निराश व्यक्तीला सावरण्यासाठी, तुम्ही काय करू शकता? त्यांना धीर देण्यासाठी, हे वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आत्महत्येच्या केसेस तर आपण आए दिन ऐकत, वाचत असतो. परंतु त्यातही जेव्हा सेलिब्रिटी असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असे घडते तेव्हा लोक अधिक चर्चा करू लागतात. अधिक व्यथित होतात.
कारण या सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनात, त्यांच्या भावविश्वात स्थान मिळवलेलं असतं. त्यामुळे लोक अधिक हळहळतात. आणि त्या व्यक्तीने असं का केलं असेल अशा प्रश्नात हरवतात.
कधी कधी लोक असाही विचार करतात, की अरे, या माणसाजवळ तर सगळं काही होतं. जे सर्वसामान्य माणसाला सहजासहजी लाभत नाही ते ते सगळंच. पैसा, प्रतिष्ठा, यश, प्रसिद्धी, रुप, गुण, शिक्षण.. मग तरीही त्याने असं का करावं?
बहुतेक आत्महत्या या डिप्रेशनमधूनच संभवत असतात. कशामुळे येत असेल हे डिप्रेशन? सर्व काही व्यवस्थित चालू असताना देखील?
कोरोना प्रादुर्भावात लॉकडाऊनचा काळ हा मोठा विचित्र, भयभीत करून सोडणारा, माणसाचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त करणारा काळ आहे. या काळात माणसे नैराश्येने ग्रासली गेलीत.
शिवाय हा काळ अस्थिर आहे. त्याचे भवितव्य अजून दृष्टीपथात नाही. अशावेळी पुढे माणसं अधिकाधिक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे.
अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या आहेत. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. असे लोक अधिक खचले आहेत. येत्या काळात आत्महत्येच्या अजून घटना घडून येतील का अशी भीती वाटत आहे. कारण त्या तशा घडत आहेत.
आकडेवारी असं म्हणते, की जगभरात दर ४० सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्येने होतो. आपल्या ओळखीतल्या लोकांना असं काही डिप्रेशन आहे का?, ते लोक अशा डिप्रेशनमध्ये सापडलेत का? हे आपण सावध राहून नेहमी तपासायला हवं.
अशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.
मात्र तरीही अशा व्यक्ती सर्वांशीच आपली व्यथा शेअर करतील असं नाही. जर कधी त्यांनी आपल्याला मदत मागितली, किंवा तसं आपल्याला जाणवलं तर आपण निदान त्या व्यक्तीला आपल्याकडून होईल तितकी मदत करायचा प्रयत्न करायला हवा.
अनेक व्यक्ती निरनिराळ्या कारणांनी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. कुणाचं ब्रेक-अप झालेलं असतं, तर कुणाला नोकरी-व्यवसायाची चिंता असते. कुणाचं घरातल्यांशी पटत नसतं, तर कुणाला कामाच्या ठिकाणी हॅरेसमेंट असते.
अशी एक ना दोन अनेक कारणं डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात.
डिप्रेशनमध्ये गेलेल्या काही व्यक्तींचे हे डिप्रेशन त्यांना बघताच जाणवते. तर काही लोक हे डिप्रेशन आतल्या आत लपवून बाहेर हसऱ्या चेहऱ्याने वावरत असतात, अशांची डिप्रेशन मानसिकता लवकर लक्षात येत नाही. अनेकदा लक्षात येईस्तवर वेळ निघून गेलेली असते.
अनेकदा आपल्याला वाटते, की आपण अशा व्यक्तीला मदत करायला हवी होती. परंतु त्यासाठी ही मदत कशी करायची हे आधी समजून घ्यायला हवं.
अनेक ठिकाणी अशा मनस्थितील्या लोकांसाठी हेल्पलाईन्सदेखील चालवल्या जातात. मात्र मदतीसाठी अशा मानसिक आंदोलनात अडकलेल्या व्यक्तीला नेमकी मदत कशी करायची हे शिकून घ्यायला हवं.
काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. याला सुसायडोलॉजी म्हणतात. ती जाणून घ्यायला हवी.
त्यासाठी पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या पाच गोष्टी सोप्या आणि सरळ आहेत. मात्र त्या जर तुम्ही शिकून घेतल्यात तर एखाद्याचे प्राण तुम्ही नक्कीच वाचवू शकाल.
