' अगदी साधी कल्पना: पोळी-भाजीचा डबा विकून महिला कमावतेय लाखो रुपये!! – InMarathi

अगदी साधी कल्पना: पोळी-भाजीचा डबा विकून महिला कमावतेय लाखो रुपये!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काहीजणांना स्वयंपाकाची आवड असते. एखादा पदार्थ बनवणे आणि तो खाऊ घालणे ही बऱ्याच गृहिणींची आवड आहे.

तरीही रोजच स्वयंपाकाला काय करायचे? मुलांच्या आवडीचं काय करायचं ? असे अनेक प्रश्न गृहिणींसमोर उभे असतात.

आता शाळा बंद आहेत म्हणून, नाहीतर डब्यातही काय द्यायचं? हाही एक महत्त्वाचा गहन प्रश्न आयांसमोर पडलेला असतो.

कारण मुलाचं केवळ पोटच भरू नये, तर दिलेल्या जेवणातून व्यवस्थित पोषक घटक देखील आपल्या मुलाला मिळावेत याची काळजी आई घेत असते.

 

cooking inmarathi

 

परंतु मुलांना मात्र रोजच नवीन काहीतरी, त्यातही जंकफूड खाण्याची इच्छा असते.

तर अशा या आयांचा प्रश्न कृपा धर्मराज या तरुणीने सोडवला आहे. ती स्वतः एका मुलाची आई आहे. तिलाही इतरांप्रमाणेच आपल्या मुलाला पोषणयुक्त आहार कसा द्यावा असा प्रश्न पडायचा.

मुलाचे नुसते पोट भरून भागणार नाही, तर त्यातून त्याला हवी ती पोषणमूल्ये, कर्बोदके व्यवस्थित मिळायला हवेत याची काळजीही घेतली पाहिजे हे तिच्या लक्षात आले.

त्यासाठी तिने स्वतः अनेक पालकांशी, मुलांशी संवाद साधला आणि त्यातून तिला असा न्यूट्रिशिनयुक्त डबा देण्याची कल्पना सुचली.

 

balanced diet inmarathi

हे ही वाचा – सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ टाळलेत तर आरोग्याची चिंता करावी लागणार नाही

कृपा धर्मराज ही मुळातली आयटी प्रोफेशनलिस्ट. चेन्नईमध्ये काम करते. तिला मुळातच स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा होती, परंतु इंजीनियरिंग झाल्यानंतर तिने आयटी कंपनीत नोकरी स्वीकारली.

नंतर तिचे लग्न मात्र एका बिझनेसमन सोबत झाले. मग तिने आयटी कंपनीतला जॉब सोडला आणि घरच्याच व्यवसायामध्ये पतीला मदत करणे चालू केले. ते करतानाच तिच्या लक्षात आले की ती स्वतःचे काहीतरी चालू करू शकते.

नंतर तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव माघी. माघी मोठा होत असतानाच इतर पालकांप्रमाणेच तिलादेखील त्याला कोणता पोषण आहार दिला पाहिजे? कुठल्या आहाराने त्याची वाढ व्यवस्थित होईल? हा प्रश्न सतावू लागला.

याचे कारण म्हणजे चार वर्षाचा माघी जेवणाच्या बाबतीत अत्यंत मुडी होता. ‘हेच नको, तेच हवंय’ अशा इतर मुलांसारखेच त्यालाही हट्ट करण्याची सवय होती.

खरेतर याचे कारण म्हणजे आजकाल मुलांना बाजारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात.

तिने जेव्हा ही समस्या आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये सांगितली तेव्हा तिच्या लक्षात आले, की ही तर सगळ्याच पालकांना भेडसावणारी समस्या आहे.

थोड्या फार फरकाने मुले असाच हट्ट करतात. मग तिने विचार केला की, याच प्रश्नांशी निगडित एखादा व्यवसाय करायला काय हरकत आहे?

मग तिने अनेक पालकांशी संवाद साधला; त्यावेळेस तिच्या लक्षात आले की पालक हे मुख्यतः मुलाचा पोट भरावे याच गोष्टीकडे लक्ष देतात. जेवणातून किती पोषणमूल्य मिळते याकडे त्यांचे विशेष लक्ष नसते.

हीच कमतरता दूर करायला हवी या विचारातूनच तिच्या व्यवसायाचा जन्म झाला.

 

krupa dharmaraj lunchbox inmarathi3

 

२०१३ मध्ये माघी कुकरीज लंच बॉक्स ( MC’s Lunchbox) ही कंपनी निर्माण झाली. पहिले दोन-तीन महिने तर केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी २००० लंच बॉक्सेस चेन्नईमधील अनेक शाळांमध्ये मोफत पुरवले.

त्यानंतर थोड्याच काळात पालकांकडून आणि शाळांमधून त्यांनी मासिक आणि केवळ काही दिवसांपुरत्या देखील ऑर्डर्स स्वीकारायला सुरुवात केली.

मुलाचे वय काय आहे, त्यानुसार त्याला लंच बॉक्समध्ये कोणता आणि किती प्रमाणात आहार दिला पाहिजे हे ठरवले जाते. त्यानुसार लंच बॉक्स दिला जातो.

त्यामुळेच पालक देखील आता या संकल्पनेवर खुश आहेत. जास्तीचे अन्न लंच बॉक्समध्ये दिले जाणार नाही किंवा कमी पडणार नाही याची काळजी एम सी लंच बॉक्स घेते.

