ज्यू धर्मियांची वाताहत : इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि ज्यू धर्माचा संयुक्त इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अब्राहम…
असं म्हणतात की मनुष्य जातीची सुरुवात एडम (आदम) अणि ईव पासून झाली. त्यांची दहावी पिढी म्हणजे नोवा. फादर नोवा.
या सृष्टीचा निर्माता एकदा जगात पाप वाढले म्हणून जग बूडवायला निघाला होता, तेंव्हा फादर नोवाने सगळ्या प्राण्यांचे वंश वाचवले अशी श्रद्धा आहे.
फादर नोवाचा अकरावा वंशज म्हणजे “अब्राहम”.
हा अब्राहम ‘मेसोपोटामीया’ नावाच्या प्रदेशातला, प्राचीन ग्रीस, आजचं इराक. अब्राहमला देवाबद्दल अनेक प्रश्न होते, त्याचे वडिल देवाच्या मूर्ती बनवून विकत असत.
पण त्याला काही हा प्रकार पचेना. तो म्हणायचा की देव असा मूर्तीत वगैरे नसतो. बापानं बरंच समजावलं पण हा काही हट्ट सोडेना.
शेवटी एकदाचा देवाने याला दृष्टांत दिला… हा देव म्हणजे “याहवे”. अब्राहमला एकदा देवाने आदेश दिला की –
तू आता ‘मेसोपोटामिया’ सोड अणि ‘कनान’ला जा, ती जमीन, तो प्रदेश मी तुला अणि तुझ्या वंशजाना बहाल करतो. बदल्यात तू माझा प्रचार कर, मी ‘याहवे’ आहे अणि मीच एकमेव देव असून बाकी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असे सांग.
देवाची इच्छा शिर्सावंद्य मानत अब्राहम निघाले… ते थेट कनानला पोचले अणि तिथे त्यानी ‘याहवे’चा प्रचार केला.
अब्राहमला सारा नावाची बायको होती. अब्राहमला मूल हवं होतं, पण ते होत नव्हतं. त्याच्या देवाने त्याला दृष्टांत दिला की “बाबा रे, होईल तुला मूल, मी वचन देतो”.
पण अब्राहमला धीर धरवेना.
मग काय, हगर नावाची त्याच्या बायकोची मोलकरीण होती तिच्याशी त्याने लग्न केलं अणि तिच्यापासून अब्राहमला “इश्माईल” नावाचा मुलगा झाला.
१४ वर्षानी देव पण पावला अणि सारा पासून त्याला “इसाक” नावाचं पुत्ररत्न प्राप्त झालं. पुढे अब्राहमने “केटुरा” नावाची अजून एक बायको केली अणि अर्धा डझन पोरं बाळं अजून झाली.
एकदा अब्राहमची परीक्षा घ्यावी म्हणून, देवानं त्याला स्वतःचं अपत्त्य ‘कुर्बान’ करण्याचा आदेश दिला. मागचा पुढचा विचार न करता अब्राहमने इसाकला एका दगडावर ठेवले अणि त्याला मारणार इतक्यात देव प्रकट झाला.
देव प्रसन्न झाला, अणि त्यानं अब्राहम अणि त्याच्या वंशजाना आशीर्वाद दिले.
पुढे इश्माइल अरेबिया मधे गेला. पण इसाक कनानलाच राहिला अणि त्याने देखील याहवेचा प्रचार करायला सुरुवात केली. जेकबने त्याला साथ दिली!
हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की, इस्लाम, ख्रिस्ती अणि ज्यू हे तिन्ही धर्म या अब्राहमने जोडून ठेवलेत.
मुस्लिम लोक म्हणतात “इब्राहीम”
ख्रिश्चन लोक म्हणतात “अब्राहम” अणि
ज्यू लोक त्याला म्हणतात “अब्राम”…
तिन्ही धर्म त्याला ‘पैट्रिआर्क’ म्हणजे कुल-पीता मानतात. या तिन्ही धर्माना म्हणतात “अब्रहमीक रेलिजन्स”. तिन्ही धर्म अंशिक दृष्टया सारखेच… ‘मोनोथेइस्ट’, म्हणजे “देव एकच असतो” असं मानणारे, मुर्तिपुजेला विरोध करणारे.
