आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : सौरभ वैशंपायन
===
१ ऑगस्ट १९२०, लोकमान्य टिळकांनी सरदारगृहात अखेरचा श्वास घेतला, टिळकांना जाऊन १०० वर्ष पूर्ण झाली.
१०० वर्षांनंतरही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो, त्याचा अर्थ त्यांचे कार्य तितके महत्वपूर्ण होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात काहीतरी चुंबकीय होते जे आजही समाजाला त्यांच्याकडे आकर्षित करते.
लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त लिहिलेला हा लेख म्हणजे लोकमान्यांना वाहिलेली शाब्दिक श्रद्धांजली आहे.
—
आपण पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो. आज वर्तमानपत्रांना मुक्तपणे पत्रकारिता करता येते, पण टिळकांचा काळ हा ब्रिटिश सत्तेचा काळ होता व राज्यकर्त्यांविरुद्ध लिहिणे – बोलणे याचा सरळ अर्थ राजद्रोह असा होता.
त्याकाळात टिळकांनी केलेली पत्रकारिता बघता विस्मयचकित व्हायला होतं.
तत्कालीन समाजाच्याबाबतीत असलेली तळमळ आणि देशाच्या स्वातंत्र्याची असलेली ओढ टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूतून जागोजागी दिसून येते तशी ती पत्रकारीतेतही दिसून येते.
पत्रकारिता सुरू करण्याआधी टिळक, आगरकर आणि अजून काही समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन शिक्षण संस्था सुरू केली. त्यामागचे मुख्य कारण युवकांना उत्तम शिक्षण देताना त्याच्या बरोबरच त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करणे, समाजाबाबत आस्था निर्माण करणे हे होते.
त्यातही त्यांनी उत्तम कार्य केलेच पण एकदा याच सर्वांच्या चर्चेचा सूर “पुण्यातील वृत्तपत्रे लोकांना दिशा दाखविण्याचे कर्तव्य नीट पार पाडत नाहीत!” असा लागल्यावर इतरांकडे बोटे दाखवण्यापेक्षा आपणच हे कार्य का करू नये या विचारातून “केसरी” व “मराठा” या दोन वृत्तपत्रांचा जन्म झाला.
या वृत्तापत्रांमार्फत थेट सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना भिडण्याची आणि एका झटक्यात हजारो – लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची जी संधी मिळाली त्याचा टिळकांनी योग्य उपयोग करून घेतला.
पत्रकारिता ही टिळकांची सावली होती असे म्हणावे लागेल. लक्षात घ्या, की टिळकांनी विविध विषयांवर घेतलेल्या भूमिका या केसरी मधून मांडल्या आहेत.
मग ते देशाचे अर्थकारण असो, समाजसुधारणा असो, धार्मिक प्रश्न असोत, शेती असो, सत्ताधाऱ्यांवर कायदा अथवा व्यवस्थेसंबंधित टीका असो या सर्वांवर मत व्यक्त करण्याचे माध्यम हे वृत्तपत्र होते.
म्हणजेच लोकमान्य टिळकांचे आपल्याला जे अनेक पैलू दिसतात , त्यातील बहुतांशी पैलूंचा पाया हा पत्रकारिता आहे.
एक पत्रकार तसेच संपादक म्हणून टिळकांनी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्दे आणि प्रश्न आपल्या अग्रलेखातून हाताळलेच, पण ज्या सामान्य लोकांना सरकारी दडपशाही विरुद्ध व्यक्त होता येत नव्हत, टिळक त्या सामान्य लोकांचा आवाज बनले.
लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव अत्यंत सोप्या शब्दात करून दिली. गरज पडली तेव्हा त्यांनी शेतकरी, मजूर, विणकर, उद्योजक अशा सगळ्यांची बाजू घेऊन व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला.
लोकमान्य टिळकांवर जे राजद्रोहाचे खटले झाले अथवा त्यांना ज्या शिक्षा झाल्या त्याचे मुख्य कारण त्यांची जहाल पत्रकारिता होते.
