Site icon InMarathi

कोरोना ते कॅन्सर अशा अनेक दुर्धर आजारांवर प्रभावी ठरणा-या आयुर्वेदाची ही माहिती वाचायलाच हवी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

 

लेखक – डॉ. अमृत भालचंद्र करमरकर, संचालक, इनक्लिनीशन, मुंबई 

आपल्या देशात प्रत्येक जण डॉक्टर असतो. तुम्ही काहीही होतय असे कुणाला सांगितले तरी तो लगेच तुम्हाला सांगेल हे औषध घे याने फरक पडेल आणि रोज ही पथ्ये पाणी कर, मला पण फरक पडलाय किंवा आणिक कोणाला काय आणि काय. आणि त्यातही मराठी माणूस म्हटले की सल्ले जास्त आणि काम कमी.

पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साक्षरतेचा आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. कदाचित यामुळेच की काय आपल्या देशातील निरोगी राज्यांच्या आकडेवारीत केरळ राज्य पहिल्या तर महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे (संदर्भ: नीती आयोग, २०१६).

आरोग्य म्हटले की वेगवेगळ्या उपचार पद्धती नजरेसमोर येतात आणि मग त्या उपचार पद्धतींचे एकमेकांशी तू मोठी की मी हे भांडण देखील आलेच.

सध्या आयुर्वेदिक उपचारांचा बोलबाला आहे. केसांच्या शँपू पासून ते कपडे धुण्याच्या पावडरीपर्यंत सगळेच आयुर्वेदिक होऊ लागले आहे.

 

 

चहा, नुडल्स, चॉकलेट बार इतकेच नव्हे सर्वच आयुर्वेदिक उत्पादने आहेत असे सांगून ती बऱ्याच वर्षांच्या संशोधनाने आम्ही कशी निर्माण केली असे देखील लोक सांगतात आणि त्यांच्या मार्केटिंगला आपण बळी पडतो.

यामुळेच सर्वसामान्य माणूस ज्याला थोडी वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. इतकेच नव्हे तर आमचे डॉक्टर मित्र देखील या मार्केटिंगला बळी पडतात.

हे सर्व होण्याचे कारण भारतीय अन्न आणि औषध कायद्याचे अज्ञान. म्हणून या विषयी समाजामध्ये जागृती करण्याचा हा प्रपंच.

 

www.quora.com

मित्रहो, सर्व प्रथम आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की आज जी उत्पादने बाजारात आहेत त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते.

१. संपूर्णपणे आयुर्वेदिक उत्पादने
२. पेटंट किंवा प्रोप्रायटरी औषध
३. होमिओपॅथीक औषधे आणि सूक्ष्मऔषधी
४. फंक्शनल फुड्स (विशेष कार्य करणारे अन्नपदार्थ)
५. अॅलोपॅथिक औषधे

वर दिलेल्या प्रत्येक उत्पादनासाठी ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४०, आणि नियम १९४५ (३१ डिसेंबर २०१६ पर्यंत सुधारित) अनुसार काही संज्ञा परिभाषित केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

औषध (सर्व प्रकारच्या पॅथीसाठी) या संज्ञेमध्ये (सेक्शन ३.४.ब)

अ) माणूस किंवा प्राणी यांच्यामध्ये शरीराच्या अंतर्गत घेण्यासाठी किंवा बाह्य उपयोगासाठी ज्याचा वापर केला जातो जसे की निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी कोणतेही आजार किंवा विकार जे माणूस किंवा प्राणी यांना होतात, ज्यामध्ये अशी उत्पादने जी डास पळवून लावण्यासाठी माणसाच्या शरीरावर लावली जातात त्यांचा देखील समावेश होतो;

ब) असे पदार्थ (अन्नाव्यतिरिक्त) जे शरीराचे कार्य किंवा रचना यांवर परिणाम करता किंवा जंत इत्यादीचा नाश किंवा कीटक यांचा नाश करता जे माणसाला किंवा प्राण्यांना आजार घडवितात.

क) असे सर्व पदार्थ जे औषधाचे घटक आहेत जसे की रिकाम्या जिलेटीनच्या कॅप्सूल्स, आणि

ड) अशी डीव्हाइस जी अतंर्गत किंवा बाह्य उपयोगासाठी असतात ज्यांचा वापर निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी माणूस किंवा प्राण्यांमध्ये केला जातो.

