आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
नितळ आणि मुलायम त्वचा ही प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. वाढीला लागल्यानंतर बहुतेक सगळे जण आपल चेहरा कसा छान राहील. त्वचा कशी तजेलदार आणि तुकतुकीत होईल याची खूप काळजी घेतात.
वेगवेगळ्या क्रीम्स, लेप, आयुर्वेदीय उपचार या सगळ्या गोष्टी प्राधान्याने करतात. वेगवेगळे ब्यूटी प्राॅडक्ट, सौंदर्योपचार हे सारं काही नितळ आणि मुलायम त्वचा हवी यासाठी.
कुणी फेशिअलचे वेगवेगळे प्रकार आजमावतं, फ्रूट फेशिअल, गोल्ड फेशिअल. अँटी एजिंग क्रीम, नाईट क्रीम, वेगवेगळ्या फेसपॅकचा वापरतं!
चेहऱ्यावर पिंपल्स आहेत तर त्यासाठी वेगळी औषधं, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स अशा विविध तक्रारी नी त्यावर विविध पर्यायी औषधं, क्रीम हे सर्रास वापरलं जातं.
काही वर्षांपूर्वी म्हणजे जेंव्हा जागतिकीकरणाच्या रेट्यात जग आलं नव्हतं तोवर सौंदर्य प्रसाधने म्हणजे फक्त क्रीम, पावडर, काजळ आणि क्वचितच लिप्स्टीक इतकंच मर्यादित प्रकरण होतं.
पण जागतिकीकरण झालं आणि अलिबाबाच्या गुहेसारखी सौंदर्य प्रसाधनांची विविधता समोर आली. नरिशिंग क्रीम, सनस्क्रीन, प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या क्रीम्स, थंडीसाठी कोल्ड क्रीम, बाॅडी लोशन वेगळं.
नाईट क्रीम, अँटी एजिंग क्रीम. गोरेपणा साठी वेगळं क्रीम, पिंपल्ससाठी वेगळं क्रीम.. या सर्वांनी ड्रेसिंग टेबल भरलेलं दिसतं पण यादी काही संपतच नाही.
गंमतीचा भाग असा की पूर्वी या क्रीमना एक ठराविक वयोगटातील आणि ठराविक वर्गातील महिलाच वापरत असत. पण आता बहुतांश वर्गातील मुली महिला सर्रास ही प्रसाधनं वापरतात.
आणि विशेष म्हणजे आईपेक्षा मुलींना या सर्व प्रसाधनांच्या बद्दल व्यवस्थित माहिती असते. त्याच आईला कसं करावं नी काय वापरावं ही माहिती देतात.
मिस इंडिया इतकीच स्पर्धा पूर्वी आपल्याला माहीत होती. पण जागतिकीकरणानंतर मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा स्पर्धा भरवल्या गेल्या.
भारतीय तरुणी तिथंही चमकल्या आणि त्यांना माॅडेल बनवून कितीतरी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नवी सौंदर्य प्रसाधने मार्केटमध्ये आणली.
त्यांच्या किंमती थोड्या जास्त असल्या तरीही सुंदर मी होणार हा प्रत्येक स्त्रीचा आवडता मंत्र आहे त्यानुसार त्यांनी ही प्रसाधनं जवळ केली आहेत.
आजकाल वाढणारं प्रदूषण, सकस आहाराचा अभाव आणि एकंदरीत जीवनशैली यांनी माणसाचं आयुष्य व्यापलं आहे. या सर्वांत चेहऱ्याची, हातांची त्वचा ही जास्तीत जास्त काळ उघडी असते.
आणि जे काही हवेतील, वातावरणातील बदल हे सर्वप्रथम त्वचेचंच नुकसान करतात. ही त्वचा, तिचा पोत चांगला रहावा म्हणून आपण नानाविध प्रकारचे उपाय करतो.
पार्लरचे उंबरे झिजवतो, वेगवेगळ्या प्रकारची फेशिअल्स करुन घेतो. तऱ्हेतऱ्हेच्या क्रीम्स, लोशन यांचा वापर करतो. कधीकधी तुझे आहे तुजपाशी अशी अवस्था असते.
पण आपल्याला त्याची खबरच नसते. निसर्गानं आपल्याला कितीतरी पर्याय दिले आहेत. ज्यांचा वापर करुन आपण आपली त्वचा उत्तम ठेवू शकतो.
कितीतरी साध्या घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून पण आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. निगा राखू शकतो.
आठवतं, आईनं काकडी कोचली की उरलेलं पाणी ती चेहऱ्यावर लावायला सांगायची.. ताक करुन लोणी काढलं की ओशट हात ती हाता पायांवर पुसायची. शिकेकाई रिठा नागरमोथा यांचा वापर केस धुण्यासाठी केला जायचा.
