उत्तम आरोग्यासाठी या धातूची भांडी घरात असणं आहे आवश्यक; फायदे वाचून आश्चर्य वाटेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
या पिढीतल्या मुलांना फक्त पितांबरी माहीत असेल. ते ही जाहिरात पाहून. देवघरातील पूजेसाठी वापरला जाणारा तांब्याचा तांब्या आणि ताम्हण स्वच्छ करायला वापरली जाणारी पावडर म्हणून.
पण मागच्या आणि त्याच्या मागच्या पिढीला कल्हई जास्त माहिती. कारण घरात फक्त आणि फक्त तांब्या पितळेच्याच वस्तू असत. अगदी ताटं, वाट्या, पेले,पातेली, डबे. सगळं काही याच धातूंचं.
आता पितळ्याची भांडी ही काही ठराविक चित्रपटांमध्ये किंवा ऐतिहासिक मालिकांमध्ये पाहायला मिळतात.
वर्षातून दोनदा पितळेची भांडी कल्हई करुन द्यायला कल्हईवाला यायचा. रस्त्यावरच छोटी भट्टी पेटवून तांब्याच्या पितळेच्या भांड्याला आतून कथलाचा पातळसा थर देऊन भांडी चकचकीत केली जात.
त्यामुळं भांड्यात शिजवलेले अन्न पदार्थ खराब होत नसतं. त्यावेळी स्टील, अॅल्युमिनीअमची भांडी वापरली जात नसत. मग आंबट किंवा चिंचेचे पदार्थ जर थेट तांब्या पितळेच्या संपर्कात आले तर ते खराब होत.
त्यांचा धातूशी आलेला थेट संपर्क रासायनिक प्रक्रिया घडून खराब होऊन जायचा. त्याला कळकणं म्हणत. ते होऊ नये यासाठी हा कल्हईचा लेप दिला जाई.
आजकाल स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनीअम, प्लास्टीक, काच, नाॅनस्टीक यांच्या भांड्यांचा वापर सर्रास केला जातो. पण एक काळ असा होता, की दैनंदिन जीवनात फक्त तांब्या पितळेच्या भांड्यांचाच वापर केला जात असे. या मागंही शास्त्रीय कारणे आहेत.
आपल्याकडे प्रत्येक चालीरीतीमागे काहीतरी विज्ञान आहे. ‘मनाला वाटलं म्हणून सांगितलं आणि केलं’ अशा गोष्टी पूर्वी फार कमी होत्या. परंपरेनुसार ज्या गोष्टी चालत आल्या आहेत त्यांचं निसर्गनियमाने पालन केलं जायचं.
भारतीय जीवनशैली ही आयुर्वेदावर आधारीत होती. आयुर्वेदात विविध काढे, चूर्णे, भस्मे आणि धातूंचा वापर करून औषधं बनवली जातात. आजही विविध धातूच्या भांड्यातच ते काढे बनवले जातात. सोने, चांदी, तांबे पितळ यांचा मुख्यत्वे वापर आयुर्वेद करतो.
आजकाल घासायला, धुवायला सोपी म्हणून आपण तांबे पितळ सोडून बाकी सर्व प्रकारची भांडी वापरतो. कारण तांब्या पितळेच्या भांड्यांना घासायला वेळ लागतो. म्हणून आपण स्टील, अॅल्युमिनीअम प्लास्टीक काच नाॅनस्टीक यांचा वापर करतो.
परंतु स्टील, काच हे उदासिन धातू आहेत. नाॅनस्टीक भांड्यांवर जे कोटींग केलेलं असतं, त्यामुळं खूप जुनाट आजार होतात. पण पितळेच्या भांड्यांचा वापर करुन काय फायदे होतात ते आपण पाहू.
पितळ हा धातू तांबे आणि जस्त यांच्यापासून बनलेला मिश्र धातू आहे. पितळ हा शब्द त्याच्या रंगामुळे पडला आहे. संस्कृत भाषेतील पीत म्हणजे पिवळा. जो पिवळा रंगाचा धातू तो पितळ.
धार्मिक दृष्टीकोनातून पिवळा रंग विष्णूला आवडतो. त्यामुळं एकंदरीत पूजा अर्चा करताना ताम्हण, निरांजनं, घंटा ही सर्व पूजेसाठी लागणारी उपकरणे पितळेचीच असतात. आयुर्वेदात पितळ हा धातू धन्वंतरीचा अतिप्रिय धातू मानला जातो.
त्याचं आणखी एक कारण म्हणजे पितळ हा धातू लवकर गरम होतो त्यामुळं इंधनाची बचत होते. पूर्वी पितळेच्या कळशा असत, कारण पितळेच्या भांड्यात ठेवलेलं पाणी जास्त ऊर्जा देतं.
अगदी पुराणकाळात द्रौपदीची अक्षयथाळी होती ती पितळेचीच होती. ज्यातून मिळणारं अन्न हे अखंड होतं. कितीतरी लोकांची भूक भागविण्यासाठी ती उपयुक्त होती असा उल्लेख आहे.
