' मोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान – InMarathi

मोदींची पं.प्र. पदाची उमेदवारी आणि फेसबुकी राजकीय पंडितांचं हास्यास्पद अज्ञान

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

नुकत्याच राज्यभरातील मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक पार पडल्या. मुंबई मनपाने ह्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं होतं. राजकीय पक्षांनी विविध वळणं घेत घेत राजकारणाचे गडद रंग दाखवायला सुरूवात केली आणि नेहेमीप्रमाणे फेसबुक आणि whatsapp वर राजकीय पंडितांचा फड रंगायला लागला. कुठल्या पक्षाने कुणाला कुठे उभा करावा इथपासून – कुठल्या राजकीय पक्षाचं भवितव्य काय आहे आणि किती वर्षांत एखादा नेता पंतप्रधान/मुख्यमंत्री होईल किंवा नामशेष होऊन जाईल – इथपर्यंत राजकीय भाकितं ह्या गप्पांमध्ये केली जातात. पूर्वी ह्या गप्पा आपापल्या मित्रमंडळीत, चार चौघात होत असत. शिवाय त्यांना वेळ-काळाची मर्यादा देखील असायची. आता फेसबुक मुळे मात्र लिमिटलेस डिस्कशन्स सुरू असतात.

ह्या वातावरणात – एक गोष्ट आठवली. २०१४ निवडणुकीच्या खूप आधी – जेव्हा भाजपचा पं प्र पदाचा अधिकृत उमेदवार घोषित झालेला नव्हता तेव्हाची गोष्ट.

मोदींची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाली १३ सप्टेंबर २०१३ ला. त्या आधी साधारण ६-८ महिने देशभर घमासान होत होतं. मोदी समर्थक ठिकठिकाणी मोर्चे काढत होते, मोदींचे मास्क्स घालून फिरत होते. अडवाणींच्या घराबाहेर झालेला धिंगाणा सर्वांच्या लक्षात असेलच. ह्या सर्वाचं कारण होतं – “मोदींनाच पं प्र उमेदवार घोषित करावं” ही मागणी.

narendra modi delhi army marathipizza
स्रोत: Getty Images

हे सर्व प्रकरण माझ्या फार चांगलं लक्षात आहे, कारण ह्या मोमेंटमला वापरून, त्या वेळी आम्ही एक वेगळी मोहीम चालवत होतो.

भाजपच्या एका अंतर्गत गोटातून मोदींना विरोध आहे हे स्पष्ट होतंच. मोदी समर्थक मात्र मोदीच उमेदवार असणार ह्या हिशेबात वावरत होते. पारदर्शक सूचना/तक्रार प्रणाली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी ह्या हेतूने आम्ही भाजप समर्थकांना सांगत होतो की ही सिस्टीम वापरून तुम्ही तुमची मागणी “अधिकृत” करा, ती ठोसपणे नोंदवा – म्हणजे पक्ष प्रमुखांवर मोदींनाच तो उमेदवार ठरवण्यासाठी दबाव वाढेल.
आमच्यासाठी, अर्थातच, उमेदवार कोण ह्याने फरक पडत नव्हता – आम्हाला आमची सिस्टीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची होती.

असो, यथावकाश मोदींच्या नावाची घोषणा सप्टेंबरमध्ये झाली, मोदी निवडणुकीत निवडून आले पंतप्रधानही आले.

ह्या पार्श्वभूमीवर – नुकतंच एक पुस्तक वाचलं. War Room: The People, Tactics and Technology behind Narendra Modi’s 2014 Win नावाचं. त्यात कळालेली एक माहिती डोळे उघडणारी आहे.

