Site icon InMarathi

चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय सैन्याने बांधलाय गलवान नदीवर ६० मीटर लांब पूल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारत-चीन संबंधात सध्या गलवान खोऱ्यावरून तणाव निर्माण झाला आहे. गलवान नदीवर भारताने सध्या एक ६० मीटर लांबीचा एक पूल बांधला आहे. भारताने हा पूल अत्यंत मजबूत आणि विशाल बनवला आहे.

अर्थात भारताने हे भारताच्या हद्दीतच केले आहे तरीदेखील चीनचा यावरती आक्षेप आहे. हा पूल आता पूर्ण झाला अशी बातमी आली आहे.

भारतीय लष्कराच्या अभियंत्यांना जेव्हा हे काम मिळालं तेव्हापासून एका क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी लडाखमधील गलवान नदीवर हा पूल बांधून तयार केला आहे. ६० मीटर लांबीचा हा पूल अत्यंत कमी वेळात आणि मजबूत बनवला गेला आहे.

हा पूल दारबुक ते दौलत बेग ओल्डी यादरम्यान २५५ किलोमीटरचा रस्ता जो भारत बनवत आहे त्या रस्त्याला जोडणारा आहे. त्यामुळे गलवान खोऱ्यात आता भारताचे वर्चस्व प्रस्थापित होईल अशी भीती चीनला वाटत आहे.

 

deccanherald.com

 

गलवान नदीवर जो हा पूल बांधला आहे त्यामुळे गलवान खोऱ्यात भारताला त्या पुलावरून लष्करी सामान वाहून नेण्यात, लष्करी मोठी वाहने नेण्यासही तसेच लष्करी मदत पुरवण्यास अत्यंत कमी वेळ लागणार आहे.

त्यामुळेच भारताच्या सामरिक सामर्थ्य या भागात वाढू शकतं याची कल्पना आता चीनला आली आहे. म्हणूनच चीन, गलवान व्हॅलीत आपला अधिकार सांगत आहे आणि भारताने हा जो पुल बांधला आहे त्याला विरोध करत आहे.

या पुलाचे बांधकाम बंद करण्यासाठी चीनकडून अनेकदा प्रयत्न झाले, तरीही चीनच्या विरोधाला न जुमानता भारतीय लष्करातील अभियंत्यांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. आता अजूनही त्या भागातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालूच राहतील असे संकेत देखील दिले आहेत.

तीन किलोमीटर लांबीचा हा पूल चार पदरी आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून मजबूत काँक्रीटचा हा पूल बनवला आहे. या पुलापासून जवळच भारताने दोन पेट्रोलिंग पॉईंट तयार केले आहेत. १४ आणि १४ A अशी ती दोन पेट्रोलिंग पॉइंट.

१५ जूनची घटना ही त्या पेट्रोलिंग पॉईंटवरून झाली. त्यादिवशी भारताच्या २० जवानांना चिनी सैनिकांनी मारले. भारताच्या दहा जवानांना बंदी बनवले असे वृत्त आहे. इतकी हिंसक घटना घडून देखील भारतीय सैन्याने या पुलाचे कामकाज थांबवले नाही.

 

hindustantimes.com

 

या दरम्यान भारत आणि चीनमधल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बोलणी सुरू होत्या. भारत आणि चीन सध्या तरी आपापल्या मुद्द्यांवर कायम आहेत. परंतु आता पूल बनवून तयार झाला आहे.

त्यामुळे कोणतीही वाईट परिस्थिती जरी निर्माण झाली तरी आता त्या पूलाच्या मदतीने भारताचे लष्करी सामर्थ्य त्या भागात निश्चितच वाढले आहे.

चीन आता हा दावा करत आहे, की गलवान खोऱ्यात भारताने आक्रमण केले आहे. भारतीय सैन्याने तिथून निघून जावं यासाठीच चीन प्रयत्न करीत आहे.

भारतीय सैन्याने जर तिथून माघार घेतली तर मात्र भारतासाठी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कारण चीन, भारत जो दरबुक श्योक ते दौलत बेग ओल्डी रस्ता बनवत आहे, त्याचं काम थांबवू शकतो. आणि भारताचे शेवटचे गाव मुर्गो मार्गे पाकिस्तानात जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करू शकतो. त्यामुळे एक नवीनच डोकेदुखी भारतासाठी तयार होईल.

