धान्य, भाजी काळजीपूर्वक घ्याल, पण अन्न शिजवण्यासाठी भांडं “योग्य” निवडताय ना? समजून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
स्वयंपाक घरात अनेक प्रकारची भांडी आपण पाहतो. त्यात स्टील, ॲल्युमिनियम, नॉनस्टिक याबरोबरच काही ठिकाणी जुन्या भांड्यांमध्ये तांब्याची, पितळेची भांडी देखील आढळतात.
काही श्रीमंत घरांमध्ये चांदीची भांडी देखील आढळतात. हल्ली आता मातीची भांडी देखील मिळत आहेत, ज्यामध्ये स्वयंपाक केल्यास त्याला एक प्रकारचा स्मोकी फ्लेवर येतो.
परंतु या सगळ्या भांड्यांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा आपण कधी विचार केला आहे का? कुठल्या भांड्यामध्ये अन्न शिजवावे, कुठल्या भांड्यामध्ये अन्न खावे, ज्यामुळे त्याचा लाभ आपल्याला होईल हे आपण पाहू.
भारतीय आयुर्वेद आरोग्य शास्त्राने कुठली भांडी वापरावीत हे सांगितलेले आहे. आपल्या जीवनात खाण्यामध्ये देखील आयुर्वेद असतंच, तसंच ते कोणत्या प्रकारची भांडी वापरावीत यासाठी देखील मार्गदर्शन करतं.
तांबे:
तांब्याचे महत्व पुरातन काळापासूनच भारतीय जीवनशैलीत आहे. तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिल्यास ते एक प्रकारचे हेल्थ ड्रिंक असते.
त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, म्हणूनच रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून ते सकाळी उठून पिण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. बुद्धिमत्ता वाढते.
रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. वाढत्या वयाच्या खुणा दिसत नाहीत, जखमा लवकर भरून येतात. शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.
भात शिजवण्यासाठी तो तांब्याच्या भांड्यात शिजवलेला जास्त चांगला. ज्यामध्ये तांब्याचे औषधी गुणधर्म भातात येतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तांबे हे माणसाच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकते.
तांब्याचे भांडे वापरताना घ्यायची काळजी :
तांबे हे माणसाच्या शरीरासाठी उपयुक्त असले तरी अन्न शिजवताना जर त्याचा वापर होणार असेल, तर कुठलाही आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात शिजवू नये.
कारण त्यामुळे तांब्याच्या भांड्यात रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे अन्न ऍसिडिक होऊन त्याचा त्रास होऊ शकतो.
तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवायच्या आधी ते भांडे आतून कल्हई केलेले असावे. तरच तांब्याचे औषधी गुणधर्म पदार्थात येतील, अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.
पितळ:
बऱ्याच जणांच्या घरात आजीच्या काळातील काही पितळी भांडी असतीलच. ताट, वाट्या, तांब्या,परात,पितळी डबे असतील.
ह्या सगळ्या भांड्यांचा मुख्यतः कंटाळा येतो ते केवळ त्याला स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे. ही भांडी लिंबू वगैरे लावून स्वच्छ करता येतात अन्यथा काळी पडतात.
पितळेच्या भांड्यांचा सगळ्यात जास्त तोटा म्हणजे जर त्याला कल्हई केली नसेल तर त्यामध्ये अन्न शिजवणे किंवा पितळी ताटामध्ये जेवण करणे महागात पडू शकते. अगदी जेवण होईपर्यंत देखील ताटातील भाजीला हिरवा रंग येतो.
अशाप्रकारच्या ताटा मध्ये आम्लयुक्त पदार्थ खाणे देखील रोगाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. ही भांडी शक्यतो धार्मिक कार्यासाठी वापरतात.
पितळी भांडी वापरताना घ्यायची काळजी:
पितळी भांडे वापरतानाही त्यांना आतून कल्हई केलेली असावी. या भांड्यामध्ये अन्न शिजवणे शक्यतो टाळावे. कारण मीठ आणि आंबट पदार्थ जसे, टोमॅटो आणि लिंबू यामुळे त्यात रासायनिक प्रक्रिया होते व त्यातून निघणारे द्रव्य मानवी शरीरास घातक असते.
