आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय खाद्यसंस्कृती विविधतेने नटलेली आहे. आपल्या खान-पान पद्धतींमध्ये प्रत्येक प्रदेशाचा, तिथल्या हवामानाचा, मनुष्याच्या प्रकृतीचा आणि उपलब्ध धान्य पदार्थांचा विचार केलेला आढळतो.
अगदी फोडणीसाठी वापरण्यात येणारी मोहरी, जिरे, हिंग किंवा कढीपत्ता हे पण केवळ स्वादासाठी समाविष्ट केलेले नसून त्यात असणाऱ्या औषधी गुणधर्माचा सुद्धा विचार केला गेला आहे.
इतर खाद्यसंस्कृती प्रमाणे मूळ भारतीय खाद्य पदार्थांत, ‘जंक फूड’ तुम्हाला सापडणार नाही.
असाच एक पदार्थ जो आपण सहसा जेवणानंतर खातो तो म्हणजे बडीशेप!
काही दशकांपूर्वी घरोघरी पानाचं तबक किंवा पेटी असायची त्यात कात, चुना, सुपारी, इलायची- लवंगा असा सगळा जामानिमा असायचा आणि या सगळ्या पदार्थात खास असायची तो म्हणजे बडीशेप किंवा सोप!
उगीच येता जाता फराळ म्हणून बडीशेप खाण्याचा मोह सगळ्यानाच होत असतो. आपण भारतीय लोकांनी कल्पकतेने बडीशेप सोबत निरनिराळे प्रयोग करून पाहिले.
उदा. मुखवास, भाजकी बडीशेप, धना-डाळ टाकून केलेला प्रकार इतकच नाही तर बडीशेप साखर एकत्र करून बडीशेप च्या रंगीबेरंगी गोळ्या सुद्धा तुम्ही खाल्ल्या असतील.
कुठल्याही भारतीयांच्या घरी हमखास सापडणारा असा हा पदार्थ! बऱ्याचदा बडीशेप ही मुखवास किंवा ‘माऊथ फ्रेशनर’ म्हणून खाल्ली जाते.
पण केवळ तोंडाची दुर्गंधी घालवणे इतकाच या पदार्थाचा गुणधर्म नाही. याचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत.
सौफ किंवा बडीशेप मध्ये बरेच खनिज द्रव्ये जस की, तांबे, पोट्याशीयम, कॅल्शियम, झिंक, मँगनीज, क जीवनसत्त्वे, लोह, मँगनेशियम इत्यादी.
इतकी पोषकतत्व असलेला पदार्थ फक्त मुखवास म्हणून उपयुक्त नाही, तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते शरीरात पाण्याची योग्य मात्रा राखण्यापर्यंत महत्वाच्या कामासाठी हे उपयोगी आहे.
बडीशेप ची झाडं हिरव्या आणि पांढऱ्या रंगात आढळतात. यांना पिवळी फुले येतात.
आपण खात असलेली बडीशेप म्हणजे या वनस्पतीचे बी!या झाडाच्या मुळापाशी असणाऱ्या कंदाचं शुद्ध औषधी महत्व आहे.
चला तर मग जाणून घेऊयात सहजच चाळा म्हणून किंवा मुखवास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या बडीशेप चे औषधी महत्त्व.
१. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात उपयुक्त :
आहार शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार ,बडीशेप चावून खाल्ल्याने आपल्या लाळेतील नायट्रेट चं प्रमाण वाढते. नैसर्गिकरित्या मिळालेल्या नायट्रेट मुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रित राखण्यात मदत होते.
या शिवाय बडीशेप मधे पोटॅशियम सुद्धा आहे जे पेशींसाठी आणि आपल्या शरीरातल्या आवश्यक द्रव्यांपैकी एक आहे. पोटॅशियम हृदयाचे ठोके सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं.
२. अनावश्यक पाणी शरीराबाहेर टाकण्यास मदत :
जर बडीशेपचा चहा करून प्यायला म्हणजे बडीशेप पाण्यात टाकून ते उकळून पिल्यास शरीरातील अनावश्यक द्रव पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
तसेच बडीशेप च्या अर्काने विषारी घटक त्या पाण्यावाटे शरीराबाहेर टाकले जातात. पर्यायाने मूत्रमार्गाच्या संसर्गापासून शरीराचा बचाव होतो.
३. बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटफुगी वर गुणकारी :
बद्धकोष्ठता,पोटफुगी आणि अपचन सारख्या पचनसबंधी तक्रारींवर बडीशेपचा अर्क रामबाण ठरतो. बडीशेप पाण्यात टाकून ते मिश्रण उकळल्यावर त्या पाण्यात बडीशेप मधील तैल पदार्थ मिसळतात.
सौफ मध्ये estragole, fenchone आणि anethole ही रसायने सापडतात. या रसायनांचा मुख्य गुणधर्म हा स्नायूंचा तणाव व दाह कमी करणे आहे.
या अर्काने आतड्यातील अन्नपचन करणारे घटक तयार करून (enzymes) कार्यान्वित झाल्याने पचन सुलभतेने होते. बडीशेप चा चहा या अर्थाने अगदी हमखास इलाज ठरतो.
४. अस्थम्याच्या लक्षणात आराम :
बडीशेप मध्ये फायटो न्यूट्रियंट्स सापडतात. यांच्या मदतीने सायनस कमी होण्यास मदत होते.सायनस मधे नाकाच्या पोकळीतील त्वचा सुजून त्याचा दाह होतो.