 

hubballionline.in

आयुर्वेदिक औषधाची परिभाषा सेक्शन ३.७ अ नुसार अशी केली जाते:

अशी सर्व औषधे ज्यांचा शरीराच्या अंतर्गत घेण्यासाठी किंवा बाह्य उपयोगासाठी वापर केला जातो जसे की निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी [आजार किंवा विकार जो माणसांमध्ये किंवा जनावरांमध्ये होतो, आणि उत्पादन केले जाते] जी अधिकृत पुस्तकांमध्ये दिलेल्या सुत्रीकरणानुसार (फॉर्म्यूला) बनविली आहेत [अशा पुस्तकांची नावे पहिल्या शेड्युलमध्ये दिलेली आहेत.] अशी पुस्तके आयुर्वेदासाठी ५४ सी पर्यंत, सिध्द साठी ५५ ते ८४ पर्यंत, आणि युनानी साठी १ ते १३ अशी आहेत.

या पुस्तकांमध्ये आयुर्वेदीय पुरातन संहिता (चरकसंहिता इ.), भैषज्य रत्नावली, निघंटू रत्नाकर, इ. यांचा समावेश होतो.

 

 

जीएसआर ६६३ (ई) मध्ये संज्ञा ३ एच मध्ये दिलेल्या पेटंट किंवा प्रोप्रायटरी औषध याचा अर्थ असा की ज्यामध्ये वापरलेले घटक हे वर उल्लेखलेल्या ५७ ग्रंथात दिलेल्या सूत्रीकरणा मधील (फॉर्म्यूला) आहेत (परंतु त्यांचे प्रमाण तेच असेल असे नाही) परंतु त्यांमध्ये इंजेक्शन्स (पॅरेनटेरल्स) चा समावेश होत नाही. होमिओपॅथीक औषधे ही वेगळ्याप्रकारे उल्लेखली जातात.

पण आज काही वैद्य आयुर्वेदात दिलेल्या वनस्पतींचा उपयोग करून त्याचा काढा तयार करतात आणि अनुपानासाठी (द्रव्य जे औषधाच्या बरोबर किंवा त्याच्या नंतर दिले जाते जे सामान्यत: औषधाचे उपयोगीत्व वाढविते) होमिओपॅथीक साखरेच्या पिल्स वापरतात.

 

 

अशा औषधांना सूक्ष्मऔषधी असेही म्हटले जाते. अशा औषधांचे लायसेन्स घेताना किंवा बाजारामध्ये विपणन करताना ती होमिओपॅथीच्या लायसेन्सच्या खाली दिली जातात.

चौथा प्रकार म्हणजे अन्न उत्पादने (ज्यामध्ये फुड्स किंवा हेल्थ सप्लीमेंट्स, विशेष आहार उपयोगाचे अन्नपदार्थ, विशेष वैद्यकीय अवस्थेतील आहार उत्पादने, नॉव्हेल फुड्स आणि फंक्शनल फुड्स) अशी उत्पादने. आपल्यापैकी काही लोक वजन कमी किंवा वाढविण्यासाठी ही उत्पादने घेत असतात. न्यूवे आणि वनस्पतीज जीवन (नाव बदलले आहे) या कंपन्यांची उत्पादने यामध्ये आघाडीवर आहेत. अशा उत्पादनांना फूड सेफ्टी आणि स्टॅन्डर्डस कायदा, २००६ चे नियम लागू होतात ज्यांचे नियमन फूड सेफ्टी आणि स्टॅन्डर्डस ऑथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएएआय) करते.

शेवटचा प्रकार म्हणजे अॅलोपॅथिक औषधे जी ओव्हर दि कौंटर म्हणजेच डॉक्टरच्या चिट्ठीशिवाय मिळणारी, आणि डॉक्टरची चिट्ठी गरजेची असणारी म्हणजेच प्रिस्क्रिप्शन औषधे अशी असतात.

हे सर्व प्रकार आणि त्यांच्या संज्ञा बघितल्यानंतर एक लक्षात घेतले पाहिजे की की आयुर्वेदिक औषध म्हणजे

१) ज्याचे सुत्रीकरण (फॉर्म्यूला) वर उल्लेखलेल्या ५७ ग्रंथात आहे (आता हे लक्षात घ्या हे फॉर्म्यूला या ग्रंथामध्ये श्लोक स्वरुपात आहेत. त्यामुळे त्यातील प्रत्यक्ष प्रमाण हे संस्कृत येत असलेल्या व्यक्तीकडून माहिती करून घेतले पाहिजे)

२) हे फॉर्म्यूला संस्कृत मध्ये असल्याने या ग्रंथातील काही फॉर्म्यूले घेऊन आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडियाची निर्मिती भारत सरकारच्या फार्माकोपियल लॅबोरेटोरी ऑफ इंडियन मेडिसिन यांनी केली आहे. १९७८ सालापासून याचे आजपर्यंत २ भाग प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये श्लोकाबरोबरच औषधांचे आजच्या सिस्टीमनुसार प्रमाण (किलोग्राम) मध्ये दिलेले आहे. या पुस्तकामध्ये औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी औषधी झाडे तसेच खनिजे यांचे मोनोग्राफ दिलेले आहेत, याबरोबरच क्वालीटेटीव, क्वांटीटेटीव चाचण्या दिलेल्या आहेत.