RSS च्या मोहन भागवतांना नरेंद्र मोदी फारसे आवडत नाहीत असं सर्वत्र बोललं जात असे. त्यामागे कारण काही का असेना पण मोदी-भागवत दुकलीमध्ये फारसं सौख्य नाही असं म्हणतात. तरीसुद्धा – भागवतांनी आपलं वैयक्तिक मत बाजूला ठेवून – २०१४ निवडणुकीच्या कित्येक महिने आधीच – नरेंद्र मोदी ह्या नावावर “भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान पदाचा उमेदवार” म्हणून मोहर उमटवली होती. गुप्तपणे झालेला हा निर्णय अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी लोकांना माहिती होता. संघाच्या विश्वासू लोकांवर हा निर्णय ठिकठिकाणचे कार्यकर्ते आणि “इच्छुक” भाजप नेत्यांच्या गळी उतरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अनेकांना चांगलंच आठवत असेल की अडवाणींची महत्वाकांक्षा अजूनही जागृत होती.

Modi-Advani-marathipizza
स्रोत: PTI

वयाच्या ८८ वय वर्षी त्यांना भारताचा पंतप्रधान म्हणून जगभर ओळख मिळवायची होती. पक्षातर्फे घोषणा होण्याच्या फक्त १ दिवस आधी त्यांना मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळवलं गेलं आणि दुसऱ्याच दिवशी अधिकृत घोषणा झाली.

म्हणजेच – सप्टेंबर महिना उजाडेपर्यंत, पक्ष आणि संघटनेतील प्रत्येक विरोधकावर साम-दाम-दंड-भेद वापरून निर्णयाचा पाया पक्का केला गेला. सर्वात शेवटी अडवाणींना “निर्णय घेतला गेला आहे” हे कळवलं गेलं आणि दुसऱ्याच दिवशी (१३ सप्टेंबर रोजी) अधिकृत घोषणा झाली.

हा फक्त एक भाग झाला.

दुसरीकडे, मोदींच्या नावावर फक्त अंतर्गत निर्णय झाल्या झाल्याच मोदींनी नेमकं कुठल्या मैदानात उतरायचं – कुठून निवडणूक लढवायची – ह्यावर विचारमंथन सुरू झालं होतं. विविध लोकसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू झाली होती. धर्म-जात ह्यांची आकडेवारी अभ्यासणं सुरू झालं होतं. कित्येक आठवड्यांच्या खलानंतर वाराणसी ची जागा मुक्रर झाली होती.

देशभर “भाजप चा पं.प्र.उमेदवार कोण?” ह्यावर घमासान होत असताना – संघ-भाजपचा अंतर्गत निर्णय होऊन ही गेला होता आणि बॅकग्राऊंडवर काम सुरू देखील झालं होतं.

ही माहिती वाचताना आपले फेसबुकी राजनीती-तद्न्य आणि पक्ष कर्ते डोळ्यासमोर तरळून गेले. एकीकडे तज्ज्ञांची गंमत वाटली आणि पक्ष कार्यकर्त्यांबद्दल कीव आली.

वॉर्डातल्या नागरसेवकापासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत – आम्हाला सर्वांचं राजकारण कळतं – हा भलताच ओव्हर कॉन्फिडन्स असतो ह्यांना. पण राजकारण फार वेगळ्या लेव्हलवर चालत असतं. त्याचा थांग आम्हाला कधीच लागत नाही. तरीही रेटून बोलतात!

दुसरीकडे, पक्ष कार्यकर्ते, “आपला पक्ष” म्हणून एखाद्या नेत्यासाठी किंवा ideology साठी त्या त्या पक्षाला खांद्यावर-डोक्यावर उचलून धरतात. पक्षासाठी, नेत्यासाठी लाठ्या खातात…

lathi charge marathipizza

पण महत्वाचे निर्णय त्यांच्या हाती अजिबात नसतात. मोजक्याच “श्रेष्ठींच्या” हाती असतात. केवळ जिंकण्याची शक्यता बघून नेता निवडला जातो – त्या मागे पक्ष समर्थकांचा विचार नसतो…हे केविलवाणं सत्य आहे.

पण पक्ष समर्थक ही जमतच भोळी, आशावादी असते. कुठ्ल्याक पक्षाचे समर्थक असेना…ते असेच असतात. त्यामुळे त्यांच्याबाबतीत हे स्वाभाविक आहे. “राजकीय विश्लेषक” तर हुशार असतात (?) ना? त्यांना देखील ह्या कटूसत्याचा विसर पडावा हे हास्यास्पद आहे!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?