Site icon InMarathi

ब्रिटिश जहाजावर ‘वन्दे मातरम्’ चा झेंडा फडकवणारा एक विस्मरणात गेलेला स्वातंत्र्य सैनिक

chidambaram pillai featured inmarathi

sharechat.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताचा स्वातंत्र्यलढा आपल्याला माहीत आहे. तसा तो अनेक घटनांमुळे लक्षात राह्यला आहे. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा चालू होता, जनजागृती चालू होती. त्यावेळेस प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यासाठी काहीतरी योगदान देऊ इच्छित होता.

त्यातूनच जन्म झाला होता स्वदेशी चळवळीचा, स्वदेशी वस्तू वापरण्याचा. या चळवळीचे अनेक शिलेदार होते यापैकी कितीतरी जण आपल्याला माहीतही नाहीत.

यातीलच एक नाव म्हणजे वि. ओ. सी. पिल्लई. ज्यांना लोक चिदंबरम पिल्लई या नावाने ओळखतात.

वि. ओ. सी. पिल्लई यांनी एक जहाज कंपनी काढली.

“केवळ पैसा कमावणे हा या कंपनीचा उद्देश नाही तर ब्रिटिशांनी भारतातून गाशा गुंडाळावा यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे” असं ते म्हणायचे.

 

ilavaluthy.blogspot.com

 

चिदंबरम पिल्लाई यांनी तुतिकोरीन ते श्रीलंका अशी जहाज सेवा १९०० यावर्षी चालू केली. सगळ्यांनाच माहीत आहे की ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश हे भारतात आले. व्यापार करण्याच्या हेतूने ते भारतात आले पण इथले राज्यकर्ते झाले.

तुतिकोरीनचे व्यापारी महत्त्व तसं नवव्या आणि बाराव्या शतकापासूनच आहे. तिथल्या पंड्या आणि चोल सम्राटांनी तिथूनच श्रीलंकेबरोबर व्यापारी संबंध ठेवलेले होते.

थोड्याच दिवसात तुतिकोरीन हे व्यापारी बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले. सोळाव्या शतकात पोर्तुगीज, सतराव्या शतकात डच, आणि अठराव्या शतकात इंग्रज तुतिकोरीन मार्गे भारतात आले.

तुतीकोरीनचे महत्व ओळखून इंग्रजांनी १८२५ मध्ये तुतिकोरीन बंदरावर ताबा घेतला. त्यामुळे तिथून होणारी व्यापारी वाहतूक, तसेच प्रवासी वाहतूक देखील इंग्रजांच्या परवानगीशिवाय होत नव्हती.

चिदंबरम पिल्लाई यांचा तुतिकोरीनशी संबंध त्यांच्या विद्यार्थीदशेत आला. तसा त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १८७२ मध्ये तामिळनाडूतील तिरूनेलवेली येथे झाला. परंतु शिक्षणासाठी त्यांची रवानगी तुतीकोरीन येथे झाली.

 

portwings.in

 

त्यांचे आजोबा आणि वडील हे वकील होते. त्यामुळेच आपल्या मुलाने देखील वकिली करावी असं त्यांच्या वडिलांचे मत होतं. परंतु वी. ओ. सी. पिल्लई यांचे भवितव्य मात्र वेगळच होतं.

वडिलांच्या इच्छेप्रमाणे ते वकील झालेही परंतु आपली वकिली ते स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी करायचे.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने आपलं चांगलंच वर्चस्व संपूर्ण भारत देशावर निर्माण केलं होतं. त्याच वेळेस ईस्ट इंडिया कंपनीने एक फर्मान काढले, ज्यानुसार कुठलाही व्यापार करायचा असल्यास कंपनीची परवानगी घ्यावी लागेल.

याचा अर्थ कुठलीही कंपनी किंवा व्यक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या परवानगीशिवाय कुठलाही व्यवहार करू शकणार नव्हती. त्यामुळे कापूस, रेशम, मीठ, मसाले किमती खडे, चहा, तंबाखू ह्या सगळ्या वस्तूंच्या व्यापारावर कंपनीची एकाधिकारशाही आली.

त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतात स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन तीव्र व्हायला लागले. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येऊ लागला, स्वदेशीचा नारा दिला गेला.

या लढ्याचे नेतृत्व करत होते लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, अरविंद घोष इत्यादी नेते. या नेत्यांनी अनेक स्वदेशी गोष्टी निर्माण केल्या जसे की वर्तमानपत्रं चालू केली.

शाळा, कॉलेजेस काढले. त्यांचीही आंदोलनं देशभर पोहोचत होती. त्याकडे पिल्लई आकर्षित झाले. ते लोकमान्य टिळकांना आपले गुरु मानायचे.

 

iasmania.com

 

त्याच वेळेस १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. यामुळे लोकांच्यात इंग्रजांविषयी रोष निर्माण झालेला होता. याच रोषाला तूतीकोरिन मध्ये चिदंबरम पिल्लई यांनी हवा दिली.

त्याच वेळेस तुतिकोरीन-श्रीलंका मध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालू झाला होता.

त्यामुळे तुतिकोरीन मधल्या व्यापाऱ्यांनी आपली एक जहाज कंपनी काढावी असा विचार केला, आणि याचे प्रमुख होते पिल्लई. त्यांना पूर्ण विश्वास होता की स्वदेशी कंपनी चालू केल्यास इंग्रजांच्या व्यापारावर नक्कीच त्याचा परिणाम होईल.

त्यानंतर १९०६ मध्ये स्वदेशी जहाज कंपनी’ स्टीम नेवीगेशन’ सुरू झाली. कंपनीसाठी 40000 शेअर्स काढले गेले. त्याद्वारे दहा लाख रुपये जमा केले गेले. एका शेअरची किंमत पंचवीस रुपये होती.

