' घरातल्या ‘सुपरवुमन’ला निरोगी ठेवण्यासाठी, या टिप्स फॉलो करणं घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे – InMarathi

घरातल्या ‘सुपरवुमन’ला निरोगी ठेवण्यासाठी, या टिप्स फॉलो करणं घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्त्रिया घरादारासाठी सतत राबत असतात. पुरुषांच्या एकसूरी कामापेक्षा स्त्रियांना विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

स्वयंपाक, घरचं बजेट, मुलांचे संगोपन, त्यांचा अभ्यास, शाळेच्या वेळा, त्यांचे खाणे, घरातील मोठ्यांची, म्हाताऱ्यांची काळजी यात त्यांच्या दिवसाचे चक्र अव्याहत सुरू असते.

सकाळी उठल्यापासून ते रात्री उशीरा अंथरूणाला पाठ लावेपर्यंत कामांची यादी संपत नसते.

त्यात पुन्हा हल्लीच्या स्त्रिया आपल्या छंदांबाबत, करीअरबाबतही तितक्याच जागृत असल्याने त्यालाही त्या तितकाच वेळ देतात. या सगळ्यात त्यांची धावपळ खूप होते. दमछाक होते. तारेवरची कसरतच करतात त्या म्हणा ना!

अशा वेळी सगळ्या बाजू सांभाळताना त्या स्वतःकडे मात्र नकळत दुर्लक्ष करत राहतात.

आपल्या शरीराच्या बारीकसारीक तक्रारींकडे दुर्लक्ष करत कामं करत राहतात. परंतु कधी कधी या बारीक सारीक तक्रारीच मोठ्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात.

 

unwell woman inmarathi
therightmoves. com

 

त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे, आणि घरच्यांनीही आपल्या घरातील अशा सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

स्त्रियाच जर आजारी पडल्या, तर त्याचा परीणाम घरादारावर होतो. स्त्रिया या घराचा मुख्य स्तंभ असतात. त्यांच्याच खांद्यावर घराचा तंबू उभा असतो.

हे लक्षात ठेवून सर्वात आधी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असते.

स्त्रियांनी देखील स्वतःच्या आरोग्याकडे असे दुर्लक्ष करू नये. “जान है तो जहान है”, या उक्तीला अनुसरून वेळच्यावेळी काही गोष्टी पाळून आपले आरोग्य उत्तम ठेवण्याची वृत्ती जोपासावी.

त्यासाठीच आज इथे देत आहोत काही आरोग्याच्या टिप्स –

काही छोट्या मोठ्या आरोग्याच्या टिप्स पाळून तुम्ही आपले आरोग्य अबाधित राखू शकाल आणि आपल्या जीवनाचा, जबाबदाऱ्यांचाही पुरेपूर आनंद घेऊ शकाल.

त्यासाठी आपली जीवनशैली स्मार्ट ठेवून तुम्ही कोणत्याही वयात आरोग्यदायी जीवन जगू शकाल.

आरोग्य टिप १ – पोषक आहार –

 

cooking inmarathi
edexlive.com

सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत घरातील सर्वांना चांगले, पोषक पदार्थ करून खाऊ घालणाऱ्या स्त्रिया अनेकदा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

घरातील शिळे अन्न फेकायला लागू नये म्हणून स्वतः खाऊन घेतात. अन्न उरू नये म्हणून भूक नसतानाही थोडे आहे म्हणून बळेच संपवून टाकतात. अशाने त्यांचे वजन वाढते. शिळे खाल्ल्याने पोषकता कमी होते.

घरातील चांगली फळे, ड्रायफ्रूट्स त्या घरातील मुलांना, पुरुषांना खाऊ घालतात. परंतु स्वतः मात्र महाग म्हणून कमी खातात किंवा टाळतात. तर हे देखील स्त्रियांनी करू नये.

जे असेल ते सर्वांना सारखे विभागून त्यांनी स्वतः देखील ताजी फळे, ताजे अन्न, ड्रायफ्रूट्स, दूध, दही, पोषक पदार्थ खाण्याची सवय लावून घ्यायला हवी.

त्याचप्रमाणे केवळ चवीला चांगले म्हणून वारंवार जंक फूड, कोल्ड्रींक्स, केक, पेस्ट्रीज, फास्टफूड, तळलेले पदार्थ, साखरेचे पदार्थ वगैरे खाण्याचे टाळावे.

आपल्या वयाप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअमयुक्त आहार, गोळ्या, औषधे इत्यादी वेळच्यावेळी घ्यावेत. लोणची, पापड यांचा वापर कमीत कमी करावा.

पोषक आणि योग्य आहारामुळे वजन काबूत राहते. आणि वजन नियंत्रणात असणे हे आरोग्याचे पहिले लक्षण आहे. त्यामुळे लठ्ठपणामुळे होणारे बरेच आजार, आणि समस्या दूर राहतात.

आरोग्य टिप २ – व्यायाम –

 

yoga inmarathi
knot9.com

ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी स्त्रियांना कामांमुळे शरीराला बराच व्यायाम, हालचाली आपोआप मिळतात. परंतु सध्याच्या काळात शहरी, मध्यमवर्गीय स्त्रियांना शरीराच्या हालचाली असलेली कामे जवळपास संपुष्टात आली आहेत.

ऑफिसमध्येही बैठी कामेच अधिक असतात. त्यामुळे शरीराच्या, पचनाच्या, सांध्यांच्या तक्रारी वाढतात.