विचारपूस करा –
लोकांना असं वाटतं, की अशाप्रकारे डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीशी जर आत्महत्येबद्दल काही विषय काढला, किंवा त्याला त्याबद्दल काही विचारलं तर तो आत्महत्या करण्याच्या विचारांकडे अधिक झुकेल. परंतु प्रत्यक्षात तसं नाही.
संशोधनातून असं निष्पन्न झालेलं आहे, की अशा व्यक्तींना उलट विचारपूस करण्याची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे एखाद्याच्या भावस्थितीबद्दल जर तुम्हाला शंका आली, तर त्याला विचारा,
‘तू बरा आहेस ना? काही समस्या आहेत का? तुला माझ्या मदतीची गरज असली तर तसं विनासंकोच सांग. तुझ्या मनात आत्महत्येचे वगैरे विचार तर येत नाहीत ना?’
हे विचारायला कचरू नका. त्यावर ती व्यक्ती काय म्हणते ते शांतपणे ऐकून घ्या. ते ऐकत असताना त्याला, त्याच्या विचारांना खोटं पाडू नका. जजमेंटल बनू नका. त्याचे विचार किंवा त्याची समस्या नाही पटली, तरी ती चुकीची आहे असं म्हणू नका.
तुमच्या बोलण्याचा, प्रतिसादाचा सगळा रोख सकारात्मकतेकडे हवा. त्याला आयुष्याबद्दलचा रस वाढेल असा हवा. हे लक्षात असू द्या.
आपण जेव्हा एखाद्याची अशी आस्थेने विचारपूस करतो तेव्हा त्या व्यक्तीला कुणीतरी आपली आस्थेने विचारपूस करणारं आहे याचा दिलासा मिळतो.
“केवळ चौकशा” हा हेतू असेल, तर ती व्यक्ती अधिक डिप्रेशनमध्ये जाईल हेही लक्षात असू द्या. मग ती व्यक्ती आपल्याबद्दल गॉसिपिंग होईल का? या विचाराने अधिक गप्प होईल. तुम्हाला त्या व्यक्तीची काळजी आहे हे दिसू द्या.
त्यांना सुरक्षित ठेवा –
त्या व्यक्तिला खरीखुरी मदत मिळवून तिला त्या विचारांपासून परावृत्त करता येत नसेल तोपर्यंत तिच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करा. अशा व्यक्तीला एकटं सोडू नका.
त्या व्यक्तीने आत्महत्येचे काही प्लॅन्स बनवलेत का? काही प्रकार ठरवलेत का? ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
अशी व्यक्ती स्वतःला इजा करून घेऊ शकेल अशा वस्तू घरातून काढून टाका. त्याच्या हाताला लागणार नाहीत अशा प्रकारे दूर ठेवा. त्याला त्या वस्तूंपासून दूर करण्याचा प्रयत्न करा.
त्याच्यासोबत राहा –
आत्महत्या करण्याचे विचार करणाऱ्या व्यक्तीच्या सोबत राहा. त्याच्याशी संवाद साधत राहा. बोलत राहा. तुम्ही खरंच त्या व्यक्तीची मदत करू इच्छिता याची त्याला खात्री वाटेल असे प्रयत्न करा.
अशा व्यक्तींना सल्ला देणारी व्यक्ती नको असते, तर आपलं ऐकून घेणारी कुणीतरी चांगली श्रोता हवी असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगले श्रोता बना.
त्याचं जास्तीत जास्त ऐकून घ्या आणि कमीत कमी सल्ले द्या. त्याला अजून कोणाची मदत हवी का ते जाणून घ्या. एखाद्या व्यक्तीशी त्याला संवाद करायचा आहे का ते जाणून घेऊन त्यासाठी त्याला जमेल तितकी मदत करा.
त्याला हवी असलेली मदत करा –
त्या व्यक्तीला हव्या असलेल्या गोष्टी करा. त्याला कोणाशी बोलायचं असेल, कोणाला भेटायचं असेल, पण ती व्यक्ती बोलायला, भेटायला तयार नसेल, तर त्या दोघांची गाठभेट घालून त्यांच्यात संवाद घडून येईल अशी व्यवस्था करा.
