Site icon InMarathi

वाचा – एका मराठी उद्योजकाने हजारो पोस्टकार्डांनी घडवलेला क्रांतिकारक बदल!

Pradeep Lokhande Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“प्रदीप लोखंडे, पुणे, महाराष्ट्र” केवळ इतकंच नाव आणि पत्ता असलेले पोस्टकार्ड जर त्या व्यक्तीला बरोबर पोहोचत असेल तर, अशा व्यक्तीला काय म्हणतात?

कारण दररोज या नावावर शेकडो पोस्टकार्ड येत असतात. एकतर टेलिफोनचे युग सुरू झाले आणि पोस्ट कार्डचा वापर कमी झाला. त्यानंतर आलेल्या मोबाईलने तर पोस्टकार्डला निरुपयोगीच ठरवले.

पोस्ट ऑफिसची अवस्था दयनीय झाली. अशा काळात एखाद्या माणसाला इतकी पोस्टकार्ड येत असतील तर त्या माणसाला “पोस्टकार्ड मॅन” असंच म्हटलं जाईल.

असा एक पोस्टकार्ड मॅन आपल्या भारतात, महाराष्ट्रात आहे त्यांचं नाव प्रदीप लोखंडे. ते पुण्यात राहतात. भारतातील खेडी आणि शहरे यांच्यातील सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी पोस्ट कार्डचा वापर केला.

 

newindianexpress.com

 

आणि अजूनही ते त्याचा वापर करीत आहेत. आता प्रश्न पडेल की खेडी आणि शहरे यांच्यामधील संवाद का आणि कशासाठी साधला जातो?

त्याच कारण म्हणजे महाराष्ट्रातील ३०५५ खेड्यांमधल्या लायब्ररीज प्रदीप लोखंडे यांच्या मदतीने सुरु करण्यात आल्या.

त्यांनी त्यांची ही चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न करता संपूर्ण देशभरातही काही राज्यांमध्ये चालू केली आहे. आणि त्यासंदर्भातली पोस्टकार्ड त्यांना येत राहतात.

आता असेही वाटेल की इतक्या लायब्ररीज त्यांनी चालू केल्या म्हणजे नक्कीच ते खूप श्रीमंत असतील. पण ते तसं नाहीये ते एक सामान्य नागरिक आहेत.

आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका मल्टिनॅशनल कंपनीत त्यांना नोकरीही मिळाली. तिथे काही काळ घालवल्यानंतर त्यांना या चळवळीकडे लक्ष द्यावं असं वाटलं.

 

dnaindia.com

 

याचं कारण म्हणजे २०१० मध्ये असं म्हटलं जात होतं की, लोकांची वाचनाची आवड कमी होत आहे. आणि थोड्याच दिवसात वाचन करणे लोकांना आवडणारच नाही असंही म्हटलं जात होतं.

एका अर्थाने म्हणाल तर ही परिस्थिती गंभीर आहे. कारण वाचनामुळे माणूस शिकतो त्याला अनेक विषयांची माहिती होते आणि केवळ त्या पुरतीच ती मर्यादित न राहता त्या माहितीबरोबरच माणूस विचार करायला शिकतो.

वाचन थांबलं म्हणजेच विचार प्रक्रिया ही थांबेल. पुस्तकांमधूनच तर ज्ञान मिळतं. म्हणजेच ‘वाचाल तर वाचाल’ हे किती खरे आहे. म्हणजेच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे किती गरजेचे आहे याची त्यांना जाणीव झाली.

म्हणूनच कदाचित त्यांनी त्यांच्या चळवळीला नाव दिलं “ग्यान की”. म्हणजेच ज्ञानाची चावी.

शहरांमधील मुलांना पुस्तकं, पुस्तकांच्या दुकानातून, लायब्ररीमधून वाचायला मिळतात. मात्र खेड्यांमधील मुलांना ही सोय उपलब्ध नसते.

