तारुण्य व आरोग्य टिकवण्याचा रामबाण उपाय आयुर्वेदाने कित्येक शतकांपूर्वीच देऊन ठेवलाय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायला हवे असे वाटत असते. पण एक वेळ येते जिथं आपल्याला आपली काळजी घेणं अत्यावश्यक ठरतं.
वारंवार उद्भवणाऱ्या शारिरीक तक्रारी, कोणतीही लस न सापडणारे विचित्र आजार, औद्योगिकीकरण झाल्यामुळे वाढलेला प्रदुषणाचा विळखा, निकस अन्नधान्य, कमी दिवसांत कृत्रिम रित्या पिकवलेली फळे, आहाराच्या चुकीच्या सवयी, जेवायच्या वेळेतील अनियमितता, सतत मसालेदार पदार्थ खाणं, जंक फूड, याचा एकत्रित परिणाम म्हणून कमी झालेली प्रतिकारशक्ती, दुर्धर आजारांनी वेढले गेलेले जीवन, सतत येणारे ताणतणाव, वारंवार उद्भवणारी बारीकसारीक दुखणी!!!
यावर शरीरशुद्धी हा अतिशय उपयुक्त इलाज आहे. म्हणजेच शरीरात निरुपयोगी द्रव्यांमुळे जे विषारी, शरीराला अपायकारक ठरू शकणारे पदार्थ साठलेले असतात ते बाहेर काढून टाकणे.
आपल्या रोजच्या आहारात कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्याला या सर्व अनावश्यक गोष्टींमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखायला मदत करतात.
त्यातील बरेचसे पदार्थ हे आपल्या स्वयंपाकघरात असतात. मसाल्याच्या पदार्थांशिवाय आपलं स्वयंपाकघर अपूर्ण आहे.
गोडा मसाला, गरम मसाला, काळा मसाला हे नित्य वापरले जाणारे भारतीय मसाले. जे केवळ जेवणाची लज्जतच वाढवत नाहीत, तर विशिष्ट स्वाद देऊन आपल्या आरोग्याचेही रक्षण करतात.
या मसाल्यात, किंवा आपल्या फोडणीच्या डब्यात असलेली हळद ही या शरीर शुद्धीकरण कार्यात मोठा सहभाग घेते. शरीरात साठलेली विषारी मुलद्रव्ये बाहेर टाकून शरीरशुद्धी व कायाकल्प करण्यासाठी हळद अतिशय उपयुक्त आहे.
कायाकल्प म्हणजे शरीरात मोठा बदल घडवणे. यासाठी हळदीचं पाणी अतिशय उपयुक्त आहे.
हळदीचे उपयोग-
आपल्या एकंदरीत जीवनात हळदीचा मुक्तहस्ते वापर असतो. देवाला वाहताना हळदी कुंकू, घरातील किंवा कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा मान पहिला असतो.
लग्नकार्यात देवकार्यात प्रथम हळद दळली जाते. वधुवरांना हळद लावतात. काही विधीत हातात हळकुंड बांधतात.ओटी भरताना विशिष्ट हळकुंडाने ओटी भरतात. त्यांना लेकुरवाळी हळकुंडं म्हणतात.
भाजी आमटीला फोडणीत हळदी शिवाय पूर्णता नाही. ओल्या हळदीचं लोणचंही करतात. थोडक्यात हळदीनं आपलं आयुष्य समृद्ध केलेलं आहे.
हळदीचे फायदे-
१. प्रतिकारशक्ती वाढते-
प्राचीन काळापासून भारतीय लोक हळद विविध कारणांनी वापरतात, पण तिच्या सर्व गुणांनी ती आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे.
हळद रोग प्रतिबंधक, शुद्ध करणारी म्हणून ओळखली जाते. इतकेच नव्हे, तर हळदीत असलेले घटक हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात.
जखमा भरुन आणायला मदत करतात. नैसर्गिक रित्या जखमांचं निर्जंतुकीकरण करतात. इतकेच नव्हे, तर त्यांचा फैलाव होणं रोखतात.
२. दुखण्यावर उपयोगी-
वर्षानुवर्षे आपण चिमुटभर हळद आणि दूध घेत आलो आहोत. त्याचा उपयोग दुखणारा घसा, फ्ल्यू, सर्दी यांनी होणारी अंगदुखी थांबण्यासाठी होतो.
