' तुम्हाला ‘या’ गोष्टीची “चटक” पारशी लोकांमुळे लागली, हे माहित आहे का? – InMarathi

तुम्हाला ‘या’ गोष्टीची “चटक” पारशी लोकांमुळे लागली, हे माहित आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फास्टफूड सोबत कोल्डड्रिंक किंवा सोडा ही गोष्ट सर्रास घेतली जाते. मॅकडॉनल्ड मध्ये बर्गर खायला गेलं की ओघाने फ्रेंच फ्राइज आणि एक कोकाकोला किंवा तत्सम कोल्डड्रिंक लोकं आवर्जून घेतात.

एका विशिष्ट फॉर्म्युला वर चालणाऱ्या ह्या सॉफ्टड्रिंक कंपन्या करोडो रुपयांचा नफा कामावतात. अत्यंत क्षुल्लक किमतीत ही ड्रिंक्स बनवून ती बाजारात चौपट किंमतीला विकली जातात!

 

 

तरी आपल्या इथे कोल्डड्रिंक ची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये..पहिले कोकाकोला आणि पेप्सी ह्या कंपन्यांची ह्या क्षेत्रात मक्तेदारी होती, पण आता पारले किंवा अमूल सारख्या कंपन्यांनी हयात उडी घेतली आहे!

 

soft drinks inmarathi

 

पण ह्या सॉफ्टड्रिंक, सोडा ह्यांची ओळख आपल्याला कुणी करून दिली तुम्हाला ठाऊक सुद्धा नसेल. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

पारसी समुदाय, होय होय अगदी बरोबर वाचलंत, पारसी समुदायानेच आपल्या देशातल्या लोकांना सॉफ्टड्रिंकची चटक लावली! 

मुंबई, कलकत्ता, अहमदाबाद, निजामाबाद अशा विविध ठिकाणी पारसी कुटुंबियांनी या व्यवसायात उडी घेऊन ही पेये यशस्वीपणे विकून लोकांना त्याची चटक लावली होती.

भारतातील सॉफ्ट ड्रिंक व्यवसायाचा पसारा –

गेल्या दोन शतकांमध्ये भारतात कोल्ड्रिंक्सचा उद्योग हा ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचलेला आहे.

कोल्ड्रींक्स भारतात लोकप्रिय होत असताना पारसी सोडा या ड्रिंकचे साम्राज्य भराभर लोकप्रिय होत गेले होते.

कोका कोला, पेप्सीसारख्या जुन्या कंपन्या भारतात येण्यापुर्वीच पालनजींनी १८६५ मध्येच भारतात पारसी सोडा आणला होता.

त्याच्या दोन दशकांनंतरच दिनशॉजी पांडोल यांनी पारसी क्रिकेट संघासह इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यांनी वापरलेल्या क्रिकेट बॉलच्या ब्रॅन्डच्या नावावर ड्यूक्स सोड्याची स्थापना केली.

 

dukes soda inmarathi

==

हे ही वाचा : पारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं कारण, इतिहासाचा एक वेगळाच अध्याय

==

 

ड्यूक्सचा रासबेरी सोडा अधिक प्रसिद्ध झाला. सुरुवातीला या सोड्याच्या एक डझन बाटल्यांची किंमत १२ आणे होती.

त्यानंतर पाश्चात्य देशात लोकप्रिय असलेला ‘रॉजर्स’ हा ब्रॅन्ड देखील पारसी गुंतवणुकदारांनी सन १९१५च्या सुमारास विकत घेतला.

तरीही ‘पारसी सोडा’ हा चांगलाच लोकप्रिय होता. तो केवळ मुंबईतच नव्हे, तर कलकत्त्यापासून ते कालिकत पर्यंत विकला जात असे. काहींनी तर देशाच्या बाहेर देखील आपला व्यवसाय वाढवला होता.

१९२० नंतर सिंगापूरमध्ये या पारसी सोडाला टक्कर देणारे दोन ब्रॅन्ड उदयाला आले होते. फ्रॅमरोज आणि फिनिक्स. या ब्रॅन्डने चीन आणि मलेशियामध्ये जोरदार जाहिरात करून तिथले आपले स्थान बळकट केले होते.

इराणी हॉटेल्स आणि सॉफ्ट ड्रिक्स –

भारतात, विशेषतः मुंबईसारख्या शहरांत त्या काळी खूपच प्रसिद्ध असलेल्या ईराणी हॉटेल्समधून हा सोडा मिळत असे.

 

irani hotel and soda inmarathi

 

भारतातील एकेकाळी लोकप्रिय असलेली ईराणी हॉटेल्स हळू हळू कशी बंद पडत गेली याबद्दल तुम्ही वाचलेच असेल. कारण काळानुसार त्यांच्या नफ्याचे मार्जिन कमी होत गेले होते.

अशा वेळी पी. धुनजीभॉय अँन्ड सन्स यांनी १९७० च्या काळात अहमदाबाद येथे बैलगाडीवरून वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चविष्ट सॉफ्ट ड्रिंक्स विकून ते प्रसिद्ध केले होते.

दक्षिणेकडील हैदराबाद शहराजवळील निजामाबाद येथे अशाच प्रकारे रोहिंतन मलोरिया यांच्या कुटुंबाने दुचाकीवरून वेगवेगळी सॉफ्ट ड्रिंक्स वितरीत करून त्यांना लोकप्रिय केले होते.

सकाळीच त्यांचे कर्मचारी एकाच सायकलवर चार क्रेट बाटल्या व्यवस्थित नेऊन त्या वितरीत करत असत.

काचेच्या बाटल्या आणि सोडा –

तेव्हा हे सॉफ्ट ड्रिंक्स काचेच्या बाटल्यांमध्ये विकले जात असत. या काचेच्या बाटल्या महाग पडायच्या. शिवाय त्या फुटायच्याही अधिक.

