Site icon InMarathi

समाजात वर्षानुवर्षे पाळल्या जाणाऱ्या ९ अंधश्रद्धामागील अजब कहाण्या!

black-cat InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काळ बदलला तरी अनेक मान्यता अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत. याचा अनुभव आपण आपल्या भवतालात अनेकदा घेत असतो.

अगदी अमुक दिवशी केस कापू नयेत, तमुक दिवशी नखं कापू नयेत इथपासून ते पुर्वजांच्या रूपात कावळा जेवण्यासाठी येतोची समजूत अशा अनेक अंधश्रद्धा आपण आजही लोक व्यवस्थितपणे पाळत असल्याचे पाहतो.

आपण जरी नाही म्हटले, तरी आपल्या घरातील वृद्ध मंडळी याबाबत आपल्याला सतत टोकत राहतात आणि या गोष्टी पाळण्यास मजबूर करतात असेही चित्र अनेकदा दिसते.

 

खरंतर या सर्व अंधश्रद्धांच्या मागे काही ठोस कारणे होती. पूर्वीच्या काळी यातील काही गोष्टींमागे तथ्यही होते.

मात्र आता काळ बदललेला असल्यामुळे यातील बऱ्याच गोष्टी कालबाह्य, निरर्थक झालेल्या आहेत. त्यांचे पालन गरजेचे राहिले नाही. तरी केवळ पुर्वज करत होते म्हणून आपणही डोळे झाकून अशा गोष्टींचे पालन करत राहतो.

तर चला जाणून घेऊ या आपल्याकडे साधारण अशा कोणत्या अंधश्रद्धा आहेत आणि त्यामागची पूर्वीची खरी कारणे कोणती होती आणि आता त्या कशा कालबाह्य झालेल्या आहेत ते –

 

१. मंगळवारी केस कापू नये –

 

 

पूर्वीच्या काळी बहुतांश लोक हे शेतीकामात गुंतलेले असत. आणि त्यांना केवळ सोमवारी सुट्टी असे. साहजिकच त्या दिवशी ते आपल्या घराची आणि आपली स्वच्छता करत.

अर्थात त्या दिवशी असे कष्टकरी लोक केस कापून घेणे, दाढी करून घेणे या गोष्टीही उरकून घेत. त्या काळात केस कापण्यासाठी न्हावी घरोघरी जात. गावगाड्यात न्हाव्यांची संख्याही फार नसे.

उपलब्ध न्हाव्याला त्या दिवशी सगळीकडे धावाधाव करावी लागे. त्याचा पूर्ण दिवस त्यातच जाई. इतरांच्या सुट्टीचा दिवस तो त्याच्या कामाचा दिवस असे. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी दिली जाई.

त्या दिवशी तो आपल्या घरातील कामे उरकू शके. त्यामुळे मंगळवारी केस कापू नये. न्हाव्याला आराम द्यावा या संकल्पनेतून ही समजूत रूढ झाली.

मात्र आता तशी गरज राहिलेली नसतानाही लोक ते विनाकारण पाळत असताना दिसतात.

 

२. दारात लिंबू-मिरची टांगणे –

 

amarujala.com

 

आपल्याकडे लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशा दोन संकल्पना मानल्या जातात. लक्ष्मी ही घरात आल्यावर आपली भरभराट करते, समृद्धी घेऊन येते. तर अलक्ष्मी घरात आली, तर ती दारिद्र्य घेऊन येते आणि घराचा सत्यानाश करते. असा समज आहे.

अलक्ष्मीला तिखट, आंबट अशा वस्तु आवडतात. तर ही अलक्ष्मी अशा वस्तू खायला आपल्या घरात शिरू नये आणि तिला दारातच या वस्तू देऊन परत पाठवावं अशा समजुतीतून ही प्रथा जन्माला आलेली आहे.

त्यासाठी दारात एक लिंबू आणि सात मिरच्या टांगल्या जातात.

मात्र तुम्हाला ही समजूत पटत नसली, तरी यामागे वैज्ञानिक कारणही असे सांगितले जाते, की लिंबू आणि मिरच्यांचे एकत्र रासायनिक गुणधर्म बाहेरून येणाऱ्या किटक, जिवाणू इत्यादींना घरात शिरण्यापासून अटकाव करतात.

आता यावर किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे.

 

३. आरसा फुटला तर सात वर्ष दुर्दैव येते –

 

people.howstuffwork.com

 

पूर्वी आणि विशेषतः रोममध्ये अशी समजूत होती, की आरशात आपले प्रतिबिंब दिसते म्हणजेच आपला आत्माही त्या आरशात असतो.

एखादा कमकुवत किंवा अस्वस्थ माणूस आरशात डोकावला तर आरसा स्वतःच फुटतो. आपले आयुष्य पुन्हा बळकट व्हायला सात वर्षे लागतात अशीही समजूत होती.

त्यामुळे आरसा फुटला तर पुन्हा आपले चांगले दिवस यायला सात वर्षे लागणार अशी अंधश्रद्धा होती.

मात्र तार्किक कारण शोधायचे तर असे दिसून येते, की त्याकाळी आरसे सहज आणि स्वस्त उपलब्ध नव्हते.

श्रीमंत आणि उच्चपदस्थ लोकच आरसे विकत घेऊ शकत. आरसा ही गोष्ट तेव्हा नवीन शोध असल्याने साहजिकच तो सर्वसामान्यांसाठी दुर्मिळ वस्तू होता. तो पुन्हा घ्यायचा तर काही वर्षे लागू शकत होती.

म्हणून आरसा फुटला तर सात वर्षे नशीब फुटकं राहतं अशी समजूत असावी.