आणि तिथली मुलं शिकली वाचली तरच भारत सुसंस्कृत होईल याची जाणीव प्रदीप लोखंडे यांना झाली. त्यासाठी काय करता येईल यासाठी त्यांचा विचार सुरू झाला.

त्यासाठी मग त्यांनी महाराष्ट्रातील सगळे जिल्हे, तालुके त्यामधील खेडी पिंजून काढली आणि त्या भागामध्ये मुलांना कोणत्या प्रकारची पुस्तक वाचायला आवडेल याचा एक कल त्यांनी घेतला.

 

youtube,com

 

त्यांच्या लक्षात आलं की मुलांना वाचायचं आहे परंतु पुस्तक नाही. मग हीच कमी दूर करायचं त्यांनी ठरवलं.

आता ती पुस्तके त्या मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांनी लोकांना पुस्तकं देण्याचं आवाहन केलं. त्यांनी असं नाही सांगितलं की मला यासाठी पैसे हवेत.

त्यासाठी त्यांनी पुस्तकांची मागणी केली. अगदी वापरलेली असतील तरी चालेल असं सांगितलं. मग हळूहळू लोकांनी त्यांना पुस्तक द्यायला सुरुवात केली.

ही पुस्तकं प्रदीप लोखंडे यांनी त्या गावांपर्यंत पोहोचवली.

परंतु त्या पुस्तकांमध्ये ते पुस्तक कोणी दिले आहे त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता असलेले पोस्टकार्ड ठेवायला सुरुवात केली आणि या पुस्तकाविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्यक्तीला सांगा असं सांगितलं.

त्यांची हीच कृती खरंतर खूप वेगळी ठरते. कारण त्यामुळे देणाऱ्या व्यक्तीला आपली मदत योग्य ठिकाणी पोचली आहे याचं समाधान मिळतं, तर पुस्तक वाचणार्‍या मुलांनाही पुढे जाऊन आपणही असं काही करावं अशी प्रेरणा मिळते.

मध्यप्रदेश कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये त्यांनी अशा लायब्ररीज काढल्या आहेत.

त्यामुळे १० लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. आणि प्रदीप लोखंडे यांना विश्वास आहे की पुढेही अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

 

thebetterindia.com

 

आतापर्यंत ८५०००० विद्यार्थ्यांनी अशी पोस्टकार्ड पुस्तक देणाऱ्या व्यक्तींना पाठवली आहेत. प्रदीप लोखंडे यांच्या या चळवळीला यश येतं आहे.

खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी त्यांचा ध्यास सुरूच आहे.

जेव्हा शाळांमधून कॉम्प्युटर हा विषय अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आला त्यावेळेस देखील त्यांच्या लक्षात आलं की खेड्यापाड्यातल्या शाळांमध्ये कॉम्प्युटर बघायलाही मिळत नाही.

मग त्या विषयात ही मुलं काय शिकणार?

म्हणून मग त्यांनी कॉम्प्युटरचीही अशीच एक योजना काढली. ज्यामध्ये ज्या लोकांना जुने कॉम्प्युटर नको आहे, नवीन घ्यायचा आहे त्या लोकांनी जुने चालू स्थितीतील कॉम्युटर शाळेला दान द्यायचे.

अशा लोकांना ते भेटले आणि ज्या शाळांना गरज आहे त्या शाळांशी देखील त्यांनी संपर्क साधला आणि कॉम्प्युटर शाळेपर्यंत पोहोचते केले.

शाळेच्या गरजेनुसार कॉम्प्युटर त्यांनी दिले. देणाऱ्यांना त्यांनी कधीही सक्ती केली नाही की नवीनच कॉम्प्युटर द्या. जुना असला तरी चालेल पण तो व्यवस्थित चालणारा असावा इतकीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

outlookindia.com

 

एकदा शाळेला कॉम्प्युटर सोपवल्यावर त्या कॉम्प्युटरची संपूर्ण व्यवस्था शाळेनेच करायची.