३) म्हणजेच आज बाजारात जे काही औषध आयुर्वेदिक या नावाने विकले जाते ते पूर्णतः आयुर्वेदीक आहे असे म्हणायचे असेल तर त्यावर ग्रंथाचे नाव, श्लोक क्रमांक लिहलेला असेल, किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडियाचा फॉर्म्यूला क्रमांक असेल तरच ते संपूर्णपणे आयुर्वेदिक समजावे.

 

homeopathyworld.in

फुड्स वगळता इतर सर्व प्रकारच्या उत्पादनांचे नियमन आरोग्य मंत्रालयातील सेन्ट्रल ड्रग स्टॅन्डर्डस कंट्रोल ऑर्गनायझेशन (ज्याला काही लोक चुकीने भारतीय एफडीए) म्हणतात.

क्लिनिकल रिसर्च (नैदानिक अनुसंधान) (माणसामध्ये संशोधन) ची गरज :

ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा, १९४० अनुसार पूर्णपणे आयुर्वेदिक असलेल्या उत्पादनांना क्लिनिकल रिसर्च करणे गरजेचे नाही. फक्त त्यांना उपलब्ध प्रकाशित साहित्यामधून औषधाच्या परिणामकारकतेचा पुरावा सादर करावा लागतो. ही औषधे हजारो वर्षापासून उपलब्ध असल्या कारणाने त्यांची सुरक्षा (सेफ्टी) आणि प्रभावीपणा यांची गुणवत्ता आधीच सिध्द झाली आहे.

पेटंट किंवा प्रोप्रायटरी औषध या प्रकारच्या औषधासाठी संदर्भ ग्रंथामधील तर्काधार देणे, तसेच उपलब्ध प्रकाशित साहित्यामधून औषधाच्या प्रभावीपणाचा पुरावा देणे गरजेचे आहे. येथे सुरक्षेचा (सेफ्टी) पुरावा गरजेचा नाही.

परंतु प्रभावीपणासाठी योग्य मसुद्याच्या / प्रोटोकॉलच्या आधारे पायलट अभ्यास करणे गरजेचे आहे. सध्या बाजारात असलेली बरीच औषधे हा अभ्यास न करता बाजारात आली आहेत आणि त्यांचेवर सरकारचे नियंत्रण नाही.

अन्न उत्पादने (ज्यामध्ये फुड्स किंवा हेल्थ सप्लीमेंट्स, विशेष आहार उपयोगाचे अन्नपदार्थ, विशेष वैद्यकीय अवस्थेतील आहार उत्पादने, नॉव्हेल फुड्स आणि फंक्शनल फुड्स) या प्रकारामध्ये येणाऱ्या उत्पादनांना आजतागायत भारतात क्लिनिकल रिसर्चची आवश्यकता नाही परंतु त्यांपासून उद्भविणाऱ्या सुरक्षा (सेफ्टी) संदर्भातील सर्व जबाबदारी कंपनी मालकाची असेल असा नियम २५ जानेवारी २०१६ रोजीच्या फूड सेफ्टी आणि स्टॅन्डर्डस (सुधारित) नियम २०१६ मध्ये करण्यात आला आहे.

तसेच अशा उत्पादनांमध्ये वापरले जाणारे घटक हे या कायद्यामध्ये नमूद केलेल्या प्रकारचेच असतील आणि त्यांचे नाव, स्वरूप तसेच प्रमाण उत्पादनाच्या वेष्टनावर लिहिणे बंधनकारक आहे.

अॅलोपॅथिक औषधासाठी क्लिनिकल रिसर्च करणे बंधनकारक आहेच. हे संशोधन नवीन औषधासाठी १ ते ४ टप्प्यामध्ये सुमारे १० ते २० हजार रुग्णांमध्ये केले जाते तर जेनरिक औषधांसाठी कमीतकमी १८ सुदृढ माणसांमध्ये केले जाते.

 

 

उत्पादन प्रक्रिया संदर्भातील कायदे :

येथे एक लक्षात घेतले पाहिजे की आयुर्वेदिक ही संज्ञा फक्त आणि फक्त भारतातच वापरली जाते. परदेशामध्ये आयुर्वेदिक ग्रंथ आणि त्यातील सिद्धांत यांना मान्यता नसल्याने तेथे आयुर्वेदिक औषधांना हर्बल असे म्हटले जाते.

