Site icon InMarathi

बंदुकीच्या गोळीने लोक मरतात – पण भारतीय हॉकी संघाच्या या कॅप्टनचा “पुनर्जन्म” झाला…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

काही काही लोकांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतं, पण त्यातूनच ते खूप काही शिकतात आणि स्वतःची वेगळी ओळख तयार करतात. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संदीपसिंग भिंदर हा त्यापैकीच एक.

पंजाब मधील संदीपसिंग भिंदर हा लहानपणापासूनच हॉकीच्या प्रेमात. भारताच्या हॉकीच्या टीम मध्ये आपले स्थान निर्माण करायचं त्याचं स्वप्न. आणि त्याप्रमाणे तो भारताच्या टीम मध्ये दाखल झाला.

२००४ साली झालेल्या अझलनशहा सुलतान हॉकीकप साठी तो पहिल्यांदा क्वालालंपूर मध्ये खेळला. त्यानंतर त्याने भारतीय हॉकी टीम मधील आपलं स्थान पक्क केलं.

 

zeenews.com

२००६ मध्ये जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक हॉकी स्पर्धेत तो भारतात कडून खेळणार होता. जागतिक स्तरावर भारताकडून खेळायचं त्याचं स्वप्न आता दोनच दिवसात पूर्ण होणार होतं.

दोनच दिवसात तो जर्मनीला रवाना होणार होता. त्याचसाठी तो आपल्या टीमला जॉईन होण्यासाठी २२ ऑगस्ट २००६ मध्ये शताब्दी एक्सप्रेसने निघाला होता.

प्रवास करीत असताना त्याच ट्रेनमधून प्रवास करत असणाऱ्या भारतीय सैन्यातील एका जवानाकडे असलेल्या बंदुकीतून चुकून एक गोळी सुटली आणि ती नेमकी संदीप सिंगला लागली. यात तो गंभीर जखमी झाला.

संदीप सिंह जो दोन दिवसानंतर हॉकीच्या मैदानावर दिसणार होता, तो त्या गोळीच्या झालेल्या जखमांमुळे अर्धांगवायुने गर्भगळीत होऊन व्हील चेअरवर बसला होता. जणूकाही त्याच विश्वच एका जागी थांबलं होतं.

 

sportskeeda.com

 

भारत देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी असून देखील हॉकी आणि हॉकी खेळाडूंना क्रिकेट खेळाडूंप्रमाणे ग्लॅमर प्राप्त नाही. ना ही तितकी प्रसिद्धी, ना ही तो पैसा यांच्या नशिबात येतो. त्यामुळेच त्यांची आर्थिक परिस्थिती देखील फारशी चांगली नसते.

परिस्थिती कशी असते पहा. संकट एका वेळेस एक येत नाही तर ती एका मागोमाग येतात.

संदीप सिंह हा असा अधू होऊन आजारी पडला. त्याला खेळता येणार नव्हते. या अपघातामुळे जवळ असलेली पुंजी उपचारांमध्ये संपली आणि त्याच वेळेस घर मालकाने घर खाली करा असे सांगितले.

त्यानंतर तो कठीण काळ देखील संदीप सिंह आणि त्याच्या कुटुंबाने झेलला. काही चांगल्या लोकांनी त्यांना मदतही केली. त्यातूनच जगण्याची उमेदही निर्माण झाली.

संदीप सिंह टीव्हीवर जेव्हा एखादी हॉकी मॅच पाहायचा, तेव्हा आतूनच तुटायचा. आपण त्या ग्राउंडवर नाही या कल्पनेनेच त्याला रडू कोसळत असे. त्यावेळेस ग्राउंडवर जाऊन हॉकी खेळायचे आहे इतकंच त्याच्या मनात यायचं.

एके दिवशी अशीच संदीपने टीव्हीवर एक हॉकीची मॅच पाहिली आणि त्याने आपल्या भावाला सांगितले की, “माझी हॉकी स्टिक मला दे. हॉकी स्टिक घेऊन मला झोपी जायचे आहे. मला परत हॉकी खेळायची आहे मला माझं करिअर हॉकीतच करायचं आहे”.

 

youtube.com

 

खरंतर त्या वेळेस संदीप सिंह याची अवस्था फार वाईट होती. बंदुकीच्या गोळीने एकूण तीन ठिकाणी त्याला जखमा झाल्या होत्या. त्याचं वजन फक्त ५५ किलो वर आलं होतं, शरीरातील स्नायुंमध्ये ताकत नव्हती.