सांधेदुखी थांबवण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे. तसेच दाह थांबवण्याचेही काम हळद करते.
३. त्वचेचे आरोग्य सुधारते-
त्वचेची निगा राखणं हा हळदीच्या हातचा मळ म्हणा हवं तर!!! हळदीच्या वापराने त्वचा तुकतुकीत होतेच शिवाय त्वचेला जर काही जखमा झाल्या तर त्या लवकरात लवकर भरुन आणते.
लग्नापूर्वी आणि लग्नात वधू वरांना याचसाठी हळद लावली जाते. आजकाल अँटी एजिंग क्रीम वापरतात, पण आपल्याकडं वर्षानुवर्षे हळद वापरली जाते.
त्वचा तरुण ठेवायला हळद खूप गुणकारी आहे. रोज जर तुम्ही हळदीचं पाणी घेतलं तर तुमची त्वचा सतेज, निरोगी आणि तरुण दिसते.
४. वजन कमी करण्यासाठी-
आजकाल सार्वत्रिक असलेली समस्या आहे ती म्हणजे वजनवाढीची. हळदीत असणारे काही घटक आपली पचनशक्ती सुधारायला मदत करतात.
पित्ताशयात निर्माण होणारे पित्त हे योग्य प्रमाणात तयार झाले तर ते शरीरास उपयोगी ठरते. हळदीच्या वापराने अतिरिक्त पित्त तयार न होता पचनशक्ती सुधारते.
अन्नाचे पचन व्यवस्थित झाले, की बऱ्याच तक्रारी कमी होतात. चरबी साठून रहात नाही. उत्तम पचनशक्ती आपोआपच सुदृढ आणि निरोगी शरीर देते. त्यामुळे वजन वाढत नाही.
इतकेच नव्हे, तर यकृतासाठीही हळद अतिशय उपयोगी आहे. व्हाईटल एंझाईम वाढवण्यासाठी हळद खूप गुणकारी आहे. यामुळे रक्त शुद्ध होते. शरिरातील विषारी द्रव्यं शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते.
एकंदरीत शरीर शुध्दीकरण, पचनशक्ती सुधारणा, त्वचेचा पोत, रंग सुधारणा, जखमा भरुन आणायला, निर्जंतुकीकरण करायला हळद अत्यंत उपयुक्त आहे.
हळदीचे पाणी बनवण्याची पद्धत-
एका पातेल्यात एक कप पाणी घ्या. ते उकळू द्या. दुसऱ्या कपात एक चमचा हळद, अर्धा चमचा लिंबाचा रस घ्या. हे नीट एकजीव करून मिश्रण गरम पाण्यात टाका.
रोज सकाळी हे हळदीचं पाणी पित जा. तुमची त्वचा, पचनशक्ती, आणि इतरही अनेक छोट्या छोट्या तक्रारी कमी होऊन आश्चर्यकारक बदल तुमचे तुम्हाला जाणवतील.
थोडक्यात सांगायचं तर,आपल्या आसपासच आपल्या छोट्या छोट्या समस्यांची उत्तरं असतात. पण आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो.
आपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या खानपानाचे पदार्थ, मसाले, मसाल्यात वापरण्याचे घटक पदार्थ, त्याचे प्रमाण हे सर्व काही बनवले आहे.
विविध ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांमुळे शरीरावर होणारे परिणाम लक्षात घेऊनच काही नियम बनवले आहेत.
आपण “जुने जाऊ द्या मरणालागुनी” असं सरसकट सर्व गोष्टींसाठी परिमाण न ठेवता थोडा अभ्यास केला, तर लक्षात येईल की बहुतेक सर्व गोष्टी आपल्या हिताच्या आहेत.
बारीकसारीक दुखणी आपण घरच्या घरी किरकोळ घरगुती, फुटकळ वाटणाऱ्या पण अल्पमोली बहुगुणी पदार्थ, वस्तू वापरून बरी करु शकतो. ती उद्भवू नयेत याची काळजी घेऊ शकतो.
सगळं आपल्या हाताशी असतं.. पण काखेत कळसा गावाला वळसा म्हणत आपण आपल्याजवळची वस्तूच गांवभर शोधत राहतो.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.