बडीशेप अर्काच्या सेवनाने ब्रॉंकायटीस, कफ, सर्दीने गच्च झालेले नाक कमी होण्यास मदत होते.
५. रक्तशुद्धीकरणात महत्वाची भूमिका :
बडीशेप मधे असलेल्या तेल आणि फायबर मुळे आपल्या शरीरातून विषारी घटक पाण्याच्या साह्याने बाहेर जाण्यास मदत होते.परिणामी रक्त शुद्धीकरण सोपं होऊन जातं.
नको असलेले घटक अगोदरच बाहेर टाकले गेल्याने ,आवश्यक पोषक द्रव्ये शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषले जातात.
६. दृष्टी साठी उत्तम :
दररोज मूठभर बडीशेप खाल्याने तुमच्या डोळ्यांचं आरोग्य नक्कीच सुधारेल. बडीशेप मध्ये अ जीवनसत्त्व सापडतं जे दृष्टी साठी अतिशय आवश्यक आहे.
आपल्या देशात प्राचीन काळात ग्लुकोमा ने होणाऱ्या दृष्टीतला अधू पणा कमी करण्यासाठी ,बडीशेप चा औषध म्हणून वापर करायचे.
७. जैव-प्रतिबंधक म्हणून उपयुक्त :
संशोधकांच्या अभ्यासानुसार बडीशेप चे गुणधर्म आपल्या शरीरात येणाऱ्या काही घातक बॅक्टेरियाना आणि बुरशीला प्रतिबंध करण्यास उपयोगी ठरतात.
त्याने ई-कोली किंवा स्कॅनडिया सारख्याना दूर ठेवण्यास मदत होते.
८. मानसिक आरोग्यात लाभदायी :
काही संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की बडीशेपच्या अर्काने वयोमानानुसार येणाऱ्या विसराळू पणा कमी करता येऊ शकतो.
९. आयुर्वेदिक महत्त्व :
बडीशेप च्या नियमित सेवनाने त्रिदोष म्हणजे कफ, वात, पित्त नियंत्रित राहतात.
शरीराला थंडावा देण्याचा गुणधर्म बडीशेप मध्ये आढळतो, त्यामुळे खासकरून उन्हाळ्यात बडीशेप चं पाणी पिल्यास त्याचा पुष्कळ फायदा शरीराला होतो.
बडीशेप मध्ये अनेक तैल पदार्थ सुद्धा आहेत त्यातील काही तेल हे पोटातील अपानवायू घालवण्यासाठी तर काही स्नायूंना आराम देण्याचा फायदा देतात.
यामुळेच आयुर्वेदात मसाज साठी सुद्धा बडीशेप च्या तेलाचा वापर होतो. स्नायूंना आराम आणि मेंदूला आराम मिळाल्याने विचारांत सुसूत्रता देण्यास या तेलाच्या मसाज चा उपयोग होतो.
१०. मुरूम- पुटकुळया घालवण्यास मदत करते :
नियमित बडीशेप चं सेवन केल्यास शरीराला आवश्यक झिंक, कॅल्शियम, सिलिनीयम सारखी खनिज द्रव्ये मिळू लागतात.
हॉर्मोन्स ना नियंत्रित ठेवून पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) उपलब्ध होतो.बडीशेप सेवनाने त्वचेला थंडावा मिळतो आणि एक नैसर्गिक पोत येतो.
११. कॅन्सर पासून बचाव :
बडीशेप मधे बरेच फ्री रॅडीकल्स सापडतात. यांचा प्रमुख गुणधर्म तणावाने निर्माण होणारे विषद्रव्ये शरीराबाहेर टाकणे होय. या कार्यामुळे शरीराचा त्वचा,पोट आणि स्तनाच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
आयुर्वेदात तर बडीशेप चं पुष्कळ महत्व आहेच. पण भारतीय पाककलेत सुद्धा याचा वापर केला जातो. शरीराला थंडावा देणाऱ्या गुणधर्मांमुळे बडीशेप लोणच्या सारख्या पदार्थात वापरली जाते.
बऱ्याच मिठायांमध्ये सुद्धा याचा वापर होतो
पण – गरोदर स्त्रियांनी बडीशेप सेवन करू नये :
प्रमाणात बडीशेप खाणं नक्कीच फायदेशीर आहे पण काही खास अवस्थांमध्ये जर मोठ्या प्रमाणात याचे सेवन केल्यास शरीरावर विपरित परिणाम होतो.
बडीशेप मध्ये इस्ट्रोजेन या हार्मोन्स चे गुणधर्म सापडतात.
महिलांसाठी पाळीच्या त्रासातून आराम देण्यासाठी बडीशेप नक्कीच उपयुक्त आहे. परंतु गर्भावस्थेत याचे सेवन हानिकारक ठरू शकतं.
इस्ट्रोजेन च्या अधिक मात्रे मुळे गर्भाच्या वाढीला आणि विकासासाठी अडथळे उत्पन्न होऊ शकतात. एका अभ्यासानुसार बडीशेप मधल्या तेलांचा अति प्रमाणात घेतलेला डोस गर्भाच्या पेशीवर विपरीत परिणाम घडवतो.
साधारण परिस्थितीत बडीशेप खाणं हितकारकच आहे. परंतु गर्भावस्थेतल्या स्त्रियांनी याचे प्रमाणात सेवन करावे तसेच बडीशेप पासून मिळणाऱ्या तेलाचा अजिबात वापर करू नये.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.