औरंगजेबाची अनैतिहासिक भलामण – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुखाकडून…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
लेखिका : शेफाली वैद्य
===
पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी दैनिक लोकसत्ता मध्ये ‘साक्षर ज्ञानशत्रूंचा किफायतशीर धंदा’ ह्या विनोदी शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला एक लेख वाचला.
शीर्षक विनोदी का आहे हे लेखाच्या शेवटी सांगेन. पण त्या लेखात डॉ. कुंभोजकरांनी औरंगजेब ह्या धर्मांध मुघल बादशहाची सेक्युलर भलावण करण्यासाठी म्हणून खालील शब्द दिलेले आहेत,
भारत इतिहास संशोधक मंडळानं प्रसिद्ध केलेल्या ऐतिहासिक फार्सी साहित्यात १६९१ या वर्षीची औरंगजेबाची राजाज्ञा दिलेली आहे, तिचा अर्थ असा – “…मठ उद्ध्वस्त करू नये, मत्ता जप्त करू नये…जातीत्वाची हीन भाषा बोलू नये.”

ते वाचून मी डॉ. कुंभोजकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंना एक ईमेल लिहिली त्यात मी त्यांनी उद्धृत केलेल्या ‘औरंगजेबाच्या राजाज्ञे’ चे पुरावे मागीतले होते.
त्यांनी मला उत्तरादाखल दोन फोटो पाठवले आणि ’तुम्ही माझ्या लेखाचा हवंतर प्रतिवाद करू शकता’ अशी उदार परवानगी दिली म्हणून हे उत्तर.
बरोबर त्यांनी पाठवलेले फोटोही जोडत आहे, शिवाय त्यांना फेसबुकच्या माध्यमातून टॅगही केले आहे.
खरंतर हा संपूर्ण लेख प्रतिवाद करण्याच्या लायकीचा नाही. अत्यंत असंबद्ध विधानांनी ठासून भरलेल्या ह्या लेखात लेखिकेला काय म्हणायचे आहे, किंवा खरंच काही म्हणायचे आहे का हेच कळत नाही. एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही.
वेबिनार सप्ताह, यीस्ट घालून आंबवलेले पदार्थ, ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळ, संतसाहित्य, नथ घालून काढलेले फोटो, स्कायलॅब, पापड-कुरडया इत्यादी अत्यंत विसंवादी गोष्टींनी भरलेला हा लेख खरंतर सकाळच्या ‘मुक्तपीठ’ मध्येसुद्धा छापून येण्याच्या लायकीचा नाही.
एरवी मी हा लेख विनोदी साहित्य मानून सोडून दिला असता!
पण डॉ. कुंभोजकरांनी ‘औरंगजेबाची राजाज्ञा’ हे शब्द वापरून वाचकांची जी काही जाणूनबुजून ऐतिहासिक दिशाभूल करायचा प्रयत्न ह्या लेखातून केलाय तो अक्षम्य आहे.
काशी-मथुरा येथली मंदिरे जमीनदोस्त करणाऱ्या
हिंदूंवर जिझिया बसवणाऱ्या
मुसलमान होत नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांना ठार मारणाऱ्या
अगदी कोवळ्या वयाच्या शिख गुरु गोबिंदसिंघांच्या तीन पुत्रांना, म्हणजे तीन साहिबजाद्यांना मुसलमान होत नाही म्हणून भिंतीत चिणून मारणाऱ्या
औरंगझेब ह्या क्रूर, धर्मांध, काफिर-द्वेष्ट्या मुघल बादशहाचे सेक्युलरीकरण करण्याच्या नादात आपण आपल्या विषयाशी म्हणजे इतिहासाशी घोर प्रतारणा करतोय याचे भान डॉ. कुंभोजकर यांना राहिलेले नाही, म्हणूनच त्यांनी कुठलेतरी त्यांना सोईस्कर असे एक फारसी कागदपत्र निवडून ते सरळ ‘औरंगझेबाची राजाज्ञा’ म्हणून दडपून दिलेले आहे.

