकांना स्फूर्ती देणारा झेंडा हा देशाच्या आत्मसन्मानाचा विषय. आपल्या देशाच्या झेंड्याचा आपल्याला अभिमान असतोच आणि तो बाळगलाच पाहिजे.

 

 

हे जरी खरं असलं, तरी हा झेंडा कधी तयार झाला? याच्यात हेच तीन रंग कुणी भरले? झेंड्यावर अशोकचक्र कधी आलं? हा झेंडा कोणी तयार केला? या प्रश्नांची उत्तरं मात्र कोणालाच फारशी माहीत नसतात.

भारत हा एकसंध देश असला, तरी भारतात अनेक राजवटी होत्या. त्या प्रत्येकाचा झेंडा वेगळा वेगळा होता. नंतर भारतात ब्रिटिश आले आणि त्यांनी भारतावर कब्जा केला.

त्यानंतर लोकांना स्वातंत्र्याचे महत्व कळू लागले. ब्रिटिशांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध संपूर्ण देशभरातून आवाज उठू लागला. त्यातूनच अनेक चळवळींचा जन्म झाला.

जनमताचा रेटा ओळखून भारतीय काँग्रेस जन्माला आली. आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा चालू असताना देशातील विविध भागात राहणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी एका झेंड्याची गरज होती.

१९०० सालानंतर असा एक झेंडा असावा हा विचार पुढे येऊ लागला. काँग्रेसच्या अधिवेशनातून हा विचार मांडला जायचा. झेंड्यावरुन देशाची संस्कृती लक्षात घेतली जावी असंही मत मांडलं जायचं.

महात्मा गांधींनी देखील देशातील सगळ्या लोकांनी लढा देण्यासाठी असा एक झेंडा असावा, असं मत मांडलं होतं.

 

biography.com

 

आंध्र प्रदेशातील पिंगली वेंकय्या यांनी एक झेंडा तयार केला. पिंगली यांनी जगातल्या ३० देशांचे झेंडे काय आहेत, कसे आहेत याचे एक बुकलेट काढलं होतं. त्याचा अभ्यास केला होता.

त्यावरुनच भारताचा झेंडा कसा असावा याविषयी त्यांच्या काही कल्पना होत्या. त्यावरूनच त्यांनी एक झेंडा तयार केला. त्याला मान्यता देण्यात आली.

१९२१ मध्ये आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पिंगली वेंकय्या यांनी तयार केलेल्या एका झेंड्याला मान्यता देण्यात आली. महात्मा गांधींनी त्यामध्ये काही बदल सुचवले.

पिंगली वेंकय्या यांनी दोन लाल रंगांच्या पट्ट्यांमध्ये हिरवा रंग झेंड्यामध्ये घेतला होता. भारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिम या दोन महत्त्वाच्या धर्मांचे प्रतीक म्हणजे हे दोन रंग होते.

नंतर महात्मा गांधींनी यात पांढरा रंग शांततेचे प्रतीक म्हणून घेतला. मग लाल, पांढरा, हिरवा असा तिरंगी झेंडा तयार झाला.

झेंड्यावर चरखा हा आत्मनिर्भरता त्याचं प्रतीक म्हणून असावा ही कल्पना शिक्षणतज्ञ लाला हंसराज यांनी मांडली.

 

 

नंतर झेंड्यामध्ये बदल होत गेले. १९३१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात झेंड्यामध्ये बदल करण्यात आले. लाल रंगाच्या जागी भगवा रंग घेण्यात आला. रंगांचा क्रम देखील त्याच अधिवेशनात ठरवला गेला.

सुरुवातीला भगवा मग पांढरा आणि त्या खाली हिरवा असा रंग घेण्यात आला. चरखा देखील पांढऱ्या रंगावर घेण्यात आला.

महात्मा गांधींना हा बदल आवडला. यामुळे भारत हा अहिंसा आणि शांततेचा पुरस्कार करणारा देश असून स्वावलंबी देश आहे हे प्रतीत होते, असं त्यांना वाटलं.

स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या संमतीने ‘राष्ट्रीय झेंडा समिती’ स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय झेंडा समितीने पिंगली व्यंकय्या यांचा तिरंगा झेंडा तसाच ठेवला आणि पांढऱ्या रंगावरचा चरखा काढून त्या जागी अशोक चक्र घेतले.

आज हाच झेंडा भारताचा झेंडा म्हणून जगात मान्यता पावला आहे.