मुलांच एक असतं, की त्यांना रोजच काहीतरी नवीन आपल्या डब्यामध्ये हव असते. एम सी लंच बॉक्स त्यांची ही मागणी पूर्ण करते. कृपा स्वतः शाकाहारी असल्यामुळे तिने लंच बॉक्स देखील शाकाहारी ठेवला आहे.

तिला दाखवून द्यायचे होते, की शाकाहारी पदार्थांमध्येही खूप विविधता आणता येते.

 

krupa dharmaraj lunchbox inmarathi2

 

त्यांच्या लंच बॉक्समध्ये चायनीज, इटालियन, नॉर्थ इंडियन, साउथ इंडियन, रॅप फुड असते. ज्यामध्ये भरपूर भाज्या, फळे आणि वेगवेगळी धान्य वापरलेली असतात.

हे सगळे लंच बॉक्समध्ये इतक्या आकर्षकरीत्या मांडलेले असते, की मुले लंचबॉक्स पाहूनच खूष होतात. त्यामध्ये नक्की काय आहे याचा मुले विचार करत नाहीत. त्यांना ते आवडते, कारण ते एकदम चविष्ट असते.

त्यांच्या नकळतच त्यांना हवी ती पोषणमूल्ये लंचबॉक्स मधून मिळतात.

 पिझ्झा बनवला तरी मल्टीग्रेन पिझ्झा, पास्ता असला तरी गव्हाचा पास्ता आणि एखादा गोड पदार्थ असेल तर तो फळे आणि गूळ घालून बनवला जातो.

 

pizza inmarathi

 

कृपाकडे सध्या २६ प्रकारचे मेनू तयार आहेत. जे ती रोज डब्यात वापरत असते. याचाच अर्थ असा, की एखादा पदार्थ महिन्यातून एकदाच मुलांना खायला मिळतो.

त्यामुळेच एच एम सी लंच बॉक्सला खूप चांगली मागणी मिळत आहे.

कृपाला खरेतर आपला हा व्यवसाय फक्त मुलांपुरताच मर्यादित ठेवायचा होता. पण आता कंपन्यांनी काम करणारे कर्मचारीदेखील तिला डबा पुरवणार का अशी विचारणा करीत आहेत. म्हणूनच आता सध्या २०० लंच बॉक्सेस ती अशा लोकांना पुरवते.

आता तर एम सी लंच बॉक्सने त्यांची वेबसाईट देखील चालू केली आहे, त्यावरून ते लोकांची मते जाणून घेत असतात.

एखाद्याला जर नवीन लंच बॉक्स सर्विस चालू करायची असेल, तर एक दिवसाकरीता “ट्रायल” म्हणून मोफत लंच बॉक्स पुरवला जातो.

यांची बॉक्सची किंमत ही एका बॉक्ससाठी दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत मेनू नुसार मर्यादित असते. आता तर नाश्त्याच्या देखील ऑर्डर्स कृपाकडे येत आहेत.

 

krupa dharmaraj lunchbox inmarathi

 

आता तिच्या कंपनीने ग्रीन इनिशिएटिव्ह घेतला आहे. ज्यामध्ये ऑरगॅनिक पद्धतीने घेतलेल्या उत्पादनातून जेवण बनवले जाते. त्यामुळेच मुलांचे पालक देखील विशेषतः मुलांच्या माता निश्चिंत झाल्या आहेत.

रोज सकाळी उठून काय बनवायचं या प्रश्नातून त्यांना सुटका मिळालीच आहे, पण मुलांना जे जेवण दिले जाते ते अत्यंत हेल्दी असते याचीही खात्री आता त्या सगळ्यांना झाली आहे.

कृपा म्हणते की, पहाटे अडीच वाजता आमचे किचन चालू होते. सकाळी सहा ते सात पर्यंत आमचे डब्बे तयार असतात. पंधरा शेफ तिच्या किचनमध्ये काम करतात.

 

krupa dharmaraj lunchbox inmarathi1

 

सुरुवातीला १००० लंच बॉक्सेस दिले जायचे. पण आता त्यांची संख्या वाढली आहे. आता तिच्या कंपनीची उलाढाल ही महिन्याला ४५ लाखांपर्यंत झाली आहे.

त्याच बरोबर आता कृपा फिटनेस क्षेत्रातही काम करते आहे. सध्या बैठ्या कामामुळे बऱ्याच लोकांना स्थूलत्व येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक जेवण कमी करतात आणि निरनिराळ्या व्याधी स्वतःला जडवून घेतात.

हेच लोकांनी टाळले पाहिजे यासाठी कृपा काम करीत आहे. “केडी (कृपा धर्मराज) वर्सेस केजी (किलोग्रॅमस)” असे तिच्या नवीन प्रोजेक्टचे नाव आहे. यासाठी तिने अनेक वर्कशॉपही घेतले आहेत.

कृपाच्या म्हणण्यानुसार, “एखादी गोष्ट करायची तुमची मनापासूनची आवड आणि जिद्द असेल तर ती तुम्हाला करता येतेच. केवळ पैसा हाच उद्देश ठेवला, तर माणूस जास्त पुढे जात नाही.

पैसा कमावताना एखादे विशिष्ट ध्येय किंवा कारण समोर असेल, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. लोकही तुमच्यावर विश्वास ठेवतात.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?