महागड्या गिफ्ट्सपेक्षा खऱ्या भावाने बहिणीला या ९ ओवाळणी द्यायलाच हव्यात!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मार्च महिन्यात देशात घडलेल्या कोरोना संकटाला अजूनही पूर्णविराम लागलेला नाही.
प्राथमिक लक्षणं दिसताच वाढणारी धडधड, त्यानंतर कोरोना टेस्टची धडपड, प्रचंड ताण आणि अखेर पॉझिटिव्ह असलेला रिपोर्ट हाती धरून हॉस्पिटलमध्ये बेडसाठी केलेली वणवण हा पाठशिवणीचा खेळ आजही घराघरांमध्ये सुरु आहे.
दरम्यान गुडीपाडवा असो की विठुमाऊलीची आषाढी एकादशी… अनेक सोहळे आले आणि भीतीच्या छायेत मुकाट्याने निघूनही गेले.
मागील काही दिवसांपासून शासनाने दिलेल्या “मिशन बिगन अगेन” च्या हाकेला प्रतिसाद देत अनेकजण घराबाहेर पडल्याने आजचा रक्षाबंधनाचा सोहळा तरी (घरगुतीचं) पण थाटात होणार यात शंका नाही.
आज आपल्या लाडक्या बहिणाबाईंना खुष करण्यासाठी अनेकांचे जिकरीचे प्रयत्न सुरु असतील.
भावाबहिणींचं गोड नातं साजरं करण्यासाठी प्रत्येकजण नवी, भन्नाट शक्कल लढवत असेल. पण दरवर्षीप्रमाणे यंदा शॉपिंगचा उत्साह नाही, की सेलिब्रेशनची धम्माल नाही. मग करायचं काय?
मास्क, हॅंडग्लोव्हज अशी जय्यत तयारी करून तुमच्यापैकी काही शुरवीर भाऊरायांनी बाजारात फेरफटका मारला असेलही, पण बहिणीला आवडणारं गिफ्ट मिळालंय का?
नाही ना?
पण आता गिफ्टची चिंताच सोडा, कारण आम्ही गिफ्ट्सचे असे काही पर्याय तुम्हाला सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
कपडे, कॉस्मॅटिक्स, शोभेच्या वस्तु यांनी हल्ली प्रत्येक मुलीचं कपाट खच्चाखच भरलेलं असतं, त्यामुळे पुन्हा त्याच त्याच गोष्टी देण्यात काहीही अर्थ नाही.
आपल्या बहिणीला केवळ बाह्यरुपाने सुंदर न बनवता तिला सर्वार्थाने सक्षम, यशस्वी बनविण्याची संधी तुम्हाला या रक्षाबंधनाला मिळत असेल तर?
सध्या तुमच्या बहिणीला ज्या गिफ्ट्सची सर्वात जास्त गरज आहे, जी गिफ्ट्स तिचा केवळ वर्तमान नव्हे, तर भविष्यही उज्वल करतील अशीच ओवाळणी यंदा द्या.
चला तर, लाडक्या बहिणाबाईला आत्मनिर्भर बनविण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या ओवाळणी देऊ शकता हे पाहूयात.
१. स्त्री स्वातंत्र्य
चारचौघांमध्ये स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना आपली आई, बहीण या पूर्णतः स्वतंत्र आहेत का याचा जरा विचार करा. हा प्रश्नच तुम्हाला काय ओवाळणी द्यावी याचं उत्तर देईल.
बहिण लहान असो वा थोरली, प्रत्येक स्त्रीला आपण स्वतंत्र असावं असं वाटतं. अर्थात त्यासाठी कुटुंबियांचा पाठिंबा हा सर्वात महत्वाचा.
अशावेळी घरातल्या लाडक्या भावानेच बहिणीला विचारांनी, कृतीने स्वतंत्र्य होण्यासाठी पाठबळ दिलंं, तिला समजून घेत तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदत केली तर ही भेट बहीण आयुष्यभर विसरू शकणार नाही.
२. निरपेक्ष प्रेम
आई-वडिलांपासून ते खोलीतल्या वस्तुंपर्यंत सगळं काही शेअर करणारी जगातली एकमेव व्यक्ती म्हणजे आपला भाऊ किंवा बहीण.
कधी तिच्याशी तर कधी तिच्यासाठी इतरांशी भांडणाऱ्या भाऊरायाचं तिच्यावर प्रेम असतंच यात शंकाच नाही, पण बालपणीचं हे प्रेम वयाच्या प्रत्येक टप्प्यात बहिणीला देत रहाल याची काळजी घ्या.
कोणत्याही अपेक्षेविना बहिणीवर केलेलं प्रेम यापेक्षा दुसरी आनंदाची ओवाळणी बहिणीसाठी असुचं शकत नाही.
हे प्रेम कृतीतून दाखवा, शब्दांतून किंवा तुम्ही स्वतः लिहिलेल्या पत्रांतून… पण हे प्रेम प्रत्येक वर्षागणिक कायम वाढत जाईल याची शाश्वती मात्र अवश्य द्या.
३. लग्नानंतर हक्काचं माहेर
आई-वडिलांचं घर म्हणजे लेकीचं माहेर ही संकल्पना जरा बदलायला काय हरकत आहे?
भावा-बहिणींच्या लग्नानंतर दोघेही आपआपल्या संसारात रमतात. मुलीच्या लग्नानंतर काही वर्ष माहेर कोडकौतुक झालं तरी माहेरचा आधार तिला कायम मिळणं गरजेचं असतं.