पण प्रत्येकाची देव मानण्याची पद्धत आणि देवाचं नाव वेगळं!
इश्माइल अरेबियामधे जाउन स्थायिक झाला अणि त्याचा वंशज म्हणजे मुहम्मद, याने इस्लामचा प्रचार केला.
अब्राहम ज्या कनान नावाच्या प्रदेशात राहिला अणि जिथे इसाक अणि
जेकबने त्याची शिकवण पसरवली, तेच आजचं “इजराइल”. इसाक, जेकब अणि अब्राहमचे अनुयायी म्हणजेच आजचे “ज्यू” लोक!
–
- नाझी राजवटीत १२०० ज्यू लोकांचे प्राण वाचवणारा ‘ऑस्कर शिंडलर’ होता तरी कोण?
- ज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा !?
–
आजचं इजराइल :
आपण खूप आधीपासून ऐकत आलोय की मुस्लिम लोक ज्युंचा अणि ज्यू लोक मुसलमानांचा तिरस्कार करतात. का करतात?
सगळे इस्लामी देश इजराइलला एक ‘देश’ म्हणून मान्यता देत नाहीत. का देत नाहीत?
रोज वाचतो पेपरात की इजराइलने पलेस्टाइनवर रॉकेट सोडले… पलेस्टाइनने इजराइलवर मिसाइल सोडले..!! हा तिरस्कार का आहे?
अगदी सुरुवातीपासून समजून घेऊ.
अब्राहमचा नातू होता जेकब, त्याला स्वतः देवानं एक नाव दिलं ‘यिसरैल’. यिसरैल म्हणजे हिब्रू भाषेत “देवासोबत निरंतर प्रयत्न करणारा”. या ‘यिसरैल’ पासून आजचं इजराइल हे नाव पुढे रूढ़ झालं.
याहवेहने अब्राहमला जे वचन दिलं तेच इसाक अणि त्यानंतर जेकबला दिलं. अब्राहम अणि इसाक नंतर ज्यू लोकांचा हा तीसरा ‘पैट्रिआर्क’ म्हणजेच कुलपिता.
या जेकबला 12 मुले झाली, अणि त्यानी इजराइलचे 12 भाग वाटून घेउन ज्यू धर्माचा प्रचार सुरु केला. इजराइलच्या 12 ट्राइब्स, जनजाती.
त्यातल्या एकाचं नाव होतं “येहूदा” त्याचा अपभ्रंश म्हणजे जेहुदा, त्यावरून “ज्यू”.
पुढल्या काही काळात इजराइलमध्ये भयानक दुष्काळ पडला अणि ज्युना नाईलाजानं इजिप्तला जावं लागलं. बरीच वर्षं ज्यू तिथे राहिले, शांतपणे. नाइल नदीच्या काठावर…
आधी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या ज्यूंनी हळू हळू याहवेचा प्रचार करण्यास सुरुवात केली आणि इजिप्तचे फॅराओ चिडले. फॅराओ इजिप्तच्या प्राचीन राजाना म्हणतात. त्याचा अर्थ पिरॅमिड बांधणारे. फ़राओ संतापले!
मग इजिप्तमध्ये ज्यूंना गुलाम बनवण्यात आलं. बरीच वर्ष गुलामगिरी करून झाल्यावर त्यांचा एक मसीहा तिथे अवतरला, जसा ‘पैगम्बर’ किंवा ‘येशु’ तसाच हा ज्यूंचा “मोसेस” (मोशे).
मोसेसनं सगळ्या ज्यूंना इजिप्तमधून परत इजराइलमधे आणलं, त्यासाठी खूप कष्ट सोसले. त्यात त्याला याहवेनं मदत केली. या इजिप्तमधून सूटकेला ‘एक्सोडस’ म्हणलं जातं.
इथून ज्युंचा दर्दनाक किस्सा सुरु झाला. २ ट्राइब्स सुखानं राज्य करत होत्या. प्रत्येक ट्राइबचा एक राजा होता, त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे किंग डेविड. डेविडनं राजधानी बनवली अणि तिथं त्याचा मुलगा सोलोमननं पहिलं ज्यूइश मंदिर बांधलं.