डॉ. कुंभोजकरांच्या दुर्दैवाने खुद्द औरंगझेब त्यांच्याइतका ढिसाळ नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या सर्व फर्मानांचे म्हणजे राजाज्ञांचे रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत आणि त्या अधिकृत फर्मानांमध्ये कुठेही हे फर्मान सापडत नाही.
इथे हे नमूद केले पाहिजे की मुघली दरबारातील फारसी कागदपत्रे मुखत्वे तीन प्रकारची असतात.
‘रॉयल फिरमान’ म्हणजे खुद्द बादशहाने सही-शिक्क्यानिशी काढलेले अधिकृत फर्मान, राजाज्ञा.
बादशाह सोडून इतर कुठल्याही मुघल बादशाही कुटुंबातील सदस्याने अधिकाऱ्यांना दिलेला हुकूम म्हणजे निशाण’ आणि खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना दिलेल्या तात्कालिक ‘ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर्स’ म्हणजे परवाना.
परवाना म्हणजे राजाज्ञा नव्हे.
ज्या पुस्तकाचा संदर्भ डॉ. कुंभोजकरांनी दिलाय त्याच पुस्तकात शाही फर्मान म्हणजे काय, ते कसे ओळखायचे असते ह्याचे उत्तम विवेचन दिलंय.
ते पाहता स्पष्ट होते की डॉ. कुंभोजकरांनी ‘औरंगजेबाची राजाज्ञा’ म्हणून जे शब्द खपवायचा प्रयत्न केलाय तो हुकूम म्हणजे केवळ एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे, तीसुद्धा खालच्या दर्जाच्या कुणी अधिकाऱ्याने काढलेली.
बरं ती ही ऑर्डर डॉ. कुंभोजकर यांनी मोठ्या धूर्तपणे आपल्या सोयीचे शब्द वेचून काढून छापलेली आहे, तीही थेट ‘औरंगझेबाची राजाज्ञा’ असे शब्द वापरून.
डॉ. कुंभोजकरांनीच दिलेला पुरावा पूर्णपणे वाचला तर लक्षात येईल की ज्या विदर्भातल्या माणसांनी तक्रार केली आहे ती केवळ त्यांच्या विशिष्ट मठासंदर्भात आहे.
त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे कागद पत्र असून देखील –
‘इतर ब्राह्मण, संन्यासी, जोगी, इनामदार वगैरे त्रास देतात, जो स्वखुशीने शिष्य होतो त्याला जातीबाहेर टाकतात, हीन जातित्वाची तोहमत घेतात’
– त्याला उत्तर म्हणून जो परवाना काढलेला आहे
आणि जो केवळ ‘वऱ्हाड सुभ्याच्या अधिकाऱ्यांच्या गुमास्त्यां’ साठी आहे हे सुरवातीलाच स्पष्ट लिहिलेले आहे तो लिमिटेड परवाना म्हणजे ‘औरंगझेबाची राजाज्ञा’ कशी काय होऊ शकते?
दुसरी गोष्ट, संदर्भ सोडून ह्या परवान्यातल्या आपल्या सोयीच्या ओळी छापताना डॉ. कुंभोजकर यांनी ‘वरील कागदपत्र असल्याने ह्यांच्या समाजास कुणीही त्रास देऊ नये’ हा भाग पूर्णपणे गाळलेला आहे.
तो भाग धरून ही ऑर्डर वाचली की स्पष्ट होते की डॉ. कुंभोजकरांनी दिलेल्या ओळी म्हणजे ‘औरंगजेबाची राजाज्ञा’ तर नाहीच उलट पूर्ण हिंदू रयतेसाठी अधिकाऱ्यांना दिलेली आज्ञाही नाही.
एका अत्यंत किरकोळ विभाग स्तरावरच्या एका समाजाच्या तक्रारीचे ते निरसन आहे.
त्या ऑर्डर मधला स्वतःच्या सोयीचा भाग तेव्हढा वापरून औरंगजेबाचे सेक्युलरीकरण करणे म्हणजे एक केविलवाणी बौद्धिक कसरत तर आहेच, पण ऐतिहासिक सत्याचा जाणून बुजून केलेला विपर्यास आहे.
दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हा विपर्यास करणारी व्यक्ती कुणी हौशी लेखिका नसून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित आणि ज्ञानदानाची उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेमध्ये इतिहास विषयाची विभाग प्रमुख आहे.

औरंजेबाच्या धर्मांधते विषयी, त्याने हिंदूंवर, जैनांवर, शिखांवर केलेल्या अत्याचाराविषयी चकार शब्द न काढता त्याचे सेक्युलर व्हाईटवॉशिंग करण्यासाठी म्हणून जाणूनबुजुन ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करून लिहिलेल्या ह्या लेखाला डॉ. कुंभोजकरांचेच शब्द वापरून ‘साक्षर ज्ञानशत्रूंचा किफायतशीर धंदा’ असे म्हणता येईल.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.