 

४. संध्याकाळनंतर नखं कापू नयेत –

 

scoopwhoop.com

 

संध्याकाळनंतर नखं कापू नयेत असे आजही जुनी माणसे म्हणतात आणि आपल्याला त्यांचं ऐकावं लागतं. मात्र त्यामागचे तार्किक कारण असे आहे, की पूर्वीच्या काळात विजेचे दिवे नव्हते. तेलाचे मिणमिणते दिवे वापरले जायचे.

त्यांचा प्रकाश अपुरा आणि मंद असे. अशा काळोखात नखे कापताना आपल्या बोटांना इजा होऊन जखम होऊ शकते आणि काळोखात नखे घरात इतस्ततः पडू शकतात. म्हणून दिवसाच नखे कापावीत.

हे तेव्हा योग्य कारण होते. मात्र आता विजेचा प्रकाश रात्रीही लख्ख उपलब्ध असताना आणि तशी ईजा होण्याचा काहीही संभव नसताना ह्या समजूतीचे पालन करत राहणे व्यर्थ आहे.

 

५. मेलेल्या माणसाच्या अंतिमक्रिया आटोपल्यावर स्नान करावे –

 

malyalam.boldsky.com

 

पूर्वीच्या समजुतीनुसार मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर आंघोळ केल्याने वाईट विचार, आणि वाईट गोष्टी दूर होतात.

मात्र प्रत्यक्षात शास्त्रीय कारण असे आहे, की कोणत्याही मृत प्राण्याच्या किंवा माणसांच्या शरीराचे विघटन होऊ लागते. आणि त्यातून जंतू, जिवाणू, रोगाचे विषाणू बाहेर पडू लागतात. दुर्गंधी येऊ लागते.

त्यामुळे त्याचे अंतिम संस्कार झाल्यावर आपल्या अंगाला असे जंतू, विषाणू, जिवाणू लागले असतील, तर ते दूर व्हावेत, शरीर स्वच्छ व्हावं हा एकमेव हेतू आंघोळीचा आहे.

 

६. प्रवासादरम्यान मध्ये लागणाऱ्या नदित नाणी फेकणे –

 

 

कदाचित आता हे हास्यास्पद वाटेल, पण विचार केला तर पटण्यासारखे कारण होते. पूर्वी नाणी ही तांब्या, पितळेची आणि क्वचित सोन्याची असायची. हे तिन्ही धातू पाणी शुद्ध करतात.

विशेषतः तांबे. त्या काळात पिण्याचे पाणी हे थेट विहिरीतून, नदीतून आणले जात असे. तर लोकांच्या पिण्याचे पाणी शुद्ध राहावे, त्यातील बॅक्टेरिया कमी व्हावेत या उद्देशाने तांब्याची नाणी त्यात फेकली जात होती.

 

७. बाहेर प्रवासाला निघालो असता मांजर आडवी जाणे –

 

 

पूर्वीच्या काळी लोक प्रवासाला बाहेर निघत ते बैलगाड्यांतून, घोडागाडीतून, किंवा घोड्यावरून. बहुतांश ग्रामीण भागात जंगल असे, जंगलातून प्रवास करावा लागे.

अशावेळी जंगली मांजर वाटेत आडवं आलं तर बैल, घोडा इत्यादी पाळीव प्राणी त्यांना घाबरत, बुजत. एका जागी थांबून राहत. म्हणून मांजर आडवी गेली की विघ्न आलं अशी समजूत होती.

मात्र आता जंगली मांजर आणि पाळीव मांजर यांची गल्लत केली जाते. आणि कुठलीही मांजर अगदी शहरात आडवी आली तरी लोक विघ्न येणार अशी अंधश्रद्धा पाळतात.

 

८. काळोख पडल्यावर झाडू नये, केर काढू नये –

 

 

इथेही पुन्हा वरील नखं कापण्याचाच संदर्भ लागू पडतोय. पूर्वी विजेचे दिवे नव्हते. तेलाचे मिणमिणते दिवे अपुरे आणि मंद प्रकाश देणारे होते.

अशावेळी घरात केर काढताना त्या केरात एखादी मौल्यवान वस्तू, पैसे, दागिने जाऊ नयेत, कारण अंधारात ते दिसण्याची शक्यता कमी होते. म्हणून दिवस मावळल्यावर अंधार झाल्यावर केर काढू नये अशी पद्धत होती.

मात्र आता विजेच्या लख्ख प्रकाशात तशी काहीच शक्यता नसताना ह्याचे पालन म्हणजे अंधश्रद्धाच ठरते.

 

९. आपले पूर्वज कावळ्याच्या रुपात येणे –

 

एक पुराणकथा आहे. एकदा इंद्रपुत्र जयंतने कावळ्याचा वेष घेऊन सीतेला त्रास दिला. त्यामुळे रामाने संतापून एक गवताची काडी घेऊन त्याचा बाण बनवला आणि तो जयंताच्या डोळ्याचा वेध घेऊन सोडला.

जयंताचा डोळा फुटला. त्यामुळे त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला.

त्याने रामसीतेची क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला क्षमा कर म्हटले की जर कावळ्यांना अन्न दिले तर ते आपल्या पुर्वजांपर्यंत जाईल. अशी ही दंतकथा आहे. यावर किती विश्वास ठेवायचा ते तुमच्यावर आहे. बरोबर ना?

तर अशा या समजूती, त्यामागील पूर्वीची कारणे आणि आताची निरर्थकता.

कुठल्याही श्रद्धा, किंवा समजूती जोपासताना आपण त्याच्यामागची तार्किक कारण तपासून घ्यायला हवीत. विनाकारण कालबाह्य समजूती पाळत बसू नये. असा याचा साधा अर्थ.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version