पक्ष्यांसाठी अंधारात गेलेलं गाव! विलक्षण, विस्मयकारक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे ज्याला इतर प्राण्यांपेक्षा जास्त काही गोष्टींचे वरदान मिळालेले आहे. ह्यामध्ये दुःख झाल्यावर अश्रू येणे, आनंद झाल्यावर स्मितहास्य, हास्य अशा काही खास गोष्टींची मनुष्याला देणगी मिळाली आहे.
मनुष्याजवळ भाव भावना, त्यांना योग्य वेळी व्यक्त करण्याची, त्यावर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. त्याचबरोबर तल्लख बुद्धी आणि ती योग्य तशी वापरण्याचे देखील वरदान मिळाले आहे.
दया, क्षमा आणि शांती असे दुर्मिळ गुण देखील मनुष्यांमध्ये आढळून येतात, अर्थात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ह्या म्हणीप्रमाणे सर्वांचेच स्वभाव सारखे नसतात.
त्यामुळे काही माणसांमध्ये चांगुलपणा असेल, तर काहींमध्ये निर्दयता पण असते. ह्याची बरीच उदाहारणे आपल्यासमोर आहेत.
फार पूर्वी म्हणजे आदिमानवाच्या काळात शिकार करून गुजराण करण्याची पद्धत होती. मनुष्य ठराविक प्राण्यांचीच शिकार करत असे. राजा – राण्यांच्या काळातही बड्या लोकांना शिकारीची आवड होती.
पण, शिकार करताना निसर्गाचा समतोल ढळणार नाही ह्याची काळजी घेतली जाई. परंतु, पुढे लोकं स्वार्थी झाली. स्वतःच्या मनोरंजनासाठी कोणताही सारासार विचार न करता मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाऊ लागली.
बरेचसे प्राणी – पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. शिकार ह्या कारणाबरोबरच प्रदुषण हेही प्राणी-पक्षी नामशेष होण्याचे एक मोठे कारण आहे! आणि ह्याला कारणीभूत फक्क्त आणि फक्त मनुष्यच आहे.
स्वतःच्या सोयी सुविधांसाठी विज्ञान तंत्रज्ञानात माणसाने प्रगती केली. ह्या प्रगतीमुळे इतर पशु-पक्ष्यांवर, निसर्गावर विपरित परिणाम होईल हे कळूनही मनुष्य चूका करत गेला निव्वळ आपल्या सोयीसाठी!
जसे, मोबाइलचा शोध लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात मोबाइल टॉवर मधल्या घातक तरंगांमुळे चिमणीसारखे नाजुक पक्षी नष्ट होऊ लागले होते!
ह्या पक्षांचे प्रमाण इतके कमी झाले होते, की अन्नसाखळीवर त्याचा परिणम होऊ लागला आणि “save sparrows”, “चिमण्या वाचवा”, “पक्षी वाचवा” अशा मोहिमा राबवण्याची वेळ आली.
पण, जसे नाण्याला दोन बाजू असतात तसेच इकडे पण आहे. मनुष्य स्वार्थी असला, निर्दयी असला, तरी सगळेच सारखे नसतात, काही लोकं इतक्या हळव्या मनाची असतात, की मुक्या प्राण्यांची त्यांना अतिशय दया येते.
त्यांच्या दुःखाने ही माणसे देखील अस्वस्थ होतात. मुक्या जनावरांना, पशु पक्षांना कोणात्याही प्रकारे हानी पोहोचू नये ह्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. “प्राणी मित्र” अशी बिरुदावली ते अभिमानाने मिरवतात.
काही काही ठिकाणी तर संस्था आहेत प्राण्यांच्या संरक्षणासाठी तर, बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे ह्यांच्यासारखी माणसे मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी स्वतःच एक भक्कम संस्था बनतात.
अशी असंख्य माणसे आहेत जे प्राण्यांसाठी केव्हाही आणि काहीही करण्यासाठी तयार असतात.
आज आपण ह्या लेखातून अशा अनोख्या गावाची माहिती घेणार आहोत, जिथे ४० दिवस स्ट्रीट लाइटस् लागले नाहित. नाही नाही! तेथे कोणताही तांत्रिक बिघाड नाही किंवा लोड शेडींग पण नाहिये.
तिथल्या सर्व माणसांनी एकत्र येऊन नामशेष होणाऱ्या पक्षांसाठी एक अनोखा निर्णय घेतला आहे. हे असे सगळ्यांनी एकत्र येऊन छोट्याशा पक्षांसाठी आपल्या सोयी सुविधांचा विचार न करणे हे खरंच खूपच कौतुकास्पद आहे.
