विकृत-घाणेरडे विनोद करणाऱ्या “स्टॅण्ड-अप” विदूषकांना वेळीच ठेचायला हवं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
विनोद म्हणजे काय? हे बहुदा आपण सगळेच विसरलो आहोत.
ह्या धकाधकीच्या जीवनात ऑफिसमधून घरी आल्यावर जेवताना टीव्हीवर लागणाऱ्या पोरकट कॉमेडी शोचा आनंद घेणं किंवा येता जाता आपल्या स्मार्टफोन च्या माध्यमातून यूट्यूब वर येणारे आचकट विचकट व्हीडियो किंवा स्टँड अप कॉमेडीयन लोकांचे व्हीडियो बघत बसायचे!
इथे आपला विनोद संपतो, पण खरच एकदा आपण शांत बसून विचार केला तर आपल्यालाही जाणवेल की हा विनोद नाही, पण मग तरीही बहुतांश लोकं ह्यांच्या इतके आधीन का झाले आहेत?
ह्याचे उत्तर आपल्याकडेच आहे, आपल्यालाच सोशल मीडिया मुळे सगळं काही चटकन अनुभवायची सवय लागली आहे!
काही लोकं तर “आमच्याकडे वेळ नाही विनोद समजून घ्यायला आम्हाला हे असेच मॅगी सारखे २ मिनिटात आनंद देणारे व्हीडियोज आवडतात” असंही म्हणतात!
पण विनोद समजायला विनोदबुद्धी सुद्धा लागते हे मात्र ते विसारतात.. सध्याचा विनोद हा फार संकुचितच नव्हे तर बीभत्स सुद्धा झाला आहे असंच म्हणावं लागेल, आणि ह्याला जवाबदार आहेत टीव्हीवर येणारे ढीगभर कॉमेडी शोज आणि सोशल मीडिया वर डझनभर व्हीडियोज टाकणारे स्टँडअप कॉमेडियन्स!
मुळात स्टँड अप ही गोष्ट पाश्चात्य देशातून आलेली आहे असा समज असणाऱ्या लोकांना कोपरापासून नमस्कार करावासा वाटतो!
अगदी पू.ल.देशपांडे यांच्यापासून कॉमेडी किंग जॉनी लिवर पर्यंत सगळेच आपल्या देशात स्टँड अप कॉमेडी करूनच मोठे झाले आहेत!
लक्ष्मण देशपांडे यांच्यासारख्या हाडाच्या कलावंताचे एकपात्री नाटक वऱ्हाड निघालंय लंडनला हे म्हणजे २ तासांचा स्टँड अप कॉमेडी शोच असायचा! पू.ल किंवा व.पू ह्यांची कथाकथनं म्हणजे स्टॅंड अप अॅक्टच आहेत.
शिरीष केणेकर ह्यांची ‘फटकेबाजी’ म्हणजे निखळ विनोदाचा आनंदच, मराठी मध्ये स्टँड अप कॉमेडी ही किती जुनी आहे यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच!
हिंदी मध्ये सुद्धा स्टँड अप कॉमेडी तशी जुनीच, जॉनी लिवर ह्यांना आज कॉमेडी किंग म्हंटलं जातं ते केवळ त्यांनी केलेल्या असंख्य स्टँड अप शोज मुळे आणि मिमीक्रि मुळे!
२००५ साली स्टार वन ह्या चॅनल वर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ह्या नावाने कोमेडियन्स ची स्पर्धा चालू झाली आणि तिथून ह्या कॉमेडी शोज फोफावत गेले, त्या शोच्या पहिल्या सीझन चा विजेता होता सुनील पाल!
हे नाव सर्वांना माहीतच असेल. त्या वेळी त्या शो मधून सुनील पाल राजू श्रीवास्तव असे कित्येक कॉमेडियन्स वर आले!
आणि त्या काळात त्या लोकांचे विनोद लोकांना आवडत देखील होते, आपण म्हणू शकतो की त्या वेळेस लोकांना विनोद कशाशी खातात ह्याची थोडी तरी जाणीव होती!
पण जसं जसं काळ बदलला तसतसे प्लॅटफॉर्म बदलले. सोशल मीडिया, यूट्यूब ओटीटी प्लॅटफॉर्म बहरले आणि ह्या सगळ्यात उत्तम दर्जाचा विनोद आणि विनोदी कलाकार मात्र मागे पडले!
आत्ता वर ज्या ज्या लोकांची नावं घेतली ती माणसं आज कुठे आहेत काय करत आहेत हे एकदा बघा म्हणजे कळेल की आपल्या विनोदाची पातळी किती खाली आली आहे ते!
हे सगळं लिहिण्याचा खटाटोप इतक्यासाठी की २ दिवसांपूर्वी हॅबिटाट ह्या क्लब मधल्या एका स्टँड अप कॉमेडियन ची व्हीडियो क्लिप व्हायरल झाली त्यात तीने छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या संदर्भात आक्षेपहार्य विधान केलं.
ज्याच्यामुळे संपूर्ण सोशल मीडिया वर लोकं त्या स्टँड अप कॉमेडियन वर तुटून पडले, त्या मुलीचे नाव अग्रिमा जोशूआ! खरंतर हा व्हिडिओ खूप जुना असल्याची देखील चर्चा होत आहे.
पण तो सोशल मीडिया मुळे आत्ता व्हायरल होत असल्याने ह्यावरून प्रचंड वादंग झाला, काही लोकांनी त्या कॉमेडी क्लब मध्ये जाऊन तिथे तोडफोड केल्याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत!