पण याचा अर्थ त्यांनी केसरी अथवा मराठा या वृत्तपत्रातून फक्त सरकारवर टिकाच केली का? तर नाही, टिळकांनी संपादक म्हणून आपल्या वृत्तपत्रातून स्त्री शिक्षण, दारूबंदी, समाजातील ऐक्य, गणपती उत्सव किंवा शिवजयंती असेेही विषय हाताळले.
त्यांनी स्वतः कायद्याची पदवी घेतली होती, पण वकिली केली नाही मात्र आपले लेख कायम कायद्याच्या चौकटीत राहतील याची काळजी देखील घेतली.
केसरीवरती ज्या अग्रलेखांमुळे खटले झाले व टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली ते अग्रलेख स्वतः टिळकांनी लिहिले नव्हते, मात्र संपादक म्हणून त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली यावरून त्यांची पत्रकारितेशी असलेली बांधिलकी व स्वतःच्या कार्यावर असलेली निष्ठा दिसून येते.
म्हणूनच आज १०० वर्षांनंतरही टिळक हे भारतीय पत्रकारितेतील दीपस्तंभ ठरतात. टिळकांच्या काळात हे होत असे कारण वृत्तपत्राचे मालक व संपादक बहुदा एकच असत त्यामुळे सत्य असून एखादे मत वृत्तपत्राच्या मालकाला पटत नाही म्हणून त्याला मुरड घालण्याचे प्रकार होत नसत.
उलट आधी उल्लेख केला तसे खटला भरलेले अग्रलेख स्वतः लिहिलेले नसताना देखील संपादक म्हणून टिळकांनी पूर्ण जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली. हे उदाहरण दुर्मिळ आहे.
१२ मे रोजी छापलेल्या “देशाचे दुर्दैव” या वादग्रस्त अग्रलेखामुळे केस झाली तोच अग्रलेख ३० जून रोजी केस सुरू असताना छापणे ही निर्भीड पत्रकारितेची पराकाष्ठा होती, अन्याय विरुद्ध एखादे वृत्तपत्र व एखादा पत्रकार किती टोकाला जाऊन लढा देऊ शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकमान्य टिळक हे चार भिंतीत बसून अग्रलेख लिहिणारे संपादक नव्हते. एक राजकीय पुढारी म्हणून समाजात सर्व स्तरांवर त्यांचा वावर होता. त्याचे प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या लिखाणात उमटलेले दिसते.
शिवाय फक्त अग्रलेख लिहिला, की आपली जबाबदारी संपली असे मानणारे देखील ते नव्हते. ज्या प्रश्नावर ते लिहीत त्याबाबत स्वतः प्रत्यक्षात जे करता येईल ते ते सर्व करीत.
उदा, दुष्काळाच्या काळात लोकांना फॅमिन कोड समजावण्यासाठी केसरीतून जागृती केलीच पण स्व-खर्चाने फॅमिन कोडचे मराठीत भाषांतर करून लोकांच्यामध्ये पत्रके वाटली.
प्लेग काळात त्यांनी स्वतः प्रयत्न करून लोकांसाठी तात्पुरती हॉस्पिटल उघडली, इतकेच नव्हे तर प्लेग संबंधित जागृती करण्यासाठी स्वतः टिळक जीवाची पर्वा न करता प्लेगचा प्रादुर्भाव असलेल्या वस्त्यांमध्ये फिरत होते, लक्षात घ्या ही सामान्य गोष्ट नाही.
जिथे जिथे अन्याय दिसला तिथे तिथे परिणामांची चिंता न करता टिळकांनी अत्यंत कडक शब्दात ब्रिटिश सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
“सरकारची अर्थनीती भारताचे कसे शोषण करत आहे” यावर लोकमान्य टिळकांचे अनेक अभ्यासपूर्ण अग्रलेख त्या त्या प्रश्नावरील उपायांसहित वाचायला मिळतात.
दुष्काळामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार कुठल्याप्रकारे मदत करू शकते? कुठली पिके घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे? शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज मिळण्यासाठी सरकारने काय व्यवस्था करायला हवी याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला वाचायला मिळते.