द फर्स्ट टेम्पल.
देवाच्या आदेशानुसार अब्राहम इसाकला ज्या दगडावर ठेउन मारणार होता, तिथेच हे मंदिर बांधण्यात आलं, आणि ही राजधानी म्हणजे “जेरुसलेम”. ज्यूँसाठी सर्वात पवित्र अणि महत्वाचं शहर.
यानंतर मात्र ज्यूंनी प्रंचड सोसलं. अतिच. हाणामारीचा जो सपाटा सुरु झाला की बस! सगळ्यात आधी त्यांच्यावर हल्ला केला बाबिलोनिअन नाबुचंदनेझरनं.
मोठी सेना घेऊन नबुचंदनेझर अवतरला आणि त्याने ज्यूंचं शिरकाण केलं. फर्स्ट टेम्पल तोडुन टाकलं अणि ज्यूंना हाकलून दिलं इजराइल मधून.
काही वर्ष अशीच गेली. देश सोडून पळून गेलेले ज्यू हळूहळू जेरुसलेममध्ये परत आले. तिथेच दुसरे मंदिर बांधले.
“सेकंड टेम्पल”.
सगळं अलबेल झालं असं म्हणावं तोच ऍलेक्झांडर अवतरले. जगज्जेता सिकंदर.
सिकंदरने इजराइल जिंकलं खरं. पण ज्यू लोकांनाच चालवायला दिलं, सत्ता मात्र सिकंदरची! पण सिकंदर नंतर किंग एंटीओकसच्या काळात ज्यू मंदिर भ्रष्ट करण्यात आलं अणि मेकाबीसच्या नेतृत्वाखाली ज्यूंनी राजद्रोह केला. सत्ता स्वतःकडे घेतली.
दोन-अडीचशे वर्ष अशीच गेली, मग अचानक टीटस आला रोमन सैन्य घेउन. अणि पहिले पाढे पंचावन्न!
जेरुसलेम काबिज़ करून “सेकंड टेम्पल” देखील जमीनदोस्त करण्यात आलं. इजराइलची सत्ता रोमन साम्राज्याकडे आली. साइमन बार कोखबा नावाच्या ज्यूइश माणसाच्या नेतृत्वाखाली परत राजद्रोह करण्याचा प्रयत्न झाला. पण यावेळी असफल ठरला. बार कोखबा मारला गेला.
या द्रोहामुळे रोमन चिडले. त्यानी ज्यूंना वेचून वेचून मारायला सुरुवात केली. असंख्य ज्यूंना मारलं, हाकलून दिलं. इजराइलच्या आजुबाजूच्या परिसराला डायसपोरा म्हणतात, ज्यू तिथे पळाले, बरेच ज्यू यूरोप मधे गेले. काही अरेबियामधे गेले. रोमन लोकानी ज्यूंची संख्या प्रमाणबद्ध पद्धतीने कमी केली.
अगदी थोडके ज्यू उरले. हे ही कमी पडलं म्हणून त्यानी ज्यूंचं अस्तित्वच नष्ट करायचं ठरवलं! जेरुसलेमचं नाव बदलून ‘एलिया कैपिटलोना’ ठेवलं अणि इजराइलचं नाव बदलून ठेवलं “पलेस्टाइन”…!
दरम्यानच्या काळात ग्रीसमधे बायझेनटाइन एम्पायर उदयाला आलं. ग्रीक बोलणारे राजे, पण ख्रिश्चन ‘मोनोथेइस्ट’. आधी ग्रीक लोक बऱ्याच देवाना मानायचे.
झेउस, पोसायडन, हरक्यूलीस वगैरे. पण ख्रिश्चन धर्माचा प्रचार जोरात चालला होता, त्यामुळे या मंडळीना गाशा गुंडाळावा लागला.
बायझेनटाइन अत्यंत शक्तीशाली राजवट होती… साहजिकच आता जेरुसलेम ख्रिश्चन शहर बनलं. जिथे ज्यूंना राहण्यास मनाई होती. जे शहर किंग डेविडनं इतक्या हौसेनं बांधलं, जिथे ज्यूंनी स्वतःचं पवित्र मंदिर बांधलं, तिथे त्यानाच प्रवेश नव्हता!
