चेहऱ्यावर घावांसकट जगणारी, आपल्या गायकीने सगळ्यांना मोहात पाडणारी “छप्पनछुरीवाली” गायिका
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताला शास्त्रीय गायनाची दीर्घ परंपरा लाभली आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अलाहाबादची जानकीबाई या उत्तर हिंदुस्थानतल्या सर्वात प्रभावी हिंदुस्थानी शास्त्रीय गायिकांपैकी एक होत्या.
तो ग्रामोफोन युगाच्या सुरूवातीचा काळ होता. त्यांच्या गाण्यांच्या असंख्य रेकॉर्ड्स तेव्हा करण्यात आल्या होत्या. लेखिका निलम सारण गौर यांनी जानकीबाईंच्या आयुष्यावर ‘रेक जानकी इन रागा जानकी’ या नावाने कादंबरीही लिहीली आहे.
जानकीबाई एका चाकू हल्ल्यातून कशा बचावल्या आणि पुढे त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कशा आल्या याची कहाणी मोठी इंटरेस्टींग आहे.
काळ –
जानकीबाईचा काळ आहे १८८० ते १९३४. त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या छप्पन जखमांच्या व्रणांमुळे त्या नेहमी ‘छप्पनछुरीवाली’ जानकी बाई म्हणून ओळखल्या गेल्या.
लोक त्यांच्या गायकीचे दिवाने होते. ग्रामोफोन कंपन्यांनी त्यांच्या गाण्याच्या अनेक रेकॉर्ड्स काढल्या, तसेच त्यांचे अनेक लाईव्ह कार्यक्रम देखील त्या काळात खूप गाजले.
जानकीबाई ‘छप्पनछुरीवाली’ या केवळ उत्तम अदाकारा नी गायिकाच नव्हत्या, तर त्यांनी त्या काळात इंग्रजी, संस्कृत आणि फारसी भाषेवर प्रभुत्व देखील मिळवले होते आणि त्या उत्तम शायरा होत्या.

त्यांनी बऱ्याच उर्दू कविता, गजल लिहिल्या होत्या. एवढंच नव्हे, तर तिच्या नावावर तिने लिहिलेला दिवान देखील आहे.
मध्य भारतातील रेवा राज्याच्या दरबारात एक भव्य रॉयल कार्यक्रम होता. तिथले महाराज हे कलेचे भोक्ते होते. त्या लग्नाच्या मेजवानीत एक गाण्याचा कार्यक्रम होता. आणि ती गायिका पडद्याआडून गात होती. पण तिच्या आवाजाने त्यांना मोहित केले.
त्यांनी तिच्याबद्दल चौकशी केली असता कळले, की ती उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय गायिका जानकीबाई आहे.
जानकीबाईंनी स्वतःला असं पडद्याआड का ठेवलं असेल तेव्हा? जो राजा त्यांचा पोशिंदा होता, आणि ज्याच्या दरबारात त्या गाणं पेश करत होत्या, त्याच्याच नजरेपासून त्या आपला चेहरा असा लपवून का बसल्या होत्या?
महाराजांनी तिला पडद्यातून आपल्या समोर येण्याची आज्ञा दिली. परंतु तिने ती धुडकावली आणि त्याऐवजी आपण आपलं गाणं बंद करून निघून जाऊ असे सांगितले.
कार्यक्रम संपल्यावर तिने पडद्याआडूनच महाराजांशी संवाद साधत त्यांना सांगितले, की तिच्या चेहऱ्यावर छप्पन जखमांच्या खुणा आहेत आणि त्यामुळे तिला आपला चेहरा राजांना दाखवण्याची लाज वाटते.
परंतु तिच्या आवाजाने मोहित झालेल्या राजांनी तिला सांगितले, की तिच्या आवाजापुढे बाकी सगळं तुच्छ आहे. आणि त्यांनी तिला भरपूर बिदागी देऊन सन्मानित केले.
मानधन –

