Site icon InMarathi

चेहऱ्याने फिरंगी असूनही अस्सल भारतीय ठरलेल्या कलाकाराची कहाणी तुम्ही वाचायलाच हवी

tom alter featured inmarathi

thewire.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

९० च्या दशकातील ‘आशिकी’ सिनेमा आपल्यापैकी सर्वांनी बघितला असेलच. हा सिनेमा आपल्या सर्वांना गाण्यांमुळे तर लक्षात आहे. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांनी या सिनेमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं.

या सिनेमात अनु अग्रवाल ज्या हॉस्टेल मध्ये राहत असते त्याचे सुपरवायजर म्हणून Arnie Campbell हे एक पात्र आहे. कमी शब्दात फक्त नजरेने व्यक्त होणारं हे पात्र उभं केलं आहे ते ‘टॉम ऑल्टर’ या कलाकाराने.

गोरा पान मनुष्य, घारे डोळे. कोणालाही बघितलं की फॉरेनर वाटेल असा त्यांचा लूक होता. टॉम ऑल्टर हे बॉलीवूड मध्ये खूप वर्षांपासून काम करत होते.

पण, आपल्या पिढीला त्यांची ओळख ‘आशिकी’ मधून झाली हे तितकंच खरं. ‘मै दुनिया भुला दुन्गा’ या गाण्यात तर ‘टॉम ऑल्टर’ यांचे expressions हे त्यांचा विरोध काही न बोलता दर्शवतात.

 

bollywoodbubble.com

 

कोण आहेत ‘टॉम ऑल्टर’? बॉलीवूड मध्ये कसे आले? इथेच कसे स्थिरावले? या लेखातून आम्ही सांगतोय:

मुंबई सर्वांना सामावून घेते हे टॉम ऑल्टर यांच्या बाबतीत सुद्धा खरं झालं.

अमेरिकन पालक असलेल्या या कलाकाराने ३०० हिंदी सिनेमा आणि टीव्ही सिरियल्स मध्ये सुद्धा काम केलंय हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.

अभिनयासोबत टॉम ऑल्टर यांना क्रिकेट बघण्याची आणि खेळण्याची सुद्धा खूप आवड होती. सचिन तेंडुलकर चा पहिला विडिओ इंटरव्ह्यू घेण्याचा मान टॉम ऑल्टर यांना मिळालेला आहे.

हा इंटरव्ह्यू त्यांनी १९ जानेवारी १९८९ रोजी घेतला होता. तेव्हा सचिन फक्त पंधरा वर्षांचा होता.

 

in.pinterest.com

 

२२ जून १९५० रोजी टॉम ऑल्टर यांचा जन्म भारतातील राजपूर या ठिकाणी झाला. हे ठिकाण डेहराडून आणि मसुरी च्या मध्ये आहे.

१९१६ मध्ये टॉम ऑल्टर यांचा परिवार अमेरिकेतून भारतात आला होता. त्यांचे वडील सियालकोट चे होते. टॉम ऑल्टर यांनी शालेय शिक्षण मसुरी येथे घेतलं होतं.

कॉलेज च्या शिक्षणासाठी टॉम हे अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटी मध्ये शिकायला गेले होते. तिथे कमीत कमी ८ ते ९ तास अभ्यास करावा अशी शिक्षकांची अपेक्षा होती. टॉम हे एका वर्षात परत आले.

त्यांच्या वडिलांनी टॉम यांच्यासाठी हरियाणा येथील जगाधरी येथे शिक्षकाची नोकरी शोधून ठेवली होती.

वयाच्या १९ व्या वर्षी कोणत्याही ट्रेनिंग शिवाय टॉम हे शिक्षक झाले होते. दोन अडीच वर्ष त्यांनी अश्याच नोकऱ्या केल्या.

 

starsunfolded.com

 

त्या काळात टीव्ही नव्हते. टॉकीज डेहराडून येथे होती. महिन्यात एक असा सिनेमा पहायला मिळायचा.

