गुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
परवा दिल्लीच्या रामजस विद्यालयात कुठल्याशा कार्यक्रमात ओमर खालिद आणि शेहला रशीद याना भाषणासाठी बोलावले गेले होते. हाच ओमर खालिद ज्याच्या विरुद्ध देशद्रोही घोषणाबाझी करण्याचा आरोप आहे. आरोपानंतर ओमर खालिद काही दिवस फरार देखील झाला होता…सध्या जामिनावर आहे.
अभाविप ह्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी रामजसमध्ये ह्या कार्यक्रमाला विरोध केला. गोधळ घातला. देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोपी असणाऱ्या ओमर खालिदला बोलावणे चूक असल्याचे सांगत अभाविपने हा कार्यक्रम हाणून पाडला. AISA ह्या डावी विचारसरणी असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांसोबत अभाविपची हाणामारी झाल्याचेही दिसून येत आहे.
ह्यातून “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” हा जुना, चघळून झालेला विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. अभाविपने जे केलं ते निश्चित निंदनीय आहे. कायदा हातात घेऊन धाकदपटशाही करणे लोकशाहीला अपेक्षित नाही. कोणता कार्यक्रम ठेवायचा आणि वक्ता म्हणून कोणाला बोलवायचे हा हक्क विद्यालयाला आहे. अभाविपने घातलेल्या गोंधळाचे आणि मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. विरोध नोंदवायचा होता तर शांतपणे नोंदवायची गरज होती.
ह्यानंतर गुरमेहर कौर ह्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीने सोशल मिडीयावर “मी दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थी असून मी अभाविपला भीती नाही. मी एकटी नसून सर्व भारतीय विद्यार्थी माझ्यासोबत आहेत” असे लिहिलेले एक प्लेकार्ड हातात घेऊन फोटो टाकलाय. गुरमेहर कौरला ह्या नंतर अनेक लोकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केल्याचे आणि बलात्काराच्या धमक्या दिल्याचे दिसून आले.
गुरमेहर हुतात्मा कॅप्टन मंदिप सिंह ह्यांची कन्या आहे! इथून खरी गंमत आहे.
गुरमेहर कौरचा गेल्यावर्षीचा एक विडिओ सध्या चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये प्लेकार्डचा वापर करून गुरमेहर सांगते की –
ती दोन वर्षांची असताना तिचे वडील शाहिद झाले. तेंव्हापासून सर्व मुस्लिम पाकिस्तानी असल्याचा समज करून घेऊन तिने मुस्लिमांचा द्वेष करण्यास सुरुवात केली. सहा वर्षांची असताना तिने बुरख्यातल्या एका बाईला भोसकण्याचा प्रयत्न केला. आईने समजवल्यावर तिचा तिरस्कार संपला. तिच्यामाते तिच्या बाबांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले आणि भारत पाकिस्तानमध्ये मैत्री होण्यासाठी, तिरस्कार आणि द्वेष संपण्यासाठी ती लढत राहील.
मेसेज छान दिलाय पण अत्यंत बालिश आहे. इतका की हसू यावं. अपेक्षेप्रमाणे पुरोगामी आणि लिबरल पत्रकार, सेलेब्रिटींनी गुरमेहरला पाठिंबा दिला आणि अभाविप, संघ ह्यांना दोष देण्याला सुरुवात केली. अभाविपपासून झालेली ही सुरुवात आता मोदी सरकार आल्यापासून कसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलं जात नाहीये इथपर्यंत येऊन पोचली आहे.
पाकिस्तानने माझ्या वडिलांचा जीव घेतला नसून युद्धाने घेतला.
– हे प्लेकार्ड हातात घेऊन असलेला गुरमेहरचा फोटो वापरून अनेकांनी ह्या तर्कातला फोलपणा विनोदाने दाखवण्याचा प्रयत्न केला.
सलमानने लोक चिरडले नाहीत, त्याच्या गाडीने चिरडले. अमेरिकेने अणूबॉम्ब फेकले नाहीत, युद्धाने फेकले. हिटलरने लाखो ज्यूंना मारले नाही, युद्धाने/गॅसने मारले वगैरे गोष्टी बोलल्या गेल्या.
ह्या सर्व प्रकरणात अनपेक्षित उडी घेतली खुद्द वीरेंद्र सेहवागने. वीरेंद्र सेहवागने एक फोटो टाकला ज्यात “मी दोनवेळा त्रिशतक ठोकले नाही, माझ्या बॅटने ठोकले” असे प्लेकार्ड त्याच्या हातात होते. ह्या विनोदावर हसला रणदीप हुड्डा!
