आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की सध्या शरीरावर वेगवेगळे टॅटू काढून घेण्याची फॅशन प्रचंड लोकप्रिय आहे. परंतु ही कला आजकालची नसून ती जगातल्या विविध भागात शेकडो वर्षांपासून प्रचलित असून ती प्राचीन आहे.
टॅटूची प्राचीन परंपरा – भारतात आणि इतर देशांतही
अगदी भारतात देखील ही कला प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. टॅटू पार्लर शहरातील गल्ली बोळात निघण्यापूर्वीच आपल्याकडे महाराष्ट्रात ही कला गोंदण कला म्हणून प्रसिद्ध होती.
आणि शरीरावर विविध चिन्हे, नावे, प्रतिके गोंदून देणारे लोक होते. खेडोपाडी जत्रेतून असे गोंदणारे येऊन बसलेले असत आणि ते पारंपरिक पद्धतीने शरीरावर गोंदून देत.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील इतर अनेक राज्यांतही ही कला लोकप्रिय होती. काही समाजात तर गोंदून घेणे ही एक प्रथाच होती.
अशाच पद्धतीने पारंपरीक टॅटू काढून घेण्याची परंपरा आशिया खंडातील इतर अनेक देशांत देखील होती. त्यापैकीच एक देश म्हणजे फिलिपिन होय.
या देशात प्राचीन पद्धतीने टॅटू काढून घेण्याची एक पद्धत कलिंगा टॅटू म्हणून ओळखली जाते.
आज ही कला जवळपास नामशेष होत चालली असली, तरी फिलिपिन्समध्ये दूरच्या एका डोंगराळ खेड्यात राहणारी एक शंभरी उलटलेली बाई अजूनही ही कला जोपासून आहे.
ती प्राचीन कलिंगा टॅटू काढून देते आणि तिच्याकडून ते टॅटू काढून घेण्यासाठी केवळ फिलिपिनच नव्हे, तर जगभरातील लोक दूरून दूरून येत असता.
अर्थात तिच्याकडून टॅटू काढून घेणे फार सोपे नाही.
त्यासाठी तिच्या काही पारंपरिक अटी असतात. काही शपथा घ्याव्या लागतात. त्यांच्यासाठी टॅटू काढणे ही केवळ गंमत नसून तो एक परंपरेचा, सन्मानाचा भाग आहे.
कलिंगा टॅटू – फिलिपिन
फिलिपाईनमध्ये शेकडो वर्षे जुनी एक टॅटू परंपरा आहे. तिचं नाव आहे कलिंगा टॅटू. ही परंपरा अजून जिवंत ठेवली आहे ती एका १०३ वर्ष वयाच्या आजीने.
ही एक वेगळ्याच प्रकारे टॅटू काढण्याची कला आहे. आज तिच्याशिवाय अन्य कोणालाही ही कला अवगत नाही.
मात्र ही आजी या कलेत इतकी प्रसिद्ध आहे की लोक शेकडो मैलावरूनही आणि डोंगर, दऱ्या, रस्ते, शेते तुडवत, अनेक तासांचा प्रवास करतही तिच्यापर्यंत टॅटू काढण्यासाठी पोचतात.
तिचं नाव आहे वॅंग-ऑड-ओगे. आजही ती रोज सकाळी उठून पाईनवृक्षाच्या रसापासून बनवलेली शाई आणि पाणी घेऊन तयार असते. तिच्याकडे आलेल्या लोकांच्या शरीरावर त्यांना आवडीचे टॅटू काढून देण्यासाठी.
ती आजही आपल्या प्राचीन परंपरेनुसारच टॅटू काढून देते. ती या कामासाठी जगप्रसिद्ध आहे. लोक दूर दूरवरून तिच्याकडून टॅटू काढून घेण्यासाठी येतच असतात.
ती फिलिपाईनची राजधानी मनिलापासून दूर बस्कॅलन नावाच्या एका डोंगराळ खेड्यात राहते. तिथे पोचायला कमीत कमी पंधरा तासाचा खडतर प्रवास करून जावं लागतं.
