Site icon InMarathi

उंची ३ फूट, कर्तृत्व मात्र उत्तुंग! महिला आयएएस ऑफिसरचा प्रेरणादायी प्रवास…

aarti dogra featured inmarathi

newsd.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही काळापूर्वी आरती डोगरांविषयी एक अफवा पसरली होती की मोदीजी त्यांच्या पाया पडले आणि तसा फोटो देखील व्हायरल झाला. फोटो मध्ये दाखवलेली व्यक्ति आयएएस ऑफिसर आरती डोगरा नसून शिखा रस्तोगी आहेत. हा सगळा घोळ या दोघींच्या दिसण्यावरून झाला.

या संपूर्ण जगात स्त्री पुरुष यांच्या सौंदर्याचे ठराविक मापदंड ठरलेले आहेत. स्त्री कशी कमनीय बांधा असलेली हवी..रंग गोरा, तेजस्वी कांती, हरीणाक्षी, लांब केस, चांगली उंची असावी. कंबर इतके इंच हवी.. वगैरे वगैरे.

अर्थात परदेशात असलेले हे मापदंड आपल्या इथे ग्राह्य धरले जातात. पण हे सगळं वरवरचं, देखणेपण कशात असतं?

दुसऱ्याला समजून घेणारी, सुस्वभावी, कर्तव्यात कसूर न करणारी, धडाडीची स्त्री जरी सुंदर नसली तरीही तिचा आत्मविश्वास, त्यामुळं चेहऱ्यावर आलेली अनुभवांची चमक हे कोणत्याही विश्वसुंदरीलाही मागं टाकणारं आहे.

सौंदर्य म्हणजे फक्त शरीर? की सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा? कधीकधी हे सगळं असूनही जर एखादी स्त्री उर्मट असेल तर तिच्याइतकी कुरुप तीच. ते सुंदर असणं यात तिचं स्वतःचं काय कर्तृत्व?

पण याऊलट एखादी सर्वसामान्य दिसणारी स्त्री जर असामान्य कामगिरी करत असेल तर तिची धडाडी, तिचा आत्मविश्वास हेच तिचं भूषण ठरतं.

अशी भूषणावह कामगिरी करणाऱ्या राजस्थान येथील आय ए एस अधिकारी आरती डोगरा यांनी सर्वांसमोर आपलं जिवंत उदाहरण ठेवलं आहे.

 

nari.punjabkesari.in

 

३ फूट सहा इंच उंची असलेल्या आरती डोगरा यांनी कोरोना काळात जी कामगिरी केली आहे ती पाहून थक्क व्हायला होतं. आणि लक्षात येतं ध्येयं मजबूत असले की जग जिंकता येतं. तिथं तुमचं बाह्यरूप काही कामी येत नाही.

उत्तरांचल मधील डेहराडून येथे १९७९ मध्ये जन्मलेल्या आरती डोगरा यांचे वडील सैन्य दलात अधिकारी होते. तर आई खाजगी शाळेत शिक्षिका. आरती त्यांची पहिलीच मुलगी.

आरतीचे मेडिकल रिपोर्ट सांगत होते की, आरती सर्वसामान्य आयुष्य जगू शकणार नाही. आरतीची बाकी सगळी प्रगती उत्तम होती. पण तिची उंची काही वाढत नव्हती.

३ फूट ६ इंच उंची झाली आणि उंची वाढायची थांबली. मग शाळेत वर्गात सगळे चिडवायचे. नातेवाईक, आजूबाजूला असणारे लोक सगळे सगळे तिला तिचं बुकटेपणावरुन बोलत, कुचेष्टा करत. अगदी तिच्या आई वडिलांना दुसरं मूल होऊ द्या हे सल्लेही देत.‌

तिच्या आई वडीलांनी मात्र या कशाकडेही लक्ष दिलं नाही. ते तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले. तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि अभिमानाने सांगावं असं ती आय ए एस अधिकारी झाली.

 

newsd.in

 

कधी कधी आपली कमकुवत असलेली बाजूच आपलं शक्तिस्थळ बनते. आरतीचं तसंच झालं. डेहराडून येथे तिनं आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. आणि काॅलेजला दिल्ली येथील लेडी श्रीराम काॅलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

अर्थशास्त्रात पदवी मिळवून आरती परत डेहराडून येथे परतली. तिनं पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं ठरवलं.

