Site icon InMarathi

बालपणी उपासमार सहन केल्याने आता २००० हून अधिक मुलांची भूक भागवणाऱ्या ह्या मुलाला सलाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मनुष्य हा असा समाजप्रिय प्राणी आहे जो एकत्र राहण्याला जास्त महत्त्व देतो. त्याचबरोबर इतरांबद्दल दया, करूणा इत्यादी भावना मानवाला असतात, हे आसपासच्या छोट्या मोठ्या उदाहरणांवरून आपल्याला नेहेमीच दिसून येतं.

बऱ्याच व्यक्ती आपापल्या पद्धतीने, आपल्याला जमेल त्या प्रकारे आजुबाजूच्या गरजूंना मदत करतात.

ज्या व्यक्ती प्रसिद्ध असतात त्यांनी दाखवलेल्या दयेला, त्यांनी केलेल्या मदतीला लगेचच प्रसिद्धी मिळते पण काही व्यक्ती अशा असतात ज्या पडद्यामागे राहून बरंच काही काम करतात.

आत्ताचंच उदाहरण घ्या ना! ह्या कोरोना रोगाच्या संकटात आपापल्या परीने खूप लोकांनी मदत केली.

 

telangana.com

 

त्यातल्या रतन टाटा वगैरे लोकांनी खरंच खूप मोलाची मदत केली, काहींनी आपली घरे देखील कोविड सेंटर म्हणून दिली, सामान्य माणसांनी देखील आपापल्या परीने मदत केली. ह्यात प्रसिद्ध व्यक्तींनी केलेल्य मदतीचं सर्व स्तरांतून कौतुक झालं जे योग्यच होतं!

पण, काही अशाही व्यक्ती आहेत ज्यांनी केलेल्या कामाची कुठेच वाच्यता झाली नाही पण, योग्य ठिकाणी योग्य वेळी मदत पोहोचली.

अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांनी आयुष्यात खूप काही सोसलं आहे, खूप संघर्ष केला आहे आणि ह्यातून त्या बरंच काही शिकल्या आणि समाजासाठी काही तरी करायचं, आपल्याला जे भोगायला लागलं ते इतरांना भोगावं लागू नये म्हणून त्यांच्या परीने ते जेव्हढं होईल तेव्हढं ते करण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात.

आज अशाच एका व्यक्तीची गोष्ट इकडे आपण बघणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव मल्लेश्वर राव आहे आणि ते हैदराबादमधे राहतात. निज़ामाबाद मधे जन्मलेल्या २६ वर्षीय मल्लेश्वर राव ह्यांची कहाणी खूपच हृदयद्रावक आहे.

त्यांच्या कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होतं, त्यामुळे लहानपणीच परिस्थितीची जाणीव झालेल्या राव ह्यांना आपण काम करायला हवं ह्याची कल्पना आली.

ते हैदराबादला आले आणि वयाच्या ५ व्या वर्षी त्यांनी बांधकामाला सुरुवात केली, ज्याला बालमजुरी म्हणता येईल. हैदराबाद आणि आसपासच्या परिसरात ह्यांनी बांधकामाच्या साईटस् वर काम करण्यास सुरुवात केली.

 

thebetterindia.com

 

बरेच दिवस उपाशी राहावे लागत असे त्यांना! राहायला जागा नसल्या मुळे त्यांना रेल्वे प्लॅटफॉर्म वरच झोपावे लागत असे.

काही काळाने हेमलता लावणम ह्यांनी मल्लेश्वर ह्यांना पाहिलं आणि मल्लेश्वर ह्यांनी खाजगी वृत्तपत्राला दिलेल्या माहिती नुसार हेमलता ह्यांनी मल्लेश्वर ह्यांना अक्षरशः रस्त्यावरून उचलून आणलं आणि त्याचं संगोपन केलं.

हेमलता आणि त्यांच्या पतींनी स्थापन केलेल्या संस्कार आश्रम विद्यालय मध्ये त्यांचं शिक्षण झालं, हेमलता ह्यांच्या देखरेखीखाली राव ह्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली.

हेमलता ह्यांनी स्थापन केलेल्या ह्या शाळेत अनेक प्रकारची वंचित, गरीब मुले शिकतात. समाजाने नाकारलेल्या किंवा दुय्यम म्हणून गणलेल्या, देवदासींची, गरीबांची ज्यांची हालाखीची परिस्थिती आहे अशा लोकांची मुले तिकडे राव ह्यांच्या बरोबर शिकायला होती.

त्यांची परिस्थिती राव ह्यांच्या लक्षात आली. त्यांच्या आवडीचा विषय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना होते. शाळेच्या वातावरणामुळे राव ह्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणला.