तीच शिकेकाईची पावडर चेहरा स्वच्छ करायला वापरली जायची. अगदी उन्हाळ्याचा त्रास होऊ नये, घामोळे होऊ नयेत यासाठी झळवणीचं पाणी घालायची पद्धत होती.
एकूण काय, पूर्वी ब्यूटी पार्लरला फारसं कुणी जायचं नाही. पौष्टिक आहार, नैसर्गिक उपाय यांनी आपल्या आज्या, पणज्या या शेवटपर्यंत तजेलदार त्वचेच्या मालकिणी होत्या.
–
हे ही वाचा – जेवणानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्यावे का नाही? यामागचे गैरसमज दूर करून घ्या!
–
त्या घरगुती उपाय करुनच सौंदर्य सांभाळत होत्या. सुरकुत्या कमी करणं, चेहऱ्याचा गोरेपणा, तुकतुकीत कांती हे मिळवण्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावेच लागले नव्हते. काय करत होत्या त्या?
आज असाच एक नित्योपयोगी उपाय त्वचा संवर्धनासाठी आम्ही सांगणार आहोत.
उठल्या उठल्या तुम्ही दात घासून झाले की तोंड धुवून पुसून मगच चहा, काॅफी घेता ना? मग तोंड धुवायला गरम पाणी वापरता की गार? गरम पाण्यानं तोंड धुता??? थांबा!
उन्हाळा वगळला तर पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतुत हवा गार असते. मग ताजंतवानं वाटावं म्हणून आणि गारठ्याचा त्रास नको म्हणून तुम्ही सर्रास गरम पाण्यानं तोंड धुता..पण तसं करु नका.
गरम पाण्यानं तोंड धुतल्यावर चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते. कारण चेहऱ्यावर असलेले नैसर्गिक तेल गरम पाण्यानं धुवून निघते. आणि त्वचा कोरडी पडू लागते.
कोरड्या त्वचेवर सुरकुत्या लवकर पडू शकतात. म्हणून गार पाण्यानंच तोंड धुवा. त्यामुळं चेहरा तजेलदार होतो, कारण गार पाण्याने रक्ताभिसरण सुरळीत होते, आणि चेहरा तजेलदार होतो.
थंड पाण्याने चेहरा धुतल्यावर मिळणारा अजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना हा त्रास जास्त जाणवतो.
कारण रात्रभर त्वचेतून झिरपणारे तेल हळूहळू त्वचेवर साठून राहते आणि तेथील रंध्रे बंद होतात. आणि त्याचा परिणाम म्हणून ही दुर्गंधी येते. थंड पाण्याने ही दुर्गंधी धुवून निघते.
तसेच झोपेतून उठल्यावर चेहरा सुजल्यासारखा दिसतो. ती सूज थंड पाण्याचे हबके मारल्याने उतरते. आणि चेहरा चमकदार होतो. मुरुमे, त्यांचे डाग यांच्यापासून पाण्याचा वापर सुटका करून देतो.
म्हणून शक्यतो चेहरा धुण्यासाठी गारच पाणी वापरावे.
–
हे ही वाचा – काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर खरंच घातक परिणाम होतात का?
–
तसेच उन्हातून आल्यावर चेहरा निस्तेज काळवंडलेला दिसतो. गार पाण्याने तो धुवावा. बाहेर उन्हातान्हात फिरताना सूर्यकिरणे त्वचेवर पडतात आणि त्यामुळे त्याचेही दुष्परिणाम त्वचेला सोसावे लागतात.
पण गार पाण्याचा शिडकावा त्वचेला तजेला तर देतोच पण सूर्यकिरण पडल्यामुळे होणारे विविध दुष्परिणाम पण टाळायला मदत करतो.
गार पाणी अँटीरिंकल म्हणजे सुरकुत्या टाळायला अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या वापराने तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण राहते.
गार पाणी चेहऱ्याच्या त्वचेवर टोनिंग करते. गुलाबपाण्यासारखा त्याचा वापर करता येतो. मुलायम कपड्याने सावकाश चेहरा पुसून घ्यावा म्हणजे त्वचा निखरुन येईल.
त्याकरिता कोणतेही महागडे सौंदर्य प्रसाधन वापरण्याची गरज पडणार नाही.
थोडक्यात सांगायचं तर, कंपन्या आपापल्या जाहिराती करणारच. पण तुम्ही त्यातल्या त्यात नैसर्गिक उपाय करुन तुमचं सौंदर्य टिकवू शकता.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.