त्यातच जीससचं “क्रुसीफिक्शन” जेरुसलेमला झालं होतं!
म्हणून हे शहर जितकं ज्यूंसाठी पवित्र, तितकंच ख्रिश्चन लोकांसाठी देखिल पवित्र.
जितका जोरात क्रिस्चियन धर्माचा यूरोप मधे प्रचार चालला होता, तितकाच मध्य-पूर्व एशिया मधे इस्लामचा! अणि इस्लामच्या अनुसार –
मुहम्मद पैगम्बर सदेह स्वर्गात जाऊन आला अणि अब्राहम, मोसेस अणि जीससला बोलून आला. कुठून? जेरूसलेमहून…! अल-अक्सा मस्जिद, जेरूसलम!
अर्थात, आता जे जेरुसलेम ज्यूंसाठी पवित्र होतं, ते ख्रिश्चन लोकांसोबत मुसलमानांसाठी देखील पवित्र होतं!! अरबांकडून बायझेनटाइन राजवटीचा पलेस्टाइनमधून पाडाव झाल्यावर जेरुसलेमवर इस्लामी खलीफांचं राज्य आलं!
आधी मदिनाचे राशीदून, मग दमास्कस (सीरिया) चे उमय्यद अणि नंतर बगदादचे अब्बसीद! या इस्लामी खालिफानी ज्यूंना नवे सिनागोग (ज्यूइश मंदिर) बांधायला मनाई घातली.
पण रशिदून खलीफा उमरनं ज्यूंना जेरुसलेमला येउन राहण्याला अणि मुक्तपणे धार्मिक कार्यक्रम करायला परवानगी दिली. जवळपास पाचशे वर्षानी ज्यूंना जेरुसलेममधे रहायला अणि धर्माचरण करायला मोकळीक मिळाली होती!
पण नंतर इस्लामी खालिफा अब्द इल मालिकनं तो जो पवित्र दगड होता, त्यावर “डोम ऑफ़ द रॉक” बांधला. ज्यूंच्या फोडलेल्या मंदिरात. कारण इस्लामनुसार पैगम्बर तिथून स्वर्गात जाऊन आला. आता जेरुसलेम एक पुरेपुर ‘इस्लामिक श्रद्धास्थान’ बनलं.
मध्य-पूर्व एशियामधे जशी इस्लामची ताकद वाढत गेली, तशी यूरोपात ख्रिश्चन मजबूत होत गेले. ग्रीसचा झालेला पाडाव अणि जेरुसलेममधून गेलेली सत्ता पाहून ख्रिश्चन पोप अर्बन II नं “क्रूसेड” म्हणून आरोळी ठोकली!
धर्मयुद्ध…!
झालं… युरोपातून लाखो ख्रिश्चन क्रुसेडर्सच्या टोळ्या जेरुसलेमच्या दिशेने बेफाम सुटल्या! एका मागोमाग एक! ज्यू अणि मूसलमानानी कसोशीने प्रयत्न केले पण जेरुसलेमचा पाडाव झाला. असंख्य ज्यूंची कत्तल करण्यात आली!
जेरुसलेम परत एकदा ख्रिश्चन शहर बनलं अणि ज्यूंना परत पलेस्टाइन मधून हाकलून देण्यात आलं किंवा मारून टाकण्यात आलं!
मधून मधून पलेस्टाइनवर मामेलुक्सचे हल्ले होत राहिले… ज्यू मरत राहिले, पळत राहिले!
सोळाव्या शतकात तुर्क ओटोमन राजा सुलेमाननं इजराइल जिंकलं अणि पुढचे ४ शतकं ज्यूंसाठी “दगडापेक्षा वीट मऊ” म्हणतात तसं ठीकठाक राहिले!
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य-पूर्व एशिया सकट पूर्ण जगाचं राजकीय समीकरण बदललं होतं! ब्रिटिश, फ्रेंच अणि जर्मन लोक जगावर राज्य करत होते.
याच काळात जगभरातल्या ज्यूंनी एक चळवळ सुरु केली, “झिओनिजम” किंवा “झायोनिजम”.
झिओनिजम म्हणजे जगभरातल्या ज्यू लोकाना एकत्र आणून इजराइल, म्हणजे ओटोमन पलेस्टाइनमधे न्यायचं!