त्याचवेळी तिला तिथं भारतातील पहिली आय ए एस अधिकारी मनिषा पवार भेटल्या आणि त्यांच्याकडून तिला युपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली.

त्या प्रेरणेनं आरतीनं जिद्दीनं अभ्यासाला सुरुवात केली. २००५ मध्ये तिनं परीक्षा दिली आणि पहील्याच प्रयत्नात आरती पास झाली. संपूर्ण भारतात आरतीचा ५६ वा क्रमांक होता.

तिनं‌ कामासाठी राजस्थान निवडलं. आता आरती राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विशेष सचिव म्हणून काम करते.

२००६ – २००७ ला आरतीचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिनं उदयपूर येथे पहिली पोस्टींग घेऊन काम सुरू केलं. नंतर अल्वार, अजमेर इथंही काम केलं. नंतर जिल्हाधिकारी म्हणून बूंदी, बिकानेर या जिल्ह्यात कार्यभार सांभाळला होता.

खरंतर काय मोठं असतं? पैसा? नाही..पद? अजिबात नाही.. मोठं असतं ते काम! तुम्ही तुमचं काम इमानदारीने करा..यश तुमच्या हातात हात घालून येतं.

कामाचा पैसा मिळतो, पदामुळं फक्त तुमचं काम करणं सोपं होतं. पण जे काम करायचं ते तुम्हाला करायचच असतं. निर्णय तुमचा असतो..काय करायचं? काम करायचं की पदाचा दिमाख दाखवायचा!

आरतीनं पहिला पर्याय स्वीकारला. तिची कामाची पद्धत, झोकून धडाडीने काम करण्याची वृत्ती यात कुठंही तिची उंची आडवी आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आरतीच्या कामाचं कौतुक वाटलं.

 

tamil.asianetnews.com

 

आपण जाहिराती मध्ये ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत शौचालये बांधण्यासाठी सरकार मदत करेल किंवा इतरही कितीतरी पध्दतीने लोकांना जागृत करण्याचे सरकारचे प्रयत्न बघतो.

अगदी विद्या बालन, अमिताभ बच्चन यांनीही यासाठी जाहिराती मध्ये काम केलं. अक्षयकुमारने टाॅयलेट हा सिनेमा याच विषयावर बनवला. पण तुम्हाला माहिती आहे? या योजनेची सुरुवात कुठे झाली? आणि ती कुणी केली?

हो, ही योजना भारतात सर्वप्रथम राजस्थान येथे राबवली आणि या योजनेची कल्पना आरती डोगरा यांची होती!

आरती जेंव्हा बिकानेर येथे जिल्हाधिकारी होती तेंव्हा ग्रामस्वच्छता अभियान अत्यंत उत्तम रित्या राबवलं. ती योजना बंको बिकाणो म्हणून ओळखली जाते. खेड्यापाड्यातील लोक तेंव्हा उघड्यावर शौचाला जात.

त्यांना घरात पार्टी शौचालये बांधण्यासाठी उद्युक्त केलं. या योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख मोबाईल वरुन केली जात होती.

जवळपास १९५ खेड्यांतून हे अभियान यशस्वीपणे राबवलं गेलं‌ आणि त्यानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील गावांनीही हाच पॅटर्न राबवला.

याच बरोबरीने आरतीनं २०१९ मध्ये राजस्थान येथील अजमेर मधील निवडणुकीत एक जबाबदार अधिकारी म्हणून अतिशय उत्तम कामगिरी बजावली. लोकांना मतदानासाठी जागृती अभियान राबवलं.

 

indiatimes.com

 

इतकंच नव्हे तर अधिकाऱ्यांना सुध्दा फार उत्तम मार्गदर्शन केलं. दिव्यांग लोकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी वाहनसेवा दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी दोन व्हीलचेअर दिल्या.

ज्यामुळे दिव्यांगांनाही मतदानाचा हक्क बजावता आला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली.

त्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि कायदा आणि सुव्यवस्था मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते आरती डोगरा यांना सन्मानित करण्यात आलं.

 

zeenews.india.com

 

इथं कुठंही आरती डोगरांची कमी उंची आड आली नाही. आय ए एस होताना देखील नाही.. आणि जिल्हाधिकारी म्हणून काम करताना तर नाहीच नाही!

उसको अंदाजा ही नही था अपने कद का.. वो आसमां था..सर झुकाकर चलता था!

मोठं कर्तृत्व असलेली माणसं अशीच असतात.. नाही का? आकाशाएवढी…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version