आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज नितूच्या घरात गडबड सुरू होती. उत्तर भारतीय नीतू ही दररोजच्या पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट मध्ये नव्हती, तर तिने साडी नेसली होती आणि डोक्यावरून पदर घेतलेला होता.
तिला विचारलं, की आज कुठला सण आहे का? तर ती म्हणाली, “नाही माझे सासू सासरे येणार आहेत. आमच्यात मोठ्यांचा आदर करण्यासाठी साडी नेसून डोक्यावरून पदर घ्यावा लागतो.
आता चार दिवस मला हा साडी आणि डोक्यावरच्या पदराचा वैताग सहन करावा लागेल. सासू-सासरे हे परंपरावादी आणि रूढी सांभाळणारे आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर असेच जावं लागतं.” असे म्हणून ती कामाला लागली.
डोक्यावरून पदर घेणे, घूंघट घेणे या परंपरा नक्की कधी आल्या असतील? पुरातन काळापासून भारतात या परंपरा असतील का? याचा शोध घेतला तर त्याचे उत्तर खरं तर नाही असं आहे.
म्हणजे तसं पाहिलं तर पुरातन काळातल्या गोष्टींमध्ये देखील स्त्रियांवरती कोणतीही बंधनं आहेत असं दिसून येत नाही. उलट स्त्रियांनाही समान वागणूक दिली जायची, याची उदाहरणे सापडतात.
मैत्रेयी, गार्गी, लीलावती या अशा अनेक विदुषी स्त्रिया आपल्याच समाजात होऊन गेल्या आहेत. अगदी एखाद्या राजाचा मृत्यू झाला आणि राजपुत्र जर लहान असेल तर राज्याचा कारभार त्याची राणीच सांभाळायची.
इतकंच कशाला अगदी ५०० वर्षांपूर्वीचं लिखाण जरी काढून पाहिलं तरी तरीही त्यात कुठेही डोक्यावरचा पदर, घुंघट असे उल्लेख सापडत नाहीत.
भारतातली जी अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यावरची कलाकुसर पहा. जसे की, खजुराहो मंदीर, अजंठा, वेरूळ लेणी.
त्यावरचं कोरीव काम जर आपण बारकाईने पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल, की इथे असणाऱ्या कुठल्याही स्त्री मूर्तीने डोक्यावर पदर घेतला नाही किंवा घुंगट घेतले नाही.
कुठल्याही भारतीय धर्मग्रंथात स्त्रियांनी डोक्यावरून पदर घेतला पाहिजे, घुंगट घेतलं पाहिजे, पडदा पद्धती ठेवली पाहिजे असा कुठेही लिखित उल्लेख नाही.
त्या काळात अगदी खेड्यापाड्यातल्या महिलादेखील कोणतीही पडदा पद्धत वापरत नसत. चेहरा न झाकता महिला काम करू शकत असत.
अगदी ऋग्वेदात देखील लग्नाच्या वेळेस नवरीने असे काही घालावे असे उल्लेख नाहीत. उलट लग्न करताना वर आणि वधूनी एकमेकांकडे पहावं असं सांगितले आहे. म्हणजेच महिलांना त्याकाळात पूर्ण स्वातंत्र्य होतं.
आपण ज्या रामायण, महाभारत या टीव्ही मालिका पाहिल्या असतील. तर त्यातील सीता, द्रौपदी, कुंती यांनी कुठेही पडदा पद्धती अवलंबलेली दिसत नाही.
चेहरा झाकून ठेवण्याची प्रथा नव्हती.
धर्मशास्त्राचे जे पुस्तक आहे त्यात पडदा पद्धतीचा उल्लेख आहे. पण केवळ काही राजघराण्यातील स्त्रिया या पद्धतीचा अवलंब करायच्या.
पडदा पद्धती किंवा घुंगट घेण्याची पद्धती नेमकी कधी आली? याचा थोडासा धांडोळा घेतल्यास दिसून येईल, की या पद्धती भारतात मुख्यतः मुस्लिम आक्रमणानंतर आलेल्या दिसत आहेत.
जेव्हा-जेव्हा भारतावर मुस्लिम आक्रमणे झाली, तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त भरडल्या गेल्या असतील तर त्या स्त्रियाच.
मुस्लिम आक्रमणानंतर लुटालूट व्हायची त्यावेळेस स्त्रियांना देखील लुटलं जात होतं. त्यांच्यावर बलात्कार केले जायचे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे.
भारतात त्याआधी इतक्या मोठ्या प्रमाणावर बलात्कार कधीच झाले नव्हते. म्हणजे स्त्रियांबरोबर दुष्टपणा केला जायचा, छल कपट केलं जायचं. पण बलात्कार कधीही होत नव्हते.
मुस्लिम आक्रमणानंतर स्त्रियांवरील बलात्काराचे प्रमाण वाढले. स्त्रिया मुक्तपणे बाहेर फिरू शकत नव्हत्या.