मुळात चीनचा जळफळाट यासाठीच होतो आहे की, १० मे पर्यंत चीनला या पूलाबद्दल काहीच माहीत नव्हते. चीनला जेव्हा माहीत झाले तोपर्यंत ७५% पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते.

 

news18lokmat.com

 

त्यानंतर चीनने त्यावर आक्षेप नोंदवला, तरीदेखील भारताने या पुलावरील काम चालूच ठेवले आणि आता १९ जूनपर्यंत पूल बांधून तयार केला.

खरंतर गेल्याच वर्षी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्या भागातील विकासकामांचे उद्घाटन केलं होतं, त्यामध्येच या पुलाच्या कामाचंही उद्घाटन झालं होतं. पण भारत इतक्या लवकर हे काम चालू करेल याची पुसटशीही कल्पना चीनला आली नाही.

भारत जो श्योक ते दौलत बेग ओल्डी हा जो मार्ग बनवत आहेत त्याला देखील चीनचा विरोध नाही. कारण तो मार्ग LAC पासून १० किमी दूर आहे. त्यांचा मोठा विरोध ह्या पुलाला आहे. कारण त्यावरून भारतीय सैन्याला लष्करी मदत लवकर मिळू शकेल.

परंतु भारताने आता चीनला हे ठणकावून सांगितले आहे की, या पुलाचे जे काही बांधकाम झाले आहे ते भारताच्या हद्दीत झाले आहे. आणि पुढेही आमची इथली अनेक विकासकामे चालू राहतील.

चीनला मुळातच भारताने जम्मू काश्मीर मधील ३७० कलम रद्द करणे, जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देणे, लडाखला केंद्रशासित प्रदेश जाहीर करणे या गोष्टींवर आक्षेप आहे. याबाबत चीनने पाकिस्तानची बाजू उचलून धरली आहे.

अक्साई चीनमध्ये भारत काहीतरी कुरापत काढेल असा चीनचा समज आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर गेल्यावर्षी चीनला गेले होते त्यावेळेस देखील त्यांनी भारत कुठल्याही विवादित जागेवर हक्क सांगणार नाही असे सांगितले होते. तरीही चीन त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.

जम्मू काश्मीर तसेच गलवानच्या खोऱ्यात भारत सरकारने जी विकासकामे हाती घेतली आहेत त्यामुळे देखील चीन अस्वस्थ झाला आहे. म्हणूनच चीन आता त्याठिकाणी आपल्या लष्करी हालचाली वाढवत आहे.

त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतदेखील आता त्या खोऱ्यात आपली लष्करी स्थिती मजबूत करत आहे.

 

opindia.com

 

जेव्हा चीनने अक्साई चीनच्या भागात मोठमोठी लष्करी वाहने आणली, सैनिकांची संख्या वाढवली. तेव्हा भारतालाही आपले सामर्थ्य दाखवणे भाग होते.

जर चीनच्या सैनिकांच्या बंदुकातील गोळ्या भारतीय हद्दीत येत असतील, तर भारताच्या सैनिकांच्या बंदुकीतील गोळ्या देखील चीनच्या हद्दीत जाऊ शकतात हे चीनला दाखवून देणे गरजेचे होते. म्हणूनच भारताने आता कठोर भूमिका घेतली आहे.

म्हणूनच भारत आता इथून मागे हटणार नाही. या पुलामुळे भारताचं सामरीक सामर्थ्य वाढणार आहे सैन्याच्या हालचाली जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्या भागातील कोणतीही विकास काम थांबणार नाहीत याची ग्वाही दिली आहे. बंदी बनवलेले १० जवान आता भारताने परत आणले आहेत.

भारताच्या कोणत्याही पोस्टवर चीनच वर्चस्व नाही, आपल्या सीमेत चीनने जे आक्रमण केले होते ते भारताने परतवून लावले आहे. आपल्या सीमा आता सुरक्षित आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version