ही गोष्ट आहे तमिळनाडु मधील पोत्ताकुडी गावाची. ज्या गावाने पक्ष्याच्या घरट्यामुळे, त्या घरट्यातील अंड्यांमुळे ४० दिवस स्ट्रीट लाइटस् लावले नाहित.
तमिळनाडु मधील शिवगंगा जिल्ह्यात पोत्ताकुडी हे गाव आहे. इतर शहरांप्रमाणेच इकडे पण वीज पोचली. रात्री सुद्धा येथे स्ट्रीट लाइटस् मुळे उजेड पडू लागला.
हे स्ट्रीट लाइटस् लावण्याचे काम करुप्पु राजा नावाच्या व्यक्तीकडे आहे. एका स्विच बोर्ड वर १०० घरांच्या आसपासच्या रस्त्यांवरचे ३५ स्ट्रीट लाइटस् सुरु होतात.
एक दिवस ह्या स्विच बोर्ड जवळ करुप्पु राजा ह्यांना एक निळसर पक्षी उडत असल्याचे दिसले. तो पक्षी सारखा त्या बोर्ड जवळ घुटमळत होता. तिकडे असणाऱ्या पोकळीमधे ये – जा करत होता.
तो पक्षी गवताच्या काड्या, पाने वगैरे गोळा करत होता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर करुप्पु राजा ह्यांनी स्विच बोर्ड जवळ निरिक्षण केले असता, तेथे तो पक्षी घरटे बांधत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.
ते घरटे ‘इंडियन रॉबिन’ ह्या पक्षाचे आहे (कोणता पक्षी आहे हे आधी माहित नसल्याचे करुप्पु राजु ह्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे). इंडियन रॉबिन पक्षी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
२-३ दिवसांनी त्या घरट्यामधे तपकिरी ठिपके असणारी ३ अंडी देखील घातली होती. स्विच बोर्ड जर चालू केला, तर त्याच्या घर्षणाने घरट्याला आग लागण्याची शक्यता होती. करुप्पु राजु ह्यांचे मन ह्या गोष्टीला तयार होईना!
त्यांनी त्या घरट्याचा फोटो काढला आणि तो फोटो त्या आसपासच्या घरांमध्ये व्हॉटसअॅप च्या माध्यमातून ‘व्हायरल’ केला.
तेथील लोकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली, की स्विच सुरू केला तर आग लागण्याची शक्यता आहे आणि ते पक्षी, अंडी, घरटे सगळंच नष्ट होईल.
दिवे चालू न करण्यासाठी राजू ह्यांनी खूप प्रयत्न केले. अशा गोष्टींसाठी लोकांचे मन वळविणे कठिण असते. काहींना ते पटले, तर काहींना असे वाटले की छोट्याशा पक्ष्यासाठी असा निर्णय घेणे योग्य नाही.
तरीही राजू ह्यांनी लोकांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. अखेर ह्या लोकांनी ह्या पक्ष्यांना हानी पोहोचू नये, म्हणून दिवे बंद ठेवण्याचे मान्य केले.
दुसऱ्या दिवशी त्याने तेथील ग्रामपंचायत प्रमुख अरुसनन् आणि कालीश्वरी एच् ह्यांना प्रत्यक्ष त्या जागी येऊन पाहणी करण्याची विनंती केली. राजुच्या ह्या विनंतीने अरसुनन ह्यांना आश्चर्य वाटले.
त्यांनी खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “खरे तर ही खूपच छोटी गोष्ट होती तरीही आम्ही तिकडे जाऊन परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याचा निर्णय घेतला.
तिकडे गेल्यावर ते घरटे आणि अंडी पाहून मला लॉकडाऊनमधे बेघर झालेली किंवा स्वतःच्या घरी पायी जाणारी, त्रास झालेली माणसे आठवली आणि मी देखील दिवे बंद ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
लोकांना रात्री जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या आणि दिवे बंद करण्यास परवानगी दिली”.
लाइटस् बंद ठेवण्यासाठी नुसतं स्विच बंद ठेवणे हा एकच उपाय नव्हता तर मेन वायर कापावी लागणार होती. मग ते घरटे टेप वगैरे लावून सुरक्षित केले आणि मेन वायर कापण्यात आली.
४० पेक्षा जास्त दिवस ते रस्ते अंधारात होते.
“घरट्यातल्या अंड्यातून पिल्ले बाहेर आली आहेत आणि हळूहळू उडण्याचाही प्रयत्न करीत आहेत. रात्री थोडासा त्रास सहन करावा लागला, पण ते पक्षी वाचल्याचा आनंद खूप मोठा आहे” असे तेथील लोक सांगतात.
खरंच अशा लोकांना सलाम जे पशु-पक्ष्यांच्या हितासाठी स्वतःचा विचार करत नाहीत!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.