जर ती व्यक्ती त्या क्षणी मरायला निघाली असेल, तर ताबडतोब तिला काऊन्सेलरकडे घेऊन जाण्याचा, किंवा काऊन्सेलरची मदत मिळवण्याचा ताबडतोब प्रयत्न करा.
अशा व्यक्तींसाठी अनेक हेल्पलाईन्स असतात, त्या शोधून त्यांची मदत घ्या. (नॅशनल सुसाईड प्रिव्हेन्शन लाईफलाईन क्रमांक 1(800)273-TALK (8255) ही हेल्पलाईन २४ तास मोफत सेवा देते. त्यांच्याशी संपर्क करा.
याशिवायही अनेक स्त्रोत आहेत. चॅट हेल्पलाईन्स, फोन ऍप्स, एसेमेस सेवा अशा अनेक सेवा अशा व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत. त्यांची मदत घ्या. त्याने त्या व्यक्तीला तात्पुरतं त्या वेळेसाठी तरी आत्महत्येपासून तुम्ही परावृत्त करू शकाल.
त्यानंतरही त्या व्यक्तीशी संवाद साधत राहा. त्याला जेव्हाही कधी डिप्रेशन पुन्हा येईल तेव्हा त्याला आपल्याशी आधी संवाद साधायला सांगून ठेवा.
त्यामुळे पुन्हा जेव्हा कधी त्यांच्या मनात विचार येईल, तेव्हा त्यांना एकदा तरी तुमच्याशी बोलावंसं वाटेल. आणि तुम्ही त्यांना पुन्हा मदत करू शकाल.
मधल्या काळात त्या व्यक्तीशी संवाद सुरू ठेवा. त्याला सकारात्मक विचार पुरवत राहा. त्याच्या मनात जगण्याविषयी इच्छा निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहा. त्यासाठी चतुरपणे संवाद साधता मात्र यायला हवा.
पाठपुरावा करा (फॉलो अप)
अशा व्यक्तींचा सतत पाठपुरावा करत राहावा लागतो. त्यांच्यावर लक्ष ठेवून राहावे लागते. त्या व्यक्तीलाही तुम्ही तिच्या मदतीसाठी उपलब्ध आहात याची जाणीव राहील असे करा.
आत्महत्येचे विचार पुन्हा पुन्हा व्यक्तीच्या मनात येत राहतात. एकदा त्याला वाचवले म्हणजे ती व्यक्ती पुन्हा तसा प्रयत्न करणारच नाही असं नाही. त्या व्यक्तीशी सातत्याने संवाद साधत राहिल्याने तुम्ही त्याच्यासाठी हवे तेव्हा उपलब्ध आहात, असा दिलासा त्याला मिळेल.
एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनमध्ये गेलेली पाहणे, आणि त्याने आत्महत्येसाठी प्रयत्न करताना पाहणे ही गोष्ट दुःखदायक आहे. परंतु लक्षात ठेवा, की तुम्ही त्या व्यक्तिला आत्महत्येपासून नक्कीच वाचवू शकता.
आत्महत्येचे विचार हे त्या क्षणाला तरी तात्पुरते असतात. तो एक क्षण जर निवळला तर व्यक्ती त्या वेळेपुरती तरी परावृत्त होते. तो क्षण टळणं महत्त्वाचं असतं.
त्यानंतर सातत्याने त्या व्यक्तिशी संपर्कात राहणे महत्त्वाचे असते. प्रत्येकवेळी त्याचे विचार आणि कृती यांच्या दरम्यान आपण भिंत बनून उभं राहता आलं पाहिजे.
अशी अनेक उदाहरणेही आहेत, की एकेकाळी आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या व्यक्ती नंतरच्या काळात आपलं आयुष्य पूर्ण सकारात्मकतेने आणि यशस्वीपणे जगल्या आहेत.
त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती वारंवार आत्महत्येचे प्रयत्न करत राहते असंही नाही. काही लगेच, तर काही थोड्या प्रयत्नांनी त्यातून बाहेर येतातच.
आणि आपल्यापैकी प्रत्येकजण हे नेक काम करू शकतो.
Ask and Prevent Suicide, Suicide Crisis Support, Virtual Hope Box, आणि My3 Safety Plan App हे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला परावृत्त करण्यासाठी मोबाईल अॅप्स आहेत. यांची मदत नक्की घ्या.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.