एखादी जरी बाई बाहेर दिसली तर तिला पकडून नेले जात असे. तिच्यावर बलात्कार केला जात असे. यातून महिला, मुली यांची सुटका नसे.
त्यानंतर त्यांचं धर्मांतरही होत असे. दररोजच अशा घटना घडताना दिसत होत्या. मुलींना पळवून नेले जात असे. अगदी राजघराण्यातील मुलींनादेखील पळवले जात असे.
राजघराण्यातील मुलींचीही अशी अवस्था होत असेल तर सामान्य स्त्रियांचं काय होत असेल?
अल्लाउद्दीन खिल्जी- राणी पद्मावती बाबतची गोष्टही आपल्याला माहितीच आहे. केवळ पद्मावती राणी मिळावी म्हणून खिल्जीने नाना प्रयत्न केले.
आपले शील वाचवण्यासाठी शेवटी पद्मावती राणीने जोहार केला आणि स्वतःचे बलिदान दिले. तिच्याबरोबर १६००० स्त्रियांनीही अग्निप्रवेश केला. इतक्या भयावह वातावरणात त्या काळात स्त्रिया वावरत होत्या.
मुस्लिम आक्रमणातील सामान्य सैनिक देखील भारतातल्या महिलांवर अत्याचार करायचा. खूप महिला या अत्याचारांच्या बळी ठरल्या. महिलांवरील हे अनन्वित अत्याचार थांबवणे गरजेचे होते. त्यासाठीच मग महिलांवरती बंधने यायला सुरुवात झाली.
मुस्लिम समाजामध्ये गोषा पद्धत आधीपासूनच अस्तित्वात होती त्या महिला शक्यतो बाहेर पडत नसत. तसेच बाहेर जायची वेळ आलीच तर बुरखा घालून, संपूर्ण चेहरा झाकून बाहेर पडायच्या.
हीच पद्धत मग भारतातील लोकांनीही स्वीकारली.
आपल्या महिलांना वाचवण्यासाठी त्यांना लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी पडदा पद्धत आणि घुंगट पद्धत अस्तित्वात आली.
स्त्रियांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. घरातही डोक्यावरून पदर आणि घूंघट घेण्याची प्रथा आली. कारण मुस्लिम आक्रमण कधीही आणि कुठेही होत.
त्यामुळे महिलांच्या शिक्षणावरही बंधने आली. मुलींची लवकर लग्न करणे आणि त्यांना सासरी पाठवणे ही जबाबदारी समजली जाऊ लागली.
घरात येणाऱ्या नव्या सुनेलाही अशाच पद्धतीचा अवलंब करण्यास भाग पाडले जाऊ लागले. अशा रीतीने घुंगट आणि पडदा पद्धत अस्तित्वात आली.
आपण पाहतो, की राजस्थानामध्ये ही घूँघट पद्धत मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. तिथे अजूनही स्त्रिया या पद्धतीचा वापर करताना दिसतात.
उत्तर भारतात या पद्धतीचं मोठ्या प्रमाणावर पालन केलं जातं. महाराष्ट्रातही काही विशिष्ट समाजामध्ये ही पद्धत अस्तित्वात आहे.
जर आपण दक्षिण भारताकडे पाहिलं तर, तिथे अशी कोणतीही प्रथा अस्तित्वात नाही हे दिसून येईल. याचा अर्थ तिथे अजूनही आपली भारताची मूळ परंपरा जपली जाते. याचं कारण म्हणजे दक्षिण भारतावर मुस्लिम आक्रमणं कमी झाली आहेत.
पुढे मग अनेक पिढ्यांनी या पद्धतीचा अवलंब केला. आणि मग समाजमनावर हीच आपली रूढी परंपरा आहे असं बिंबलं गेलं.
अनेक स्त्रियांना देखील मग असंच वाटायला लागलं, की हीच आपली रूढी परंपरा आहे ती आपण मोडता कामा नये. या प्रथेचे पालन मग स्त्रियांकडूनच व्हायला सुरुवात झाली.
जी बाई या पद्धतीचा वापर करत नाही, ही रूढी परंपरा पाळत नाही तिला मग नावं ठेवली जाऊ लागली. तिला बेजबाबदार निर्लज्ज, असंस्कारी समजलं जाऊ लागलं. तिला सासरी यावरून टोचून बोललं जाऊ लागलं.
विशेष म्हणजे त्या नव्या सुनेला यावरून बोलणाऱ्या तिच्या सासू आणि नणंदा या बायकाच होत्या.
मग आता नीतू सारख्या काही जणी फक्त सासरच्या लोकांसमोर डोक्यावरून पदर आणि घुंगट घेतात. पण इतर वेळेस मॉडर्न कपड्यात वावरतात.
तर काही जणी मुळातच बंडखोर असतात त्या या प्रथेला विरोधही करतात. वर्षानुवर्षे पाळली गेलेली ही प्रथा आता महिलाच उखडून लावत आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.