म्हणूनच शिजवलेले अन्नदेखील पितळी भांड्यात साठवून ठेवू नये.
ॲल्युमिनियमची भांडी:
स्वयंपाक घरात सर्रास आढळली जाणारी भांडी म्हणजे ॲल्युमिनियमची भांडी. त्यामध्ये पातेली, कढई, डबे इत्यादी दिसून येतात.अल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
त्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना ॲल्युमिनियम काही प्रमाणात ॲल्युमिनियमचा अंश आपल्या अन्नात सोडतं. ज्यामुळे किडनीचे विकार होण्याची दाट शक्यता असते.
त्याच बरोबर अनेक वर्ष जर ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजलेलं अन्न खाल्लं गेलं तर अल्झायमर, पार्किन्सन्स हे आजार होण्याचा धोकाही तितकाच जास्त असतो.
ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा मुख्यतः वापर हा बेकिंग साठी केला जातो.
ॲल्युमिनियमची भांडी वापरताना घ्यायची काळजी :
ॲल्युमिनियमच्या भांड्यात शक्यतो पालेभाज्या शिजवू नये. पण जर इतर काही शिजवायचं असेलच तर टोमॅटो सारखे आंबट पदार्थ त्यामध्ये घालू नयेत, कारण आंबट पदार्थ ॲल्युमिनियमला लगेच शोषून घेतात.
जर ॲल्युमिनियमची भांडी वापरायची असतील, तर चांगल्या क्वालिटीचे ॲल्युमिनियम वापरला पाहिजे. जे स्क्रॅच रेझिस्टन्स अनोडाईज्ड ॲल्युमिनियम वापरलं पाहिजे.
सिल्वर (चांदी):
एक मौल्यवान धातू म्हणून आपण चांदी कडे पाहतो. परंतु आपल्या आयुर्वेदातही चांदीच्या भांड्यांचा महत्त्व नमूद केलं आहे. चांदीच्या ताटात जेवण करणे किंवा चांदीच्या पेल्यातून दूध पिणे या आरोग्यासाठी अत्यंत उत्कृष्ट गोष्टी आहेत.
चांदीमुळे माणसाच्या शरीरातील उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. तसेच त्वचेचा रंग आणि पोतही सुधारतो.
लहान बाळांना देखील चांदीच्या वाटीत चांदीच्या चमच्याने दूध दिले जाते. म्हणूनच चांदीची भांडी वापरली पाहिजेत. अगदीच शक्य नसेल तर एखादा चांदीचा नाणं असेल तर दूध गरम करताना दुधाच्या पातेल्यात ते नाणं टाकल्यास त्याचाही उपयोग होतो.
चांदी ही अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे त्या भांड्यांमध्ये अन्न ठेवल्यास ते अधिक फ्रेश राहते. तसेच चांदी मुळे माणसाच्या प्रतिकारशक्तीत वाढ होते. जखमा लवकर भरून येतात.
चांदीची भांडी वापरताना घ्यायची काळजी
मुळातच चांदी हवेच्या संपर्कात आल्यास काळी पडते. परंतु ती भांडी जर वापरत असतील तर अशी भांडी स्वच्छ करायला फारसे कष्ट पडत नाहीत. अगदी थोड्याशा साबणाने देखील ही भांडी स्वच्छ होतात.
म्हणूनच ही भांडी वापरायचे असतील, तर ती वापरायला सुरुवात करावी. फक्त ही भांडी महाग असल्याने त्यांची काळजी स्वतः घ्यावी.
स्टेनलेस स्टील:
आजकालची सगळ्यात उपयुक्त भांडी म्हणजे स्टेनलेस स्टीलची भांडी. सर्वांना परवडेल अशा किमतीत ही भांडी मिळतात. लोखंड, क्रोमियम आणि निकेल या तिन्ही धातूपासून स्टेनलेस स्टील बनतं.
