' ६ महिन्यात कंपोस्टमध्ये बदलणारे कपडे विकणारा फॅशन ब्रँड… – InMarathi

६ महिन्यात कंपोस्टमध्ये बदलणारे कपडे विकणारा फॅशन ब्रँड…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही कधी विचार केलाय का, की आपण वापरत असलेल्या कपड्यांचे शेवटी काय होते?

वापरून झाल्यावर आपण कपडे जुन्या कपडेवाल्यांना देऊन टाकतो, कधी इतर गोरगरीबांना देतो. परंतु ते लोक देखील हे कपडे वापरल्यानंतर कुठे ना कुठे टाकतच असतील.

त्या कपड्यांचे, त्यांच्या अवशेषांचे पुढे काय होते? त्याचा पर्यावरणावर काही परीणाम होतो का? ते कपडे पूर्णपणे विघटन होणारे असतात का? याचा विचार कधीतरी तुमच्याही मनात येतच असेल ना?

कारण आजकाल जे कपडे आपण वापरतो, त्यात कृत्रिम पॉलिएस्टर यार्न अधिक असतं. पूर्वी कपडे फक्त सुती असायचे. नंतर यात नायलॉन, पॉलिएस्टर, कृत्रिम सिल्क इत्यादी प्रकार येत गेले.

 

stinky-clothes-inmarathi04
wikihow.it

 

सुती कपडे कापसापासून बनलेले असल्याने ते मातीत मिसळून जायचे आणि त्यांची माती बनत असे. पण कृत्रिम यार्न वगैरेचं काय? आणि असे कपडे कितीतरी मोठ्या प्रमाणावर तयार होत असतात.

पूर्वीचे सुती कपडे लवकर विरत, फाटत. त्याच्या चिंध्या होत. परंतु आता हे कृत्रिम धाग्यांपासून आणि रासायनिक रंगांपासून तयार झालेले कपडे लवकर विरतही नाहीत.

वर्षानुवर्षे वापरले तरी ते तसेच्या तसे राहताना दिसतात. ना त्यांचे रंग उतरतात, ना ते विरतात. याचाच अर्थ या कपड्यांचं पर्यावरणात विघटनही तितकंच कठीण असणार.

शिवाय हे कपडे अतिशय स्वस्त असतात. हे तयार करताना त्या कारखान्यातील कामगारांना त्याचा पुरेसा मोबदलाही मिळत नाही.

उद्योजक असलेल्या हितेशा देशपांडे आणि हिमांशु कुलहारी या दोघांना देखील हाच प्रश्न पडला आणि त्यांनी आपला स्वतःचा कपड्यांचा ब्रॅन्ड तयार केला.

 

compostable cloths couple inmarathi2
thebetterindia.com

 

त्या दोघीही पर्यावरण आणि प्राणीप्रेमी असल्याने त्यांनी प्राण्यांची थीम असलेल्या कपड्यांचा ब्रॅन्ड तयार करण्यासाठी या इंडस्ट्रीचा अभ्यास करायला सुरूवात केली.

हा अभ्यास करताना त्यांना वरील गोष्टी लक्षात आल्या. शिवाय हे कपडे तयार करत असताना खूप पाण्याची नासाडीही होते. रासायनिक रंग, कृत्रिम धागे या सगळ्यांमुळे अशा कपड्यांचे विघटनही होत नाही.

दरवर्षी जवळपास २१ बिलिअन टन्स वजनाचे कपडे विविध बांधकामाच्या वेळी जमिनीत भर म्हणून टाकले जातात.

असे कपडे फॅशन भराभर बदलत असल्याने मोठ्या प्रमाणात बांगला देश, भारत इत्यादीसारख्या विकसनशील राष्ट्रांमधून तयार करवून घेतले जातात. कारण इथं मजूरी फार कमी द्यावी लागते.

म्हणजेच हे कपडे तयार करण्यासाठी कष्ट घेणाऱ्या मजुरांना योग्य मोबदलाही मिळत नाही.

 

विघटनशील कपडे –

 

compostable cloths couple inmarathi1
thebetterindia.com

 

या सगळ्याचा विचार करून या दोघींनी नैसर्गिक कपडे बनवण्यावर भर दिला. त्यासाठी सुंदरबनमधील विणकरांकडून कपडा मागवून त्याचे सुंदर कपडे तयार केले. हे विणकर नैसर्गिक धागे आणि रेशीम वापरून कपडा तयार करतात.

याशिवाय हे कपडे कोणत्याही कृत्रिम, रासायनिक रंगामध्ये रंगवलेले नसतात. किंबहुना ते रंगवलेलेच नसतात. ते फक्त पांढऱ्या कपड्यांतूनच बनवले जातात.

