Site icon InMarathi

सर्वार्थाने “आत्मनिर्भर” होण्यासाठी या “८ गोष्टी” पुनरुज्जीवीत करायलाच हव्यात!

Traditional banana leaf InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अमूल्य भारत… अतुल्य भारत…

ही केवळ घोषणा नाही…हे सत्य आहे!!! त्रिकालाबाधित सत्य. भारताला परंपरांची, निसर्ग सौंदर्याची, कलांची, साहित्य, संगीत, भाषा, नृत्यकला, गायन, यांची खूप मोठी देणगी मिळाली आहे.

एकंदरीत १४ विद्या आणि ६४ कलांचं माहेरघर असलेला आपला देश विविध प्रकारच्या परंपरांनी नटलेला आहे. या परंपरा विविध जाती जमातींनी आजवर जमतील तशा पाळत इथंवर आणल्या आहेत.

अगदी मधुबनी चित्रशैली असो, वारली चित्रकला असो..विणकामाचे नाना प्रकार असोत, रांगोळीचे विविध प्रकार असोत, घर बांधणी, वास्तुशास्त्र असो की खाद्यपरंपरा असो.

 

softpowermag.com

 

भारतात हे सारं मुक्तपणे उधळलं आहे. नवनव्या कल्पना लढवत लोकांनी त्यात काही बदल करत ते सारं जतन करून ठेवलं आहे.

हे सारे बदलाचे वारे वाहताना आपल्या हातातून काही गोष्टी मात्र निसटून गेल्या. चुलीऐवजी स्टोव्ह मग गॅस, ओव्हन, मिक्सर यांनी हळूहळू स्वयंपाकघरात पावलं टाकली.

नुसतीच टाकली नाही तर घट्ट रोवली.

जातं गेलं गिरण्या आल्या. उखळ खलबत्ता यांची जागा मिक्सर आणि फूड प्रोसेसर बळकावून मोकळे झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांची जागा स्टील, अॅल्युमिनीअम प्लास्टीक यांनी घेतली.

पुढं तर स्टीलला पर्याय म्हणून प्लास्टीकलाही लोकांनी आपलं म्हटलं!

मातीच्या मडक्याची जागा रेफ्रीजरेटनं कधी घेतली हे पण समजलं नाही. उन्हाळ्यात वाळा, मोगऱ्याची फुलं टाकून सुगंधी बनवलेलं माठातलं गार पाणी पितानाच तहान भागायची.

 

recipes.indiatimes.com

 

पण आता बाहेरुन आलं की फ्रीजमध्ये असलेल्या गार पाण्याची बाटली तोंडाला लावली की झालं!! त्यात गारपणा असतो, पण मोगरा वापरण्याचा सुगंध असतो का?

अशाच काही वस्तू ज्या काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पण कधीकधी आपली कमकुवत बाजू नीट अभ्यासली, तर तेच आपलं शक्तिस्थळ बनतं.

याच काळाच्या पडद्याआड जाऊ लागलेल्या किंवा गेलेल्या वस्तू खरंच अतुल्य होत्या.

आता आता सारं जग ईको फ्रेंडली म्हणून कृत्रिम साधनं नको म्हणतं, पण भारतात पूर्वापार असे पर्यावरणाचा समतोल राखूनच वस्तूंचा वापर केला जाई. काय होत्या या वस्तू?

 

१. पाटा वरवंटा –

 

aussietaste.com.au

 

आजकाल चटण्या वाटायला, मसाल्याचं वाटण घाटण करायला मिक्सरच वापरला जातो. पण पूर्वी हे सारं काम पाटा वरवंटा वापरुन करत. पुरणयंत्र नव्हतं तेंव्हा पुरणही पाट्यावरच वाटत.

त्या पाट्यावर वाटलेल्या चटणीची चव इतकी छान लागायची आणि सगळी पोषणमूल्यं जशीच्या तशी मिळायची हा पण एक जमेचा मोठा भाग होता.

सुगरण साळू असलेली बाई तर वाटतं असं झकास वाटायची आणि ते पाट्याला पाण्यानं धुवून राहीलेला पण वाटण्याचा भाग वाया जाऊ न देता वापरायची. वीज बचतही व्हायची!

 

२. उखळ मुसळ –

 

flickr.com

 

मिरची कांडप मशिन नव्हती, तेव्हा घरात असलेल्या उखळातच बायका वर्षभराची मिरची पावडर बनवायच्या.

अगदी कोरड्या चटण्या म्हणजे जवस, शेंगदाणे,कोरटे यांच्या चटण्या पण उखळात केल्या जात आणि त्या चविष्ट असत.