म्हणून या मरोलिया कुटुंबाने शक्कल लढवली आणि बाटलीचा तळ सपाट न ठेवता तो गोल करून घेतला. त्यामुळे बाटली सरळ उभी ठेवता येत नसे.

 

vintage soda bottles inmarathi

 

मग गिऱ्हाईक त्यातील पेय एकाच वेळी आणि लवकर सगळं संपवून मग बाटली परत करत असे.

मरोलिया कंपनीच्या या गोल तळ असलेल्या बाटल्यांमुळे त्यांचा व्यवसाय १९५०च्या दरम्यान इतर पारसी कंपनींच्या व्यवसायापेक्षा अधिक चांगला चालू लागला.

अगदी ड्यूक आणि रॉजर्स या ब्रॅन्डनाही त्यानी मागे ढकललं होतं.

किक आपू –

रॉजर्सचे माजी सरव्यवस्थापक नोशिर लंगरानांनी सांगितले की त्यांनी ‘किक आपू’ या नावाने देखील एक ड्रिंक बाजारात आणले होते.

हा शब्द गुजराती असून त्याचा अर्थ ‘किक किंवा नशा देणारे’ असा होतो. हे पेय पायनॅपल फ्लेवरचे होते.

त्यानंतर ड्यूक्सने आंब्याच्या फ्लेवरपासून बनलेले सॉफ्ट ड्रिंक्स ‘मॅंगोला’ बाजारात आणले आणि तेही खूप लोकप्रिय झाले.

 

dukes mangola inmarathi

==

हे ही वाचा : चहा आणि बन मस्का – आजही जीभेवर रेंगाळणारी चव देणाऱ्या इराणी कॅफेचा इतिहास…

==

 

ही भारतीय सॉफ्ट ड्रिंक्स कंपन्यांमधील चढाओढ होती. आणि या सर्व कंपन्या या पारसी मालकांच्याच होत्या.

कोला आणि पेप्सी कंपन्यांचा भारताच्या बाजारात शिरकाव –

मात्र त्यानंतरच्या काळात, म्हणजे नव्वदच्या दशकांत बाजारात आलेल्या नवीन धोरणामुळे मल्टीनॅशनल कंपन्या बाजारात आल्या आणि त्यांनी या सर्व भारतीय मोनोपॉलीवर कबजा करायला सुरूवात केली.

यातूनच कोको कोला आणि पेप्सी या दोन ब्रॅन्डनी त्या सुरूवातीच्या काळात मुसंडी मारली. त्यांची जोरदार जाहिरात केली आणि भारतीय ड्यूक्स आणि रॉजर्स या कंपन्यांना शह दिला.

 

pepsi coke inmarathi

 

१९९४ साली पेप्सीने ड्यूक्स कंपनी ताब्यात घेतली. आणि ड्यूक्सचा रासबेरी सोडा बाजारातून गायब झाला.

आज पेप्सीला ड्यूक कंपनी विकून २५ वर्षे उलटल्यावरही ड्यूक कंपनीचे मालक नवल पांडोले यांना त्याचे वाईट वाटते.

रॉजर्स कंपनी –

डी दारूखानावाला आणि हेन्री रॉजर्स यांनी भारतात प्रथम सॉफ्ट ड्रिंक्सची फॅक्टरी टाकली होती. ही कंपनी टाकण्यामागे नफा कमावण्याच्या हेतूपेक्षा त्यांच्या भावना अधिक जोडलेल्या होत्या.

परंतु रासबेरी सोडा या लोकप्रिय पेयाचा असा अंत व्हावा का? ते पूर्णपणे लयाला गेले का?

पालनजी कंपनीचे आताचे मालक पीवी सोलंकी मात्र या विषयाबाबत इतके निराश नाहीत.

या व्यवसायातील पारंपरिक उद्योजक हा पारसी समाज होता आणि तो या व्यवसायातून बाहेर पडला तरी इतर समाजाने त्यात रस दाखवला.

आज लोक याला रेट्रो म्हणजेच जुन्या काळातले ड्रिंक समजतात. अजूनही ईराणी कॉफी शॉपमध्ये आल्यावर लोक या पेयाची मागणी करतात.

अशाप्रकारे एकेकाळी लोकप्रिय असलेले हे ‘रासबेरी सोडा’ पेय नंतर लोकप्रियतेच्या उतरणीला लागले आणि आता ते पुन्हा लोकांच्या मागणीत प्रवेश करते झाले आहे.

 

rogers soda inmarathi

 

अशा रितीने या पेयाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

पालनजींच्या या पेयांची विक्री आता लंडनमध्ये केली जाते. तिथल्या डिशूम सारख्या ट्रेंडी रेस्टॉरंटमध्ये याची विक्री सुरू झाली आहे.

सोलंकी म्हणतात, आम्ही याची काहीही जाहिरात करत नाही. तरीही ग्राहक या पेयाची मागणी करत राहतात.

या पेयात कोणत्याही फळांचा रस नाही अशी प्रामाणिक जाहिरात करणारे पालनजी कंपनीचे हे पेय आजही त्याच जुन्या काचेच्याच बाटलीत मिळते.

==

हे ही वाचा : फाळणी नंतरही दोन्ही देशांची मूळ “रुह” कायम ठेवणाऱ्या रुहअफजाचा इतिहास

==

अशा प्रकारे भारतातील सोडा प्रकारातील सॉफ्टड्रिंकचा पाया भारतात पारसी कंपन्यांनी कसा घातला आणि त्यात पारसी कंपन्यांचा हातभार कसा होता याची आपल्याला रंजक माहिती मिळते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?