“काहीच घडत नाहीये” या जीवघेण्या नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी या टिप्स फॉलो करा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
कहीं सफर है, कहीं रस्ता है मंजिल का…!!
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतोच. जिथं आपल्याला सगळे रस्ते संपले, आयुष्य निरर्थक झालं आहे असं वाटतं.
कधीकधी ही नकारात्मकता इतकी टोकाला जाऊन पोहोचते, की त्या भरात माणसं बरं वाईट पाऊल उचलून आयुष्याची माती करुन घेतात.
वास्तविक मानवाचा जन्म दुर्लभ असतो. हे घिसं पिटं वाक्य खोटं नाही.
माणसानं प्रगती केली कारण त्याला असलेलं बुद्धीचं वरदान. नाहीतर युगानुयुगे माणूस आणि गाढव एकाच पातळीवर नसते का राहीले? माणूस पार अवकाशात पोहोचला आणि गाढव उकीरड्यावर राहीलं.
आपले आई वडील यांनी आपल्याला अशी पावलं उचलण्यासाठी जन्म देऊन लहानाचं मोठं केलेलं असतं का? त्यांनी खाल्लेल्या खस्ता, उपसलेले कष्ट, हे सारं कशासाठी केलेलं असतं?
आपल्यावर अवलंबून असणारे आपले कुटुंबीय, जीवाला जीव देणारे मित्र, सहकारी यांचाही विचार करावाच.
कोणतीही समस्या तात्पुरती असते. त्यावर आतताईपणाने कसलाही कायमचा इलाज करु नये.
जेव्हा असं काही वाटू लागेल, तेव्हा पुढील बाबी नक्की विचारात घ्या…आपल्या मनाला हे प्रश्न विचारा.
१. आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे?
जेव्हा आपल्या मनात निराशा दाटून येईल.. आयुष्य नकोसे वाटू लागले की मनाला सांगा..आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे?
प्रत्येकाने काही स्वप्नं बघितलेली असतात. करिअरची, नोकरीची, मुलांबाबतची. त्यासाठी आपल्याला मजबूत होऊन उभं रहायचं असतं.
आपल्यावर अवलंबून असलेली आपली मुलं, त्यांची स्वप्नं हे सांभाळणं आपल्या आयुष्याचा उद्देश आहे हे जाणून त्यांच्यासाठी थांबा. तुम्ही तुमचं वाकडं पडणारं पाऊल योग्य रस्त्यावर नेऊ शकता.
२. काय महत्त्वाचं आहे हे स्वतःला विचारा-
आयुष्य जगताना आपल्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मनाला विचारा. त्या गोष्टीत तुमचं ध्येय असू शकतं.
तुमच्या कुटुंबाला द्यायचा वेळ असू शकतो. आवडता मित्र, मैत्रिणी, नातेवाईक हे पण असू शकतात.
त्या महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा. या सगळ्यांपेक्षा तुमचा तो शेवटचा निर्णय तर नक्की बिनकामाचा असणार आहे.
३. ध्येयावर लक्ष केंद्रित करा-
चला, आता आयुष्यात महत्त्वाचं काम कोणतं हे समजलं. त्यावर लक्ष केंद्रित करा.
एखादी चांगली गोष्ट हवी असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल हे निश्चित केलं की पुढचं काम जास्त सोपं होतं.
त्या अनुषंगाने पुढचं नियोजन करून आपलं ध्येय शक्य तितक्या लवकर कसं गाठता येईल हे बघा.
४. स्वतःकडं प्रेमानं पहा –
जगात सगळ्यात मोठी ताकद प्रेमात असते. ते इतरांवर करण्याआधी स्वतःवर करा. जे लोक स्वतःवर प्रेम करत नाहीत, ते दुसऱ्यावर काय प्रेम करणार?
प्रेमानं खूप मोठे मोठे प्रश्न सुटतात. तुमची तत्त्वं, तुमचे विचार हे सगळं उत्तम आहे हा विश्वास बाळगा. आपण करतो करणार आहे ते उत्तम आहे याचा विश्वास तुमच्या मनात ठेवा.