एकंदरच सगळ्यांच्या मनात हा राग खदखदत आहे, बरं हे असं पहिल्यांदाच घडतंय आशातलाही भाग नाही, स्टँड अप कॉमेडियन्स आणि वाद हे काही आपल्याला नवीन नाही!
फ्रीडम ऑफ स्पीच च्या नावाखाली असे कित्येक कोमेडियन्स काही बाही बोलून वादाच्या भोवऱ्यात फसल्याचं आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे!
एआयबी वाल्यांचा रोस्ट शो आठवा जिथं करण जोहर, रणविर सिंग, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट सारखे बॉलिवूड स्टार्स जमून विनोदाच्या नावाखाली आचरट चाळे करत होते!
बरं ते सुद्धा सोडून द्या, तो एक पेड शो होता ज्याचं लाईव्ह टेलिकास्ट कुठे केलं गेलेलं नव्हतं, आणि लोकं स्वतः हजारो रुपयांचं तिकीट काढून तो शो बघायला आले होते!
पण त्यानंतर सुद्धा एआयबी च्या कित्येक लोकांवर केसेस झाल्या तरी त्यांच्या कंटेंट मध्ये सुधारणा ही आजतागायत झालेली नाही!
वरूण ग्रोव्हर, कुणाल कामरा ह्यांची नावं तर आजकालच्या लहान मुलांना सुद्धा ठाऊक आहेत, त्यांनी केलेल्या प्रत्येक वादातीत स्टेटमेंटमुळेच ही लोकं आज इतकी प्रसिद्ध आहेत!
पद्मावत सिनेमाच्या वादाच्या दरम्यान वरून ग्रोव्हर ने एक स्टँड अप शो केलेला त्याचा व्हीडियो आजही यूट्यूब वर तुम्हाला पाहायला मिळेल.
तो पाहून ह्यांना कॉमेडीयन म्हणायचं की नाही? ही शंका सुद्धा मनात येईल, इतक्या खालच्या थराला जाऊन त्याने त्या विषयावर विनोद केले आहेत!
कुणाल कामरा चे स्टँड अप शोज बहुतेक नरेंद्र मोदी, भारतीय संस्कृति आणि राजकारण ह्याशियावी पूर्णच होत नाहीत, किंबहुना ह्या ३ गोष्टी नसत्या तर कुणाल कामरा हा इसम कॉमेडी क्षेत्रातच नसता असंही म्हंटल तरी वावगं ठरणार नाही!
आपल्या कंटेंट मधून सतत भारतीय संस्कृति, मिडल क्लास मानसिकता, राजकारण, लोकांचे श्रद्धास्थान, धर्म-जात, लैंगिकता, भ्रष्टाचार, ऐतिहासिक महापुरुष, धर्मग्रंथ अशा गोष्टींवर अत्यंत बीभत्स पद्धतीने भाष्य करणे!
आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा वाईट आणि समाजाला जखडून आहेत हेच दाखवण्याकडे ह्या सगळ्या कॉमेडी आर्टिस्टचा कल असतो!
बरं ही लोकं जिथे परफॉर्म करतात त्या त्या क्लब मध्ये सुद्धा एक वेगळीच कंपूशाही बघायला मिळते!
म्हणजे वर उल्लेख केलेल्या पैकी एकही मुद्दा तुमच्या कंटेंट मध्ये नसेल किंवा वादातीत विषयावर भाष्य न करता तुम्ही जर निखळ विनोद करू पाहणार असाल तर तिथे तुमच्या विनोदाला कुणीच दाद देत नाही!
असंही नाही की ह्या सगळ्या कोमेडियन्स च्या गर्दीत सगळेच सारखे आहेत.
झाकीर खान, बिस्वा कल्याण, अतुल खत्री यांच्यासारखे खूप छान विनोद करून लोकांचं मनोरंजन करणारे स्टँड अप कॉमेडियन्स अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत!
त्यांच्या ही कंटेंट मध्ये आक्षेपहार्य शब्द, राजकारण, कमरेखालचे विनोद हे सगळं असतंच. पण त्याचा वापर खूप मार्मिक असतो आणि त्यातून ती लोकं कोणताच वाद मुद्दाम निर्माण करायचा ह्या उद्देशाने कधीच परफॉर्म करत नाहीत!
हे असे काही मोजके कलाकार सोडले तर सध्याचे बरेच स्टँड अप कॉमेडियन्स म्हणजे फक्त आणि फक्त प्रसिद्धीच्या मागेच धावताना आपल्याला दिसतात.
कशाप्रकारे एखादं वादग्रस्त स्टेटमेंट करून लोकांच्या नजरेत येता येईल, आणि मग त्यातून स्वतःची प्रोफाइल आणि पोलिटिकल आयडियोलॉजि बनवून कशाप्रकारे वाद निर्माण करता येईल ह्या कडेच ह्या कोमेडियन्सचा कल असतो!
खरंतर लोकांना हसवणं खूप कठीण काम असतं, पण हे असले बीभत्स आणि आपमानजनक विनोद किंवा वाद करून ह्या कोमेडियन्सना काय साध्य करायचं आहे हे त्यांचं त्यांनाच ठाऊक!
पण फ्रीडम ऑफ स्पीच किंवा कॉमेडीच्या नावावर आपल्या इतिहासाची, धार्मिक ग्रंथांची, महापुरुष तसेच आपल्या श्रद्धास्थानांची अशी खिल्ली उडवणाऱ्यांना वेळच्या वेळीच ठेचायला हवं!
ह्यासाठी आपण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा सुजाण होणं आणि आपली हरवलेली विनोद बुद्धी पुन्हा शोधून आणून निखळ विनोद काय असतो आणि त्याचा आनंद कसा लुटायचा हे पुन्हा शिकायची नितांत गरज आहे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.