आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सूर्यापासून सहाव्या क्रमांकावर असलेल्या या ग्रहावर नेत्रदिपक कडे आणि डझनभर चंद्र आहेत. त्यामुळेच शास्त्रज्ञांना या ग्रहात विशेष रस वाटतो आणि त्याचा अभ्यास करण्याबाबात ते उत्साही असतात.
शास्त्रज्ञच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या आवडीचा ग्रह देखील शनीच आहे. त्याच्याभोवतीचे सुंदर आणि रहस्यमय कडे, त्या ग्रहाला असणारे डझनभर चंद्र आणि रहस्यमय टायटन यामुळे सर्वांनाच शनी या ग्रहाचे आकर्षण असते.
त्याबद्दल जाणून घ्यावेसे सगळ्यांना वाटते. उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या बुध, शुक्र, मंगळ व गुरू प्रमाणेच शनी देखील पुरातन काळापासून लोकांना माहीत आहे.
मात्र डच खगोलशास्त्रज्ञ क्रिस्टियन ह्युगेन्स याने शक्तीशाली दुर्बिणीच्या सहाय्याने १७ व्या शतकात या ग्रहाकडे पाहिले तेव्हा त्याला त्याच्याभोवती असलेले कडे दिसले. तोपर्यंत त्याचे हे वलय मात्र कुणाला दिसले नव्हते.
तेव्हापासून या ग्रहाबद्दल अधिकाधिक माहिती उपलब्ध होत गेली. विशेषतः गेल्या काही दशकांत उपग्रहांच्या, उदा. पायोनियर-२, व्होयाजर्स-१, २, मुळे या ग्रहाबद्दल अधिकाधिक माहिती मिळवता आली.
छोटे दिवस आणि मोठी वर्षे –
शनीचा व्यास हा जवळपास ७२,००० मैलांचा असून शनी हा पृथ्वीपेक्षा नऊपट मोठा आणि गुरु सोडल्यास इतर सर्व ग्रहांपेक्षाही मोठा ग्रह आहे.
इतर ग्रहांप्रमाणेच शनीवर वायूंचे आवरण आहे. यात प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम वायूचे प्रमाण जास्त आहे.
याचा पृष्ठभाग घट्ट, कठीण नाही. परंतु तरी त्याच्या मऊ पृष्ठभागाच्या आतल्या बाजूला खोलवर लोह आणि निकेलसारख्या धातूंचा समावेश आहे.
शनीची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. समुद्रातही शनी आरामात तरंगू शकेल.
शनीग्रह हा पृथ्वीपेक्षा खूप जलदगतीने फिरत असतो. त्यामुळे पृथ्वीवरचा दिवस २४ तासांचा असून शनीवरचा दिवस मात्र ११ तासात पूर्ण होतो.
शनीवरचं वर्ष मात्र पृथ्वीच्या वर्षापेक्षा फार मोठं असतं. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २९ वर्षांहून अधिक काळ लागतो.
शनीचे सूर्यापासूनचे अंतर फार लांब आहे. तो सूर्यापासून जवळपास ९०० मिलियन मैलावर आहे. पृथ्वी आणि सूर्यामधले अंतर फक्त ९३ मिलिअन मैल आहे.
सूर्यापासून इतक्या दूरवर असल्याने अर्थातच शनीवरच वातावरण अतिशय थंड आहे. शनीवरचं तापमान हे मायनस २८८ डीग्री फॅरनहीट इतकं आहे.
पृथ्वीवरून सूर्य जितका प्रखर दिसतो त्यापेक्षा शनीवरून दिसणारा सूर्य हा शंभरपटीने मंद दिसतो.
शनीचे नेत्रदिपक कडे
शनीचे हे कडे कठीण किंवा घट्ट नाही. ते लक्षावधी खडकांच्या आणि बर्फाच्या तुकड्यांनी शनीभोवती कडे केलेले आहे.
हे तुकडे कुठून आले? हा इतका माल त्या कड्यात कुठून आला असेल?
अर्थातच खडे आदळून त्यांची मालिका बनत असते. ज्याप्रमाणे चंद्र आणि एखादा लघुग्रह किंवा धुमकेतू यांच्यात टक्कर होते त्याचप्रमाणे.
आपण जरी याला शनीचे कडे म्हणत असलो, तरी शास्त्रज्ञ मात्र त्याला कड्यांची व्यवस्था म्हणतात. याचाच अर्थ त्या अनेक रिंग्ज असून त्यांच्यामध्ये अंतर आहे.
