आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : डॉ. अभिराम दीक्षित
===
रूढार्थाने मी नास्तिक आहे. हे नास्तिक असणे विज्ञानाच्या (मुखतः जीवशास्त्राच्या) अभ्यासातून आलेले आहे. मानव प्राण्यांसकट सगळ्या जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली? मानवी जीवनाचा हेतू काय? जीवसृष्टी कशी चालते ? मानवी राग, लोभ, प्रेम, भक्ती इत्यादी गोष्टी मेंदूत कोणते केमिकल निर्माण झाल्याने होतात?
या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विज्ञान समर्थ आहे. धर्म त्याचे उत्तर देऊ शकत नाही. मुळात धर्म हे प्राचीन आहेत . टप्प्या टप्प्याने मानवी ज्ञान वाढत जाते त्यामुळे कालचे धर्मज्ञान त्याला नमस्कार करून कपाटात ठेवावे.
आजचे जगण्याचे प्रश्न विज्ञान सोडवू शकते. धर्म नाही. असे माझे मत आहे . हे नास्तिक मत धर्माच्या आणि विज्ञानाच्या अभ्यासामुळे बनले आहे.
राम मंदिर हा मुख्यतः राजकीय विषय आहे. मंदिराचे राजकारण करू नका म्हणून तोंडे वेंगाडू नयेत. राम मंदिर हा राजकीय विषय आहे. हिंदुत्व हा सुद्धा राजकीय मुद्दाच आहे.
राजीव गांधींनी शहाबानो ची राजकीय आग विझवायला राम मंदिराचे टाळे पहिल्यांदा उघडले हा इतिहास आहे. ते राजकारण आज हिंदूंनी जिंकले.
तलाक पोटगीच्या प्रश्नात मुल्ला मौलवींच्या इस्लामी आदेशापुढे झुकणे म्हणजे सेक्युलारीझम! या मंदबुद्धी व्याख्येला हिंदूंनी आग लावली आहे.
शहाबानो ते सच्चर कमिटीपर्यंत मुस्लिमांच्या धार्मिक दाढ्या कुरवाळणाऱ्या काँग्रेसचा आज संपूर्ण पराभव झाला आहे. हिंदूंचा राजकीय विजय झाला आहे.
देव माणसाचे काही बरेवाईट करू शकतो असे मला वाटत नाही. अल्लाही नाही, रामही नाही. देवाकडे सुपरपॉवर नसतात. कारण त्या अर्थाचा देवच अस्तित्वात नसतो.
राम मंदिर बांधल्याने कोणताही चमत्कार घडणार नाही. रामाचे फंक्शन चमत्कार करणे हे आहे काय? राम आणि कृष्णाने सारा भारत जोडला आहे. उत्तरेतली अयोध्या, नाशिकचे दंडकारण्य आणि कन्याकुमारीच्या रामेश्वर ला रामाने एकत्र जोडले आहे.
जैनांचे स्वतःचे रामायण आहे. बुद्ध रामाच्या इक्ष्वाकू कुळातला राजपुत्र आहे. शिखांच्या धर्मग्रंथात हजारो वेळा रामनाम येते. कारसेवा हा पंजाबी शब्द आहे.
राम राम म्हणून अभिवादन केले जाते. सकाळची वेळ रामप्रहर म्हणून सांगितली जाते . जेंव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतो तेव्हा – त्यात काही राम राहिला नाही असे आपण म्हणतो. वैतागून डोक्यावर हात मारतो तेव्हा – अरे रामा रामा रामा म्हणतो.
बाळ जन्मल्यावर रामनाम घेतले जाते. माणूस मेल्यावर रामनाम सत्य है चा पुकारा होतो. राम रोजच्या भाषेत आहे. रामप्रहरात आहे. भारताच्या दिग्काळात राम आहे. भारताचा संस्कृती पुरुष आहे.
पूजा,पंथ अन प्रदक्षिणेच्या
पल्याड काही संचित असते
संस्कृतीत जो अथांग रुजला
त्या रामाशी माझे नाते !
असेल जरी ती कवी कल्पना
शाश्वत काही म्हणून टिकते
पिढ्यापिढ्यांना भारून उरला
त्या रामाशी माझे नाते !
राम इतिहासपुरुष आहे की नाही हा प्रश्न चुकीचा आहे. राम मंदिराची जागा इतिहासात हिंदूंची होती का? हा योग्य प्रश्न आहे. ती जागा हिंदूंची आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुरावे पाहून मान्य केले आहे.
राम मंदिर केस जिंकताना महत्वाचा पुरावा होता तो गुरु नानकांनी १५१० मध्ये राम जन्मभूमीवरील मंदिराचे दर्शन घेतल्याचे ऐतिहासिक दस्तावेज. म्हणजे बाबरापूर्वी तिथे मंदिर होते.
१८५७ साली निहंग शिखांनी बाबरीवर हल्लाबोल करून ती ताब्यात घेतली होती आणि तिथे जबरदस्ती होम हवन सुरु केल्याबद्दल एफआयआर दाखल झाली होती.
१५१० पूर्वी तिथे हिंदूंचे मंदिर होते आणि १८५७ पासून हिंदू मंदिरासाठी लढत होते हे न्यायालयाने मान्य केले आहे. १५१० सालापर्यत मंदिर होते. ती जागा हिंदूंच्या मालकीची आहे असेही कागदोपत्री सिद्ध झाले आहे.
राम इतिहासपुरुष असेल अथवा नसेल पण राम जन्मभूमीवर त्याचे ऐतिहासिक मंदिर होते. त्या रामलल्ला च्या नावानेच कोर्टात केस लढली. राम जिंकला. हा इतिहास आहे.
स्वातंत्र्य मिळाल्या नंतर हिंदू क्रमाक्रमाने संघटित होत गेले. त्या हिंदू संघटनात राम मंदिराचा फार मोठा हातभार आहे. जातिभेदाचे विष कमी करायचे असेल तर त्याचा एक मार्ग हिंदू संघटन हा आहे.
हिंदू संघटन हि टर्म जातीभेद निर्मूलन या अर्थाने अनेक समाजसुधारकांनी वापरली आहे. संघटित व्हायची इच्छा भेद – विषमता कमी करायला मदत करते हे उघड आहे.
रामाला कोणी शम्बुकाच्या गोष्टीसाठी मानत नाही, ती प्रक्षिप्त उत्तर रामायणातली गोष्ट आहे. राम मंदिरामुळे हिंदूंच्यात जागृती झाली. हिंदू संघटित झाले. हिंदूंचे परस्परावरील प्रेम आणि ममत्व वाढले हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
हिंदु एकतेचे स्पिरिट आणि आधुनिकता या दोन गोष्टी पुढे जातीभेद कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
एका अमेरिकन गोऱ्या मित्राशी आज राम मंदिराबाबत बोलणे झाले. तो कुठून तरी डावे ज्ञान पिऊन आला होता . आणि आता भारतात पुराणमतवादी मागास राजवट लागू होणार असे बोलत होता.
मी त्याला फक्त दोन प्रश्न विचारले. पहिला म्हणजे डावे – उजवे असे दोन गट प्रत्येक देशात असणार हे तुला मान्य आहे का? उत्तर होकारार्थी आल्यानंतर विचारले की अमेरिका – युरोप आदी प्रगत देशातले उजवे गट आणि भारतातले उजवे गट यात जास्त सेन्सिबल कोण आहे?
पाश्चात्य उजवे ऍबॉर्शन वर बंदी घालतात, उघड वंशवादी असतात, बायबलचे कायदे त्यांना हवे असतात. मंदिर बांधले म्हणून रामाच्या काळातले कायदे लागू करा अशी भूमिका एकाही जवाबदार हिंदुत्व वादी नेत्याने घेतलेली नाही.
तुर्कस्थानातल्या उजव्या इस्लामी सरकारने कोर्टबिर्ट च्या भानगडीत न पडता नुकतेच एक खूप जुने चर्च आणि म्युझियम गाडून तिथे मशीद स्थापित केली. इस्लामी देशात आया सोफिया नावाचे चर्च बदलून त्याची मशीद दोनच दिवसापूर्वी झाली.
त्यावेळी त्यात काय चूक वाटले होते का? मुस्लिम किंवा ख्रिस्ती देशातल्या उजव्यांशी तुलना केली तर भारतातले उजवे गट खूपच सहिष्णू आणि आधुनिक आहेत.
मी देवाचे अस्तित्व मानत नाही. धर्माला प्रमाण मानत नाही. पण त्यामुळे हिंदू समाजात मला कोणी मारून टाकत नाही. हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून आणि हिंदू बहुसंख्य असेपर्यंतच या देशात नास्तिक नावाचा फ्यान्सी क्लब जिवंत राहील हे सत्य आहे.
हिंदू लोकांची अनेक धर्म – मते आहेत. हिंदू हे प्रादेशिक नाव आहे. एका समाजाचे नाव आहे. त्या हिंदू समाजाच्या बऱ्या वाईट गोष्टींसकट तो माझा समाज म्हणून मी स्वीकारला आहे.
त्या हिंदूंचा शेकडो वर्षांनी विजय होतोय. राम मंदिराची ध्वजा उचलणारे बाळासाहेब ठाकरे उत्तर आयुष्यात मी देव मानत नाही असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वात फरक पडला नाही.
हिंदुत्व हा शब्द आधुनिक भारताच्या राजकीय पटलावर आणला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. ते बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ आणि नास्तिक होते.
बाबर गाडला. भगवा फडकला. जय श्रीराम! पाचशे वर्ष हजारो हिंदू हुतात्म्यांनी बलिदान दिल्याने आज राम मंदिर मोठ्या दिमाखात उभे राहते आहे. आता उरलेल्या बाबरी पाडून तिथे लायब्ररी, शाळा आणि कोव्हीड हॉस्पिटल बांधावीत.
राम मंदिर आजपासून अयोध्येत आहे. आता बाबराचा बाप खाली आला तरी मंदिराची वीटही त्याला इंचभर हलवता येणार नाही. शेकडो वर्षांची गुलामीची साखळी हिंदूंनी आज तोडली आहे.
काहीतरी अद्भुत घडते आहे. गेली अनेक वर्षे याची तयारी सुरु आहे.
राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही हे मला माहीत आहे. कोणताही चमत्कार होणार नाहीये. पण शेकडो वर्षांनी हिंदूंचा राजकीय, सांस्कृतिक विजय होतो आहे हा लहान चमत्कार नाही.
हा परिश्रमाचा साक्षात्कार आहे. वीरबाहुंच्या कोदण्डाचा टणत्कार आहे. आत्मविश्वास पूर्ण भविष्याचा जयजयकार आहे. हिंदू समाजाचा एक लहान बिंदू म्हणून मी सद्गतीत झालो आहे….
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.