टिळक हे जे अग्रलेख लिहीत त्यांचे मथळे फार अर्थपूर्ण असत. मी स्वतः जाहिरात क्षेत्रात काम करतो, स्वतः कॉपी लिहितो त्यामुळे हेडलाईनचे महत्व काय असते हे चांगलेच जाणतो.
लोकमान्यांनी वापरलेले मथळे हे कधी आकर्षक असत, कधी अत्यंत धारदार असत, अगदी क्वचित टोचणारा विनोदही असे, कधी थेट ५-७ शब्दात थेट विषयाला हात घालत.
मी माझ्या रोजच्या कामाशी याची सांगड घालतो, तेव्हा मला त्या मथळ्यांचे आश्चर्य वाटते. कारण सगळा लेख लिहिण्यात जितकी शक्ती आणि बुद्धी खर्च होत नाही तितकी एक हेडलाईन तयार करायला लागते, मी रोज हे अनुभवतो म्हणून टिळकांच्या भाषा प्रभुत्वाला आणि कल्पकतेला मला खरोखर सलाम करावासा वाटतो.
इथे अजून एक महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो तो असा, की आज आपण आपला भारत आत्मनिर्भर बनवा म्हणून उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.
माननीय संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार संरक्षण क्षेत्रात आपण ७४% थेट परदेशी गुंतवणूक खुली केली आहे. ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी वर आपण कटाक्षाने भर द्यायला सुरुवात केली आहे.
इथे त्याचा उल्लेख करण्याचे कारण भारत आत्मनिर्भर बनावा हे लोकमान्य टिळकांचं देखील स्वप्न होतं.
सरकारने परदेशी तंत्रज्ञान आणावं तिथून काही काळासाठी तंत्रज्ञ देखील आणावे, परदेशी भांडवल आणावं पण उत्पादन आणि रोजगार निर्मिती मात्र भारतात व्हायला हवी अशी आग्रही भूमिका मांडणारे टिळकांचे लेखही आपल्याला वाचता येतात.
अगदी महायुद्धाच्या दरम्यानही भारतीय सैनिकांसाठी भारतातच शस्त्र निर्मिती व्हायला हवी अशी मागणी ते करतात. त्या मागणीपाठी त्यांचा फार दूरचा विचार होता.
तेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडाप्रमाणे भारताला देखील अंतर्गत स्वायत्ता द्यावी असा विचार पुढे येऊ लागला होता. तसे काही झाले तर पुढे शत्रू विरुद्ध लढायला ब्रिटन येईलच असे नाही, ही लढाई भारतीय सैनिकांना स्वतः लढायाची आहे त्यामुळे भारतीय सैनिकांना सैन्यात वरचे हुद्दे हवेत आणि शस्त्रे इथेच बनली पाहिजेत असा विचार टिळकांनी मांडला होता.
पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अगदी हाच विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अजून पुढच्या पायरीवर नेऊन व्यक्त केलेला दिसतो की “सरकार स्वतः शिकवते आहे तर सैन्यात जा, बंदुका शिकून घ्या, बंदुकांची तोंडे कुठे वळवायची याचा निर्णय नंतर घेता येईल.” त्या विचाराचे उद्गाते एका अर्थी टिळकच.
दुसरे म्हणजे सध्या आपण Vocal for local वर देखील भर देतो आहोत जी अतिशय उत्तम गोष्ट आहे.
गंमत म्हणजे टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी “मॉरिशस मधून तीन कोटींची साखर आयात करण्यापेक्षा महाराष्ट्र आणि कर्नाटकात उसाचे उत्पादन घेऊन परदेशी तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञान वापरून इथेच साखर कारखाने काढा” असा सल्ला अगदी statastic सकट दिला होता.
महाराष्ट्रातील एक तालुका देखील मॉरिशसहुन येणाऱ्या साखरे इतके उत्पादन सहज करू शकेल हे देखील त्यात सांगितले होते. एका अर्थाने आपण पुन्हा लोकमान्यांची तत्वे अंगिकारत आहोत ही अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.