इथून प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. इतके दिवस अभिव्यक्तीवर घाला पडला वगैरे बोलणारे पत्रकार आणि लोक सेहवाग आणि रणदीपला पुरुषवादी, लहान मुलीला चिडवणारे वगैरे म्हणायला लागले. राणा अय्युब ही पत्रकार तर संपूर्ण हरियाणाला दोष देती झाली.
हरियाणाचे आहेत म्हणजे असेच वागणार
– ह्या तिच्या वक्तव्यावर बबिता फोगाटने तिला चांगलेच फैलावर घेतले. एका मुलीला बलात्काराच्या धमक्या मिळणे आणि शिवीगाळ होणे चूक असले तरी मी देशाविरोधात एक शब्दही ऐकू शकत नाही असे खडे बोल तिने ऐकवलेत.
ही सगळी झाली पार्श्वभूमी! आता विश्लेषण करूयात.
सर्वप्रथम हे स्पष्ट लक्षात घेऊया की अभाविप ने विरोध नाही तर गुंडगिरी केलीये! कायदा हातात घेऊन हाणामारी करणे गुन्हा आहे. गुरमेहरला शिवीगाळ करणे किंवा बलात्काराच्या धमक्या देणे हे नीच मानसिकतेचे लक्षण आहे. अशा शिवीगाळ कारणाऱ्याना आणि धमक्या देणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी.
पण ह्यासगळ्यांमधून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झालीय, ती अशी की –
आपला नावडता नेता सत्तेत असला की पुरोगामीत्वाच्या व्याख्या बदलतात. सोयीस्कर भूमिका घेतल्या जातात.
ओमर खालिदवर देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप असल्याने त्याला आमंत्रण दिले जाऊ नये ही अभाविपची भूमिका त्यांनी केलेली हिंसा सोडली तर अजिबात गैर नाही. प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा हक्क नव्हे काय? हिंसेचा आरोप AISAच्या विद्यार्थ्यांवर देखील आहे, त्याच्यावर आक्षेप घेताना तथाकथित बुद्धिवादी दिसले नाहीत. ओमर खालिदला जर अलगाववादी घोषणा देण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर अखंड हिंदुराष्ट्राची मागणी लावून धरणारे देखील ते स्वातंत्र्य वापरू शकतात. तिकडे ठप्पेबाजी करण्याचा, ट्रोल किंवा हिंदुत्ववादी म्हणण्याचा अधिकार तो काय?
गुरमेहर कौरने अभाविपचा विरोध केला ते ही अजिबातच चूक नाही, पण अलगाववादी भूमिका असणाऱ्या AISAचा विरोध तिने केला का? नाही! गुरमेहरला आलेल्या धमक्यांची निंदा सर्वांनी केली, करावीच. पण इतक्याच उत्कटतेने अभाविपची भूमिका मांडणाऱ्या, किंवा भाजपची बाजू घेणाऱ्या महिलांना येणाऱ्या धमक्यांची, शिवीगाळीची बुद्धिवादी, उदारमतवादी लोकांकडून निंदा होताना दिसते का?
वीरेंद्र सेहवाग आणि रणदीप हुडा ह्यांना bullies म्हणून संबोधले गेले. “हरियाणाचे आहेत मग असंच वागणार” वगैरे बोललं गेलं. का? रणदीप आणि सेहवागची भूमिका, अभिव्यक्ति असूच शकत नाही का? हे नेहमी होताना दिसतंय. अनुपम खेर, रविना टंडन, विवेक अग्निहोत्री, अशोक पंडित ह्यांना संघी, मोदींचे पाळीव वगैरे विशेषणे लावल्यानंतर आता ह्याही दोघांविरुद्ध गँग अप होताना बुद्धिवादी दिसत आहेत!
जान्हवी बेहल किती जणांना आठवते? 15 वर्षांच्या जान्हवीने कन्हैया कुमारला उघड वादविवादाचे आव्हान दिले होते तेंव्हा हेच तथाकथित बुद्धिवादी आणि उदारमतवादी लोक तिची खिल्ली उडवताना दिसून आले.
तेव्हा पुरुषवादी मानसिकता वगैरे कोणालाच का दिसली नाही? तेव्हा लहान मुलीला bully करणारे आज लहान मुलीचा बहाणा का देतात? तर्कातला फोलपणा दाखवला म्हणून?
होय! गुरमेहर कौरचे वडील देशाची सेवा करताना हुतात्मा झालेत. कॅप्टन मंदिप सिंह! पण म्हणून गुरमेहरकडे देशभक्ती शिकवण्याची मक्तेदारी येत नाही! पाकिस्तानने माझ्या वडिलांचा जीव घेतला नाही, युद्धाने घेतला म्हणणारी गुरमेहर हे सांगत नाही की तिचे वडील युद्धात हुतात्मा झाले नाहीयेत, ते आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेत. ती म्हणते कारगिल युद्ध होतं! कारगिल युद्ध कोणी सुरू केलं? आतंकवादी कोणाचे?
