“आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात. एक खंबीर, धडाडीचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं आजही पाहिलं जातं. त्यांचे अनेक चाहते आजही त्यांच्या या प्रतिमेच्या प्रेमात आहेत.
तरी देखील त्यांनी घेतलेले काही निर्णय पाहता त्यांच्या या प्रतिमेला तडा जातो हे लक्षात येईल.
मुख्य तर १९७१ च्या पाक बरोबरच्या युद्धानंतर पाक बरोबर केलेला सिमला करार हेच त्याचं मोठं उदाहरण आहे. या करारावरून लक्षात येईल, की इंदिरा गांधी या देखील एक सर्वसामान्य राजकीय नेत्याच होत्या.

परंतु काही हिंदुत्ववादी राष्ट्रप्रेमी लोक त्यांचं कौतुक करतात तर काही सेक्युलर लोक त्यांच्या हुकुमशाहीचा निषेधही करताना दिसतात.
त्याशिवाय त्यांनी अजूनही काही मोठ्या चुका आपल्या राजकीय कारकिर्दीत केल्या आणि त्याची फळं देशाला आणि त्यांना स्वतःलाही भोगावी लागली.
पाहूया त्यांच्या या तीन मोठ्या चुका कोणत्या होत्या –
पहिली चूक – शिमला करार (१९७१) –
१९७१ चं भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती ह्या दोन घडामोडी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या घडामोडी.
या युद्धाच्यावेळी त्यांनी फिल्डमार्शलना आवश्यक ते निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली होती.
खरंतर शिमला येथील करार ही त्यांच्यासाठी सर्वात सोपी परीक्षा होती परंतु दुर्दैवाने त्यात त्याना यश मिळवता आले नाही.
या करारान्वये केवळ भुट्टो यांच्याशी मैत्रीच्या नात्याने त्यांच्यासमोर कोणतीही अट न ठेवता त्यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानचा जिंकलेला मोठा प्रदेश पाकिस्तानला परत केला आणि पाकिस्तानचे जवळपास ९३००० युद्धकैदी सोडून दिले.

मात्र दुर्दैवाने भुट्टो हे भारताला तरीही मित्र नव्हे तर शत्रूच मानत होते. जरा विचार करून बघा, जर त्यावेळी इंदिरा गांधी यांच्याजागी सरदार वल्लभभाई पटेल असते तर!
त्यांनी काय केले असते? एवढंच कशाला, तिथे उलटं चित्र असतं आणि इंदिरा गांधींच्या जागी स्वतः भुट्टो असते तरी त्यांनी भारताचा एवढा जिंकलेला भूभाग आणि युद्धकैदी परत केले असते का?
खरंतर हीच मोठी संधी होती तेव्हा काश्मीर प्रश्न सोडवण्याची. पाकला नमवून त्यांनी ताब्यात घेतलेला कश्मीरचा भूभाग तरी सोडवून घेता आला असता. पाकपुरस्कृत दहशतवाद मोडीत काढता आला असता.
तो निर्माणच झाला नसता कदाचित. परंतु त्यांनी ही संधी गमावली. आणि त्यांची ही चूक भारताला आजपर्यंत महागात पडली. याशिवायही त्या त्यावेळी पाकिस्तानसमोर अनेक अटी ठेवू शकल्या असत्या.
पाकिस्तानच्या सैन्याचे संख्याबळ कमी करण्याची अटही ठेवू शकल्या असत्या. कश्मीरमध्ये पुन्हा कधीच दखलअंदाजी करायची नाही हे वदवून घेऊ शकल्या असत्या.
थोडक्यात ज्याप्रमाणे १९१८ च्या पहिल्या विश्वयुद्धात अमेरिकेने व्हर्सायच्या तहात जर्मनीपुढे असंख्य अटी ठेवून त्यांना नमवले होते.
अगदी तशाच प्रकारे इंदिरा गांधी १९७१च्या युद्धानंतर झालेल्या भारत-पाक युद्धानंतरच्या तहात अटी घालून पाकिस्तानचं कंबरडं कायमसाठी मोडू शकल्या असत्या.
पण त्यांनी ते केलं नाही. सहज सोपं असूनही त्यांनी ती संधी गमावली.