बहिणीचं वय कितीही वाढलं तरी तिला आपली सुखदुःख मांडण्याचा, हक्कानी वावरण्याचा, पुन्हा एकदा लहान होऊन मनसोक्त जगण्याचा हा निवारा म्हणजे स्त्री साठी स्वर्गसुख.
मग हे सुख देण्यासाठी आजच्यासारखा दुसरा मुहुर्त नाही.
केवळ सण-समारंभाला नव्हे तर आयुष्यभर तिला हक्काचं, तिचे लाड पुरवणारं, आणि तिचा सर्वार्थाने आधार असणारं माहेर देणं हे भावाचं कर्तव्यचं!
एवढंच नव्हे, तर आईवडिलांच्या पश्चातही त्यांच्या इतकी माया देणारं माहेर ही ओवाळणी पाहून बहिणीला आनंदाश्रु आवरता येणार नाहीत यात काही शंकाच नाही.
४. भक्कम आधार
“तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना” या उक्तीचा प्रत्यय म्हणजे घरातील बहिणभावाची जोडगोळी!!
मात्र वरकरणी बहिणीशी वाद घालून तिला सतावणारा भाऊ कोणत्याही अडचणीच्या काळात तिच्यासाठी खंबीरपणे उभा आहे ही भावनाच बहिणीसाठी सुखावह आहे.
वैयक्तिक आयुष्यापासून करिअरपर्यंत, कोणत्याही बाबतीत “तू लढ, मी पाठीशी आहे” हे तुमचे शब्दही तिला जिंकण्याचं बळ देतील.
त्यामुळे आजच्या दिवशी तिला काही द्यायंच असेल तर तिच्या खांद्यावर हात ठेवून हे शब्द केवळ उच्चारा.
५. अतूट विश्वास
लहानपणी रात्री उशीरा घराच्या एखाद्या कोपऱ्यात केवळ तुम्ही दोघांनी केलेली चर्चा आठवतीय?
आईबाबांना कळू न देता केवळ आपल्या भावाला मनातली सगळी गुपितं उलगडून सांगणारी ही बहीण आजही तुमच्याकडून त्याच विश्वासाची अपेक्षा करतीय हे कधीही विसरू नका.
वय वाढलं, तरीही ज्याच्याकडे सगळी सिक्रेट्स, सगळ्या अडचणी मोकळेपणाने मांडू शकतो, असा भाऊ हवाचं ही बहिणीची अपेक्षा आता तरी ओळखा.
लहानपणीप्रमाणे आजही तिची सिक्रेट्स तुमच्याकडे सुरक्षित राहतील आणि इतकंच नव्हे तर तुमचीही सिक्रेट्स, प्रश्न या तिच्याकडे मांडू शकाल हा विश्वास हीच तुमची यंदाची ओवाळणी…!!
६. आर्थिक पाठबळ
लहानपणी पिगीबॅंकेत साठवलेले पैसे जमा करून बहिणीसाठी एखादं पुस्तक, किंवा पेन आणल्याची आठवण प्रत्येकाकडे असेल.
आज क्रेडिट कार्डवर बहिणीसाठी महागड्या वस्तुंची खरेदी करण्यापेक्षा तिला थोडी आर्थिक सुरक्षा द्यायला काय हरकत आहे?
हल्ली गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेअरमार्केट असो वा म्युचुअल फंड, कोणत्याही मार्गाने बहिणीसाठी साठवलेली रक्कम तिला भविष्यातील महत्वाच्या प्रसंगासाठी हक्काचा आधार ठरेल.
७. निर्णयाचा आदर
मुलगी सासरी गेल्यानंतर माहेरच्या प्रश्नांमध्ये तिला सहसा सहभागी करून घेतंल जात नाही. मात्र अशी चूक तुम्ही करू नका.
कोणत्याही प्रसंगात बहिणीच्या निर्णयाचा आदर करा. तिने घेतलेल्या निर्णयाचा विचार करा, तिची भूमिका समजावून घ्या, आणि तिचं म्हणणं पटत असेल तर त्याप्रमाणे निर्णय घ्या.
८. मार्गदर्शक बना
बहिणीवर अतोनात प्रेम करत तिचा वाट्टेल तो हट्ट पुरवणारे भाऊ तुम्ही पाहिले असतील.
बहिणीवर प्रेम करण्याचा हक्क प्रत्येक भावाला आहे यात शंकाच नाही मात्र आपलं प्रेम हे तिच्यासाठी धोक्याचं ठरत नाही ना याचा विचार करा.
बहिणीवर प्रेम करताना ती चुकत असेल, तिचा एखादा निर्णय अयोग्य वाटत असेल तर तिला सावध करा. तुमचं प्रेम हे तिच्यासाठी मार्गदर्शकही ठरेल असा प्रयत्न करा.
९) बेस्ट फ्रेंड व्हा
फ्रेन्ड, फिलॉसॉफर आणि गाईड असा भाऊ कुणाला आवडणार नाही?
चित्रपटात दिसणाऱ्या शिस्तप्रिय भावपेक्षा तिच्याशी खेळीमेळीने वागून, तिच्या कलानं घेऊन एकमेकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
यंदा प्रत्येक सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे मागील चार महिन्यात प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप बदल झालेत.
म्हणूनच तुमची ही खास ओवाळणी यंदाचा हा सण दरवर्षी पेक्षा वेगळा, जास्त अर्थपूर्ण आणि बहिणीसाठी आयुष्यभर लक्षात राहिल असा सुंदर बनवेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.