१९०७ मध्ये जानकीबाईला २० गाण्यांच्या रेकॉर्डसाठी २५० रुपये मानधन मिळाले होते. दुसऱ्याच वर्षी २५ गाण्यांसाठी ते ९०० रुपये झालं होतं. ग्रामोफोन कंपनीने तिला सेलेब्रिटी स्टेटस प्रदान केलं.
१९१३ पासून त्यांनी जांभळ्या रंगाची ग्रामोफोन कॉन्सर्ट रेकॉर्ड काढायला सुरूवात केली होती. ग्रामोफोन कंपनी मोजक्या स्टार लोकांकरताच अशा प्रकारे रेकॉर्ड्स काढत असे. त्यात जानकीबाईंचं नाव फार वरचं होतं.
१९२० च्या दरम्यान जानकीबाईंचं नाव फार गाजू लागलं होतं. त्या काळात लाईव्ह कार्यक्रमासाठी तिला २००० रुपयांचे मानधन दिले जात होते. त्या काळात सर्वात जास्त मानधन घेणारी ती गायिका होती.
उत्तर भारतातील मातीतल्या खास होली, चैती, कजरी, ठुमरी इत्यादी प्रकारच्या रचना त्या सर्वात अधिक गात असत.
पूर्वजीवन –
जानकीबाई ही मुळची बनारस येथली. ती लहान असतानाच तिचे वडील तिला आणि तिच्या आईला टाकून निघून गेले होते. त्यामुळे दोघींनाही अलाहाबादला येऊन तवायफ बनण्याव्यतिरिक्त पर्याय शिल्लक राहिला नव्हता.
तिची आई आणि ती या दोघी जन्मजात कलाकार होत्या. गायकी आणि नृत्य हे त्यांच्या अंगातच होते. त्यांच्यावर बारीक नजर असलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर उपकार करण्याच्या बहाण्याने त्यांना या व्यवसायात ओढले.
तिच्या चेहऱ्यावरील जखमांबद्दल अनेक आख्यायिका आहेत. यापैकीच एक म्हणजे एकदा तिने एका माणसाला धिक्कारल्याचा सूड म्हणून त्याने तिच्या चेहऱ्यावर चाकूने केलेल्या या जखमा आहेत असे म्हटले जाते.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, तिची सावत्र आई आणि तिचा बॉयफ्रेन्ड या दोघांना तिने रंगेहाथ पकडले म्हणून तिच्यावर त्यांनी केलेल्या या जखमा आहेत असंही म्हटलं जात असे.
कारणं काहीही असली, तरी जानकीबाई ही त्या काळातली एक वेगळी अदाकारा म्हणून प्रसिद्ध होती.
तोपर्यंतच्या गायिका आणि अदाकारा या सुंदर चेहऱ्याच्या बळावर भाव खाऊन जाणाऱ्या असत सहसा. मात्र जानकीबाई चेहऱ्यावरील व्रणांमुळे रुढार्थाने सुंदर नव्हती, तरी केवळ तिच्या कलेचे चाहते असणारा वर्ग फार मोठा होता.
हेच कारण होते, की ती इतर कलाकार आणि गायिकांपेक्षा फार वेगळी होती. ती जन्मजात कलाकार होती. कलेसाठीच ओळखली गेली. केवळ सौंदर्यासाठी नाही.
सुपरस्टार –
तिच्या रेकॉर्ड्सनी अक्षरशः रेकॉर्ड्स नोंदवले. तिच्या बहुतेक ध्वनिफिती २५००० हून अधिक प्रतीत विकल्या गेल्या. तिच्या त्यावेळच्या स्पर्धक असलेल्या गायिकांहून तिच्या रेकॉर्ड्स अधिक खपत होत्या.
तिच्या रेकॉर्ड्सना मिळत असलेल्या या प्रतिसादामुळे जानकीबाई तेव्हाची सुपरस्टार झाली होती.
तिच्याच काळात अजून एक सुपरस्टार आणि नावाजलेली गायिका होती – गौहर जान. या दोघींमध्ये त्या काळी स्पर्धा असायची. गौहर जान ही तिची आजीवन प्रतिस्पर्धी राहिली.

या दोघींचा सोबत असा एक लाईव्ह कार्यक्रम १९११ साली दिल्लीच्या दरबारात ब्रिटीश राजे पंचम जॉर्जच्या उपस्थितीत ठेवला गेला होता. हा त्या दोघींचाही बहुमान होता.
तिथे या दोघींनी ‘ये जलसा ताजपोशी का मुबारक हो, मुबारक हो’ हे खास पंचम जॉर्जसाठी लिहिले गेलेले आणि संगीत दिलेले गाणे गायिले होते.
वैवाहिक जीवन –
जानकीबाईने अलाहाबादच्या शेख अब्दुल हक या वकिलाशी लग्न केले होते. परंतु त्या दोघांचे ही सोबत फार काळ टिकली नाही. कारण हकने तिची फसवणुक केली होती.
त्यानंतर भौतिक सुखाच्या उपभोगाची इच्छा संपवून तिने आपल्या नावाने एक ट्रस्ट निर्माण केला होता.
तिने आपल्या रेकॉर्डच्या माध्यमांतून जमा केलेली सगळी संपत्ती या ट्रस्टच्या नावे करून, त्यातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात यावी, गरीबांना ब्लॅंकेट्स वाटले जावेत, मंदिरांना तसेच मस्जिदीनाही दान दिले जावे, आणि मोफत अन्नाचे भंडारे उघडले जावेत असे ठरवले.
मृत्यु –
१८ मे १९३४मध्ये जानकीबाईचे निधन झाले.
दंतकथा –
अपूर्व यश, प्रसिद्धी आणि तिचे आयुष्य यामुळे दंतकथा बनून राहिले.
ती ज्या विहिरीचे पाणी पित असे, त्या पाण्यामुळेच तिचा आवाज गोड बनला होता अशा दंतकथेपासून ते आजही तिच्या घराजवळ तिच्या पायातील घुंगरूंचा आणि तिच्या आलापांचा आवाज ऐकू येतो या दंतकथेपर्यंत ती लोकांच्या मनात आजही जिवंत आहे.
तिच्या उपलब्ध असलेल्या रेकॉर्डवरून आपणही तिच्या गायकीचा अंदाज लावून, त्या काळात तिचा आवाज किती लोकप्रिय असेल ते समजू शकतो.
ती किती दर्जेदार कलाकारा होती याचा अंदाज आपल्याला तिच्या रेकॉर्ड्सवरून आणि त्यातील तिच्या आवाजावरून येतो. अलाहाबाद आणि परीसरातील जुन्या-जाणत्या रसिकांना अजूनही तिच्या आठवणी येतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.