संपूर्ण आशियाखंडात आपलं नाव गाजवणाऱ्या या गावाकडून आपण सर्वांनी शिकायला हवं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतातील लोकसंख्येची आपल्या सर्वांना चांगलीच कल्पना आहे. भारतातील लोकसंख्येमुळे भारतासमोरील प्रश्न प्रचंड प्रमाणात वाढतात, लोकसंख्या भरपूर प्रमाणात असल्यामुळे भारतात कचरा देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतो अर्थात त्यासाठी नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात कचरा जरी आढळत असला तरी एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की आशियातील सर्वात स्वच्छ गाव चक्क आपल्या भारतात आहे चला तर मग जाणून घेऊया या गावाबद्दल!
भारतामध्ये स्वच्छते बद्दल प्रबोधन करण्यासाठी अनेक प्रकारचे हातखंडे वापरण्यात आलेले आहेत. आपल्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत स्वच्छ गावांना पुरस्कार देखील देण्यात येतो.
एवढे प्रयत्न केल्यानंतर आत्ता कुठे या प्रयत्नांना यश येत असल्याचे पहायला मिळत आहे. परंतु मेघालयात वसलेलं मावलिंनोग नावाचं हे गाव जणू “देवाची बागच” आहे असं वाटेल एवढं सुंदर आणि स्वच्छ आहे.
या गावाला देवाची बाग म्हणण्यामागे कारण देखील तसेच आहे मित्रांनो हेच ते गाव आहे जे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं. २००३ मध्ये या गावाला ही ओळख देण्यात आली.
सर्व गावकऱ्यांनी मिळून घेतलेल्या दक्षतेमुळे या गावाला ही ओळख मिळवण्यात मदत झाली आहे.
फक्त स्वच्छताच नव्हे तर या गावात शंभर टक्के साक्षरता असून, महिलांना या गावात कसल्याही प्रकारची बंधन नाही त्यामुळेच हे गाव सर्वसामान्यांना पर्यटनासाठी नेहमीच साद घालतं .
अत्यंत सुंदर निसर्ग आणि स्वच्छतेमुळे तुम्हाला इथे नेहमी चक्कर मारायला आवडेल. भारताच्या ईशान्य राज्यांमधील पाऊस तसा सर्वश्रुत आहे परंतु मेघालयात पावसाळा हा खरंच आनंददायी असतो.
संपूर्ण परिसर हा निसर्गाच्या हिरवळीने सुशोभित झालेला असतो, सभोवताली तुम्हाला मनमोहक पोपटी रंगाचे गवत अनुभवायला मिळतं.
पावसाळ्यात जर तुम्ही मावलिंनोंग या गावात गेलात तर असं वाटेल जणू तुम्ही एखाद्या सुंदर अशा कल्पनाचित्र मध्ये विहार करत आहात.
श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात विविध प्रकारचे सण आणि उत्सव साजरे केले जातात. या भागांमध्ये देखील या काळात अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात.
या उत्सवांमध्ये तुम्हाला येथील पारंपरिक संस्कृती बघायला मिळते म्हणूनच जर तुम्हाला हे गाव बघायची इच्छा असेल तर तुम्ही जुलै ते डिसेंबर या काळात या गावांमध्ये चक्कर नक्कीच मारायला हवी.
या गावाला जाण्यासाठी तुम्हाला शिलॉंग किंवा चेरापूंजी वरून बस मिळते जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर इथे सर्वात जवळचे एअरपोर्ट शिलॉंग येथे आहे.
शिलॉंग पासुन हे गाव केवळ ७८ किलोमीटर एवढं दूर आहे. तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही गुवाहटी मार्गे देखील प्रवास करू शकता.
आशियातील या सर्वात स्वच्छ गावाबद्दल तुम्हाला माहिती असाव्यात अशा काही गोष्टी आम्ही खाली देत आहोत.
स्वच्छता :
अर्थातच जर हे गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध असेल तर या गावातील स्वच्छता नक्कीच पाहायला हवी. या गावातील लोक आपलं गाव कशा पद्धतीने स्वच्छ ठेवतात हे देखील नक्कीच अभ्यासायला हवं.
या गावातील लोकांच्या मते स्वच्छता ही त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. २००७ पासूनच या गावातील प्रत्येक घरात शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्यासोबतच या गावातील प्रत्येक घरात तुम्हाला बांबू पासून तयार करण्यात आलेल्या कचरापेटी दिसून येईल. सर्व प्रकारचा कचरा त्यासोबतच वाळलेली पाने देखील या कचरापेटीत टाकली जातात.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या गावात प्लास्टिकचा वापर आणि धूम्रपान या दोन गोष्टींवर कडक बंदी आहे, आणि ज्या व्यक्ती या नियमांचा भंग करतील त्यांच्याकडून मोठा दंड आकारण्यात येतो.