या रिंग्जना त्यांनी अल्फाबेट्सप्रमाणे ए, बी, सी.. अशी नावे दिली आहेत. पैकी ए,बी,सी ही त्या तीन रिंग्ज साध्या अंगणातल्या मोठ्या टेलेस्कोपमधूनही दिसतात. कारण त्या चमकदार आहेत.
मात्र डी, इ, एफ या रिंग्ज प्रमाणात धुरकट असल्याने त्या इतक्या सहजी दिसत नाहीत.
शनीवरून दिसतात डझनावारी चंद्र – त्यातले काही तर चित्रविचित्र आहेत.
आधुनिक खगोलशास्त्रामुळे वेगवेगळ्या खगोलशास्त्रीय लॅबोरेटरीज आणि विविध उपग्रहं इत्यादींच्या अभ्यासामुळे आज आपल्याला हे कळलं आहे, की शनीवरून जवळपास ८० चंद्र दिसतात.
त्यातील बहुतांश सगळे छोटे छोटे असून ते काही मोजक्या मैलांइतके रुंद आहेत, तर त्यातील तेरा चंद्र हे ३० मैलांहून अधिक मोठे आहेत.
या चंद्रांपैकी ‘मिमास’ नाव असलेला चंद्र हा एक विचित्र चंद्र आहे. त्यात आपल्या चंद्राच्या आकाराच्या एक तृतियांश आकाराचा विस्तीर्ण खड्डा आढळतो.
शनीच्या बर्फाळ पृष्ठभागावर पातळ पाण्यासारखा महासागर असल्याचाही काही खगोल शास्त्रज्ञांचा दावा आहे. आणि या पाण्यात काही जीवनावश्यक असे हायड्रोजन आणि अमिनो ऍसिडसारखी द्रव्यंही असावीत असा त्यांचा अंदाज आहे.
पृथ्वीपेक्षा दाट वातावरणाचा थर –
मिमास आणि एन्सेलड्स यांच्यानंतर शास्त्रज्ञांना आकर्षित करून घेणारी गोष्ट आहे, ती म्हणजे शनीचा अजून एक चंद्र – टायटन. ३२०० मैलाचा व्यास असलेला हा चंद्र म्हणजे सूर्यमालेतला दुसरा सर्वात मोठा चंद्र आहे.
हा चंद्र मर्क्युरी ग्रहापेक्षाही मोठा आहे. आणि हा एकमेव चंद्र असा आहे ज्याच्यावर मुबलक वातावरण आहे.
टायटनच्या वातावरणात नायट्रोजन आणि मिथेनचे मिश्रण आहे आणि ते पृथ्वीपेक्षा ५० टक्क्याने दाट आहे. जर दोन पंख लावून घेतले, तर त्या हवेत लोक उडू शकतील असं खगोलशास्त्री म्हणतात.
पण त्यासाठी तुम्हाला तिथं ऑक्सिजनची गरज लागेल नि एका जाड स्वेटरची असेही सांगायला ते विसरत नाहीत.
जरी आज या टायटनवरील वातावरण मानवी जीवासाठी विषारी असले, तरी कोट्यवधी वर्षांपूर्वी तिथे देखील पृथ्वीवरील वातावरणाशी मिळतेजुळते वातावरण असावे असे त्यांना वाटते.
सन २०३४ साली आपण या टायटनच्या जवळ जाऊन त्याला पाहू शकू. कारण तेव्हा नासाने सोडलेले यानाचे मिशन तिथपर्यंत पोचलेले असेल.
हे यान सोडायला अजून अवकाश आहे. ते सन २०२६ मध्ये सोडले जाणार आहे. जेव्हा ते टायटनपर्यंत पोचेल, तेव्हा ते १० फूट लांबीचे रोबोटिक ड्रोन तिथे तैनात करेल.
हे ड्रोन त्या टायटनवर जवळपास अडीच वर्षे शोध घेत फिरेल आणि आपल्याला तिथल्या वातावरणात असलेल्या रसायनांविषयी माहिती देईल.
या मोहिमेमुळे पृथ्वीवरील मानवी जीवनाचा मार्ग अधिक सुकर होईल. अंतराळाविषयी अधिक ज्ञान प्राप्त होईल. अशी आशा बाळगू या.
शनीविषयी किंवा इतर ग्रहांविषयी तुमच्याकडेही काही रंजक माहिती असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.