भारतात आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादन प्रक्रीयेसाठी ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यामधील शेड्यूल टी मधील गुड मॅन्यूफॅक्चरिंग प्रॅक्टीसेसची तत्वे वापरली जातात. तीच तत्वे पेटंट किंवा प्रोप्रायटरी औषधांसाठी वापरली जातात.

सूक्ष्मऔषधी किंवा होमिओपॅथी साठी शेड्युल एम I तर अॅलोपॅथी साठी शेड्युल एम ची तत्वे आणि नियम वापरली जातात. तर हर्बल फुड्स साठी फूड सेफ्टी आणि स्टॅन्डर्डसची तत्वे वापरली जातात.

परदेशामध्ये हर्बल उत्पादने तयार करण्यासाठी त्यांमधील वापरल्या जाणाऱ्या घटकांची शेती कशी करावी, त्यांची जोपासना, त्यांची तोडणी तसेच पुढील प्रक्रिया या साठी गुड अॅग्रीकल्चरल कलेक्शन प्रॅक्टीसेस ची तत्वे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी निर्देशित केली आहेत.

त्यानंतर अॅनेक्स ३ मधील तत्वानुसार त्यांचे उत्पादन कसे करावे हे देखील सांगितले आहे. भारतीय शेड्युल टी शी तुलना करता हे नियम खुप सरस आणि अधिक कडक आहेत.

कसे ओळखाल आयुर्वेदिक उत्पादन?

१. वेष्टनावर (लेबल) ग्रंथाचे नाव, श्लोक क्रमांक लिहलेला असेल, किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडियाचा फॉर्म्यूला क्रमांक असेल तरच ते संपूर्णपणे आयुर्वेदिक समजावे.

२. लायसन्स नंबर मध्ये आयु (AYU) असेल तर (सूक्ष्मऔषधी किंवा होमिओपॅथी HOM असे असते)
हे लक्षात ठेवा की फुड्स प्रकारच्या उत्पादनांच्या वेष्टनामध्ये लायसेन्स क्रमांक हा एफएसएआयचा असतो ज्यामध्ये एफएसएआयचा लोगो देखील असतो.

म्हणजेच हे लक्षात घ्या की कोणतेही उत्पादनामध्ये जडीबुटी, वनस्पती किंवा तत्सम कोणताही घटक टाकला तर तो आयुर्वेदीक होत नाही.

काय करायला हवे?

कोणत्याही मार्केटिंग ला बळी न पडता प्रत्येकवेळी उत्पादनाचे लेबल पहा. त्यामध्ये उत्पादनाची तारीख, एक्सपायरी तारीख (लक्षात ठेवा १० ऑगस्ट २०१० च्या नियम क्र. १६१ बी अनुसार प्रत्येक आयुर्वेदिक उत्पादनाला एक्सपायरी तारीख असते), तसेच लायसन्सचा प्रकार आणि ग्रंथाचा तपशील पाहावा.

हे ही ध्यानात घ्या की उत्पादन भारतात तयार झाले असेल तरच भारतीय मानकांनुसार त्याची सुरक्षा आणि परिणाम तपासलेला असतो त्यामुळे परदेशी ते सर्व चांगले असे देखील नाही. सरकारने या संदर्भात जागृती घडवून आणून आयुर्वेदिक ही संज्ञा कुठे वापरावी याची नियमावली तयार केली पाहिजे.

 

putiapurefood.com.au

त्याच उत्पादनांना आयुर्वेदिक ही संज्ञा लागल्याने अशा उत्पादनांचा अपेक्षित परिणाम शरीरामध्ये दिसेल आणि त्यामुळे आयुर्वेदिक औषधांचा परिणाम उशिरा दिसतो अशा वल्गना होणार नाहीत.

तसेच अॅलोपॅथी प्रमाणेच आयुर्वेदिक औषधांसाठी देखील प्रिस्क्रिप्शन औषधे हा प्रकार तयार करून त्यामध्ये योग्य त्या औषधांचा समावेश व्हावा. यामुळे कोणतेही आयुर्वेदिक औषध घेण्यास प्रिस्क्रिप्शन गरजेचे असेल आणि त्यामुळे औषधाचे दुष्परिणाम दिसणार नाहीत आणि योग्य तो इलाज करणे सोयीचे होईल.

याच बरोबर शेड्युल के सारखा नियम आयुर्वेदिक औषधांना लागू करावा जेणेकरून उपचाराच्या गरजेपेक्षा जास्त नियमबाह्य साठा डॉक्टर करू शकणार नाहीत. इतकेच नव्हे तर आयुर्वेदिक औषधांची विक्री नोंदणीकृत फार्मसिस्टनेच करावी ज्यामुळे प्रिस्क्रिप्शन एरर्स होणार नाहीत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com | त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version