या गावात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू देखील तयार केल्या जातात ज्यामुळे कचऱ्याचा देखील योग्य पद्धतीने वापर केला जातो. या गावातील प्रत्येक व्यक्ती गावाच्या स्वच्छतेत आपला हातभार लावते.
या गावातील लोकं गावचा रस्ता स्वच्छ करतातच पण त्यासोबतच दरवर्षी सामूहिक वृक्षारोपण देखील करतात आणि आपल्या घराची देखील योग्य पद्धतीने स्वच्छता करून गावाला स्वच्छ ठेवण्यात हातभार लावतात.
येथील या मूल्यांमुळे आणि स्वच्छतेमुळे युनेस्को या जागतिक संघटनेने या गावाला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यामुळेच येथे दरवर्षी हजारो पर्यटक प्रवास करतात.
या गावात अनोख्या पद्धतीचे पुल तयार केले जातात, हे पुल लाकडाच्या आणि रबराच्या झाडाच्या साह्याने तयार केलेले असतात. याच्यामध्ये कुठेही लोखंड किंवा इतर गोष्टी वापरल्या जात नाहीत.
अगदी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले असताना देखील हा एक पूल एका वेळी किमान ७० व्यक्तींच वजन नक्कीच सांभाळू शकतात.
या गावात आल्यानंतर तुम्हाला एवढं निरभ्र आकाश बघायला मिळेल की तुम्ही थक्क व्हाल प्रदूषण कमी असल्यामुळे तुम्हाला येथील वातावरण सोबतच येथील आकाश देखील नेहमीच गवसणी घालत राहील.
या आकाशाची आणि गावाची टेहळणी करण्यासाठी गावकऱ्यांनी बांबूच्या साह्याने एक टॉवर तयार केलेलं आहे, या टॉवरची उंची जवळपास ८५ फूट एवढी आहे.
हे गाव बांगलादेश बॉर्डर जवळ असल्यामुळे तुम्हाला त्या टॉवरवर चढल्यानंतर बांगलादेश सुद्धा सहज दिसू शकतो.
या गावात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला केवळ दहा रुपये प्रति माणसे खर्च येतो आणि या दहा रुपयांच्या बदल्यात तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच अनुभवायला मिळेल.
आदिवासी जमात :
या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात येथील आदिवासी जमातच वास्तव्य करते, “खासी” असं या जमातिचं नाव आहे आणि या गावाचं हे देखील एक आकर्षण आहे. ही आदिवासी जमात पूर्वीपासूनच आपल्या राष्ट्रभक्तीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
या गावातील लहान मुलं आपल्या वडिलांचं नाही तर आपल्या आईच आडनाव लावतात त्यामुळेच भारतीय संस्कृतीत असणाऱ्या मूल्यांची जपणूक या गावात चांगल्या पद्धतीनं होत असल्याचं आपल्याला नक्कीच आढळून येईल.
आणि असं करण्याला आजपर्यंत या गावातील एकाही स्थानिक पुरुषाने विरोध दर्शवला नाही.
खाद्यपदार्थ :
या भागात तुम्हाला येथील पारंपरिक खाद्य पदार्थ चाखायला मिळतील, या पदार्थांची चव तुम्हाला नक्कीच आवडेल.
या गावात गेल्यानंतर तुम्हाला अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर अशा भाज्या चाखायला मिळतील. येथे ऑरगॅनिक पद्धतीने भाज्यांची शेती केली जाते त्यामुळे शेतातील ताज्या घेतलेल्या भाज्यांची चव कशी आहे हे तुम्हाला या गावात जाऊन अनुभवायला मिळेल.
अगदी मांसाहारी जेवण जरी करायचं असेल तरी इथे घरगुती पाळलेल्या प्राण्यांच मांस तुम्हाला खायला मिळेल.
इथे पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणारे अनेक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तुम्हाला अनुभवायला मिळतील.
तर अशा ह्या अद्भुत गावाबद्दल तुम्हालाही माहीत नव्हतं ना? आता हा लॉकडाऊन संपला की एकदा ह्या गावाला अवश्य भेट द्या आणि खूप चांगल्या गोष्टी शिकून घ्या!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.