गाडी-बंगला, २ करोड पगाराची परदेशी नोकरी, नाकारणाऱ्या “प्रताप” ची यशोगाथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
विकी कौशल, यामी गौतमी यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट उरी-द सर्जिकल स्ट्राईक आठवतोय?
ज्यात डीआरडीओच्या रिसर्च सेंटर मध्ये एक मुलगा गरुड उडवत असतो. बसल्या बसल्या तिथे उपलब्ध असलेल्या गोष्टी पासून ते त्याने बनवलेलं असतं.
एक उडणारा रोबोट कम ड्रोन जो नंतर स्ट्राईक च्या वेळेस लागणारी माहिती कव्हर करण्यासाठी वापरला गेला.
हीच घटना सत्यात उतरली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ती ड्रोन बनवण्याची!
मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीने एका २१ वर्षीय तरुणाची डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ मध्ये वर्णी लागल्याची बातमी आली होती.
परदेशातील रग्गड पॅकेजची नोकरी त्याने यासाठी सोडून दिली अशी सुद्धा बातमी होती, पण पुढे या बातमीचा पिच्छा पुरवल्यानंतर ही शिफारशीची बातमी खोटी असल्याचे दिसून आले होते.
परदेशी नोकरीच्या बाबत मात्र सत्यता असल्याचे आढळून आले होते.
तर, याच तरुणाबद्दल आज आपण वाचणार आहोत.
कर्नाटक स्थित २१ वर्षीय एम.प्रताप हा सध्या कर्नाटकमध्येच एका स्टार्टअप कंपनी मध्ये काम करतो. याचा प्रवास चित्रपटाच्या कथेपेक्षा काही वेगळा नाही.
फेकलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून अर्थात “इ वेस्ट” पासून जुगाड करून ड्रोन बनवण्यात प्रताप याचा हातखंडा!
वयाच्या १४ व्या वर्षी ड्रोन म्हणजे नेमकं काय कळल्यावर त्यावर माहिती गोळा करून प्रताप ड्रोन वर काम करू लागला. ड्रोन बनवण्यापासून, रिपेअरिंग ते ड्रोन चालवण्यापर्यंत हळूहळू सर्व त्याने सुरू केलं.
वयाच्या १६ व्या वर्षी त्याने पहिला ड्रोन बनवला. हा ड्रोन उडण्यासोबत फोटो घेण्यात सुद्धा सक्षम होता.
बेकार पडून राहिलेल्या आणि टाकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून अर्थात इ वेस्ट पासून बनवलेला हा त्याचा पहिला ड्रोन.
नवीन शिकण्याची इच्छा आणि जिज्ञासा यामुळे हे सर्व शक्य झालं असे प्रताप म्हणतो.
प्रतापने आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट वर नजर टाकल्यावर त्याची एकूण क्षमता कळून येईल.
त्याने केलेले महत्त्वाचे प्रोजेक्ट पुढील प्रमाणे :
बॉर्डर सिक्युरिटीसाठी टेलिग्राफी ड्रोन
रस्ते-हायवे साठी ट्रॅफिक मॉनिटरिंग ड्रोन
ऑटो पायलट ड्रोन, इत्यादी
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कर्नाटकात जेव्हा पूर आला होता तेव्हा रेस्क्यू ऑपरेशन, मदत कार्य यासाठी प्रतापच्याचं ड्रोनची मदत घेतली गेली होती.
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गोष्ट ही हॅक होऊ शकते. याचं भान ठेवून प्रतापने आपल्या ड्रोन ला हॅकिंग पासून वाचवण्यासाठी क्रिप्टोग्राफीवर पण काम केलं आहे.
ड्रोन वर इतर कोणत्या सायबर पद्धतीने छेडछाड केली जाऊ नये असा त्याचा प्रयत्न आहे.
आयआयटी दिल्ली येथे झालेल्या ड्रोन डिझाईन स्पर्धेत प्रताप रनर अप होता.
आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पो २०१८ मध्ये प्रतापला अल्बर्ट आइन्स्टाइन इनोव्हेशन गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.