हे पैसे जमा करण्यासाठी पिल्लई यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला. लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांनीही त्यांच्या या कंपनीला पाठिंबा दिला.

सुरुवातीला स्टीम नेवीगेशन कंपनीकडे कोणतेही जहाज नव्हते. सुरुवातीला भाड्याने जहाज घेऊन कंपनीने व्यापार चालू केला. ज्यामुळे ब्रिटिश कंपन्यांना तोटा व्हायला लागला.

त्यानंतर ब्रिटिशांनी जहाज देणाऱ्या कंपन्यांवर दबाव टाकायला सुरुवात केली. म्हणून पिल्लई यांना जहाज मिळत नव्हते. मग त्यांनी श्रीलंकेतून जहाज भाड्याने घ्यायला सुरुवात केली.

 

en.wikipedia.org

 

कंपनी जशी फायद्यात आली तसे त्यांनी २ जहाज स्टीम नेवीगेशन कंपनीसाठी फ्रान्स कडून विकत घेतले. ही कंपनीसाठी नक्कीच गौरवास्पद गोष्ट होती.

स्वदेशीचा नारा आणि स्वदेशी कंपनी यामुळे भारत – श्रीलंका मध्ये जो व्यापार व्हायचा त्यासाठी लोक आता याच कंपनीकडे येऊ लागले. जहाजातून एकाच वेळेस तेराशे प्रवासी आणि चाळीस हजार बॅगा बसू शकत होत्या.

या जहाजावर जो झेंडा लावलेला होता त्यावर देखील वंदे मातरम असे लिहिलेले होते.

स्टीम नॅव्हिगेशन कंपनी त्यावेळेस खूपच प्रसिद्ध झाली होती. संपूर्ण देशभरात तिचे कौतुक होत होते. आणि लोक देखील समुद्र प्रवास करायचा असेल तर याच कंपनीला प्राधान्य देत होते. परंतु कंपनीचं हे यश टिकू शकले नाही.

याचं कारण म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या जहाज कंपनीतील जहाज तिकीट फक्त एक रुपयावर आणले. तरी देखील लोक टीम स्टीम नेवीगेशन कंपनीकडे यायचे.

परंतु ब्रिटिशांनी तिकीट दर एक रुपया केला म्हणून स्टीम नॅव्हिगेशन कंपनीने देखील आपला तिकीट दर ५० पैसे केला. त्यानंतर ब्रिटिशांनी लोकांना मोफत प्रवास द्यायला सुरुवात केली मग मात्र स्टीम नेवीगेशन कंपनीचा व्यापार हळूहळू कमी होत गेला.

त्याच वेळेस तुतीकोरीन येथील कामगारांच्या मागण्यांसाठी चिदंबरम पिल्लई यांनी कामगारांना पाठिंबा दिला. कामगारांच्या विरुद्ध लावलेल्या केसेस मध्ये त्यांनी कामगारांची बाजू मांडली.

कामगारांना दिले जाणारे कमी वेतन आणि करून घेतलं जाणार काम यांचे व्यस्त प्रमाण त्यांनी लक्षात घेतलं आणि कामगारांना पाठिंबा दिला.

कामगारांना संप करण्यास, आंदोलन करण्यास प्रेरित केलं. या वेळी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले, तुतिकोरीन मध्ये दंगे पेटले आणि त्यात चार लोकांचा मृत्यू झाला.

याच कारणांसाठी १९०८ मध्ये पिल्लई यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दंग्यांसाठी आणि मृत्यूसाठी पिल्लई यांना जबाबदार धरण्यात आले. त्यांना चाळीस वर्षांचा आजन्म कारावास ठोठावण्यात आला.

जेलमध्ये त्यांना अत्यंत वाईट वर्तणूक देण्यात येत असे. तेलबियांचे तेल काढायच्या घाण्याला बैलाच्या जागी जुंपण्यात येत असे. भर उन्हात त्यांना घाणा ओढायला सांगितला जात असे.

 

navrangindia.wordpress.com

 

या सगळ्या कालखंडात स्टीम नेव्हिगेशन कंपनीचं अत्यंत नुकसान झालं. १९११ मध्येच ही कंपनी बंद करायची वेळ आली. अगदी कंपनीचं एक जहाज तर आपल्याच प्रतिस्पर्ध्या ब्रिटिश कंपनीला विकावं लागलं.

१९१२ मध्ये पिल्लई यांची सुटका करण्यात आली. परंतु त्यांच्यावर अत्यंत कडक बंधनं घालण्यात आली होती. त्यांना तूतीकोरिन आणि त्यांच्या जन्मगावी जाता येणार नव्हते. त्यांना त्यांची वकिली चालवता येणार नव्हती.

एका नातेवाईकांकडे आश्रित म्हणून राहायची वेळ त्यांच्यावर आली. त्यांची ही अवस्था बघून ज्या न्यायमूर्तींनी त्यांची वकालत रद्द केली होती ती त्यांनी त्यांना परत बहाल केली. त्यानंतर त्यांना वकिली करता येऊ लागली.

चिदंबरम पिल्लाई हे तामिळ विद्वान होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९३६ मध्ये ते कालवश झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वदेशीचे महत्त्व पटवण्यासाठी चिदंबरम पिल्लाई यांचे योगदान महत्त्वाचं आहे.

 

youtube.com

 

व्यापारातील ब्रिटिशांची मक्तेदारी त्यांनी मोडून काढली. त्यांचं तेच योगदान ओळखून भारत सरकारने त्यांच्या नावाचा स्टॅम्प काढला आहे.

त्यांच्या नावाचे वि.ओ. चिदंबरम कॉलेज देखील तूतुकुडी मध्ये आहे. तुतुकोरिन पोर्टला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version