जर गुरमेहर ला वागवताना तिच्या वडिलांची कर्मे ध्यानात घ्यायची झाली तर ओमर खालिदचे वडील “सिमी” ह्या दहशतवादी संघटनेत काम करत असत! मग त्यालादेखील वडिलांच्या कामांमुळे जज करायचे काय? सर्वात हास्यास्पद काय असेल तर “सैनिक जीव देऊन उपकार करत नाहीत, पगारासाठी, सोयी साठी सैन्यात जातात” असं बोलणारे आता गुरमेहरच्या चुका झाकण्यासाठी तिच्या वडिलांच्या वीरमरणाचं भांडवल करत आहेत.
भारत पाकिस्तान शांततेसाठी गुरमेहर लढा देतेय म्हणे! कसा? सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून शांतता प्रस्थापित होणार आहे का? उद्या आतंकवादी भारतात घुसल्यानंतर त्यांना गुरमेहरचा व्हिडीओ दाखवायचा का? मानमोडी भूमिका घेऊन शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. खास करून अर्धा देशाविरुद्ध जो बनलाच आहे धार्मिक कट्टरतावादाच्या परिणामातून!
होय, अभाविपची भूमिका बरोबर आहे पण मार्ग नाही. पण AISAची मूळ भूमिकाच चुकीची नव्हे काय? आजकालच्या उदारमतवादी लोकांनी देखील भूमिका स्पष्ट करावी, तटस्थपणाचा आव आणून अजेंडा राबवू नये. एकीकडे शाहिद सैनिकाची मुलगी सांगून सिम्पथी घ्यायची, दुसरीकडे जी डी बक्षी हेट स्पीच देतात म्हणून केस टाकायची. हा दांभिकपणा आहे.
मुळात रणदीप हुडाने म्हणल्याप्रमाणे – गुरमेहरचा राजकीय वापर होताना दिसून येतोय. बहुतेकवेळा अभाविपचा थेट संबंध भाजप आणि पर्यायाने मोदींशी जोडून अभाविपची प्रत्येक करतूत मोदींच्या सांगण्यावरून होते असं गृहीतक असतं. आणि मग प्रत्येक गोष्ट ह्या रेषेत जोडून देश कसा आणीबाणीकडे निघालाय वगैरे आरामखुर्चीतल्या गप्पा सुरु होतात.
हार्दिक पटेल, कन्हैया कुमार, जसलीन कौर, ओमर खालिद इत्यादी मोहरे भुईसपाट झाल्यानंतर आता गुरमेहरचा वापर करून घेण्यात उदारमतवादी मग्न झालेत. पण हा सलेक्टिव्हपणा धोकादायक आहे. “सगळे मुसलमान वाईट असतात” ही विचारधारा जितकी धोकादायक आहे तितकाच. कारण अशी विचारधारा मूलतत्ववादाला जन्म देते. मुस्लिम अंध-विरोधी भूमिका ओवैसी सारख्याना जन्म देत असतील तर हाच सलेक्टिव्हपणा तिरस्काराला जन्म घालतो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा नाजूक विषय आहे. आजकाल तो सोयीनुसार वापरताना दिसून येतो. भाजप समर्थकांना शिवीगाळ करणारे ट्रोल, भक्त वगैरे शिक्के मारले जात असताना इतर पक्षीय किंवा विचारसरणीच्या लोकांना सोयीस्कररित्या दुर्लक्षित करण्यात येतंय आणि हीच मुख्य अडचण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वाना सारखं आहे. तुम्ही कोणत्या नेत्याला पाठिंबा देत ह्यावरून ते स्वातंत्र्य कि स्वैराचार हे ठरत नाही! हार्दिक पटेल-कन्हैयाला स्वातंत्र्य असेल तर ते मोहन भागवत आणि आदित्यनाथ ह्यांनाही आहे हे मान्य करावेच लागेल. जर हिंदुत्ववाद्यांचे स्वातंत्र्य मान्य नसेल तर अलगाववाद्यांना देखील नाकारावेच लागेल. अन्यथा अजेंडा चालवतोय हे मान्य करावे लागेल.
अगदी परवाच भाजप विरोधात अक्षरशः शिवसेनेसारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला पाठिंबा देताना उदारमतवादी दिसून आले तेंव्हाच ही गोष्ट स्पष्ट झाली. पुरोगामीत्व, उदारमतवाद सगळं बेगडी आहे….अस्सल, खरा आणि शुद्ध आहे – तो केवळ मोदी द्वेष!
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi