आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेली कित्येक वर्षं प्रलंबित असलेला, राममंदिराचा प्रश्न, अखेरीस मागच्या वर्षी निकालात निघाला. एवढेच नाही, तर राममंदिराच्या बांधकामासाठी, भूमिपूजनाचा मुहूर्त सुद्धा काढण्यात आलाय.
भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमीवर, पुन्हा एकदा राममंदिराची निर्मिती होणार आहे. अर्थात, भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून सुरु असणारं राजकारण, उलटसुलट चर्चा, यांना सुद्धा उधाण आलं आहे.
मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर, ५ ऑगस्ट रोजी, राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येत आहे. हा दिवस सगळ्यांसाठीच ऐतिहासिक ठरणार आहे.
यासाठी अयोध्यासुद्धा सजली आहे.
भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. याचसाठी, ते अयोध्येत उपस्थित राहणार आहेत.
अर्थात, राममंदिराचे भूमिपूजन करण्याआधी, ते हनुमान गढीला जाऊन, मारुतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर, त्यांच्या हस्ते पारिजाताचे झाड लावण्यात येणार आहे.
हादेखील एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. नेमकी, पारिजात वृक्षाचीच निवड का करण्यात आली, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
भारतीय संस्कृतीत, पौराणिक काळापासून, या पारिजात वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारिजाताचे सौंदर्य वाखाणण्याजोगे असते.
जमिनीवर पडलेला, पारिजाताचा सडा मन मोहून घेतो. त्याचे अनेक औषधी गुणधर्म, सुद्धा आहेत. मात्र, या पारिजातकाचे अस्तित्व भूतलावर असण्यालाही, त्याला एक पौराणिक महत्त्व आहे.
असं म्हटलं जातं, की समुद्र मंथनातून जी १४ रत्नं प्रकट झाली, त्यापैकीच एक म्हणजे पारिजात वृक्ष! चौदा रत्नांपैकी एक असल्यामुळे, पारिजात अमूल्य मानला जातो.
समुद्रमंथनातून प्राप्त झालेला हा पारिजात, इंद्रदेव स्वतःसोबत स्वर्गात घेऊन गेले होते, असं सुद्धा मानलं जातं.
इंद्रदेवांच्या बागेत हा पारिजात दिमाखात उभा होता. हा पारिजात स्वर्गातील, एक महत्त्वपूर्ण किमया ठरला होता. त्याला स्पर्श करण्याचा हक्क, फक्त उर्वशी या अप्सरेला होता, असे मानण्यात येते.
शरीराचा थकवा क्षणार्धात नाहीसा करण्याची किमया या वृक्षामध्ये आहे, असं मानलं जातं. उर्वशी तिचा थकवा दूर करण्यासाठी पारिजात वृक्षाला स्पर्श करत असे.
पारिजाताचा हा चमत्कार लक्षात घेऊनच, इतर कुणालाही त्याला स्पर्श करण्याची अनुमती नव्हती अशी आख्यायिका सांगितली जाते.
मग, कुणीही स्पर्श करू शकत नाही, असा हा पारिजात स्वर्गातून भूतलावर आला कसा? हा प्रश्न मनात आला असेल ना? या प्रश्नाचं उत्तर, अर्थातच दंतकथांमधूनच मिळू शकतं.
पारिजात पृथ्वीतालावर अवतारण्यामागे, अनेक दंतकथा, आख्यायिका सांगण्यात येतात.
यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि नेहमी सांगण्यात येणारी दंतकथा आहे, ती पांडवांची माता कुंती हिची!
पांडवांची माता कुंती, ही नियमितपणे महादेवाची पूजा करत असे. पांडवांनी यासाठी शिवमंदिराची निर्मिती केली होती. महादेवाच्या पूजेसाठी, पारिजाताची फुले वापरण्याची इच्छा कुंतीने आपल्या पुत्रांकडे बोलून दाखवली.
पडत्या फळाची आज्ञा मानून, कुंतीपुत्र अर्जुनाने स्वर्गाचा रस्ता धरला. स्वर्गातील पारिजात वृक्ष, तो भूतलावर घेऊन आला. कुंतीची इच्छा तर पूर्ण झाली, मात्र त्यानंतरही पारिजाताचा वृक्ष भूतलावर तसाच राहिला.
उत्तर प्रदेशातील, बाराबंकी जिल्ह्यातील, कुंतीर या गावात, हा पारिजात आजही आहे. ४५ फूट उंचीचा हा पारिजात लोकांसाठी श्रद्धेचा विषय आहे.
या पारिजाताची नियमितपणे पूजा करण्यात येते. एवढेच नाही, तर माता कुंती हिच्या नावावरूनच, या गावाचे नाव कुंतीर असे ठेवण्यात आले आहे.
अर्थात, ही कथा सर्वश्रुत असली, तरीही, पारिजात पृथ्वीतलावर आला; यासंदर्भात आणखी एक आख्यायिका सांगण्यात येते.
भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी रुक्मिणी, यांना नारद मुनी यांनी पारिजाताचे फुल दिले होते. तिच्या केसात माळलेले ते सुंदर फुल पाहून, श्रीकृष्णाची तिसरी पत्नी सत्यभामा, हिने त्यांच्याकडे हट्ट धरला.
असे सुंदर फुल असणारा वृक्ष तिला हवा होता. हा स्त्रीहट्ट पुरवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी पारिजात द्वारकेत आणला. त्यानंतर, कुंतीची इच्छापूर्ती करण्यासाठी, अर्जुनाने तो कुंतीर येथे नेला. त्यानंतर तो कायमस्वरूपी तिथेच राहिला.
या दोन्ही दंतकथांच्या बरोबरीनेच, सीतेला सुद्धा पारिजाताच्या फुलांची आवड होती असा उल्लेख पुराणात केलेला आढळतो. वनवासात असताना, प्रभू श्रीराम यांची पत्नी सीता, पारिजात फुलांचा वापर नटण्यासाठी करत असे, असे सांगितले जाते.
पौराणिक कथेमुळे, पारिजाताचे महत्त्व अधिक आहे. या झाडांची फुले लक्ष्मीदेवीच्या पूजेसाठी वापरण्यात येतात.
परंतु, या पारिजाताची फुले कुणीही खडू नयेत असे आजही मानले जाते. आपोआप वृक्षापासून गळून पडलेली फुले पूजेसाठी वापरण्यात येतात.
पारिजाताच्या स्पर्शाने थकवा दूर होतो, असे आजही मानले जाते. १० ते ३० फूट उंची असणाऱ्या या वृक्षाच्या छायेत, बसण्याचा पर्याय बहुतेकदा निवडला जातो.
पारिजाताच्या सावलीत बसल्यामुळे थकवा लवकर नाहीसा होतो असं मानण्यात येतं.
स्वर्गातून अवतरलेल्या, या वृक्षाचे सौंदर्य सुद्धा अवर्णनीय आहे. पारिजाताची, केशरी देठांची, सुंदर पांढरी फुलं डोळ्यांचे पारणे फेडतात. या वृक्षाला असंख्य फुले येतात. या फुलांचा सडा जमिनीवर पडल्यावर त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
या फुलांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ही केवळ रात्रीच फुलतात. रात्रभर पारिजात बहरलेला असतो. मात्र, सकाळी ही फुलं झाडावरून गळून पडतात.
पश्चिम बंगाल या राज्याने तर, या झाडाला राजकीय वृक्षाचा दर्जा दिला आहे.
पौराणिक महत्त्व असणाऱ्या या वृक्षाचे, औषधी गुणधर्म सुद्धा उत्तम आहेत. या फुलांच्या बीजाचे नियमित सेवन केल्यास, ते मूळव्याधीवर गुणकारी ठरते.
पारिजाताची पाने आणि मध यांच्या मिश्रणाचे सेवन, कोरड्या खोकल्यावरील गुणकारी औषध आहे. याशिवाय, पारिजाताची पाने, अनेक त्वचारोगांवर सुद्धा गुणकारी आहेत.
पौराणिक महत्त्व, सौंदर्य, औषधी गुणधर्म, अशा सर्व गोष्टींचा मिलाफ पारिजात या वृक्षात आढळतो. अनेकांच्या भावभावना आणि श्रद्धा सुद्धा या वृक्षाशी निगडित आहेत.
पवित्र राममंदिराच्या भूमिपूजनाआधी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पारिजाताचे वृक्षारोपण करणार आहेत. पारिजाताचे अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेता, हा निर्णय किती उत्तम आहे, हे लक्षात येते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.