हे झिओनिस्ट खूप कट्टर म्हणून ओळखले जायचे/जातात. स्वतंत्र ज्यू देश ही त्यांची मागणी होती. 1882 पासून यूरोप, मध्य-पूर्व एशिया मधले ज्यू पलेस्टाइनमधे परतायला लागले, मोठ्या संख्येने.
पहिल्या महायुद्धात ओटोमन साम्राज्याचा पराभव झाला अणि पलेस्टाइनमधे ब्रिटिश राजवट आली ती पांढरे पाय घेउनच!
ब्रिटिशानी पलेस्टाइनमधल्या अरब लोकाना युद्धातल्या मदतीच्या बदल्यात “पलेस्टाइन” स्वतंत्र इस्लामी देश अणि ज्यूंना काही भाग “इजराइल” म्हणून देण्याचं मान्य केलं!!
पण राज्य इंग्रजांचंच राहिलं… २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून ज्यूंचं देशांतर चालूच राहिलं. लाखो ज्यू जगभरातून इजराइलमधे परतले.
बघता बघता दुसरं महायुद्ध आलं, अणि नाझी फौज़ानी ज्यूंसोबत काय केलं ते सगळ्या जगाला ठाऊक आहे! झिओनिस्ट ज्यू लोकानी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला, यात इजराइल मधल्या अरब लोकांशी बरंच भांडण झालं. दंगे झाले.
अरब म्हणाले पलेस्टाइन नावाचा इस्लामी देश हवा, ज्यू म्हणाले ‘इजराइल’ हवं! दोघंही ऐकेनात. मांजरांची कळवंड लागल्यागत भांडण!
शेवटी ज्यू लोकांची संख्या अरब लोकांपेक्षा जास्त झाली, अणि १४ मे १९४८ ला हैरी ट्रूमैन (अमेरिकन राष्ट्राध्यक्ष) चा आधार घेउन इजराइल जन्माला आलं! स्वतंत्र ज्यू देश! काही भाग अरब लोकाना पण देण्यात आला, पलेस्टाइन!
पण अरबांचं समाधान झालं नाही. त्यांना संपूर्ण पलेस्टाइन हवं होतं/आहे!! त्यामुळे या घटनेनंतर लगेच, इजिप्त, जॉर्डन, सीरिया, लॅबेनॉन, इराक झाडून सगळ्या अरब देशांच्या फौझांनी इजराइलवर हल्ला केला!
इजराइलनं हा सगळा हल्ला परतावला… अणि जितकी जमीन आधी मिळाली होती, त्याच्या दुप्पट काबिज़ केली. इसको बोलते वट!
नंतर देखील अनेकवेळा अरब देशांनी इजराइलवर युद्ध लादले, हल्ले केले. पण इजराइल नेहमी जिंकले!
असं हे इजराइल अणि हे चिवट ज्यू! असंख्य हल्ले, अडचणी, अन्याय सोसले साल्यांनी. पण हार नाही मानली! शेवटी साला इजराइल ट्रायंफड्!
3000 वर्षांपासून एकच भाषा बोलतात, एकच लिपी वापरतात, एकच संस्कृती फॉलो करतात! हा सगळा अट्टहास का?
कारण देवाने प्रॉमिस केलं होतं त्यांना – की ही जमीन त्यांची आहे. इजराइल अस्तित्वात आल्यावर जेव्हा ज्यू जगभरातून आले, तेव्हा आधी कधीही इजराइल न पाहिलेल्या ज्यूंनी देखील अक्षरशः इजरायली जमिनीच्या पाप्या घेतल्या रडत!
आज इजराइल आहे, मधोमधचा काही भाग म्हणजे पलेस्टाइन आहे. जेरुसलेमचे पण दोन भाग पडलेत. ओल्ड सिटी अरबांची अणि न्यू सिटी ज्यूंची! डोम ऑफ़ रॉक वर अरब नमाज़ पढतात, तर ज्यू प्रार्थना करतात!
आजही रोज दंगे होतात… आजही रोज लोक मारतात. हे असं कधीपर्यंत चालणार, हे एकतर अल्लाह जाणो नाहीतर याहवे जाणो…!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.