 

३. रगडा –

 

youtube.com

 

इडली डोसा उत्तप्पा यांची पीठं बनवण्यासाठी हा रगडा पूर्वी घरोघरी असायचा. आजकाल छोट्या शहरात घरीच मिक्सरमध्ये ही पिठं बनवून घेतात तर मोठ्या शहरात ही तयार पिठं विकत आणून मोकळ्या होतात.

 

४. खलबत्ता –

 

tourdefarm.in

 

शेंगदाण्याचं कूट करायला ही खल आणि बत्त्याची जोडी आजही छोट्या छोट्या गावात वापरतात. या कुटाची चव आणि ते वापरुन केलेले पदार्थ जीभेवर आपला स्वाद रेंगाळत ठेवतात. यालाही मिक्सरनं अडगळ दाखवली आहे.

 

५. कुल्हड -‌

 

financialexpress.com

 

कुल्हड म्हणजे मातीचं छोटं भांडं. ज्यात चहा पिता येतो..दही विरजता येतं..ताक करता येतं. आणि विशेष भाग असा, की त्याची चव अफाट असते. दही घट्ट लागतं.

स्टील अॅल्युमिनीअमनी यांना खरोखर मोडीत काढलं.

पूर्वी तर गंगा नदीच्या काठावर असलेल्या मातीपासून हे कुल्हड बनवले जात. त्यातून घेतलेला चहा चवदार लागायचा.

प्लास्टीक आणि कागदी कपांनी या कुल्हडना पार बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र जसे त्याचे दुष्परिणामही दिसू लागले, तसं परत हे कुल्हड परत एकदा चहासाठी वापरायला सुरुवात झाली आहे.

 

६. घुसळखांब रवी –

 

pinterest.com

 

पूर्वी मोठमोठ्या घरात माजघर स्वयंपाकघर सोपा पडवी असत. आणि यातच असायचा एक घुसळखांब आणि त्याला लावून ठेवलेली रवी..ताकाचा डेरा! केवळ ताक करायला यांचा वापर केला जाई.

अजून एक परंपरा अशी होती, की बाळंतीण झाल्यावर सोयर संपलं, की बाळाला त्या मुसळखांबावर चढवलं जाई. कदाचित तेव्हा बाळाला फार बाहेर नेता येत नसे म्हणून असा उंच हो असंही त्यातून सांगायचं असेल.

पण आता नव्या काळात रवीची जागा ब्लेंडरनं घेतली आहे. त्याबरोबर खांबाशी बसून ताक करणारी नी गोपाळकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवून नातवंडांना ताजं ताजं लोणी हातावर ठेवणारी आजीही गायब झाली आहे.

 

७. केळीचं पान –

 

thespruceeats.com

 

पूर्वी लग्न कार्य घराच्या अंगणात पार पडत. गावजेवणाच्या पंगती उठत. मग एवढ्या लोकांना ताटं कुठली आणायची? मग सोपा उपाय..केळीची पानं!!! केळीच्या पानांवर पंगती उठत.

धुवायचा अट्टाहास नाही. जेवणं झाली की पानं गोळा करा नी गाई म्हशींना घालून टाका. प्रदूषण नाही..वाया जाणं नाही आणि जनावरांच्या जीवाला धोकाही नाही.

पर्यावरण पूरक होती की नाही सांगा बरं आपली परंपरा?

 

८. कडुलिंबाची काडी –

 

indusscrolls.com

 

आजकाल दात घासायला सर्रास पेस्ट आणि ब्रश वापरतात. त्या पेस्ट मध्येही नाना तऱ्हेच्या वनस्पतींचा अर्क असतो. जाहिरातीत मीठ असलेली पेस्ट, राखुंडीसारखी पेस्ट काय काय सांगतात.

पण पूर्वी लोक दात घासायला कडुलिंबाच्या जाड काडीचा वापर करत आणि त्यामुळे त्यांच्या दातांना वर्षानुवर्षे कीड लागणं..खराब होणं हे काहीही होत नव्हतं. तोंडाच्या सर्व विकारांवर कडुलिंबाची काडी हाच उत्तम उपाय होता.

आता मात्र दर महिन्याला साधारण १५० कोटी ब्रश मोडीत टाकले जातात. आणि त्यानं पर्यावरणाला धोकाही संभवतो.

थोडक्यात…आपल्या देशात ज्या ज्या जुन्या पर्यावरण पूरक गोष्टी आहेत त्यांचा अंगिकार केला तर पर्यावरणाचं रक्षण होईलच शिवाय खेड्यात असलेल्या पारंपरिक व्यवसायांनाही नवसंजिवनी मिळेल.

आणि याचाच वापर केला तर आपण मेक इन इंडिया हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवू.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version