 

 

पिंगली वेंकय्या यांच्या मेहनतीमुळे, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भारताला एक झेंडा मिळाला आहे.

पिंगली वेंकय्या यांचा जन्म २ ऑगस्ट १८७८ मध्ये आंध्र प्रदेशामध्ये झाला. त्यांचे शिक्षण केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये झालं.

शिक्षणाकडे त्यांचा ओढा होता. भूशास्त्र, शेती, शिक्षण आणि विविध भाषा शिकण्याकडे त्यांचा कल होता. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या.

१९१३ मध्ये त्यांनी संपूर्ण भाषण जपानी भाषेत केलं होतं, म्हणून त्यांना ‘जपान व्यंकय्या’ असंही म्हणायचे. तसंही त्यांना अनेक टोपण नावं होती. हिरे ओळखण्यात ते वाकबगार होते म्हणून त्यांना ‘हिरा व्यंकय्या’ असंही म्हणायचे.

तसेच कापसाच्या जातींचा शोधही त्यांनी लावला म्हणून त्यांना ‘कॉटन व्यंकय्या’ असंही म्हटलं जायचं.

 

 

त्यांच्या वयाच्या १९व्या वर्षी पिंगली वेंकय्या हे ब्रिटिश इंडियन आर्मी मध्ये सैनिक झाले. १८९९ ते १९०२ या कालावधीत ते दक्षिण आफ्रिका इथे युद्धासाठी गेले होते.

तिथे त्यांची ओळख महात्मा गांधी यांच्याशी झाली. गांधीजींच्या विचाराने ते प्रभावित झाले. म्हणूनच भारतात आल्यानंतर त्यांनी देशसेवा करायची ठरवले. जगभरात भारताची ओळख व्हावी यासाठी झेंडा असावा म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले.

संशोधन करण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे भारतात आल्यावर त्यांनी अनेक क्षेत्रात संशोधन केले. शेतीमधील त्यांचं संशोधन विशेष महत्वाचं आहे.

त्यांनी विविध देशांच्या झेंड्यांचा अभ्यास केला. झेंड्यावरुन देशाची ओळख असावी असा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि त्यातूनच तिरंगा झेंडा जन्माला आला.

त्यांनी तयार केलेल्या झेंड्याचं प्रारूप गांधीजींना दाखवलं. १९२१ ला त्यांच्या झेंड्याला मान्यता मिळाली. नंतर झेंड्यामध्ये काही बदल झाले, परंतु झेंडा तयार करणारा भारतीय म्हणून पिंगली वेंकय्या यांचं नाव घेतलं जाईल.

 

 

स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांची ही ओळख धूसर होत गेली. समाजाकडून आणि काँग्रेस पक्षाकडूनच ते दुर्लक्षित राहिले. परिस्थितीने ते गरीब झाले. त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हालाखीत गेला.

त्यांची स्वतःची एक इच्छा होती, की त्यांनी बनवलेला झेंडा लाल किल्ल्यावर फडकताना त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी पाहायचा होता. त्या सोहळ्याला उपस्थित राहायचं होतं. परंतु केवळ परिस्थिती नसल्यामुळे हे शक्य झालं नाही.

त्यांची ही इच्छा अधूरीच राहिली. १९६३ मध्ये त्यांचा मृत्यू एका झोपडीत झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर २००९ मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक पोस्टल तिकीट काढले. २०१२ मध्ये आंध्र प्रदेश सरकारने त्यांना भारतरत्न दिला जावा अशी शिफारस केली होती.

परंतु त्यावर्षीचा भारतरत्न पुरस्कार हा शास्त्रज्ञ सी. एन. राव व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला.

२०१६ मध्ये विजयवाडा येथील रेडिओ स्टेशन मध्ये पिंगली वेंकय्या यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

आज आपला तिरंगा डौलाने लालकिल्ल्यावरून फडकत असतो. निरनिराळ्या देशांत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय. बोर्डरवर सैनिकांना देशभक्तीचे स्फुरण देतोय. लहानग्यांना देशभक्तीचे धडे देतोय.

म्हणूनच या १५ ऑगस्टला जेव्हा दिल्लीत लाल किल्ल्यावर झेंडावंदन होईल, तुमच्या शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, सोसायटीत झेंडावंदन होईल, तेव्हा पिंगली वेंकय्या यांचे स्मरण जरूर करा. या अनामवीराला हीच मानवंदना असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version