आपलं आयुष्य अर्थपूर्ण व्हावं, गरिबांच्या कल्याणासाठी काही तरी करायचं, समाजासाठी काही तरी करायचं हे त्यांनी लहानपणीच मनाशी पक्कं ठरवलं होतं.

शाळा झाल्यानंतर राव ह्यांनी संस्थेमधल्या टी.बी. पेशंटस् साठी काम करण्यास सुरुवात केली. राव हे तिथल्या पेशंटस् ची काळजी घ्यायचे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला थोडासा आर्थिक हातभार लागला. ह्या कामामुळे त्यांची अर्थिक परिस्थिती स्थिर झाली.

 

scoopwhoop.com

 

काही काळ आश्रमात टी.बी. पेशंटस् साठी काम केल्यानंतर मल्लेश्वर ह्यांनी केटरिंगच्या व्यवसायात नोकरी करायला सुरुवात केली. तिकडे काम करताना त्यांनी वाया जाणारे अन्न पाहिले.

लग्न आणि इतर समारंभात मोठ्या प्रमाणावर वाया जाणारे अन्न पाहिले तेव्हा त्यांना उपाशी पोटी रेल्वे प्लॅटफॉर्म वर झोपल्याचे आठवत असे.

मल्लेश्वर ह्यांच्या कडे अन्न विकत घेण्यासाठी देखील पैसे नसत ही आठवण त्यांच्या मनात ताजी होती, त्यामुळे, त्यांना अन्न वाया जाणे पटत नसे.

आता इतर लोकांची गरिबी त्यांना पाहवत नसे. वाया जाणारे अन्न त्यांनी ह्या गोर-गरिबांना वाटायला सुरुवात केली.

ह्यातूनच इ.स. २०१२ मधे ‘Don’t waste food’ नावाची संस्था स्थापन झाली.

सुरुवातीला राव आपल्या मित्रांसोबत आसपासचे कार्यक्रम कोठे आहेत ह्याची माहिती काढत व तिथे उरलेले, वाया जाणारे अन्न गोळा करत आणि ते अन्न गरिबांमध्ये वाटले जाई.

सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणावर सुरू झालेले काम हळूहळू वाढू लागले. छोट्या कामाचे एका चळवळीत रूपांतर झाले. छोट्याश्या रोपट्याचे आता वृक्षात रूपांतर होऊ लागले.

 

indianf.com

 

सुरुवातीला राव स्वतः सगळीकडे अन्न कोठे उरणार आहे ह्याचा शोध घेत असत पण, आता सोशल मिडिया मुळे हे काम खूप सोपे झाले आहे.

राव ह्यांचा फ़ेसबुक वर एक ग्रुप आहे ज्यामुळे त्यांना आसपासच्या कार्यक्रमांची माहिती मिळते, काही लोकं स्वतः हून राव ह्यांना फोन करतात आणि अन्न देतात.

रेस्टॉरेंटस्, होटेल्स्, प्राइव्हेट इव्हेंटस्, फंक्शन्स् आणि पार्टीज् मधून लोकांचे फोन राव ह्यांना येतात आणि उरलेले, जास्तीचे अन्न त्यांना देतात आणि मल्लेश्वर ते अन्न गरीब मुलांना देतात.

विविध स्वयंसेवकांच्या मदतीने आता तिथल्या जवळपास २००० गरिब लोकांना दररोज अन्नाचे वाटप केले जाते.

शनिवार आणि रविवारी तिथल्या I.T. कंपनीमधले कर्मचारी ह्या कामात मल्लेश्वर ह्यांना मदत करण्यास येतात, ह्याशिवाय सोशल मिडिया मुळे आता ही चळवळ दिल्ली, रोहतक तसेच डेहराडून ह्यासारख्या शहरांमध्ये पसरली आहे.

आणि आता सुमारे १०,००० गरिब लोकांना ह्या ‘Don’t waste food’ संस्थेद्वारे अन्न दिले जाते, जे खरंच खूपच कौतुकास्पद आहे.

 

zeenews.india.com

 

अर्थातच त्यांच्या ह्या कामाची दखल सरकार दरबारी देखील घेतली गेली आहे.

२६ वर्षीय मल्लेश्वर राव ह्यांना आत्तापर्यंत २६ च्या वर पुरस्कार देण्यात आले आहे ज्यात इ.स. २०१८ मध्ये ‘Youth Icon Award’ आणि इ.स. २०१९ मधे ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ ह्यांचा समावेश आहे.

खरंच मल्लेश्वर राव ह्यांच्या ह्या गोष्टीवरून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे.

आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणतीही कटूता मनात न ठेवता जर योग्य मार्ग निवडण्यासाठी बरोबर ती दिशा मिळाली तर, केवळ स्वतःचीच प्रगती नाही होत तर आपण समाजासाठी देखील काही करू शकतो, आपल्या जगण्याला खरा अर्थ मिळतो.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version