लोकमान्य टिळक पत्रकारिता आणि भारताच्या स्वातंत्र्याची सांगड कसे घालत होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे चिरोल खटल्याच्या निमित्ताने टिळक वर्षभर इंग्लंडला गेले होते.
खटल्याचा निकाल त्यांच्या विरुद्ध लागला होता, मात्र तिथल्या वास्तव्यात त्यांनी अनेक लोकांशी स्नेह जोडला. इंग्लंडमधील मजूर पक्ष हा भारताला निदान स्वायत्तता मिळावी या मताचा होता.
“डेली हेराल्ड” नावाचे त्यांचे साप्ताहिक मुखपत्र होते. नंतर टिळकांचा एक लेखही त्यात आला होता. तर त्या “साप्ताहिक” पत्राचे “दैनिक” करायचा मजूर पक्ष विचार करत होता, पण मजूर पक्ष हा त्यावेळी नवा नवा होता आणि हुजूर पक्षाच्या तुलनेत “गरीब” होता.
टिळकांनी हे हेरले भारतीय राजकारणी म्हणून स्वार्थ आणि पत्रकार म्हणून एक कर्तव्य पार पाडावे म्हणून त्यांनी या कामासाठी त्याकाळी तब्बल दोन हजार पाऊंड रुपयांची देणगी दिली.
या दैनिकातून पुढे मग भारताविषयी सहानुभूती असलेले लेख अधूनमधून येऊ लागले. म्हणजे एका अर्थी टिळकांनी ज्याला आपण प्रॉपोगंडा वॉर म्हणतो ते सुरू केले होते ते सुद्धा तिथल्याच लोकांना हाताशी धरून.
टिळकांची पत्रकारिता ज्याला “reading between the lines” म्हणतात तशी असायची. अनेकदा टिळक एकाच वाक्यातून अनेक गोष्टी सांगून मोकळे व्हायचे.
ज्यांना जे समजायला हवं त्यांना ते समजायचं. कधी ती सूचना असे, कधी तो इशारा असे किंवा जर दुर्दैवाने गरज पडलीच तर त्यात अप्रत्यक्ष धमकी देखील असे.
यात रोचक गोष्ट अशी जी आपल्याला मान्य करावी लागते, की तत्कालीन ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी देखील हे “reading between the lines” असतं ते वाचलं होतं.
टिळकांची पत्रकारिता काय भूकंप घडवू शकते याची जाणीव ब्रिटिशांनाही होती कदाचित म्हणूनच जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा केलेली आहे.
अनेकदा प्रतिस्पर्ध्याने तुमचे विचार ओळखणे अथवा तुम्ही नक्की काय करताय हे ओळखणे आणि त्याला कडाडून विरोध करणे ही तुमच्या मोठेपणाची पावती असते, पत्रकारितेच्या निमित्ताने टिळकांना तर ती बऱ्याचदा मिळाली.
शेवटी या लेखाचा समारोप करताना असं म्हणेन, की व्हॅलेंटाइन चिरोल या ब्रिटिश लेखकाने टिळकांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हटले त्याशिवाय इतर अनेक दूषणे दिली व आरोप केले ते सगळे अपमानास्पद असल्याने टिळकांनी त्याविरुद्ध खटला देखील दाखल केला.
पण एका अर्थी ते खरोखर भारतीय असंतोषाचे जनक होते. १८५७ नंतर दडपलेल्या भारतीयांच्या असंतोषाला टिळकांनी वाचा फोडली आणि त्यासाठी त्यांनी मुख्यतः वृत्तपत्राचा वापर केला.
टिळकांची पत्रकारिता ही दुधारी तलवार होती आणि अनेकदा लोकमान्य टिळकांनाच त्याच्या जखमा झाल्या पण माझ्या लोकांसाठी, माझ्या समाजासाठी त्या जखमा न बोलता अत्यंत शांतपणे सहन करण्याचा मोठेपणा टिळकांमध्ये होता. म्हणून कदाचित आज शंभर वर्षांनंतर देखील निर्भीड पत्रकारिता म्हटल्यावर पहिलं नाव आपल्या मनात येतं ते म्हणजे “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!”
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.