Site icon InMarathi

भारतीयांसाठी जीव की प्राण असलेल्या तिरंग्याच्या जन्माची “ही” कहाणी अवर्णनीय भाव उत्पन्न करते

indian flag featured inmarathi

hindustantimes.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या सहभागाची कहाणी सांगणारी पिढी आता जवळजवळ काळाच्या पडद्याआड गेली आहे. आता आहे ती स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी पिढी.

त्या भूमिगत चळवळीच्या कहाण्या, भारत छोडो आंदोलन, जहाल गट मवाळ गट हे सारं आता फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचावं लागेल.

 

hindi.firstpost.com

 

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यालाही अनेक वर्षे लोटली. हे स्वातंत्र्य मिळवताना किती अगणित लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची गाथा खरोखर शब्दात मांडणं अशक्य आहे.

त्याचबरोबरीने डौलाने फडकणारा आपला तिरंगा पाहून कुणाही भारतीयाचं मन अभिमानाने भरून येईल.

आपला राष्ट्रध्वज उंची आणि लांबी २:३ या प्रमाणात असलेला आपला तिरंगा.. यातील केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आणि मधोमध असलेले अशोकचक्र या प्रत्येकाचा एक अर्थ आहे.

केशरी रंग हा स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची कहाणी सांगतो, शौर्य आणि त्याग यांचा अर्थ हा केशरी रंग सांगतो. मधोमध असलेला पांढरा शुभ्र रंग पावित्र्याची खूण सांगतो. हिरवा रंग समृद्धी दर्शवतो.

मधोमध असलेले २४ अऱ्यांचे अशोक चक्र हे गौतम बुद्धांनी सांगितलेल्या २४ सत्यांचे ते प्रतिक आहे. ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवरील अशोकचक्र आहे.

 

newsd.in

 

या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीची कहाणी, प्रक्रिया विविध प्रकारच्या टप्प्यांतून गेली आहे. ही सुरस कथा..

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी २२ जुलै १९४७ हा तिरंगा ध्वज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अधिकृतपणे आपला राष्ट्रध्वज म्हणून मान्य केला गेला.

पिंगली वेंकय्या यांनी या राष्ट्रध्वजाची रचना केली. आणि त्यावर मधोमध अशोकचक्र असावे ही सूचना सुरैया तय्यबजी यांनी केली. त्यापूर्वी तेथे चरखा अंकित होता.

भारताचा पहिला राष्ट्रध्वज १९०४ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी तयार केला. त्यावेळी त्यामध्ये फक्त दोनच रंग होते-लाल आणि पिवळा रंग. पैकी लाल रंग हा लढ्याचे तर पिवळा विजयाचे प्रतीक मानला होता.

त्यावर वंदे मातरम् बंगालीत लिहीलेलं होतं आणि इंद्राचं शस्त्र असलेल्या वज्राची प्रतिमा होती. त्यानंतर बऱ्याच जणांनी राष्ट्रध्वजाची रचना केली.

मॅडम कामा, विनायक दामोदर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ध्वज तयार केला होता.

 

twitter.com

 

१९१६ साली पिंगली वेंकय्या यांनी तिरंगी झेंड्याचं डिझाईन बनवलं. त्या ध्वजामध्ये राष्ट्रीय ऐक्य दिसले पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती. पिंगली वेंकय्या गांधीजींना भेटले.

गांधीजींनी त्यांना सांगितलं भारताच्या अर्थव्यवस्थेत चरखा खूप मोलाचा आहे तर राष्ट्रीय ध्वजावर चरखा असायला हवा. मग पिंगली वेंकय्या पुन्हा आले. येताना त्यांनी लाल आणि हिरवा रंग आणि त्यावर चरख्याचं चित्र असा ध्वज तयार केला होता.

पण गांधीजींना काही तो मनाला आला नाही. त्यांना असं वाटतं होतं की हा ध्वज भारतातील असलेली सांस्कृतिक विविधता दाखवत नाही.

मग पिंगलींनी परत एक डिझाईन बनवलं. त्यात पांढरा शुभ्र रंग, हा रंग सर्वात वर होता, नंतर मधोमध हिरवा रंग आणि खाली लाल रंग होता.

या लाल रंगात भारतातील अल्पसंख्याक लोक म्हणजे मुस्लिम आणि हिंदू धर्मातील काही जाती यांचं प्रतिक म्हणून ठेवलं होतं.

हा ध्वज स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वापरला जात होता.