अंगात प्रचंड अशक्तपणा होता. कुणाच्याही मदतीशिवाय उभे राहणे देखील शक्य नव्हतं.

शारीरिक दृष्ट्या इतका असक्षम झालेला संदीप सिंहला पाहून, हा परत हॉकीमध्ये गगन भरारी घेईल असं कुणालाही खरं वाटलं नसतं. परंतु हळूहळू तो चालायला शिकला आणि मग पळायची प्रॅक्टीस चालू केली.

जवळजवळ सात महिने प्रॅक्टिस केल्यानंतर त्याची झोनल टीम मध्ये निवड झाली आणि ती मॅच त्याच्या टीमने जिंकली. त्यानंतर त्याची निवड परत भारतीय संघात झाली. आणि २००९ मध्ये त्याला भारतीय हॉकी संघाचा कप्तान करण्यात आले.

त्या वर्षी झालेल्या अझलनशहा हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये मलेशियाचा पराभव भारतीय हॉकी संघाने केला. यात सिंहाचा वाटा होता तो संदीप सिंहाचा.

 

sportskeeda.com

 

त्याने त्या टूर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त गोल केले. त्यावेळेस तो त्याच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होता त्याचा पळण्याचा वेगही जास्त होता.

त्यानंतर २०१२ मध्ये जवळजवळ आठ वर्षांनी भारतीय संघाची इंग्लंड मधील समर ऑलिंपिक्स मधील निवड करण्यात आली. ह्या समर ऑलिंपिकमधील अंतिम सामन्यात भारताने फ्रान्सचा ८-१ अशा गोलने पराभव केला.

यामध्ये संदीपसिंहने पाच गोल केले आणि त्यात एक हॅट्रिक सुद्धा समाविष्ट आहे. संदीप सिंह त्या समर ऑलिम्पिकचा स्टार गोलर होता. त्या टूर्नामेंटमध्ये त्याने एकूण १६ गोल केले.

हॉकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय आयपीएल प्रमाणेच हॉकी मध्ये देखील लीग मॅचेस खेळण्याचे ठरवण्यात आले. २०१४ मध्ये संदीप सिंहला ६४४०० USD अशी सगळ्यात जास्त बोली लावून मुंबई मॅजिशियनने विकत घेतले.

नंतर २०१६ मध्ये रांची रेज ने ८१००० USD डॉलर्स इतकी बोली त्याच्यासाठी लावली.

 

wikibio.com

 

भारतासाठी हॉकी खेळायचे त्याचे स्वप्न त्याने पूर्ण केलं, पण हा प्रवास खरोखरच कठीण होता. अगदी त्याच्याच भाषेत सांगायचं तर,

“तुमची स्वप्न जादूने पूर्ण होत नाहीत, त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते एकाच ध्येयासाठी काम करावं लागतं, घाम गाळावा लागतो. कितीही संकटे आली तरी त्यांचा हसत सामना केला तरच आपल्याला ती संकटे परतवून लावायची शक्ती प्राप्त होते.”

संदीप सिंह आता अनेक ठिकाणी प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी जात असतो. ज्या लोकांवर संकट कोसळले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी तो धीर देतो.

त्याच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ-उतार येतात, पण तुम्ही त्याला कसे सामोरे जाता हेच महत्त्वाचे आहे.

 

scroll.in

 

संदीप सिंहने स्वतःच्या आयुष्यात हे करून दाखवले आहे. एक गोळी लागली, त्याचं आयुष्य, त्याचं करिअर पणाला लागलं. पण म्हणून हातपाय गाळून तो बसला नाही.

भारतीय टीम मध्ये खेळायचे त्याचे स्वप्न तर त्याने पूर्ण केलंच पण त्याचबरोबर भारतीय टीमचा कप्तान देखील तो झाला. आणि भारताला विजय मिळवूनही दिला.

संदीप सिंह याची हीच प्रेरणादायी गोष्ट आता रुपेरी पडद्यावरही दिसली आहे. त्याच्या जीवनावर आधारित ‘सुरमा’ हा सिनेमा बघायलाच हवा. सोनी इंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. दिलजीत दोसांज आणि तापसी पन्नू यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version