१९७० मध्ये टॉम यांनी राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ हा सिनेमा बघितला. त्यांना हा सिनेमा फारच आवडला होता आणि त्यांनी हा सिनेमा बघून अभिनेता बनायचं ठरवलं.

त्यांनी FTII, पुणे येथे प्रवेश घेतला. १९७२ ते १९७४ या काळात त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं ते सुद्धा गोल्ड मेडल मिळवणारा विद्यार्थी म्हणून.

त्यावेळी नसिरुद्दीन शाह आणि ओम पुरी हे त्यांचे जोडीदार होते. नसिरुद्दीन शाह सोबत टॉम ऑल्टर यांनी ‘मोटली थिएटर ग्रुप’ सुरू केला होता.

मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांना त्यांच्या चेहऱ्यामुळे त्यांना फक्त इंग्रज अधिकाऱ्याचेच रोल मिळायचे.

 

ndtv.com

 

त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो म्हणजे रामानंद सागर यांचं दिगदर्शन असलेल्या ‘चरस’ या सिनेमात एक कस्टम ऑफिसर च्या रोल मध्ये. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते.

त्यांच्या प्रमुख सिनेमांपैकी ‘राम ‘तेरी गंगा मैली’ या सिनेमात मंदाकिनीच्या भावाचा रोल केला होता.

रंगभूमी वर त्यांनी एका नाटकात ‘मौलाना अबुल कलाम आझाद’ यांचा सुद्धा रोल केला होता आणि त्यामुळे त्यांचं हिंदी आणि उर्दु भाषेवर प्रभुत्व वाढलं होतं.

१९९३ ते १९९७ या काळात त्यांनी ‘जुबान संभाल के’ ह्या टीव्ही सिरीयल मध्ये एका ब्रिटिश तरुणाचा रोल केला होता जो की हिंदी शिकण्यासाठी भारतात आलेला असतो.

टीव्हीवरील त्यांनी केलेल्या रोल्स पैकी सर्वात जास्त हिट झालं ते म्हणजे ‘जुनून’ या सिरीयल मधील ‘केशव कल्सी’ हे पात्र. दूरदर्शन वरील हे सिरीयल ८ ते ९ वर्ष चाललं होतं.

या व्यतिरिक्त ‘भारत एक खोज’, ‘शक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’ या गाजलेल्या सिरीयल मध्ये सुद्धा काम केलं होतं.

 

india.com

 

हिंदी सिनेमा व्यतिरिक्त टॉम यांनी बंगाली, असामी, गुजराती, तेलगू, तामिळ सिनेमात सुद्धा काम केलं होतं. २०१७ मध्ये रिलीज झालेला ‘सर्गोशिया’ हा टॉम ऑल्टर यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

आलोक नाथ आणि फरीदा जलाल यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या.

अभिनेता, लेखक आणि पद्मश्री ने सन्मानित असलेल्या टॉम ऑल्टर यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी २९ सप्टेंबर २०१७ रोजी स्किन कॅन्सर मुळे निधन झालं.

जवळपास सगळे रोल्स निगेटिव्ह करूनही स्वतःची ऑफ स्क्रीन इमेज कायम पॉझिटिव्ह ठेवण्यात टॉम ऑल्टर हे यशस्वी ठरले होते.

त्यांच्या डोळ्यातील सच्चेपणाने ते लोकांना कायम खरे आणि त्यांच्या नजरेतील धाक हा कायम एका कुटुंब प्रमुखासारखा वाटला.

टॉम ऑल्टर यांच्या या प्रवासातून आपण एक गोष्ट शिकू शकतो की,

तुमच्या मनामध्ये जर कोणत्या गोष्टीबद्दल ‘पॅशन’ असेल तर तुमचं बॅकग्राऊंड, तुमचा वर्ण, मातृभाषा या गोष्टींना सुद्धा बाजूला सारून आपल्या आवडत्या क्षेत्रात यश मिळवणं शक्य आहे.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version