आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : सौरभ गणपत्ये
===
मागे, राज्यसरकारने मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवण्याचा मानस व्यक्त होता यावरून अपेक्षित चर्विचरण सुरु झालं होतं. हा अल्पसंख्याकांच्या लांगुलचलनाचा भाग आहे इथपासून ते थेट मराठी भाषेच्या मुळावर हा निर्णय कसा उठणार आहे याची आता चर्चा सुरु झाली होती.
हे सगळं आठवायचं निमित्त म्हणजे आजचा राजभाषा दिवस आणि गेला काही काळ आपल्या सेक्युलॅरिझमला असलेला धोका.
जगातल्या १५ व्या क्रमांकाच्या भाषेवर एखादं आक्रमण आणि त्या भाषेचा संभाव्य पराभव आणि विध्वंस या गोष्टी न पटणारया आहेतच. भारत हे सेक्युलर राष्ट्र आहे आणि हा सेक्युलॅरिझम या देशाने सहज आणि नकळत अप्रतिमरीत्या जपलं आहे.
जोपर्यंत नेमक्या पाकिस्तानविरुद्धच्याच सामन्यात मोहम्मद शमीने कामगिरी नीट का नाही केली किंवा मोक्याच्या क्षणी परवेझ रसूलने झेल का सोडला हे असले घाणेरडे प्रश्न आपल्याला त्रास देत नाहीत तोपर्यंत यादेशाची घडी सेक्युलरच राहणार.
त्याचं कारण इथल्या सामाजिक अभिसरणात दडलेलं आहे.
सामान्य माणूस असो किंवा अगदी शिवसेना मनसे सारखे पक्ष. यांच्या भाषेबद्दलच्या स्वभिमानाबद्दल दुमत नसले तरी समाजशास्त्र आणि भाषाशास्त्राच्या नियमावर मराठीवर आक्रमण या मुद्द्यांचा निव्वळ राजकीय पेक्षाही जरा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल.
आपली मराठी भाषा जी आपण बोलतोय तीच मुळात तथाकथित शुद्ध आहे का? आणि तिची कथित विटंबना झाली आहे का? याचा विचार करायला गेलं तर काय गवसेल?
इथे थोडासा भाषाशास्त्राचा आणि अधिक समाजकारण व राजकारणाचा आढावा घेऊन अभ्यास करावा लागेल. (फिलॉलॉजी बॉडी सोशो पॉलिटिक)
शिवकालीन मराठी भाषा म्हणजे प्राकृत भाषेचा आविष्कार. मराठी भाषेवर असलेला संस्कृत भाषेचा पगडा एका टप्प्यावर स्थिर झाला.
त्याला जशी नव्याने उदयाला आलेली लोकसंस्कृती कारणीभूत होती तशीच कारणीभूत होती तेव्हाची नवी राजकीय व्यवस्था. याच काळात मराठी प्रांतात बहामनी मुसलमानी राजवट स्थिरावली.
यापैकी निजामाच्या राजवटीत शासकीय भाषा मराठी होती. याचे कारण म्हणजे मराठी ही जनसामान्यांची भाषा होती.
आता लोकांमध्ये राज्य टिकवायचे झाल्यास त्यांची भाषा आत्मसात करावीच लागणार आणि त्यांच्याशी काही प्रमाणात तरी जमवून घ्यावेच लागणार.
पण मराठी भाषा आत्मसात करून ती कारभारात आणताना राज्यकर्त्यांनी शब्द मात्र सर्रास फारसी वापरले. प्रशासन व लोकांमध्ये संवाद निर्माण होताना हीच भाषा रुजायला सुरवात झाली.
मराठीत शिरलेल्या या नव्या पर्वामुळे व्याकरण प्रक्रियेला धक्का लागला का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे देता येईल. त्याचप्रमाणे नवीन आलेल्या शब्दाला लिंग, विभक्ती आणि वचन मिळाले की त्याला त्या भाषेत स्थान मिळते.
इथेच खऱ्या अर्थाने मराठी भाषा समृद्ध झाली. उपलब्ध शब्दांना अक्षरश: समांतर अशी एक नवी संपदा उभी राहिली.
इथे फारसी भाषा ही अंतरश्वसित तर मराठी भाषा बहिरश्वसित. म्हणजेच फारसी भाषा बोलताना श्वास रोखून धरावा लागतो. मराठी भाषा बोलताना सोडावा लागतो.
जिक्र हा शब्द जिकीर असा झाला तर फिक्र चा रुपांतरीत शब्द झाला फ़िकिर. मुलाकात म्हणजे मुलाखत तर गुनाह म्हणजे गुन्हा.
असेच शब्द म्हणजे जिल्हा, शिपाई, तपशील, अब्रू, किल्ला, आणि दरम्यान. पुढे अर्थ बदलून काही शब्द आले. उदा, मुलाचा पसारा हा अर्थ असलेला शब्द म्हणजे दुकान. तर काही प्रत्यय आले.
उदा, दार (भालदार, चोपदार) आणि गिरी (गुलामगिरी, मुत्सद्देगिरी, शिपाईगिरी, मुलूखगिरी).
आजच्या मराठीतले घर, जमीन, तालुका, रस्ता, नुकसान, फायदा, ताकद, कायदा, दाब, जोर, इमारत, शासन, सरकार शब्द हे गृहीत धरले तर जवळपास ७५% शब्द फारसी आहेत.
मात्र या सांस्कृतिक संक्रमणाचे काही परिणाम व्हायचे ते झालेच. मराठीचे रूपच पालटले. आणि इंडो आर्यन कुळातली मराठी ही परसो आर्यन कुळातली होते आहे की काय अशी भीती निर्माण झाली.
या परिस्थितीत बदल करण्यासाठी म्हणून शिवछत्रपतींनी मराठी शब्दकोश प्रकाशित केला…!
मूळ मराठी भाषेला संजीवनी देण्याचा हा प्रयत्न. आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या मूळ मराठी नावांबरोबरच त्यांनी फारसी नावेही जोडली. पण शिवशाहीच्या उत्तरकाळात हा प्रयत्न मागे पडला.
कारण राज्य टिकवणं हीच मोठी जबाबदारी होती. बाजीरावाचा घोडा तर पायाला भिंगरी लावलेला. त्यामुळे राज्याची वाढ झाली पण भाषासंवर्धन नाही.
त्यावेळेस पत्रभाषा तर “मुन्साफिच्या (न्यायमूर्ती पदाच्या ) हुद्द्यावर तुमचा तक्रूर (नेमणूक) केलाय” अशी होती. अजूनही ही तोच बाझ ठेऊन आहे.
पण शासनाचेही संकृतप्रचूर नवीन शब्दांसाठी प्रयत्न चालू आहेत. उदा: मंजूर ऐवजी पारित, यादी ऐवजी सूची, सदर ऐवजी उपरोक्त.
शेवटी एवढेच नमूद करावेसे वाटते की, मराठी भाषा श्रीमंत झाली आहे हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. हमी या शब्दाला हिंदीत गारंटी हा प्रतिशब्द आहे.
आपल्याला याची गरज नाही. आज धर्माच्या नावावर एकमेकांचा तिरस्कार करण्याची वृत्ती वाढली आहे. जर असाच कोणाला विचार करायचा असेल तर तबला सुद्धा सोडवा लगेल.
तेव्हा भाषेचा अभिमान बाळगताना हा समाजशास्त्रीय इतिहास डोळ्यासमोर आणल्यास उत्तम.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.