यामध्ये अन्न शिजवणे किंवा अन्न खाणे यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. स्टेनलेस स्टील मध्ये अन्न शिजवल्याने आणि अन्न खाल्ल्याने कोणताही फायदा होत नाही, तसंच कोणतं नुकसानही होत नाही.
हेच या भांड्यांचा वैशिष्ट्य असल्याने ही भांडी स्वयंपाकासाठी उत्कृष्ट समजली जातात. शिवाय या भांड्यांची स्वच्छता करायलाही फारसे कष्ट पडत नाहीत.
स्टीलची भांडी वापरताना घ्यायची काळजी:
स्वयंपाकासाठी जर स्टीलची भांडी वापरायची असतील, तर ती उत्कृष्ट प्रकारच्या स्टीलची भांडी वापरली पाहिजेत. आजकाल बाजारात जाड बुडाच्या कढया मिळत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला पदार्थ करता येतील.
पातळ आणि निकृष्ट दर्जाच्या स्टीलची भांडी जर वापरली तर पदार्थ करपण्याची शक्यता असते, तसेच ते भांड देखील काळं होतं.
नॉनस्टिक किंवा टेफ्लॉनची भांडी:
कमी तेलात बनवला जाणारा हेल्दी पर्याय म्हणून स्वयंपाकासाठी ही भांडी निर्माण करण्यात आली.
खरंतर वापरायला आणि स्वच्छ करायलाही ही भांडी चांगली म्हणून सुरुवातीला यांचं कौतुक फार झालं. परंतु थोड्याच दिवसात त्याचे दोष दिसायला लागले.
ही भांडी जास्त तापवल्यावर त्याचं वरचं असलेलं टेफ्लॉनच कोटिंग निघायला लागतं, आणि तेच आपल्या अन्नामध्ये येतं. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.
म्हणूनच नॉनस्टिकची भांडी वापरणे धोकादायक बनले आहे. आणि आता यातील तज्ञही ही भांडी वापरू नका असा सल्ला देत आहेत.
लोखंडी भांडी:
आरोग्यासाठी उपयुक्त म्हणून लोखंडी भांड्यात स्वयंपाक करायला हवा. या भांड्यात स्वयंपाक केल्याने शरीराला आवश्यक असणारे लोह आपसूकच मिळून जातं. लोखंडी तवा, कढई बाजारामध्ये मिळतातच.
लोखंडी भांड्यामध्ये हिरव्या पालेभाज्या केल्या पाहिजेत. तसेच पोळी, भाकरीसाठी देखील लोखंडी तवा वापरायला हवा. स्लो कुकिंगसाठी ही भांडी उपयोगी पडतात.
फक्त लोखंडी भांड्यात अन्न साठवून ठेवू नये. खूप वेळ जर अन्न लोखंडी भांड्यात राहिलं, तर त्याची चव बदलते.
काचेची भांडी:
बेकिंग करण्यासाठी आणि अन्न काढून ठेवण्यासाठी काचेची भांडी वापरली जातात. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यासाठी देखील ही भांडी उपयोगी पडतात.
गॅसशेगडीवर अन्न शिजवण्यासाठी याचा उपयोग होत नाही. कारण उच्च तापमानाला काचेला तडा जातो आणि भांडी फुटतात. ही भांडी हाताळतानाही खूप काळजी घ्यावी लागते.
मातीची भांडी:
आज-काल मातीची भांडी पुन्हा एकदा वापरात आली आहेत. मानव जन्माच्या उत्क्रांतीच्या काळात ही भांडी वापरली जात होती. आता परत मातीचा तवा, कढई, गाडगे वापरात आले आहेत.
त्यामुळे जेवणाला एक प्रकारचा स्मोकी फ्लेवर येतो. तसेच पदार्थातील कोणतेही पोषणमूल्य वाया जात नाही. या भांड्यांमध्ये तापवलेल्या दुधाला एक वेगळीच टेस्ट असते.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये गाडग्यांमध्ये लावलेलं दही थंडावा देतो. फक्त ही भांडी हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण खाली पडल्यास ती फुटून जातात.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.