हितेशा म्हणते, अजून तरी नैसर्गिक पक्क्या रंगात रंगवण्याची कला आम्हाला कळलेली नाही.

 

compostable cloths couple inmarathi
yourstory.com

 

मात्र हे कपडे बनवताना त्याचा प्रत्येक भाग विघटन होईल असाच असण्यावर या दोघांनी भर दिलाय. या कपड्यांतील बटने ही अक्रोडसारख्या फळांच्या कवचांपासून बनवलेली आहेत.

हे कपडे वापरून झाल्यावर तुम्ही जस्ट कुठेही खड्डा खणून त्यात ते टाकून दिलेत, तर १८० दिवसांत त्यांचे विघटन होते.

 

नैसर्गिक धागे आणि इतर सामान –

 

compostable cloths couple inmarathi4
thebetterindia.com

 

त्यांच्या या नैसर्गिक कपड्यांना युएस, युके, दुबई, नॉर्वे आणि काही प्रमाणात भारतातूनही मागणी आहे. त्या या कपड्यांचे पॅकींग देखील नैसर्गिक साधनांद्वारे करतात. त्यामुळे ते पॅकींगही पर्यावरणहितकारी असते.

बेसिल, मेरीगोल्ड, लव्हेन्डर इत्यादीसारख्या वनस्पतींपासून बनलेल्या पेपरबॅगेत हे कपडे लपेटून पाठवले जातात. त्यांच्या ब्रॅन्डचे नाव आहे PECKD.

या कपड्यांमध्ये कुठेही रबर इलॅस्टीक, किंवा धातूंच्या झिपचा वापर केला जात नाही.

त्यामुळे कुठेही झिप किंवा इलॅस्टीक नसलेले डिझाईन्स तयार करून कपडे तयार करणे हे आव्हानात्मक काम होते. त्यांचा स्टुडिओ गुरूग्राम इथे आहे.

तिथे त्यांनी मास्टर टेलर्स आणि डिझाईनयर ठेवलेले आहेत. ‘डेल्टा अँड डाऊन’ या नावाने त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये आपल्या कपड्यांचे कलेक्शन बाजारात आणले होते.

त्या दोघांनी आपल्या कपड्यांच्या प्रत्येक कलेक्शनचे नाव देशी प्राण्यांच्या प्रजातींवर ठेवायचे ठरवले होते.

त्याप्रमाणे या कलेक्शनचे नाव व्हेल माशाच्या नावावरून ठेवले होते. यांतून त्यांचे केवळ पर्यावरणप्रेम नव्हे, तर प्राणीप्रेमही अधोरेखित होत होते.

पर्यावरणप्रेमी लोकांची त्यांच्या कपड्यांना मागणी असते. असे जागरुक लोकच त्यांची गिऱ्हाईके आहेत. हे कापड नैसर्गिक असल्याने ते शरीराला पण आरामदायी आणि मऊ वाटते.

त्यांना आपण एक नैतिक व्यवसाय करतो याचे समाधान आहे.

 

अडचणी-

 

compostable cloths couple inmarathi3
thebetterindia.com

 

अर्थात आता हा ब्रॅन्ड जम बसवत चालला असला, तरी सुरूवातीला त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं.

सुरुवातीला लोकांना विघटन होणारे कपडे म्हणजे काय तेच कळत नव्हतं. लोक विचारत, की काही दिवस वापरल्यानंतर हा कपडा विघटन होऊन जाईल का? त्या सगळ्यांना विघटनशील कपडे म्हणजे काय ते समजावून सांगावं लागत होतं.

दुसरी अडचण होती ती कपड्यांची किंमत. अजून अशा कपड्यांना जास्त डिमान्ड नसल्याने त्यांची किंमत कमी ठेवणे शक्य नव्हते. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील त्याचा परीणाम झालेला आहे.

ते सध्या त्यांच्या नवीन कलेक्शनच्या तयारीत आहेत. त्याचे नाव आहे ‘फ्रिल्ड ड्रॅगन’.  ही एका ऑस्ट्रेलियात सापडणाऱ्या पालीची जात आहे.

ते आता नैसर्गिक रंगात कपडे कसे रंगवता येतील आणि रंगीत करता येतील याच्या प्रयोगात आहेत.

आधुनिक फॅशनचे कपडे असावेत, पण ते नैसर्गिकरित्या बनवलेले असावेत असे त्या दोघांना वाटते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

हे वाचून तुम्हालाही वाटले असेल ना, कपडे घालावेत तर नैसर्गिकच म्हणून…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?