प्रतापला आतापर्यंत ८७ देशांमधल्या विविध कंपन्यांकडून जॉब ऑफर्स आल्या आहेत. ज्यामध्ये फ्रांस मधून आलेल्या ऑफर ही विशेष चर्चा होते. तर ऑफर अशी होती,
१६ लाख मासिक पगार, ५ बीएचके फ्लॅट आणि करोडो किंमत असलेली गाडी. एकूणच ऐषोआराम असलेलं जगणं.
पण या सगळ्याला नकार देऊन त्याने भारतातच सेटअप सुरू करण्याचा निर्णय घेतला.
प्रतापचा आपण इथपर्यंतचा प्रवास थोडक्यात पाहू.
शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या प्रतापचं कुटुंब तसं सामान्यच.
बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या इलेक्ट्रॉनिकच्या आवडीमुळे इंजिनीअर व्हायचा त्याचा मानस होता. परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे फिजिक्स मध्ये त्याने बीएस.सी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं.
एक वेळ तर अशी आली होती, की हॉस्टेल फी न भरल्यामुळे त्याला हॉस्टेल मधून काढून टाकण्यात आले होते.
स्वतःच्या हिमतीवर तो सी, सी++, कोअर जावा, पायथन सारख्या संगणकीय प्रोग्रामिंग लँग्वेज शिकला. ज्याचा त्याला ड्रोन बनवण्यात खूप फायदा झाला.
त्याने इ वेस्ट च्या माध्यमातून आपला पहिला ड्रोन बनवला हे आपण पाहिलं. पण तोच ड्रोन ८१व्या प्रयत्नात तयार झाला हे सुद्धा विशेष.
आयआयटी दिल्ली मधल्या स्पर्धेतली कामगिरी पाहता त्याला जपानमध्ये भरवल्या गेलेल्या स्पर्धेत भाग घेण्याचे आमंत्रण मिळाले.
जपानला जाऊन स्पर्धा अटेंड करण्यासाठी कमीतकमी ६०,००० रुपयांची त्याला गरज होती.
म्हैसूरच्या एका संस्थेने त्याच्या फ्लाईट तिकीटचा खर्च उचलला, तर इतर खर्चासाठी त्याला आईचं मंगळसूत्र विकावं लागलं.
जेव्हा प्रताप जपान मध्ये लँड झाला तेव्हा त्याच्या खिशात फक्त १४०० रुपये होते.
स्पर्धा ठिकाणी पोहोचण्यासाठी बुलेट ट्रेनचा सोयीस्कर मार्ग होता. पण जवळ असलेले पैसे पाहता बुलेट ट्रेन परवडणारी नव्हती.
शेवटी स्पर्धेत भाग घ्यायचा या इच्छेपोटी त्याने १६ वेगवेगळ्या गाड्या बदलून आणि ८ किलो मीटर चालून आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचला.
जपानच्या त्या स्पर्धेत जवळपास १२७ देशांचे प्रतिनिधी सामील झाले होते.
अंतिम दिवशी निकाल जाहीर करण्यात आला. २०० नाव जाहीर झाली. त्यात प्रतापचं नाव नव्हतं. टॉप १० सुरू झाले. क्रमांक ३ पर्यंत प्रताप कुठेच नव्हता.
प्रताप मागे फिरून आपलं सामान बांधणार तेवढ्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भारताच्या एन.प्रताप याला जाहीर होत आहे, हे ऐकल्यावर त्याचा स्वतः वर विश्वास होत नव्हता.
अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज खाली द्वितीय क्रमांकावर येऊन भारताचा तिरंगा पहिल्या स्थानावर येताना त्याने पाहिलं.आणि एकच जोराची आरोळी त्याने दिली. हा त्याचा विजयाचा जल्लोष होता.
अन जपान पर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास भराभर त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला.
प्रतापने आतापर्यंत जवळपास ६०० ड्रोन्स बनवले आहेत. जे सामान्य गोष्टी पासून थेट सिक्युरिटी साठी सुद्धा वापरले जातात.
एकूणच प्रतापचा हा संशोधन क्षेत्रातील प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.