पारंपरिक साधनांच्या सहाय्याने टॅटू –
वॅंग-ऑड काही मोजक्या साधनांच्या सहाय्याने दिवसभर लोकांना टॅटू काढून देत असते. ही साधने म्हणजे पोमेलो झाडाचा काटा, एक लांब बांबूची छडी, कोळसा आणि पाणी ही आहेत.
टॅटूसाठी ती स्वतः पारंपरिक पद्धतीने शाई तयार करते. ती शाई बांबूच्या सहाय्याने काट्यात ओतत त्या काट्याच्या सहाय्याने ती त्वचेवर टॅटू कोरत असते.
तिने काढलेले टॅटू वर्षानुवर्ष तसेच राहतात. कायमस्वरुपी. टॅटूसाठी ती पारंपरिक डीझाईन्सचा उपयोग करते. हे डीझाईन्स शेकडो वर्षे तसेच चालत आलेले आहेत.
यात आदिवासी लोकांच्या काही मान्यता, काही प्रतिके, काही प्राण्यांची चित्रे इत्यादी सामील आहेत. या प्रत्येक चिन्हांचा काही ना काही अर्थ आहे. सौंदर्य, ताकद, सर्जकता अशा गोष्टींची प्रतिकं आहेत.
वीर योद्ध्यांचे चिन्ह –
कलिंग टॅटू जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा ते केवळ युद्धात जिंकलेल्या लोकांच्या अंगावरच काढून देण्याचा रिवाज होता. तो त्यांचा गौरव होता. पुरुषांसाठी हे टॅटू वीरतेची प्रतिकं होती. तर स्त्रियांसाठी सौंदर्याची.
व्हॅंगच्या म्हणण्यानुसार तिच्या अंगावर असलेले टॅटू ती तरूण असताना तिच्या मैत्रिणींनी काढून दिलेले आहेत. त्यानंतर ती देखील असे टॅटू इतरांच्या शरीरावर काढून द्यायला शिकली.
याचे धडे तिला खुद्द तिच्या वडिलांनी दिले. वयाच्या १५ व्या वर्षीच तिने आपल्या वडिलांच्या हाताखाली टॅटू काढायला शिकायला सुरूवात केली होती.
परंपरागत कला –
सध्या असे प्राचीन पद्धतीने टॅटू काढणारी व्हॅंग ही एकटी कलाकार आहे. आणि ही कला केवळ आपल्या रक्ताच्याच वारसांना शिकवायची अशी पद्धत असल्याने ही कला ती इतर कुणालाही शिकवू शकत नाही.
ही कला इतरांना शिकवली तर ती नष्ट होते, अशी मान्यता असल्यामुळे ती इतरांना शिकवू शकत नाही, आणि तिला स्वतःचे मूलबाळं नाहीत.
परंतु तिने यावर उपाय शोधून काढला आहे. जरी तिला स्वतःची मुलं नसली तरी तिने आपल्या घराण्यातील पुतण्या, त्यांची मुलं अशा नातवंडांना ही कला शिकवायला सुरूवात केली आहे.
त्यामुळे तिच्यानंतरही ही प्राचीन कला नष्ट न होता जिवंत राहण्याची शक्यता आहे.
व्हॅंग ऑड गेली जवळपास ८० वर्षे ह्या कलेत कार्यरत असून टॅटू काढते. आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ती म्हणते,
‘मी डब्यातले हवाबंद पदार्थ खात नाही. मी हिरव्या भाज्या आणि कडधान्ये खाते.’
व्हॅंग केवळ टॅटूच काढते असे नाही, तर आज १०३ व्या वर्षी देखील ती एकदम फिट आहे. घरातली सगळी कामं ती स्वतःची स्वतः करते. गावात सगळीकडे फिरते. शेतांतून चिखल तुडवत जाते.
तिचे डोळे आजही तेजस्वी आहेत आणि इंद्रिये सगळी कार्यरत.
तासंतास टॅटू काढणे हे देखील कष्टाचे आणि श्रमाचे काम आहे. परंतु ती ते या वयात देखील उत्साहाने आणि अथकपणे करते. हे कौतुकास्पद आहे. आणि आश्चर्यजनक देखील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.