 

commons.wikimedia.com

 

पुढं १९१९ मध्ये पिंगलींनी अजूनही बरीच राष्ट्रध्वजाची डिझाईन बनवून दाखवली पण आपल्या भारतातील अनेक रंगांनी भरलेल्या संस्कृतीचा सर्वसमावेशक ध्वज काही तयार करता येईना.

हिंदूंना आपल्या इष्टदेवतेचं म्हणजे विष्णूचं आयुध असलेली गदा तिथं असावी असं वाटत होतं. तर शिखांचं म्हणणं होतं ध्वजात पिवळा रंग ठेवावा त्यांचं प्रतिनिधित्व करायला. हे एकमत काही होईना.

पुढं २ एप्रिल १९३१ ला काँग्रेस पक्षानं ध्वज समिती स्थापन केली. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी. या समितीने आपला तिरंगा ध्वज नक्की केला.

एकंदरीत धार्मिक दृष्टीकोनातून त्यावरील रंग, अशोक चक्र हे निश्चित केलं गेलं.

केशरी रंग हा शौर्य आणि त्याग यांचं प्रतिक म्हणून मानला जातो. पांढरा रंग सत्य आणि शांततेचं प्रतिक तर सुजलाम सुफलाम भूमीचं प्रतिक हिरवा रंग दाखवतो. आणि मधोमध असलेलं अशोकचक्र हे आशावाद दर्शवतं.

पिंगली वेंकय्या यांनी हे डिझाईन निश्चित केलं. भारतीय काँग्रेस पक्षानं ६ ऑगस्ट १९३१ ला हा ध्वज स्विकारला आणि ३१ ऑगस्ट १९३१ रोजी तिरंगा फडकवला.

त्यावेळी या ध्वजाच्या मधोमध अशोकचक्र नाही तर चरखा होता.

 

en.wikipedia.org

 

द हिंदू या वृत्तपत्राने म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या ध्वजातील डिझाईन मध्ये काही बदल करण्यात आले.

भारतीय राज्यघटना समितीने तो ध्वज काँग्रेसचा ध्वज वाटू नये म्हणून त्याच्या मध्यभागी असलेला चरखा काढून टाकायचा निर्णय घेतला. त्याऐवजी तेथे फिरणारे चक्र ठेवायचं ठरवलं.

गांधीजींनी या गोष्टीवर आक्षेप घेतला की, काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून याच तिरंग्याच्या सोबतीने कितीतरी चळवळी, आंदोलनं जिंकली मग तो राष्ट्रध्वज राहीला तर बिघडलं कुठे?

गांधीजी राष्ट्रध्वजाच्या या डिझाईनवर फारसे खुश नव्हते.

पण २२ जुलै १९४७ रोजी भारतीय राज्यघटना समितीने एक बिल पास केले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वजाच्या मधोमध फिरणाऱ्या चाकाऐवजी सारनाथ येथील सिंहमुद्रेवरील अशोकचक्र ठेवायचा निर्णय घेतला.

लैला तय्यबजी ही सुरैया तय्यबजी यांची मुलगी. तिनं लिहीलं आहे की, त्यांची आई सुरैया तय्यबजी हिनं हे राष्ट्रध्वजाचं डिझाईन बनवलं होतं. त्यांनी काही ग्राफीक्स बनवून प्रिंट काढून राष्ट्रपती भवनात पाठवली.

 

indiatoday.in

 

आणि ते सर्वांनाच आवडलं. सुरुवातीला तिनं अशोकचक्र काळ्या रंगाचे बनवले होते पण गांधीजींबरोबर चर्चा करून तो रंग बदलून निळा बनवला.

आज विधानसभेत गेलं तर तिथं ध्वजसमितीमधील लोकांची यादी दिसते त्या यादीत सुरैया बद्रुद्दीन तय्यबजी यांचं नांव सापडतं पण त्यांनी एकटीनं तिरंगा ध्वज बनवला हे मात्र खरं नाही.

राष्ट्रध्वज तयार करताना किती कष्ट घ्यावे लागले आहेत. आपण त्याला १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला पाच रुपयांना विकत आणतो आणि नंतर फेकून देतो.

पण आपला राष्ट्रध्वज अनमोल आहे. तो मिळवण्यासाठी किती जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे..रक्ताने अभिषेक करुन इंग्रजांच्या तावडीतून देश बाहेर काढला आहे.

निदान हा इतिहास आठवून किंवा त्या बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांची आठवण म्हणून तरी आपल्याकडून तिरंग्याचा उपमर्द होऊ नये याची काळजी घेऊ…

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version