आताही कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या शाळा बंद आहेत तर काही शाळांनी आता ऑनलाइन पद्धतीने अभ्यास चालू केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे.

कारण त्याद्वारे व्हिडिओ पाहता येतात ऑनलाईन क्लास जॉईन करता येतो. शिक्षकांना शंका विचारता येतात.

अर्थात शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करण्यास कोणताही प्रॉब्लेम येणार नाही कारण इथल्या मुलांकडे देखील अँड्रॉइड मोबाईल्स असतात.

पण खरा प्रॉब्लेम आहे तो गावांकडे. तिथे प्रत्येकाकडेच मोबाईल असेल याची खात्री नाही, फार तर एखादा मोबाईल घरामध्ये असतो. आणि तोही अँड्रॉइड नसेल तर मुलांच्या शिक्षणात नक्कीच अडथळा येणार आहे.

ही अडचण ओळखून सध्या प्रदीप लोखंडे यांनी मोबाईल डोनेशनची कल्पना मांडली आहे.

ज्यानुसार शहरांमधल्या ज्या लोकांना जुना मोबाईल नको आहे त्या लोकांनी नवीन मोबाईल घेताना, आपला जुना चालू स्थितीतील मोबाईल या गरजू विद्यार्थ्यांना दान करावा.

जेणेकरून त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही.

ज्या विद्यार्थ्यांना एकदम पैसे घालून मोबाईल घेता येणार नाही त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे. पुढं मोबाईलचा रिचार्ज वगैरे गोष्टी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बघाव्यात असं त्यांना वाटतं.

 

freepressjournal.in

 

टाळी दोन्ही हाताने वाजली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.

तिथेही त्यांनी ही व्यवस्था एकदम पारदर्शक ठेवली आहे. त्यांच्याकडे सध्या किती विद्यार्थ्यांना मोबाईलची गरज आहे याची माहिती आहे.

म्हणूनच ज्यांना मोबाईल दान करायचा आहे त्यांनी तो कुठे, कोणत्या जिल्ह्यातल्या शाळेत दान करायचा आहे हे सांगितलं तरी त्या शाळेचा पत्ता दानी व्यक्तीकडे दिला जातो.

त्या व्यक्तीने परस्पर त्या शाळेत तो मोबाईल पाठवायचा आहे. म्हणजेच लॉक डाऊनच्या काळातही शिक्षणाची ग्यान की त्यांनी उघडली आहे.

प्रदीप लोखंडे यांच्याकडे त्यांच्या व्यवसायासाठी लागणारा महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सगळ्या गावांचां एक सर्वसाधारण डेटा उपलब्ध आहे.

ज्यानुसार जिल्हा, तालुका, खेडी याबरोबरच खेड्यांमध्ये असलेली पायाभूत सुविधा यांचीदेखील माहिती त्यांच्याकडे आहे.

ही माहिती जमा करताना त्यांना खेड्यातल्या समस्या देखील समजल्या आहेत. म्हणूनच शहरातल्या लोकांच्या मदतीने खेड्यातल्या समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल आहे.

नुसतंच खेड्याकडे चला म्हणून चालणार नाही. तर तिथे राहण्यासाठी तिथल्या लोकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.

 

outlookindia.com

 

म्हणूनच तिथे उपलब्ध असणाऱ्या साधन सुविधेचा, नैसर्गिक घटकांचा खेड्यांच्या विकासासाठी कसा वापर करता येईल यासाठी देखील त्यांच्या काही योजना आहेत.

कारण खेडी सुधारली तरच भारत सुधारेल यावर त्यांचाही विश्वास आहे.

देशसेवा केवळ बॉर्डरवरच करता येत नाही तर ती अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ही करता येते, हेच प्रदीप लोखंडे यांनी दाखवून दिलं आहे. प्रदीप लोखंडे यांसारखी माणसे समाजामध्ये आहेत म्हणूनच भारताचे भविष्य उज्वल आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version