त्यांनी पाकिस्तानला तशा अटी तेव्हा घातल्या असत्या, तर ज्याप्रकारे बांगलादेश मुक्त करता आला, त्याचप्रमाणे पाकिस्तानपासून बलुचिस्तान देखील स्वतंत्र काढून मुक्त करता आला असता.
पाकिस्तानचे दोन ऐवजी तीन तुकडे झाले असते. परंतु ते न केल्यामुळे आज बांगलादेशप्रमाणेच पाकचे सैन्य बलुचिस्तानात अत्याचार करत राहिले.
बलुचि लोकांचा प्रश्न अजूनही तसाच भिजत घोंगडं राहिलं. तिथं पाक सैन्याचं दमन चालूच राहिलं.
दुसरी चूक – आणीबाणी –
त्यांची दुसरी चूक म्हणजे त्यांनी १९७५ मध्ये देशावर लादलेली आणीबाणी. १९७१ मधील निवडणुकीत त्यांचे विरोधक राजनारायण यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यात त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात निवडणुकीच्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणा वापरल्याचा ठपका ठेवला होता.
या राजनारायण यांनी त्यांना नंतर १९७७च्या लोकसभेच्या निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून हरवलेही होते.
१२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची १९७१ मध्ये जिंकलेली निवडणूक ही निवडणूकीतील गैरप्रकारांमुळे रद्द ठरवली.
अनेक तज्ज्ञांच्या मते, ही निवडणूक रद्द ठरवल्यानेच बाईंनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली.

आणिबाणीच्या वेळी पोलिसांना कर्फ्यू लावण्याचे आणि संशयावरून नागरिकांना ताब्यात घेऊन कोठडीत डांबण्याचे अधिकार दिले होते.
सर्व प्रकारच्या माध्यमांवर, प्रकाशनांवर माहिती आणि प्रसारण खात्याकडून नियंत्रण ठेवले गेले होते. त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादली गेली होती.
यातूनच श्रीमती इंदिरा गांधी यांचा कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सत्तेत राहण्याचा हव्यास दिसून येतो. आणि त्यांची महात्मता कमी होते.
तिसरी चूक – भिंद्रनवालेला मोठं होऊ देणं –
१९७० साली पंजाबमधील शीख मतांचे धृवीकरण करण्यासाठी आणि अकाली दल या मुख्य प्रतिस्पर्धी पक्षाला कमकुवत करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी जरनलसिंग भिंद्रनवाले याचे समर्थन केले.
त्यावेळी भिंद्रनवाले हे फार प्रभावशाली व्यक्तिमत्व नव्हते खरंतर. परंतु कॉंग्रेसच्या राजकीय कारवायांनी त्याला ऐंशीच्या दशकात प्रमुख नेत्याच्या स्तरापर्यंत नेले.
कॉंग्रेसनेच हे प्रकरण वाढवले, मोठे केले. त्यातून भिंद्रनवाले हाताबाहेर गेला. त्याचे वर्चस्व आणि देशविघातक कारवाया वाढत गेल्या.

नंतर त्याची मजल स्वतःचे शीख दहशतवादी सैन्य ठेवण्यापर्यंत गेली आणि नंतर भिंद्रनवाले हे प्रकरण खुद्द कॉंग्रेसलाच डोईजड होऊन बसले.
भिंद्रनवालेला पाकिस्तान आणि पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संघटना मदत करून स्वतंत्र राज्यासाठी चिथावणी देऊ लागले होते.
शेवटी सुवर्ण मंदिरात लपलेल्या भिंद्रनवालेवर ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवून त्याला संपवण्याची वेळ इंदिरा गांधींवर आली. यातूनच शीख समाजाचा रोष त्यांनी ओढवून घेतला आणि सन १९८४ मध्ये त्यांची हत्या झाली.
खरंतर इंदिरा गांधी या सक्षम, अनुभवी राजकीय नेत्या होत्या. प्रचंड अनुभव गाठीशी होता.
परंतु त्यांनी या तीन मोठ्या चुका केल्या नसत्या तर देशाचे चित्रही वेगळे असते, त्यांची हत्याही टळली असती आणि त्या एक महान नेत्या म्हणून चिरस्मरणात अजून राहिल्या असत्या. यात शंका नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.