५. आपल्या लोकांना वेळ द्या –
आपली माणसं पैशाची नाही, तर आपल्या सहवासाची भुकेली असतात. त्यांना पैसा नाही तर तुमचा वेळ द्या. वस्तू नाही त्यांना वेळ द्या. हा प्रेमाचा धागा तुम्हाला एकमेकांशी खूप घट्ट बांधून ठेवेल.
त्यांच्या आवडीच्या छोट्या छोट्या गोष्टी करा. कोणत्याही अडचणीत ही माणसांची दौलत तुम्हाला नेहमी मदत करेल.
६. सहानुभूतीने वागा-
सहानुभूती म्हणजे केवळ दया नव्हे, तर एखाद्या माणसाबद्दल वाटणारी संवेदना. त्याचा त्रास मनापासून समजून घेऊन वागणं.
सहानुभूती आणि समानुभूतीनं वागा. जगात प्रेमाची भाषा ही सर्वांना समजते. बहिऱ्याला ऐकू येते, आंधळ्याला दिसते. बधीर माणसालाही समजते.
७. कृतज्ञ रहा-
आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा. कृतज्ञतेइतकं जगात दुसरं काहीही सुंदर नाही आणि कृतघ्नतेइतकं कुरुप काहीही नाही.
कोणाकडूनही काहीही मिळालं, तर ते कोणत्या ना कोणत्या रुपात परत करा. यामुळं तुम्ही माणसं पेरता.
तुम्हाला केलेल्या गोष्टींची जाणीव आहे हे समजून लोक तुम्हाला कायम आपलं समजू लागतात,आणि वेळप्रसंगी या पेरलेल्या माणसांकडून प्रेम उगवतं आणि हेच प्रेम तुम्हाला मोठमोठ्या संकटातून तारुन नेतं.
हीच खरी दौलत असते.
८. साधेपणाने रहा-
पैसा, भौतिक सोयी या तात्पुरत्या असतात. आपण त्यांच्या मागे लागून फार काळ सुखी नाही राहू शकत. गरजेपेक्षा जास्त कोणत्याही गोष्टीची हाव ठेवू नका. कारण ती हाव कधीच पूर्ण होत नसते.
कमीत कमी गरजा ठेवल्या तर आयुष्य खूप आनंदी होतं. एकमेकांवर कुरघोडी, ईर्ष्या या गोष्टी आयुष्यातील शांतता नष्ट करतात. यातून वाढलेले ताणतणाव मनावर भयंकर ओझं आणतात.
९. रोजचं ध्येय निश्चित करा-
रोज सकाळी उठल्याबरोबर आज आपण काय करणार आहोत हे मनाशी पक्कं ठरवा. आणि त्यानुसार आपली कामं करा.
दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा. “नाही” हा शब्दही मनात आणू नका.
आज माझं हे काम होणार आहे.. आज दिवसभर मी आनंदी रहाणार आहे.. असेच सकारात्मक विचार करा.
१०. सोडून द्यायला शिका-
माणसाचं मन जितकं चांगलं तितकं वाईट आहे. कधीकधी ते बागेसारखं असतं, तर कधी दारुगोळा भरलेलं कोठार.
नकारात्मक विचार असताना मन खरोखर दारुगोळा भरलेलं कोठार असतं. आयुष्य उध्वस्त करायची ताकद या नकारात्मक भावनांमध्ये असते.
म्हणून कोणी तुमच्याशी वाईट वागलं तरीही सोडून द्यायला शिका. हे फार कठीण काम असतं, पण ते आपल्या मनःशांतीसाठी आवश्यक असतं.
नाहीतर एकमेकांना पाण्यात पाहून सूड घ्यायचं दुष्टचक्र सुरुच राहतं.
खरं सांगायचं, तर आयुष्य खूप सुंदर आहे.आपल्याला ते नीट जगता आलं पाहिजे.
जीवघेणी नकारात्मकता केवळ आपलंच नाही, तर आपल्या कुटुंबियांचे पण नुकसान करु शकते. म्हणून सकारात्मकतेने जगायला शिका..जगन्मित्र व्हा!!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.