अगदी धार्मिक विधीमध्येही पितळेच्या भांड्यांना जास्त महत्त्व दिले जाते. विवाह विधीमध्ये, कन्यादानात पितळेच्या कलशातूनच पाणी सोडलं जातं. ज्योतिषशास्त्रात तर पितळेच्या भांड्यांना अनन्यसाधारण महत्व आहे.
काही विधीत दानधर्म करताना पितळेच्या भांड्यांचं दान केलं जातं. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करताना पितळेच्या भांड्यातूनच केला जातो. तर बगलामुखी देवीच्या अनुष्ठानातही पितळेची भांडी वापरतात.
कितीतरी ठिकाणी, जेव्हा मूल जन्माला येतं, तेव्हा पितळेची थाळी वाजवून आनंद व्यक्त केला जातो. त्यामागे अशी मान्यता आहे की, आपला कुणी पूर्वजच पुन्हा जन्माला आला आहे.
काही सनातनी हिंदू लोक जन्मापासून मृत्यूपर्यंत पितळेची भांडीच वापरतात. एखादा माणूस मृत्यू पावल्यानंतर दहाव्या दिवशी तिलांजली देताना पिंपळाच्या पानावर पितळी कलशातूनच पाणी सोडले जाते.
अगदी बाराव्या दिवशी सुतक संपलं, की पितळी कळशीत सोन्याचा तुकडा व गंगाजल टाकून ते पाणी घरभर शिंपडून घर स्वच्छ नी पवित्र केले जाते.
साधारणपणे घरोघरी कितीतरी पितळेची भांडी वापरली जात.
पितळेचे पेले, वाट्या, ताटं, फुलपात्र, पितळेची ताटं, थाळ्या, घागरी, हंडे, कळशा, देवतांच्या मूर्ती, नळाच्या तोट्या इतकंच नव्हे तर पितळी बांगड्या, कानातली गळ्यातले हार अशा कितीतरी वस्तू सर्वत्र वापरत.
आयुर्वेदात तर या धातूच्या वापरायचं स्पष्ट कारण आहे. तांब्या- पितळेच्या भांड्यात ठेवलेले पाणी तुमच्या शरीरावर फार चांगले परिणाम करते. त्वचाविकार कमी होतात. शरीरातील अग्नी तत्त्व उद्दीपित करतात.
इतकेच नव्हे तर चयापचय क्रिया सुधारायला मदत करतात. रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी या भांड्यांचा वापर उपयुक्त ठरतो. वातप्रकृतीवर पितळेची भांडी जास्त परिणामकारक आहेत.
पित्तप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पितळ अतिशय गुणकारी आहे. त्याचबरोबर त्वचेचे विकार, स्थूलत्व, यांवरही पितळी भांड्यात शिजवलेले अन्न पदार्थ उपयोगी आहेत.
दृष्टीदोषांवरही पितळेच्या भांड्यात ठेवलेलं अन्न, पाणी फार मोठा प्रभाव टाकतं. पितळेच्या भांड्यातील तूप अतिशय गुणकारी मानले जाते. पचनक्रिया सुधारते. म्हणजे किती विचारपूर्वक आपल्या पूर्वजांनी एकेक गोष्ट तयार केली होती. आपण फक्त वरवरचं बघतो.
केवळ स्वच्छ करायला, घासायला ही भांडी वेळखाऊ आहेत यासाठी आपण आपलं सोडून दिलं आहे. पण जुनं सारंच मरणालागुनी देण्यासारखं नसतं. कधी कधी आपल्या जवळ कितीतरी प्रश्नांची उत्तरे असतात आणि आपण आंधळेपणाने जगभर उत्तरं शोधत फिरत असतो.
ज्योतिषशास्त्रात तर पितळेचे बरेच वेगवेगळे उपयोग सांगितले आहेत.
१. भाग्योदयासाठी-
पितळेच्या वाटीत रात्रभर हरभऱ्याची डाळ भिजत घाला. आणि ती वाटी उशाला ठेवा. सकाळी त्या डाळीत गूळ घालून गायीला खाऊ घाला.
२. धनप्राप्तीसाठी-
अखंड धनप्राप्ती होण्यासाठी पौर्णिमेला तुपानं भरलेला पितळेचा कलश श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून एखाद्या निर्धन ब्राह्मणाला द्या.
३. सुखप्राप्तीसाठी-
वैभवलक्ष्मीला पितळी दिव्यात शुद्ध तूप घालून त्याचा दिवा देवीसमोर लावावा. अखंड सुख मिळतं.
४. सौभाग्यप्राप्तीसाठी-
सौभाग्यप्राप्तीकरीता पितळी भांड्यात हरभरा डाळ भरुन ते विष्णूच्या मंदिरात दान करावं.
या सगळ्यावर आपला विश्वास नसला आणि यातला ज्योतिषशास्त्राचा भाग सोडला तरीही दान देणं श्रेष्ठच आहे. त्यामुळे बाकी काही असो, पण चांगल्या आरोग्यासाठी तांबे पितळ यांचा समावेश आयुष्यात दैनंदिन करावाच करावा.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. कोणत्याही गैरसमजुतीला प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.