त्यामुळे स्त्रियांनी जाणीवपूर्वक व्यायाम, योग इत्यादीसाठी दिवसभरातून निदान स्वतःसाठी तासभर तरी काढावा. योग शिकून घ्यावा. व्यायामाचे नेमके प्रकार शिकून घ्यावेत.

निदान आठवड्यातून तीन ते चार वेळा अर्धा ते एक तास व्यायाम, योग करण्याची सवय लावून घ्यावी.  शक्य असेल त्यांनी ऍरोबिक्स, स्विमिंग, चालणे, सायकलिंग, डान्सिंग इत्यादी प्रकारचे सर्व प्रकार आळीपाळीने करत राहावे.

व्यायामाची शरीराला अत्यंत आवश्यकता असते.  त्याने शरीर डिटॉक्स होते, अनावश्यक चरबी वितळायला मदत होते, रक्ताभिसरण चांगले राहते, पचनक्रिया सुधारते.

 

आरोग्य टिप ३ – घातक सवयी, व्यसनं सोडा –

 

beer for car-inmarathi
thedailymeal.com

प्रमाणात भारतात अजून मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये सिगरेट, दारू इत्यादी व्यसने कमी दिसतात. परंतु आधुनिक काळात ती देखील सुरू झाली आहेत. कष्टकरी स्त्रियांमध्ये तर तंबाखू, विड्या, अल्कोहोल यांची व्यसने दिसतातच.

सर्वच वर्गातील स्त्रियांनी ही व्यसनं टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. तंबाखू पूर्णपणे टाळायला हवी, तर अल्कोहोलिक ड्रिंक माफक प्रमाणात चालू शकते. मात्र त्याची रोजची सवय किंवा व्यसन नको.

मात्र यातूनच व्यसन लागायची शक्यताही तितकीच बळावते हे लक्षात ठेवायला हवे.

 

आरोग्य टिप ४ – ताणतणावाचे व्यवस्थापन

 

stress inmarathi 1
bangloremirror.com

स्त्रियांचे वय कोणतेही असो, त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या नेहमीच असतात. मुलगी म्हणून, आई म्हणून किंवा आजी म्हणूनही आयुष्यभर त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी होत नसतात.

या सर्वांतून त्यांच्या शरीरावर आणि मनावरही अनावश्यक ताण सतत राहत असतो.

सतत काळजी, चिंता यांनी त्या घेरलेल्या असतात. कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात त्यांची ओढाताण होत राहते आणि त्यातून त्या तणावाला बळी पडतात.

या सर्वांचं व्यवस्थापन त्यांनी स्वतःच करायला हवं. त्यासाठी स्वतःला वेळ देऊन दिवसातले काही क्षण अधूनमधून स्वतःला देऊन रिलॅक्स व्हायला हवं.

यासाठी आवडते संगीत ऐकणे, बागकाम करणे, सहज म्हणून पडून राहणे, टिव्ही बघणे,वाचन करणे, आवडत्या मित्रमैत्रिणींशी फोनवर गप्पा मारणे अशा विविध प्रकारांतून त्या स्वतःला ताणरहित ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात.

स्वतःसाठी वेळ काढणे हा गुन्हा नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकीला लागणार हा काळ भिन्न असू शकतो. काहींना दिवसांतून एकदा विश्रांती पुरते तर काहींना कामातून थोड्या थोड्या वेळाने ती गरजेची भासते.

त्यामुळे याबाबतीत इतरांचं अनुकरण न करता स्वतःचा विचार करून वेळ काढा. छंदांमुळे शरीराबरोबरच मनालाही विश्रांती मिळून मन ताजेतवाने होते.

 

आरोग्य टिप ५ – उन्हात जाण्याआधी काळजी –

 

Asian woman in hot summer - heat stroke concept
sowetanlivecom

घराबाहेर पडताना उन्हाची काळजी घेऊन बाहेर पडा. सनस्क्रिन लोशन, गॉगल्स, टोपी, दुपट्टा यांचा आवर्जून वापर करा. थेट कडक उन्हात वावरल्याने त्वचेचे आजार होतात. ते टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.

त्वचेत काहीही बदल घडत असतील तर त्याकडे लक्ष ठेवा. असे ठळक बदल दिसले, तर आपल्या डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घ्या. त्वचेवरच्या जखमा लवकर बऱ्या होत नसतील तरी डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या.

 

आरोग्य टिप ६ – ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता वारंवार तपासून पाहा –

 

breast cancer inmarathi
medical news today

 

सर्वच स्त्रियांनी, त्यातही चाळीशीच्या वरील सर्वच स्त्रियांनी ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्यापासून सावधचित्त राहाण्याची गरज असते. दर महिन्या पंधरा दिवसातून एकदा आपले स्तन आपणच चेक करूनही त्यात काही बदल झालेत का, कुठे गाठ जाणवते का यासंबंधी तपासून घ्या.

शक्य असेल, तर डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करून घ्या अशी. वर्षातून एकदा मॅमोग्राम टेस्ट करून घ्या.

मॅमोग्राम टेस्टमध्ये असा कॅन्सर सुरुवातीलाच लक्षात येतो. आणि वेळीच योग्य ट्रिटमेंट घेऊन तो बरा करता येतो.

वयातील टप्प्यांप्रमाणे स्त्रियांच्या आरोग्यविषयक तपासण्या आणि गरजा बदलतात. तरी देखील वरील टिप्स या साधारणपणे सर्वच वयातील स्त्रियांनी पाळाव्यात अशा आहेत. जेणेकरून आपले आरोग्य आणि पर्यायाने घराचे, कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?